भाग ३५
\" ते बघ तो पण आपल्या दुःखात सहभागी झाला आहे म्हणूनच तो असा अवकाळी बरसतो आहे." असे शशांकने म्हटल्याबरोबर रुपाने आपल्या डोळ्यांतील अश्रू पुसत आकाशाकडे बघू लागली.
दोघेही या अवकाळी पावसामध्ये मनसोक्त भिजून गेले.नकळतच या पावसाच्या धारांनी यांच्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
आता या दोघांची मैत्री खूपच घनिष्ठ झाली. दोघांमध्ये विचारांची देवाणघेवाण होत होती त्याचबरोबर एकमेकांना समजून घेऊन एकमेकांना साथ देत होती. यांना सोबत देण्यासाठी नेहा कामिनी या दोघी याचबरोबर रुपाचा दादा आणि कामिनीचा भाऊ हे दोघेही होते.
बघता बघता सहा महिने उलटून गेले.सहामहीची परीक्षा झाली. ही सगळी मित्र मैत्रिणी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली. घराचे बांधकाम पण पुर्ण झाले. रुपाची बारावीची परीक्षा झाली की दादाचे लग्न करायचे असे ठरले होते. लग्नाच्या गोंधळात तिच्या अभ्यासाला व्यत्यय नको म्हणून तिची परीक्षा झाली तर लग्न करायचे असे राधा याचबरोबर आजी देखील म्हणाली.पण या आधी घराची वास्तुशांती करुन मगच गृहप्रवेश करायचा असे आजीने सांगितले.
वास्तुशांतीसाठी मुहूर्त बघून दिवस ठरवला गेला. रुपाने आपल्या सर्व वर्ग मित्र मैत्रिणींना आमंत्रित केले. राधाने आपल्या फॅक्टऱी मधील सर्व कामगारांना आमंत्रण दिले.
वास्तुशांती दिवशी रुपाने फिकट पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. या रंगांमध्ये तिचे रुप अजूनही खूलुन दिसत होते. दुपारी तिचे सगळे वर्ग मित्र मैत्रिणी आले. घराबाहेर अंगणात मोठ्ठा मांडव सजवलेला होता. मांडवाला फुलांची सजावट अगदीच सुंदर केली होती. फुलांच्या सुगंधाने सारा परिसर दरवळून गेला होता. सनईचे रेकाॅर्ड लावले होते.यामुळे सर्वत्र अगदीच प्रसन्नतेचे वातावरण निर्माण झाले होते.सर्वांचे जेवण झाल्यावर रुपाने आपले घर दाखविण्यासाठी सर्वांना आत घरामध्ये नेले.
हाॅल खूपच सुंदर होता. हॉलमध्ये सुंदर सोफा सेट त्याचबरोबर इनडोअर प्लॅन्ट, सुंदर फुलांची फ्लाॅवरपॉट, एक मोठी फिशटॅंक खिडक्यांना दारांना सुंदर रंगाचे पडदे. अगदीच सुंदर असा सजवलेला हॉल होता. एकेक करून सर्व खोल्या दाखवून नंतर वरती टेरेसवर ती आपल्या मित्रांना घेऊन गेली. टेरेस गार्डन खूपच सुंदर होते. एकापेक्षा एक सुंदर अशा फुलांची झाडे.त्याचबरोबर काही फळभाज्या पालेभाज्या पण लावलेल्या होत्या.टेरेसवर मधोमध एक झोपाळा होता. सर्वांनी टेरेस गार्डनची खूप स्तुती केली.
" या सगळ्या झाडांची लागवड देखभाल आजीच करते ." रुपा म्हणाली.
" वाह मस्तच...!" सर्वांनी एकदमच म्हटले.
" आणि हे बघा न इथे पाण्याची टॅंक आहे न तर त्याचे पाणी टॅंक भरून खाली पडून वाया जाऊ नये म्हणून आजीने कशी आयडीया केली आहे." असे म्हणत रुपा तिथे लावलेल्या पाईपजवळ गेली तोच तिचा पाय त्या पायिपमध्ये अडकला आणि तिचा अचानक तोल गेला. ती खाली पडणार तोच तिला पटकन शशांकने तिच्या कंबरेला धरून तिला पडता पडता वाचविले. ती इतकी घाबरली आणि घाबरून पटकन आपले डोळे बंद केले. तिने केसांची बांधलेली नॉट एकदमच निघाली आणि तिचे केस मोकळे होऊन तिच्या चेहऱ्यावर रुळू लागले. शशांक तिचे हे रुप एकसारखे निहारु लागला. समोर सगळी मुले आ वासून उभे राहून बघू लागली. इतक्यात नेहाने जोरजोरात टाळ्या वाजवत हसायला लागली.तिच्या हसण्याच्या आवाजाने ही दोघे भानावर आली. रुपा पटकन उठून उभी राहिली. ती थोडीशी लाजलेली थोडीशी घाबरलेली बावरलेली होती. तिला कळेचना की काय बोलू न काय नको.तिच्यासारखीच काहीशी अवस्था शशांक ची होती.
" ह्रदयात वाजे समथिंक
सारे जग वाटे हॅपीनिंग
दिसतो सदा मी ड्रीमींग" असे म्हणत कामिनी ने हळूच रुपाला चिमटा काढला.
सारे जग वाटे हॅपीनिंग
दिसतो सदा मी ड्रीमींग" असे म्हणत कामिनी ने हळूच रुपाला चिमटा काढला.
आता कॉलेजमध्ये या दोघांना सगळेजण बघून हसत होते.
" काहीतरीच काय. छ्छे ग...! तसं काही नाही हो आमचे. आम्ही दोघे मित्र आहोत बस...!" रुपा वारंवार आपल्या मैत्रिणीला म्हणत होती.
पण ती मनात विचार करत होती, \"हे प्रेम म्हणजे नक्की काय आहे. हो मला शशांक आवडतो पण एक मित्र म्हणून. एक मुलगा मुलगी मित्र मैत्रिण होऊ शकत नाहीत का. मैत्रीला प्रेम हे नाव द्यावे का ??? काही तरीच मी विचार करतेय. पुन्हा माझी गाडी रुळावरून घसरत आहे.\"
त्यादिवशी नेहाची थोडीशी तब्येत बिघडली म्हणून ती कॉलेजला आली नाही. आज रुपा एकटीच होती. कॉलेज सुटल्यानंतर ती बसस्थानकावर जाऊन बसची वाट पाहत होती तोच तिथे शशांक आपल्या बाईक वरुन जात होता. त्याने रुपाला बघून गाडी थांबवली आणि चल तुला घरी सोडतो म्हणाला. रुपाने येईल इतक्यात बस असे सांगून नकार दिला. शशांक पण तिने नकार दिला म्हणून ठिक आहे बाय उद्या भेटू असे म्हणत निघून गेला. ही बसस्थानकावर एकटीच उभी होती. तोच समोरून तीन चार तरुण टवाळक्या करत येऊन उभारली. त्यांचे लक्ष रुपा कडे गेले. तिला बघून शिट्या वाजवत काही तरी गलिच्छ घाणेरडे शब्द उच्चारून छेडछाड करु लागले.रुपा खूपच घाबरली. मी शशांक बरोबर गेले असते तर बरे झाले असते असे मनात म्हणू लागली. आता तर कळसच झाला. या मुलांमधील एक मुलगा रुपाचा अगदीच जवळ जाऊन," ये चल आमच्या बरोबर . मस्त पैकी मज्जा करु चल." असे म्हणत तिच्या अंगाला हात लावणार तोच त्या मुलाला मागून कोणीतरी फाटकन जोरात मारले. तसा तो मागे फिरला तर तिथे शशांक उभा होता. शशांक ला बघून रुपा पटकन त्याच्या जवळ गेली आणि त्याला घट्ट मिठी मारत म्हणाली ," शशांक अगदी वेळेवर धावून आलास रे."
शशांकला बघून त्या मुलांनी एकदमच तिथून पळ काढला.
" अगं तू नाही म्हणालीस मग मी घरी निघालो पण रस्त्यावर मला आठवले मी आज लायब्ररीची पुस्तके बदललीच नाही. आज शेवटचा दिवस . म्हणून मी अर्ध्या वाटेवरुन मागे फिरलो. बघतो तर इथे हे रामायण घडत आहे.पण तू घाबरू नकोस मी आहे." शशांक म्हणाला.
शशांकने आपली पुस्तके लायब्ररी मध्ये जाऊन बदलली त्यानंतर रुपाला तिच्या घरी सोडून आपल्या घरी निघून गेला.
फायनल परीक्षा जवळ आली होती. घरामध्ये दादाच्या लग्नाची तयारी सुरू झाली होती. आजी तर नातसूनेसाठी रोज काही ना काही नवीन पदार्थ बनवून नेऊन देत होती. नातसूनेच्या आवडत्या रंगाच्याच साड्या घ्यायच्या हा आजीचा अट्टाहास. राधा पण आजी जे काही सांगेल ते ऐकत होती.
काही दिवसांवर परीक्षा असले मुळे रुपा जास्त वेळ कॉलेजमध्ये अभ्यास करत होती. आज जरा लवकरच कॉलेज सुटले होते म्हणून कॉलेजच्या आवाराच्या गार्डनमध्ये अभ्यास करत बसली होती.हवेची झुळूक आली तशी तिच्या केसांची बट तिच्या चेहऱ्यावर रुळत होती. ती मागे सारण्याचा प्रयत्न करत होती पण पुन्हा ती बट चेहऱ्यावर रुळतच होती. तिथे जवळच उभा असलेला शशांक बघून हसत होता. त्याला पण हे बघून रुपाची गंमत करावी वाटली म्हणून तो हळूच तिच्या जवळ गेला आणि तिच्या केसांवर फुंकर घालून तिच्या केसांच्या बटांना तिच्या चेहऱ्यावर हलकेच सोडू लागला.
" अरे नको न रे शशांक. मला अभ्यास करु दे न रे. अरे शशांक नको न रे ....!"
" काय झाले ताई..! काही हवं का ?" शांताबाईंनी रुपाला विचारले.
हे ऐकून रुपा एकदम दचकून जागी झाली.
" हो...! नाही नाही काही नको...! डोळा लागला होता वाटत मला. जरा पाणी द्या प्यायला." असे म्हणत रुपा हळूच खिडकीच्या काचेत आपला चेहरा बघून गालातल्या गालात हसली.
क्रमशः
©® परवीन कौसर...
©® परवीन कौसर...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा