Feb 29, 2024
नारीवादी

कस्तुरी भाग ३८

Read Later
कस्तुरी भाग ३८


कस्तुरी
भाग ३८

तिघी मैत्रीणींनीं एकमेकांना कडकडून मिठी मारत एकमेकांचे पटापट पापे घेतले. आपल्या वयाचे भान विसरून त्या जणूकाही आपल्या बालपणात निघून गेल्या होत्या. एकमेकींकडे पहात आपापले डोळे न पुसता एकमेकींचे डोळे पुसत होत्या.त्यांना काय बोलावे हेच सुचत नव्हते. त्यांचे डोळेच सारेकाही सांगत होते. तोच किचनमध्ये कुकरची शिट्टी वाजली तशा या तिघी भानावर आल्या.

" अरे रुपा तुला आवडतो न तसा कुकरमध्ये वेजपुलाव केला आहे ग. तू येणार तेव्हा गरम असावा कारण तुला नेहमीच गरम गरम पुलाव आवडायचा वाफाळलेला म्हणून." असे म्हणत नेहा आत किचनमध्ये गेली.

कामिनी रुपा दोघी हाॅलमध्ये सुंदर अशा सोफ्यावर बसल्या.

" छान ठेवले आहे घर नेहाने.अगदी नीटनेटके टापटीप." रुपा म्हणाली.

" हो . तसे तिला आधीपासूनच आवडतो टापटीप पणा त्यात नवरा पण शिस्तप्रिय मिळाला आहे. मुलांना देखील चांगली शिस्त लावली आहे दोघांनी. या उलट माझे आहे बघ. मी आधीपासूनच आळशी . तुझ्या आजी जवळ काहीसं शिकले पण माझा नवरा आहे शिस्तप्रिय पण माझा मुलगा माझ्यावर गेला आहे आणि मुलगी बापावर. मग कोणाचेच गणित बरोबर येत नाही. होतो मग घरात हेदौस." कामिनी हसत हसत म्हणाली.

" असुदे ग. तो पण एक वेगळाच आनंद नाही का.असा आनंद सर्वांच्याच नशीबात नसतो गं." असे म्हणत नकळतच रुपाचे डोळे पाणावले.

इतक्यात नेहाने जेवणाचे टेबल लावले आहे चला जेवायला मग रात्र आपलीच आहे असे म्हणत दोघींना आत बोलावले.

" अरे बापरे...!!! एव्हढे सारे पदार्थ. कधी केले ग. इतका स्वयंपाक कसा केला एकटीने." रुपाने डायनिंग टेबलवर सजवलेल्या वेगवेगळ्या डिशेस बघून म्हटले.

" छ्छे गं....! मी एकटीने कुठे केले हे. काही पदार्थ कामिनी ने केले. तर ही कोशिंबीर अहोंनी केली. हा फ्रुट सॅलड आमच्या छोट्या पिल्लू ने केले. अगं तो इतके सुंदर डेझर्ट बनवतो. सगळे यु ट्युब वर बघून शिकला बघं. इतका लहान आहे पण खूप आवड ग त्याला. हे तर त्याला मास्टर शेफ म्हणून बोलावतात." नेहा अगदी आनंदाने म्हणाली.

तिघींच्या गप्पा रंगल्या होत्या. गप्पा मारत मारत तिघिंचे जेवण कधी संपले हेच कळले नाही.

जेवण झाल्यानंतर नेहाने कामिनीला मदतीस घेऊन सगळा किचनमधील पसारा आवरला.तोपर्यत रुपा आपला फोन हाताळत होती. तिला पुन्हा त्याच अननोन नंबरने \"हाय\" असा मेसेज आला होता.

\" कुणाचा नंबर असेल हा ? ट्रू कॉलरवर नाव सारेगमप सूर असे येत आहे.\" रुपा मनात म्हणत होती.

" कसला विचार करतेस रुपा. काय झाले ? " नेहा म्हणाली.

" अगं नाही ग. पण आज एका अनोळखी नंबरने फोन येत होता . उचलला की आवाज ऐकू आला नाही. नंतर याच नंबरने हाय असा मेसेज. नाव बघ ट्रू कॉलरवर सारेगमप सूर असा दाखवतोय. काही समजेना." रुपाने चिंतित स्वरात म्हटले.

" अगं यात एव्हढा विचार करण्यासारखे काही नाही.चल असेल कोणी तरी . तुझ्या कडे काम असेल त्याचे. तुझा फोन लागत नसावा प्रवासात यामुळे मेसेज करत असेल तो किंवा ती. हे घे तुझ्यासाठी खास कडक फिल्टर कॉफी केली आहे." असे म्हणत नेहाने काॅफीचा मग रुपाच्या हातात दिला.

कामिनी ने आपल्याला चहा बनवला.

" अगं हे काय कामिनी तू आणि चहा....!!!! " रुपाने कामिनी कडे बघून आश्चर्याने म्हटले.

" अगं यांना चहा आवडतो मग मी कुठे वेगवेगळे चहा कॉफी करत बसू.मग झाली सवय गेली आवड." कामिनी ने हसत पण किंचित लाजत म्हटले.

" ओहो क्या बात है. बघं कशी लाजते. जशी नववधू प्रिया मी बावरते तशी." नेहाने हसत हसत म्हटले.

" इश्श काही तरी काय." असे म्हणत कामिनी पुन्हा लाजत लाजत चहाच्या मगाकडे बघू लागली.

" अरे रुपा तुला ती अश्विनी आठवते का गं. ती ग ती जी शेवटच्या बाकावर बसायची. नेहमी मॅडम ओरडायच्या तिला. कधी बघेल तेव्हा झोपाच काढायची. अगं ती कशी तेल लावून चपचपीत दोन वेण्या घालून काॅलेजला यायची. अगं परवा मला ती माॅलमध्ये भेटली. म्हणजे मी तिला ओळखलेच नाही तिनेच मला ओळखून हाय असे म्हटले. मग मी कोण मला बोलावतेय हिला तर मी ओळखत नाही असे प्रश्नार्थक नजरेने पाहिले तर ती म्हणाली अगं असं काय मी अश्विनी. ओळखले नाही का मला. तुम्हाला सांगते काय बदललीय ती बापरे...!!!! इतकी मॉडर्न की काय सांगू. केस स्टाईलीश कटिंग केलेले. उंच सॅंडल,काळा गॉगल, सुंदर पर्स हातामध्ये, ड्रेस तर इतका सुंदर विचारु नका.

मी तिला बघून आ वासून उभीच राहिली. मग ती पुन्हा माझ्या जवळ आली आणि म्हणाली कशी आहेस नेहा. अगं मी लग्नानंतर अमेरिकेतच होते. आता दोन आठवडे झाले आली आहे.बहिणीच्या मुलाचे लग्न आहे म्हणून. अगं इतकी बदलली आहे ती तुम्ही उद्या बघाल तिला तेव्हा तुम्ही पण ओळखणार नाही तिला." नेहा म्हणाली.

" अगं मग तिने गृप वर फोटो का नाही टाकला तिचा. तसे पण खूप जणांनी आपला फोटो टाकलेला नाही. आता खरंच कधी एकदा सगळ्यांना भेटू असेच झाले आहे मला तर." कामिनी म्हणाली.

" हो ग . बघ न गौरव मेसेज करतोय तो पण खास या गेट टुगेदर साठी दुबई वरुन आला आहे पण फोटो टाकत नाही. आणि शशांक सुद्धा.....!!!!" नेहा बोलता बोलता एकदमच शांत झाली.

कामिनी देखील नेहा कडे आपले डोळे मोठे करून बघितले. रुपा या दोघींकडे बघून न बघितल्यासारखे करत पुन्हा एकदा आपला फोन बघू लागली.तोच पुन्हा तिला त्याच नंबरवरुन प्रश्न चिन्हाची ईमोजी आली. आता मात्र रुपा गोंधळून गेली.

" अगं हे बघा गं पुन्हा त्याच नंबरवरुन प्रश्न चिन्हाची ईमोजी." रुपा म्हणाली.

" इकडे दे रुपा तो नंबर मला.मी करते माझ्या फोन वरून फोन.बघुया मला तरी काही उत्तर मिळते का." असे म्हणत कामिनी ने रुपा कडून नंबर घेऊन आपल्या फोनवरून फोन केला.

" हो होतीय रिंग. बघुया कोण आहे तो कि ती." कामिनी म्हणाली तोच तिकडून फोन कट केला गेला.

क्रमशः
©® परवीन कौसर
बेंगलोर
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//