कस्तुरी भाग ३४

शशांक परदेशी जाणार तिथेच सेटल होणार या दोन वाक्ये ऐकून रुपाला झोपच येत नव्हती.


कस्तुरी
भाग ३४

रात्री रुपाला झोपच येत नव्हती. ती वारंवार एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर होत होती. एकसारखी तिची तळमळ सुरू होती. का ती त्या दोन वाक्यावर इतकी बेचैन होत होती हे तिचे तिलाच कळत नव्हते. एकदमच ती उठून बसली. तोच

तोच तिच्या पाठीवरून हात फिरवत

" झोप बाळा. इतकी काळजी करु नकोस. आजपर्यंत एकाही वर्गात तू कधी तरी कमी मार्क घेतले आहेस का. तू नेहमी वर्गात प्रथम क्रमांक पटकावला आहेस. तसेच आता देखील होणार. बघ तू निकाल जाहीर झाला तेव्हा म्हणशील हो आजी म्हणाली ते बरोबरच. झोप शांत." असे म्हणत आजीने रुपाच्या पाठीवरून हात फिरवला.

हे ऐकताच रुपा थोडी दचकलीच आणि ती एकदम भानावर आली.

\" अरे हे काय ? मी माझ्या ध्येयापासून भरकटत चालली आहे.‌माझे ध्येय काय आणि मी करतेय काय ? श्शी...! हे बरोबर नव्हे. माझी स्वप्ने,आई आजीची स्वप्ने दादाची माझ्या साठी लहान वयात घेतलेली मेहनत हे सर्व मी असे व्यर्थ कसे होऊ देत आहे. शशांक नावाचे वादळ येऊन माझ्या स्वप्नाला असे उध्वस्त करुन जात आहे. ते वादळ इथेच थांबवले पाहिजे. आणि हो तो जेव्हा गाणे म्हणत असताना मलाच एकटीला बघून हसत होता हे कशावरून. तसा तर तो सर्व विद्यार्थ्यांना बघून मंद हास्य करत गात होता. बरं मी एकटीच त्याची मैत्रीण नाही नेहा कामिनी पण आहेतच न. मग मीच बावळट हा विचार कसा करत आहे की ...! छ्छे !!!
हा निव्वळ माझा मुर्खपणा आहे दुसरे काही नाही. तसे पाहिले तर तो कुठे न मी कुठे. तो एका गर्भश्रीमंत कुटुंबातील मुलगा. त्याची स्वप्ने वेगळी त्याच्या आयुष्याच्या वाटा वेगळ्या. आमचा मेळ जमणारच कसा नाही का. आतापासून तो माझा फक्त आणि फक्त मित्र असेल दुसरे काही नाही.\" असे मनात म्हणत रुपा पटकन आपल्या आजीला बिलगून झोपी गेली. आणि खरोखरच तिला लगेचच गाढ झोप लागली.

रुपाचा निकाल जाहीर झाला. नेहमीप्रमाणे ती आपल्या वर्गात पहिल्या नंबरने पास झाली. वर्गामध्ये एकच जल्लोष. नेहा , कामिनी, शशांकने रुपा जवळ पार्टी मागितली. रुपाने या तिघांना घरी जेवायला बोलावले.

" वाह खूपच छान. किती चविष्ट आणि रुचकर जेवण बनवले आहे. मला तर असले घरचेच जेवण आवडते. आपल्या माणसांनी आपल्या माणसांसाठी बनविलेले जेवण किती रुचकर असते . नाही तर आमच्या घरी स्वयंपाक करायला बाई अगदीच मिळमिळीत जेवण बनविते.रोज रोज तेच तेच खाऊन कंटाळा आला आहे." शशांक म्हणाला.

आजीने देखील त्याला आवडतात ते लाडू बनवले होते. नेहा कामिनी या दोघी तर आधीपासूनच आजीच्या हातची चव चाखलेल्या होत्या. शशांकला घरी जाते वेळी आजीने डबा भरुन लाडू दिले. शशांक रुपाचे घर त्याचबरोबर घरातील सर्व सदस्य कसे एकमेकांसोबत प्रेमाने साथ देत रहातात हे पाहून अगदीच खूश झाला होता. असे सर्व कुटुंबीय एकत्र बसून जेवण करणे त्याला आवडले होते.

आता बारावीचे वर्ष. यासाठी रुपाने आपण जितका मिळेल तितका वेळ अभ्यासात लक्ष द्यायचे हेच ठरवले होते.

घराचे बांधकाम जवळ जवळ पूर्ण झाले. काही थोडेसे किडूकमिडूक काम शिल्लक राहीलेले होते. दादाचे लग्न दिवाळी झाली की करायचे असे ठरवले गेले.

रुपाचे कॉलेज सुरू झाले. अगदीच पहिल्या दिवसापासून अभ्यासक्रम सुरू करण्यात आला होता.काॅलेज सुटले की रुपा नेहा कॉलेजमधील लायब्ररी मध्ये जाऊन जरा वेळ अभ्यास करत बसत होत्या. यांची क्लासटिचर मिस अनू खूपच चांगली होती. ती सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायची. गरजू विद्यार्थ्यांना मदत करायची. सर्व विद्यार्थ्यांची आवडती शिक्षिका म्हणजेच अनू मॅम.

त्यादिवशी रोजच्या प्रमाणे रुपा लायब्ररी मध्ये जाऊन अभ्यास करत बसली होती तेव्हा तिथे शशांक आला.

" हाय !!!" असे हळू आवाजात म्हणाला.

रुपाने फक्त त्याच्याकडे पाहत एक स्माईल देत आपली मान डोलावली.

" ऐक ना. उद्या आमच्या डॅडचा वाढदिवस आहे.त्यासाठी मी एक सरप्राइज पार्टी आयोजित केली आहे. तेव्हा मला आजीकडून काही गोड पदार्थ बनवून हवेत. देतील का त्या करुन." अगदीच हळू आवाजात शशांक बोलत होता.

रुपाने आपल्या हातातील पुस्तक बंद केले आणि त्याला बाहेर जाऊन बोलू असे म्हणत ती दोघे लायब्ररीच्या बाहेर पडले.

" हा बोल आता." रुपा म्हणाली.

शशांक ने पुन्हा तेच सांगितले.

" अरे त्यात काय एव्हढे. करुन देईल आजी. तिला तर खूप आनंद होतो असे काही करायचे म्हटले की." रुपा म्हणाली.

सांगितल्याप्रमाणे आजीने देखील शशांकला हवे होते ते गोड पदार्थ बनवून दिले.

संध्याकाळी शशांक ने आपल्या घरी आपल्या वडिलांसाठी सरप्राइज पार्टी ठेवली होती. त्याने आपल्या कॉलेजच्या सर्व मित्र मैत्रिणींना आमंत्रित केले होते.

सर्व जण त्याने सांगितले होते त्या वेळेस शशांकच्या घरी गेले.

" बापरे...! बाहेरून जितका सुंदर दिसतो बंगला त्याहुनही आत आणखीन सुंदर आहे. बंगला म्हणावे की राजवाडा." नेहा आपल्या विस्फारलेल्या डोळ्यांनी आतील सजावट बघत म्हणाली.

" हो न . खूपच सुंदर आहे." रुपा म्हणाली.

शशांक ने सर्वांचे स्वागत नेहमीप्रमाणे आपली गोड स्माईल देत सर्वांचे हस्तांदोलन करत केले. सर्वांना हाॅलमध्ये बैठक व्यवस्था केली होती. मधोमध एक मोठ्ठ्या टेबलावर मोठ्ठा केक ठेवला होता. घरामध्ये नोकरचाकर भरपूर होते. जो तो आपापल्या कामात व्यस्त होते. कोणी मुलांना पाणी आणून देत होते तर कोणी शीतपेय. तर कोणी काही हवंय का आणखीन हे अगदीच अदबीने विचारत होते.

" काय यार एकदम रॉयल लाईफ आहे तुझी." एका मित्राने शशांकला म्हटले.

हे ऐकून शशांकने फक्त एक सुंदर स्माईल दिली.

इतक्यात बाहेर गाडीचा हॉर्न ऐकू आला. तो ऐकून शशांकने सर्वांना शांत बसण्यासाठी सांगितले. बंगल्याचे गेट उघडले आणि एक मोठ्ठी महागडी कार आत आली. कार थांबताच ड्रायव्हर ने कारचे दार उघडले. कारमधून काळ्या रंगाचा सुट डोळ्यांवर महागातला चष्मा पायात उंची महागातले बुट घातलेले असे एक गृहस्थ उतरले. त्यांनी दारावरची बेल वाजवली. तसे एका नोकराने दार उघडले. जसे दार उघडले तसेच त्यांच्या वर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव झाला. आणि एकच सर्वांनी मिळून एकदम

" हॅप्पी बर्थडे टू यू. हॅप्पी बर्थडे टू डियर अंकल. हॅप्पी बर्थडे टू यू." असे म्हणत टाळ्यांचा गजर केला.

" अरे आज माझा वाढदिवस आहे. हे माझ्या लक्षातच नाही.तुझी मॉम होती ती प्रत्येक वर्षी अगदी आनंदाने माझा वाढदिवस साजरा करायची. ती गेली आणि सगळेच संपले." असे हताश होऊन म्हणत ते आत आले.

" प्लिज डॅड ! !! आजच्या दिवशी असे हताश असे उदास होऊ नका. आजचा दिवस तुमचा आहे. आनंदी रहा." शशांक म्हणाला.

" ओह....! शशांकची आई नाही." रुपा मनात म्हणाली.

सर्व मुलांना पाहून शशांकचे वडिल खूश झाले. आज बंगल्यामध्ये वेगळाच आनंदोत्सव साजरा केला. आज कधी नव्हे ते शशांकच्या वडिलांनी कामातून सुट्टी घेतली. ते आज खूप दिवसांनी इतके रिलॅक्स आणि आनंदी झाले होते.

आजीने बनवलेले गोड पदार्थ खाऊन त्यांना त्यांच्या आईची आठवण आली.

" डॅडी हिची ओळख करून देतो. ही रुपा. आज जे काही गोड पदार्थ खाल्ले न हे हिच्या आजीने बनवले आहेत. त्या इतके सुंदर जेवण बनवतात की काय सांगू. मला खूप आवडले. आणि हो हिच ती जिच्या बद्दल मी तुम्हाला सांगतो न ती." शशांक म्हणाला.

" अच्छा....!" शशांकच्या वडिलांनी रुपाकडे बघत म्हटले.

" तुझ्या हुशारीचे गोडवे रोजच शशांक गातो बरं का बेटा. छान वाटले तुला भेटून. आणि हो तुलाच नाही तर तुम्हा सर्वांना भेटून खूप बरे वाटले. या रोजच्या धकाधकीच्या जीवनात असा एखादा दिवस विरंगुळा मिळावा हे अहो भाग्य आहे माझे. याचे सगळे श्रेय जाते वन अॅड ओन्ली माय सन शशांक. आय एम प्राऊड आॅफ यू बेटा." असे म्हणत त्यांनी शशांकला मिठी मारली.

दुसऱ्या दिवशी काॅलेजमध्ये शशांकचीच चर्चा होती.

" अरे त्याची आई नाही हे कधीच सांगितले नाही त्याने."

" हो न."

" पण वडिल खूप चांगले आहेत हो. बघ न इतके पैसेवाले पण जरा देखील घमेंड नाही."

" क्वचितच असतात असे लोक."

जो तो शशांक बद्दलच बोलत होते.

" अरे शशांक आईबद्दल कधीच बोलला नाही तू ?" रुपा म्हणाली.

" काय बोलायचे रुपा. आई गेली हेच पटत नाही मुळी. ती अजूनही आमच्या दोघांत आहे. आई माझी खूप चांगली होती. ती आम्हा दोघांना कधीच एकटे सोडून कुठेही जायची नाही पण त्यादिवशी तिच्या मैत्रिणीच्या नवऱ्याला हार्ट सर्जरी करायची होती तेव्हा तिला काही पैशाची गरज होती. ती देण्यासाठी आई दवाखान्यात जात होती. ड्रायव्हरने गाडी दवाखान्याच्या बाहेर पार्क केली होती. आईने आत बाहेर पैसे दिले तेव्हा त्यांना आणखीन काही औषधे हवी होती पण ती दवाखान्यात उपलब्ध नव्हती म्हणून आई स्वतः जाऊन आणायला बाहेर पडली. ड्रायव्हरने गाडी काढतो म्हणाला पण आईने इथे जवळच आहे मेडिकल आणते चालत जाऊन असे म्हणत ती निघाली. सोमवार असलेमुळे रस्त्यावर राहदारी खूप होती. एका मागोमाग एक गाड्या सुसाट वेगाने धावत होत्या. तरीदेखील औषधांची गरज होती म्हणून ती गडबडीने चालत जाऊन रस्ता ओलांडत होती तोच समोरून एक सीटिबस भरधाव वेगाने आली आणि.....!

आणि त्या भरधाव वेगात आईला चिरडून गेली. आई नेहमी सर्वांच्या मदतीस धावून जाणारी पण त्यावेळी मात्र तिच्या मदतीला कोणीच आले नाही हीच खरी शोकांतिका आहे. तेव्हा पासून डॅडी एकटेच पडले. त्यांनी आपल्याला आपल्या कामामध्ये व्यस्त करुन दिले. घरात कमी कामासाठी बाहेरच जास्त राहतात. रविवारी दिवसभर घरातील लायब्ररीत स्वतः ला पुस्तकात आपले मन रमवतात. मी पण आई गेली तेव्हा खूप रडलो पण मला आमच्या घरी कामवाली मावशी होती तिने मला सांगितले की आई तुला सोडून कुठेही गेली नाही ती नेहमी तुझ्या सोबत आहे. तुझे असे रडणे तिला आवडणार नाही. तू नेहमी आनंदी राहा. हसत खेळत मजेत राहा. तुझे आहेत ते छंद जोपास. आईला संगीत आवडायचे तू पण संगीतामध्ये रुची घे. मग बघ तुला कधीच वाटणार नाही की आई नाही म्हणून. मग तेव्हा पासून मी स्वतः ला अभ्यासाबरोबरच दुसऱ्या अॅक्टीविटीज मध्ये व्यस्त करुन घेतले. संगीत, गिटार वाजवणे बासरी वादन करणे हे सगळे क्लास लावून शिकून घेतले. आता मी स्वतः ला सावरले पण डॅडी इतके नाही सावरले म्हणून मी काहीही करून परदेशात जाणार तिथे डॅडना बोलावून घेणार. बघू काय होतं ते." असे म्हणत शशांकने हळूच आपले डोळे पुसले.

" ग्रेट होत्या आई तुझ्या. पण त्यांच्या बरोबर असे घडायला नको होते. मी समजू शकते तुझे दुःख. कारण मी पण या दुःखातून गेले आहे. आपण दोघेही समदुःखी आहोत. माझे बाबा असेच एका नैसर्गिक आपत्तीत गेले. " असे म्हणत रुपा रडू लागली.

तिला रडताना पाहून शशांकने तिला एकदम आपल्या जवळ घेतले आणि तिचे डोळे पुसले. इतक्यात एकदमच आभाळ दाटून आले. एकसारखी हवा सुटली आणि एकदमच टपटप करत पावसाचे थेंब पडू लागले. उन्हाने तापलेल्या जमीनीवर पावसाचे थेंब पडताच भिजलेल्या मातीचा सुगंध चहुकडे दरवळला. या पावसामध्ये भिजण्याची मजाच काही औरच असते. रुपाच्या अंगावर पावसाचे थेंब पडताच तिने वर आकाशात पाहिले.

" ते बघ तो पण आपल्या दुःखात सहभागी झाला आहे. म्हणूनच असा अवकाळी बरसत आहे." शशांक म्हणाला.

क्रमशः
©® परवीन कौसर

🎭 Series Post

View all