कस्तुरी भाग ३७

रुपा मंदिराच्या बाहेर आली आणि ती आपले सॅंडल घालत होती तोच समोरून एक गाडी सुसाट वेगाने धावत आली. तशीच ती म्हणाली," अरे शशांक इतक्या वेगाने गाडी चालवत जाऊ नकोस रे."
कस्तुरी
भाग ३७

रुपा शशांक या दोघांना बघून राधाने त्यांच्या लग्नाचे मनोरे मनामध्ये रचायला सुरुवात केली.दादाचे लग्न अगदीच सुंदररित्या पार पडले. सगळे नातेवाईक, फॅक्टऱी मधील सर्व कामगारांना आमंत्रण दिले होते. सर्व जण लग्न छान झाले असे म्हणत वधू वराला आशीर्वाद देत होते. घरामध्ये आनंदी वातावरण निर्माण झाले होते.

नव्या सूनेचा गृहप्रवेश अगदीच थाटामाटात झाला. आजी तर अगदीच खूश होती. नातसून आली आपल्या घरी हे बघून तिचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. ती सूनेजवळच बसून होती.

" सुंदर आहे हो सून..!" असे जो तो म्हणत होता.

हे ऐकून आजी हळूच सूनेची दृष्ट काढत होती. राधाला आज आपल्या नवऱ्याची खूप आठवण येत होती. नवीन वधूवरांना तिने आपल्या नवऱ्याच्या फोटो जवळ नेले.

" आज या दिवशी तुमची खूप आठवण आली हो. इतकी वर्षे एकही दिवस असा गेला नाही की तुमची आठवण आली नाही.पण आज रोजच्या पेक्षा जास्त आठवण आली. आज आपल्या मुलाचे लग्न झाले. या आनंदाच्या क्षणी तुम्ही नाही. इतकी वर्षे मुलांकडे बघून मी आयुष्य जगत होते पण अशा प्रसंगी तुम्ही हवे होता‌. तुमच्या आशीर्वादाची गरज आहे आपल्या लेकरांना." असे म्हणत राधा ने आपल्या डोळ्यांतील अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

तिच्या बरोबर रुपा देखील रडत रडत आपल्या आईला मिठी मारत म्हणाली," आई बाबा आहेतच ग आपल्या बरोबर नेहमी. ते कुठेही गेले नाहीत. आपल्या मनात आपल्या आठवणीत ते आहेत गं...!"

" नको बाळा आजच्या शुभ दिनी घरात सांजवेळी दिवा लागण्याच्या वेळी असे रडणे भरल्या घरात बरोबर नाही बाळांनो." असे म्हणत आजीने राधा,रुपाचे डोळे पुसले.

" ताई चहा थंड झाला. थांबा मी पुन्हा गरम करून आणून देते." वहिनीच्या आवाजाने रुपाने एकदम दचकून मागे वळून पाहिले.

" नको वहिनी असुदे. आता मला थंड चहा प्यायची सवय झाली आहे. कामात असले की चहा ठेवल्या जागीच थंड होऊन जातो.आणा पिते तसाच मी." असे हसत हसत रुपा म्हणाली.

" आत्या....!! आत्तू....!! " एकच जोराचा आवाज करत पळत पळत दादाची दोन्ही मुले येऊन पटकन रुपाला मिठी मारली.

" अरे हो हो...!!!! आधी हातपाय धुवून या कपडे बदला मग आत्याला मिठी मारा..!" वहिनी म्हणाली.

" नाही नाही आम्ही असेच भेटणार आत्तूला. हो की नाही आत्तू."

" हो रे माझ्या बाळांनो." असे म्हणत रुपाने मुलांचे पटापट पापे घेतले.

मुलांची बडबड बडबड सुरु होती. रुपा पण आनंदाने टाळ्या वाजवून त्यांच्या बोलण्याला प्रतिसाद देत होती.मुलांबरोबर आनंदी असणाऱ्या रुपाला बघून वहिनीने मनात म्हटले,\" ताईंनी तेव्हा जर लग्नाला होकार दिला असता तर आज त्या आपल्या मुलांबरोबर अशाच आनंदी राहिल्या असत्या. का त्यांनी तेव्हा नकार दिला असेल हे एक गुढच आहे....!!!!!!\"

इतक्यात रुपाचा फोन वाजला.

" हाय मॅडम वेलकम इन अवर सीटी.कधी येतेस. आम्ही अगदी चातकासारखी वाट पाहत आहोत तुझी. आणि हे बघ डिनर इथेच करायचा आहेस तू. गेस व्हाॅट...!!! आज कामिनी ने तुझ्या आवडीच्या अळूवडी केली आहे त्याचबरोबर लाडू जे आजीने शिकवले होते त्या पध्दतीने." नेहा फोन वर अगदीच जोरजोराने बोलत होती.

" ये नको न आत्तू. आज तू माझ्या जवळच हवीये." असा लाडिक स्वरात छोटी प्रिया म्हणजेच दादाची मुलगी म्हणाली.

" अगं आजच जाते तिकडे मी. यानंतर आठ दिवस रहाणार आहे हो मी इथेच . माझ्या या गोड छकुली जवळ." असे म्हणत रुपाने प्रियाला आपल्या जवळ घेतले.

" वहिनी मी नेहाच्या घरी जाते. सकाळी येईन मी. शांतामावशीं ड्रायव्हर राहतील इथे." रुपा म्हणाली.

" हो ताई तुम्ही काही काळजी करू नका. मी व्यवस्था करते त्यांची. पण सकाळी लवकर या हो. नाश्त्याला शाबुखिचडी बनवते तुमच्या आवडीची." वहिनी म्हणाली.

" हो मी फोन करेन सकाळी. बघुया या दोघींनी काय काय प्ल्यन केले आहेत ते." असे म्हणत रुपा उठली.

" ताई गाडी काढू ?" रुपा हातामध्ये बॅग घेऊन बाहेर पडत होती हे बघून ड्रायव्हर म्हणाला.

" नको नको जाईन मी चालत चालत. तेवढेच पाय मोकळे होतील माझे. तुम्ही जेवण करून निवांत झोपा. आराम करा. सकाळी मुलांना शाळेत सोडायला जा." असे म्हणत रुपा निघाली.

शहरातील रस्ते तेच होते पण तिथल्या इमारती बदलल्या होत्या. काही ठिकाणी असलेली दुकाने बंद होऊन तिथे शाॅपिंग मार्ट झाले होते. समोरच असलेली चहाची टपरी ती आता नव्हतीच त्याच्या जागी फास्ट फुडचे हॉटेल झाले होते.एकेक नवनवीन दुकाने सुशोभित झाली होती.शहर तेच रस्ते तेच पण खुप सारे बदल झाले होते. रुपाला तिथून जाताना तिला तिच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळत होता. इतक्यात तिला समोर एक महिला एका दुकानाच्या बाजूच्या फुले विकत बसलेली दिसली. तिचा चेहरा ओळखीचा वाटला पण कोण असेल असा मनात विचार करत रुपा तिच्या जवळ गेली. जवळ जाताच तिने त्या महिलेला ओळखले.

" नमस्ते शैला मावशी. ओळखलं का मला ?" रुपा म्हणाली.

" कोण...? नाही न...!!"

" अहो मावशी मी रुपा. राधाची मुलगी." रुपाने चेहऱ्यावर स्मित हास्य करत म्हटले.

" अगं बाई...!!! रुपा तू !! मी ओळखलेच नाही तुला. अगं आता वयोमानानुसार आठवत नाही आणि दिसतही नाही डोळ्यांना . कशी आहेस लेकी. बस बस इथे बस माझ्या जवळ." असे म्हणत शैला मावशीने आपल्या जवळील एका फडक्याने ती बसलेल्या फरशीवर पुसत पुसत म्हटले.

" नाही नको . जाते मी वेळ होतोय. येईन निवांत नंतर मी. पण तुम्ही अजूनही फुले विकतात या वयात देखील ?" रुपाने विचारले.

" हो बाळा . काय करू. पोटाचा प्रश्न आहे. हे गेले लवकरच तेव्हा एक लेक होता माझा सोबतीला. तो हातभार लावायचा गं.इथेच वड्याची गाडी होती. कसं दृष्ट लागावी असा चालायचा गाडा त्याचा. पण....!!! पण त्यादिवशी वड्यांना लागणारे साहित्य आणायला बाजारात गेला तेव्हा एका मोठ्या ट्रकने उडवले ग लेकाला माझ्या. जागीच गतप्राण झाला बघं." असे म्हणत ती रडू लागली.

" अरेरे खुपचं वाईट झाले मावशी. पण मला एक सांगा त्याचा अपघात झाला तर त्याची काही नुकसान भरपाई म्हणजे पैसे मिळाले नाही का ?" रुपाने विचारले.

" नाही बाळा कुठले पैसे कसले पैसे...!!! आणि कशाला हवेत पैसे. सोन्यासारखा पोर गेला माझा. त्या पैशाचे काय करु मी सांग." असे म्हणत ती रडू लागली.

" तसे नव्हे मावशी. शेवटी तुमचा पण उदरनिर्वाह व्हायला हवा न. मी करेन मदत.आहे मी काही दिवस." असे म्हणत रुपाने आपल्या पर्स मधून पाचशे रुपयांची नोट काढून शैला मावशीला देत म्हटले," मावशी पाचशे रुपयांची फुले द्या मला."

" अरे वेडी कुठली...!!! पैसे कशाला ग . घेऊन जा किती हवीत ती फुले." असे म्हणत तिने तिचे पैसे परत केले.पण रुपाने ही पैसे देऊनच विकत घेणार फुले अथवा नाही असे सांगून तिला पैसे देऊन अगदी थोडीशीच फुले घेऊन ती निघाली.

मनामध्ये शैला मावशीला मदत करण्याचा निर्णय घेऊन रुपा हळूहळू नेहाच्या घरी जाऊ लागली. वाटेवर असलेल्या मंदिरात जाऊन ती फुले देवाला वाहून थोडावेळ तिथेच उभारुन रुपा मंदिराच्या बाहेर आली. बाहेर येऊन ती आपली सॅंडल घालत होती तोच एक झूम्म करून मोटरसायकल जोरात हवेच्या वेगाने तिच्या जवळून गेली.

" अरे शशांक किती वेळा सांगितले तुला इतक्या वेगाने गाडी चालवत जाऊ नकोस." रुपाच्या तोंडातून अचानक हे वाक्य बाहेर पडले.

आणि तशी ती स्तब्ध होऊन उभी राहिली.

इतक्यात तिचा फोन वाजला या आवाजाने ती एकदम भानावर आली.

" हो हो आले आलेच...! पाच मिनिटांत पोहचते बघं." असे म्हणत रुपाने फोन ठेवला.

तिच्या डोळ्यासमोर शशांक बाइकवर स्वार होऊन येत आहे असेच दिसू लागले होते.नकळतच तिचे डोळे पाणावले.तिच्या मनामध्ये प्रश्नाचे काहूर माजले होते.एक न अनेक प्रश्न तिला भेडसावत होते. या तंद्रीत चालत चालत ती नेहाच्या घरासमोर येऊन उभारली.

तिथे गेल्यावर रुपाने घराच्या दारावर थाप मारली.

दार उघडताच नेहा आणि कामिनी दोघींनी रुपाला घट्ट मिठी मारत," वेलकम डियर." असे एकदम दोघींनी मिळून म्हटले.तिघींनीही आपापल्या ड़ोळ्यातील अश्रूंना वाट मोकळी करून दिली. खूप दिवसांनी म्हणण्यापेक्षा खूप वर्षांनी या तिघी जीवलग मैत्रीणी आज भेटत होत्या.

क्रमशः
©® परवीन कौसर

🎭 Series Post

View all