कस्तुरी भाग ३६

दादाच्या लग्नात रुपा शशांक या दोघांना बघून आजीने आणि राधा ने यांच्या लग्नाचे मनोरे मनामध्ये रचायला सुरुवात केली


कस्तुरी
भाग ३६

रुपा खिडकीच्या काचेत आपला चेहरा बघून गालातल्या गालात हसली. पुन्हा एकदा आपले हवेच्या वेगाने भुरभुरणारे केस कानामागे करण्याचा प्रयत्न करत करत पुन्हा आपला चेहरा निहारु लागली. इतक्यात तिचा फोन वाजला तसा तिने आपला फोन पर्स मधून काढून बघितले कोणाचा फोन आहे. तर पुन्हा तोच नंबर.

\" अरे हा कोण आहे किंवा ही कोण आहे ? फोन उचलले तर बोलत नाही.\" असे मनात म्हणत तिने फोन उचलला.

" हॅलो...! कोण ?" रुपा म्हणाली.

तिकडून काही आवाज आला नाही.

" हॅलो कोण आहे ? तेव्हा पासून येतोय तुमचा फोन पण आवाज येत नाही. नेटवर्क इश्यू असेल तर मी काही वेळाने करते फोन." असे म्हणत रुपाने फोन ठेवला.

तोच पुन्हा एकदा फोन वाजला.

" छ्छे...! पुन्हा तोच नंबर आहे की काय ?" असे म्हणत रुपाने फोन बघितला तर कामिनीचा फोन.

" हाय डियर ...! कुठं पर्यंत पोहोचली. आजची रात्र आपण खूप मज्जा करायची आहे. पुन्हा एकदा आपण आपले आयुष्य जगायचे बिंधास्त. आपापल्या जवाबदाऱ्या आपापली कामे आपली वय सर्व काही विसरून जायचे. तू मी नेहा आपण तिघीच. विद्यार्थी जीवन अनुभवायला मिळणार पुन्हा आज आपल्याला ." कामिनी म्हणाली.

" अरे अगदी जवळच आलो आहोत. पोहचतोय लवकरच." रुपा म्हणाली.

" रुपा मॅडम लवकर या हो. तुझ्या येण्याच्या वाटेवर डोळे लावून बसलो आहोत आम्ही." नेहाने कामिनी बोलत असताना मध्येच येऊन म्हणाली.

" बापरे...! तुम्ही दोघी एकत्रच आहात. मग काय धमाल सुरू असेल न तुमची. पण तुमचे दोघींचे नवरे कुठे ग ?" रुपा म्हणाली.

" या दोघांना आम्ही त्यांच्या माहेरी पाठवलंय मुलांना घेऊन." नेहा म्हणाली.

" त्यांच्या माहेरी?" रुपा म्हणाली.

" अगं बाई माहेरी म्हणजे दोघींचेही नवरे त्यांच्या त्यांच्या आजोळी गेले आहेत. मुलांना घेऊन. मग ते त्या दोघांचे माहेर न ग." असे म्हणत नेहा कामिनी दोघीही जोरजोरात हसू लागल्या.

" कठीण रे बाबा कठीण आहे." असे म्हणत रुपा पण हसू लागली.

काही वेळातच गाडी रुपाच्या दादाच्या घरासमोर येऊन उभारली. वहिनी दारातच उभी होती.

" किती वेळ झाला. केव्हा पासून वाट बघत होती मी.आणि हे काय किती बारीक झाला आहात. आता जाऊच देणार नाही तुम्हाला लवकर . नुसते काम काम काम. नकोच आता." वहिनीने रुपाला बघताच बोलायला सुरुवात केली.

" अगं हो हो...! सगळं इथेच बोलणार आहेस का ? तिला आत तर येऊ दे." दादा हसत हसत म्हणाला.

दादाच्या बोलण्यावर वहिनी पण हसू लागली. रुपा ,शांतामावशी पण हसायला लागल्या.

वहिनीने रुपाच्या पायावर पाणी घातले. भाकरीचा तुकडा तिच्या वरुन ओवाळून घराच्या दोन्ही बाजूला टाकले.

" या या आत या." असे म्हणत तिच्या हातातील पर्स घेऊन वहीनी आत आली.

ड्रायव्हरने गाडीमधून सर्व सामान आत आणले. शांतामावशीने पटकन खाऊची बॅग काढून वहीनीच्या हातात दिली.

" हो ग रुपा वहिनी बरोबरच बोलली. तू बारीक झाली आहेस गं.कामाचा व्याप वाढला आहे का?" दादा म्हणाला.

" छ्छे रे दादा तसे काही नाही. खूप दिवसांनी बघितले न तू मला म्हणून तसे वाटत आहे तुला. आहे तशीच आहे मी." रुपा म्हणाली.

तोच वहीनीने गरमागरम चहा आणि बदामाचा शिरा करुन आणून सर्वांना दिला.

" शांतामावशी तुम्ही आत जाऊन आराम करा जरा वेळ. सकाळी लवकर उठला होतात तुम्ही.गाडीत पण झोपल्या नाहीत. तुम्ही पण करा आराम." रुपाने ड्रायव्हरला आणि शा़तामावशीला म्हटले.

" हो ताई." असे म्हणत शांतामावशी उठून वरच्या मजल्यावर गेल्या.

" नको ताई मी जरा बाहेर जाऊन पाय मोकळे करुन येतो." ड्रायव्हर म्हणाला.

" बरं ठिक आहे." असे म्हणत रुपा उठली.

रुपाने मुलांना आणलेले चाॅकलेट्स, मिठाई,खेळणी सगळ्या वस्तू काढून बाहेर ठेवल्या.

" कधी येणार आहे वानरसेना ? घरात नसली की घर कसं खायला उठते." रुपा म्हणाली.

" येतील इतक्यातच. आज ती दोघेही शाळेला जायला तयारच नव्हती. जबरदस्तीने पाठवले आहे त्यांना." वहीनी हसत हसत म्हणाली.

रुपा पण हे ऐकून हसायला लागली.

रुपाने समोर भिंतीवर लावलेल्या फोटोंकडे पाहून आपले पाणावलेले डोळे पुसले. भिंतीवर तिचे आई बाबा आणि आजी या तिघांचे फोटो होते.रुपाने उठून आजीच्या फोटो वर हळूच हात फिरवला.

" आजी तू खूप घाई केलीस ग लवकर जाण्याची." असे म्हणत रुपा तिथेच उभारली ‌. तशी तिला आपल्या अंगावर मंद वाऱ्याची झुळूक आली असे जाणवले. वाऱ्याच्या झुळूकाबरोबर तिघे मन तिच्या आजीच्या आठवणीत गेले.

रुपाचा बारावीचा निकाल जाहीर झाला. तिला ९७ टक्के गुण मिळाले. वर्तमान पत्रामध्ये तिचे नाव आले. शहरातील टॉप टेन मुलांमध्ये तिचा नंबर आला होता. कॉलेज मध्ये, तिच्या शाळेमध्ये तिच्या मित्र मैत्रिणी मध्ये तिचा सत्कार करण्यात आला. तिचे नाव कॉलेजच्या बॅनरमध्ये लावण्यात आले. कामिनीच्या आईवडिलांनी तिला खूप आशीर्वाद देत अशीच प्रगती करत रहा असे सांगितले.शशांक देखील चांगले गुण घेऊन पास झाला. त्याने डिग्री पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या कॉलेज मध्ये प्रवेश घेतला. नेहा कामिनी पण चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्या. आता या चौघा मित्र मैत्रिणींनी आपापल्या करीयर साठी वेगवेगळ्या वाटा निवडल्या. शशांकचे तर आधीच ठरले होते डिग्री झाली की परदेशात जायचे. कामिनीला फॅशनडिजानर व्हायचे होते. तिच्या आईवडिलांची इच्छा होती की ती डॉक्टर व्हावी पण तिच्या इच्छेनुसार त्यांनी तिला मेडिकल मध्ये प्रवेश घेण्याचे टाळले.नेहाला बॅंकेत नोकरी करायची होती म्हणून तिने आपले बी एस्स सी पूर्ण करायचे ठरवले. आता नेहा रुपा दोघींनी एकाच कॉलेजमध्ये डिग्री पूर्ण करण्यासाठी प्रवेश घेतला.

चौघांच्या वाटा वेगवेगळ्या झाल्या तरीदेखील या चौघांनी प्रत्येक रविवारी एकाच ठिकाणी भेटायचे ठरवले.

आता दादाच्या लग्नाची तयारी जोरात सुरू झाली होती. रुपाने आपल्या सर्व वर्ग मित्र मैत्रिणींना आमंत्रित केले. लग्न अगदीच सुंदररित्या पार पडले. आज रुपाने आपल्या आजीची ठेवणीतली पैठणी नेसली होती. ती पैठणीत खूपच सुंदर दिसत होती. शशांक तर तिला बघतच उभा राहिला. हे बघून नेहा कामिनी दोघीही एकमेकींना बघून गालातल्या गालात हसत होत्या.

इतक्यात शशांकचा मित्र त्याच्या जवळ जाऊन म्हणाला ,

" हृदयात वाजे समथिंक
सारे जग वाटे हॅपीनिंग"

" ये काही तरीच काय...!" शशांक ने हसतच म्हटले.

लग्नात सर्वांनी एकत्र उभे राहून फोटो काढले. सर्व फोटो मध्ये रुपाच्या शेजारी शशांकच उभा होता.हे पाहून आजीने एकदम राधाला म्हटले ," राधा हे बघ हा कसा अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा दिसतो आहे बघ. काय म्हणतेस ? मला तर नातजावई पसंत आहे हो."

आजीच्या सांगण्यानुसार राधानेही शशांकला आपल्या जावयाच्या रुपात बघितले. ती पण मनोमनी आनंदली.

" खरंच खूपच छान दिसतात दोघेही. तुम्ही म्हणता तसे झाले तर किती बरे होईल न. " राधा म्हणाली.

या दोघांना बघून आजी आणि राधाने रुपाच्या लग्नाचे मनोरे मनामध्ये रचायला सुरुवात केली.

क्रमशः
©® परवीन कौसर

🎭 Series Post

View all