कस्तुरी भाग ३९

शशांकच्या वडिलांनी रुपाला शशांकला भेटायला यायचे नाही असे सांगितले.


कस्तुरी
भाग ३९

" अरे यार फोन कट केला की काय...!!! काही समजेना ग. जाऊ दे सोड रुपा.‌कोणाचे तरी काही काम असेल तुझ्याजवळ जे तू सुट्टीत असून सुद्धा तुला फोन करत आहे ती किंवा तो. बघुया सकाळी पुन्हा फोन येतोय का. तू तुझा मुड खराब करून घेऊ नकोस. बरं ऐक ना तुझ्या कामाबद्दल रोज दिवसभरात तुला कसले अनुभव येतात सांग ना. " कामिनी म्हणाली.

" हे काय किती वेळा तुम्हाला बोलावते मी या ग माझ्या कडे रहायला निवांत. पण तुम्ही कुठे ऐकता. नेहा चे तर नेहमीचीच कहाणी असते सुट्टी सुरू झाली की हिच्या नणंदा आल्याच घरी. येऊ दे ग मी नको यायला असे म्हणत नाही पण एखाद्या सुट्टीच्या दिवसात हिला पाठवावे न पण ते करत नाहीत या दोघी हेच वाईट वाटते. कामिनी तू तर काही बोलूच नकोस. तुला तुझा रोमिओ सोडत नाही. त्यांना पण सोबतीला घेऊन ये म्हटले तर त्यांना सुट्टी मिळत नाही." असे लाडिक स्वरात थोडीशी नाक मुरडत रुपा म्हणाली.

रुपाच्या बोलण्यावर दोघीही काही न बोलता पटकन तिच्या जवळ जाऊन तिला घट्ट मिठी मारत म्हणाल्या," नको न रे रागाऊ. तू अशी रागे भरले की कशी गोल गोल पुरी फुगते न तशीच दिसते टम्म टम्म टमटमीत." असे म्हणत दोघी तिच्या चेहऱ्यावरुन हात फिरवू लागल्या.

" बास बास झालं हो नाटक तुम्हा दोघींचें." असे म्हणत रुपा गालातल्या गालात हसली.

रुपा आपले रोजचे अनुभव कामामध्ये होणाऱ्या गमती जमती,रोज कसे वेगवेगळ्या लोकांबरोबर काम करत असताना काही तरी विनोदी प्रसंग तर कधी कधी येणारे वाईट प्रसंग हे सर्व सांगू लागली. दिवसभर काम करून थकून भागून घरी आली की कशी शांतामावशी गरमागरम चहा नाश्ता आणून देते. आपुलकीने विचारपूस करते अगदी आई,आजी करायची तशीच हे सांगताना नकळतच रुपाचे डोळे पाणावले.

" खरंच ग रुपा आई कशी अचानक आपणास सोडून देवाघरी गेली.अजूनपण मला कोडे सुटले नाही. आई न आजारी पडली न काही तिला त्रास होत होता.पण ती अशी कशी गेली. असे काय झाले जे तिने जेवणच सोडले. तसे पाहिले तर तुझ्या तिन्ही भावजयी चांगल्या आहेत गं. म्हणजे बघ ना तेव्हा आजी बाथरुममध्ये पाय घसरून पडली ती बिछानाच धरला. तेव्हा तिची सेवा या तिघी सूनांनी कशी केली हे पाहिले आहे आम्ही. अगदी लहान बाळासारखे जपायच्या त्यांना.दादा केअरटेकर लावतो म्हणाला पण या तिघिंनी लावून दिले नव्हते. स्वतः या तिघी आजीचे सर्व काही कामे करायच्या. कधीही कुरबुर न करता. अशा सूना मिळणे अहो भाग्य म्हणायचे. पण आईचे काही समजलेच नाही ग." नेहा म्हणाली.

" हो न. तेव्हा मी पण आईंना भेटायला गेले होते तेव्हा त्या काहीही न बोलता फक्त रडायलाच लागल्या होत्या." कामिनी म्हणाली.

" हो ग . त्यादिवशी मला आईचा फोन आला होता. तेव्हा शेवटचेच बोलली ती त्यानंतर बोलणेच बंद केले. तेव्हा तिने पुन्हा एकदा माझ्या लग्नाचा विषय काढला आणि नेहमीप्रमाणेच मी नकार दिला. तेव्हा ती खूप चिडली. मला म्हणाली जोपर्यंत तू होकार देत नाहीस तोपर्यंत मी अन्न प्राशन करणार नाही. मला वाटले ती नेहमीप्रमाणे एकदिवस राग करुन बसेल म्हणून मी पण लक्ष दिले नाही. त्यानंतर मी इअर एन्ड चे काम जास्त होते त्यातच संपूर्ण आठवडा व्यस्त झाले. तसे दादा वहिनीचा रोज एक फोन व्हायचा तेव्हा आईबद्दल विचारले तर ती देवघरात आहे असेच सांगायचे मी पण ठिक आहे म्हणत काम जास्त आहे असे सांगून फोन ठेवायची.

आणि त्या दिवशी सकाळी दादाचा फोन आईची तब्येत खूपच बिघडली आहे तिला दवाखान्यात दाखल करावे लागेल. हे ऐकताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी जायची तर सुट्टी मिळेना कामे खूप. कशी बशी कामे आटोपून रजा घेऊन आली. तेव्हा खूप वेळ झाला होता. आई जवळ जवळ शेवटची घटका मोजत होती. तिचे प्राण माझ्यातच अडकले होते. मी दवाखान्यात पळतच गेले तेव्हा मला शून्य नजरेने पाहत तिने आपले प्राण त्यागले." असे म्हणत रुपा रडू लागली.

" अरेरे....!!!! " दोघी एकदमच म्हणाल्या.

" पण मला सांगा मी मनापासून शशांकला माझा नवरा मानले होते. मी प्रेम केले होते. जर मनात तो आणि लग्न दुसऱ्या बरोबर हा धोका होणार नाही का ? मी त्याची खूप वाट पाहत होती पण तो....!!!!

असे म्हणत रुपाने आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

" हो रुपा ठाऊक आहे ग आम्हाला. तुमचे दोघांचेही एकमेकांवर प्रेम होते ते देखील अतोनात. पण ...!!!! काय माहित कोणाची नजर लागली तुमच्या प्रेमाला." कामिनी म्हणाली.

" हो न ग. तरी त्यादिवशी मी शशांकला म्हटले होते बरे का की तू इतकी सुसाट वेगाने गाडी चालवत जाऊ नकोस पण तो तेव्हा मला बघून जोरजोराने हसायला लागला होता. आणि म्हणाला मी या रविवारी जवळच्या शहरात मोटारसायकलच्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी जाणार आहे तेव्हा बघ सुवर्ण पदक घेऊन येतो की नाही. तेव्हा का कोणास ठाऊक माझ्या मनात भीतीने गाळण उडाली होती. मला आतून असे वाटत होते की काही तरी विपरीत घडणार आहे. पण पुन्हा म्हटले की त्याच्या काळजीपोटी मला असे वाटत असेल. पण घडायचे ते घडलेच.

शशांकचा त्या स्पर्धेत जीवघेणा अपघात झाला. आणि त्यामध्ये त्याचा पाय कायमचाच निकामी झाला. तेव्हा मी त्याला भेटायला दवाखान्यात गेले तर त्याला झोप लागली होती. त्याचा तो सुजलेला चेहरा त्याचा एकच राहिलेला पाय पण तो देखील पूर्णपणे प्लास्टर लावलेल्या अवस्थेत दुसरा पाय तर .....!!!!!!" असे म्हणत रुपा एकदम ओक्साबोक्शी रडू लागली.

" हो ग रुपा . माहित आहे ग आम्हाला. तेव्हा जितके वाईट तुला वाटत होते तितकेच वाईट आम्हाला पण वाटले गं. पण मला एक कळले नाही रुपा . शशांक असा अचानक कुठे गायब झाला. तेव्हा तुझे त्याच्याबरोबर काही बोलणे झाले होते का ? " नेहा म्हणाली.

रुपाने आपले डोळे पुसत म्हटले," नाही ग. त्यादिवशी त्याला झोप लागली होती म्हणून मी तिथेच काही वेळ बसले होते नंतर त्याचे वडील म्हणाले मी आहे इथे तू जा घरी वेळ होत आहे. काही लागले तर बोलावून घेईन तुला.मग मी घरी आले. दुसऱ्या दिवशी सकाळी मी लवकरच दवाखान्यात गेले तर तिथे परीस्थिती एकदमच उलटलेली होती. शशांकचे वडिल मला बघून एकदमच चिडले आणि म्हणाले पुन्हा का आलीस तुला येऊ नकोस म्हटले होते न. शशांकला तर आता तुला भेटायची इच्छा नाही. परत इथे तू येऊ नकोस असेच त्यांचे म्हणणे आहे. प्लिज तू जा इथून.

मला काहीच कळले नाही हे असे का बोलत आहेत. मी त्यांना म्हटले असे का बोलता तुम्ही फक्त एकदा मला शशांकला भेटू द्या नाहीतर फक्त बघू तरी द्या ना. हे ऐकून ते पुन्हा चिडले आणि जोरजोराने ओरडू लागले. त्यांचे ओरडणे ऐकून दवाखान्यातील नर्सने येऊन मला बाहेर जायला सांगितले हा दवाखाना आहे इथे असे ओरडून बोलायचे नसते असे म्हणत. मी तिला देखील खुप गयावया करून सांगितले पण तिने माझा एकही शब्द ऐकला नाही. मी रोज नचुकता दवाखान्याच्या बाहेर जाऊन उभी राहायची की चुकून कधीतरी शशांक बाहेर येऊन उभारेल मला दिसेल पण तो दिसलाच नाही. जवळजवळ एक महिना मी जात होती. जेव्हा महिना झाला तेव्हा मी माझ्या छोट्या भावाला दवाखान्यात पाठवून शशांक ची चौकशी करून ये म्हटले तेव्हा तो दवाखान्यात जाऊन चौकशी करायला लागला तेव्हा तिथून कधीच डिस्चार्ज मिळाला होता शशांकला तो घरी देखील गेला होता असे कळाले. हे ऐकून मला धक्काच बसला मी तर रोजचं जायची पण मला तर ते बाहेर पडलेले दिसलेच नाही तर केव्हा घेतला असेल डिस्चार्ज.
त्यानंतर लगेचच मी शशांकच्या घराजवळ गेले तर पहाते तर त्याच्या घराला मोठे कुलूप आणि तिथेच एक पाटी लावली होती घर विकणे आहे."

क्रमशः
©® परवीन कौसर
बेंगलोर

🎭 Series Post

View all