भाग ,३३
शशांक रुपाच्या नजरेतील भाव निरखताना स्वतः हळूच गालात हसत होता. दोघांची नजरेतील भाषा नजरेतून नकळतच होत होती. दोघांच्या चेहऱ्यावरचे हावभाव अगदीच आनंदाने खुलून दिसत होते.
वन्स मोअर....! एकसारख्या टाळ्यांच्या कडकडाटात सर्व विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. या जल्लोषाने हे दोघेही एकदम भानावर आले.
यानंतर आणखीन काही विद्यार्थ्यांनी आपापल्या कलेचे उत्कृष्ट असे प्रदर्शन केले. शेवटी कार्यक्रमाची सांगता पुन्हा एकदा शशांकच्या सुमधुर अशा बासरीवादनाने झाली.
" बापरे...! काय टॅलेंट आहे शशांक मध्ये. गिटार वाजवतो त्याच बरोबर बासरी देखील. वाह...!" नेहा म्हणाली.
रुपा काहीही न बोलता फक्त एक सुंदर अशी स्माईल देत शशांक कडे पाहत बसली.
" ओ मॅडम...! चला उठा. आता काय इथेच झोपायचा प्लॅन आहे का तुमचा. चला संपला कार्यक्रम. घरी जायचे आहे आपल्याला." नेहाने रुपाला म्हटले.
" अगं हो गं. चल निघुया." असे म्हणत रुपा उठली.
" रुपा नेहा चला मी सोडते घरी तुम्हाला. आता कुठे बस मध्ये जाता दोघी." कामिनी म्हणाली.
या तिघी कामिनीच्या कारमध्ये बसल्या.
" आज खरंच किती सुंदर कार्यक्रम झाला न. मला तर खूप मज्जा आली. आणि तुम्हाला सांगायचे तर मी स्टेजवर जायला इतकी घाबरत होती. पण मला शशांक ने खूप मदत केली हो. स्टेज डेरींग यायला हवे असे म्हणत त्याने कसे उभा रहायचे या पासून कसा आपला परफॉर्मन्स सादर करायचा हे सर्व शिकविले. खरंच तो जिनियस आहे बरं का. त्यादिवशी पण कशी शिक्षक बनून आपल्याला गंडवले. पण जरा देखील आपल्याला शंका नाही आली.असे सर्व गुण संपन्न कलाकार खरंच खूप कमी असतात." कामिनी म्हणाली.
रुपाचे घर येईपर्यंत गाडीमध्ये या तिघींची फक्त आणि फक्त शशांकचीच चर्चा सुरू होती.
आरशात स्वतःला चुकून कधीतरी पाहणारी रुपा आता सारखे सारखे आरशात पाहून लाजत होती. कधीकधी आपल्याशीच बोलत होती.गाणे गुणगुणत होती. स्वतः ला आरशात निहरताना स्वता:शीच बोलत होती. तिचे तिलाच कळत नव्हते की हे काय होत आहे.
घराचे बांधकाम, फॅक्टरीचे काम त्याचबरोबर दादाच्या लग्नाची तयारी या तिन्ही कामाची धुरा राधा ने सांभाळली होती. आजी तर नात सून येणार म्हणून खूप आनंदली होती. तिने तिच्या सासूने तिला दिलेली चार पदरी मोहनमाळ नातसूनेला देणार म्हणून सांगितले होते.
रुपा शशांकची मैत्री खूपच सुंदर जमली होती. शशांक जसा संगीतात रुची घेत होता तसाच तो अभ्यासातही एकदमच हुशार होता. शशांक नेहा कामिनी रुपा हे चौघे आता घनिष्ठ मित्र झाले होते.
बघता बघता फायनल परीक्षा जवळ आली. आता या चौघांनी आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले.
अभ्यासात काही अडचणी असतील तर शशांक अगदी सोप्या पद्धतीने समजावून देत होता.
त्यादिवशी शेवटचा पेपर होता. पेपर संपल्यानंतर या चौघांनी मिळून येणाऱ्या रविवारी कुठेतरी बाहेर फिरायला जायचे ठरविले. कामिनी ने आपण आपलीच कार घेऊन जाऊ शकतो असे म्हणाली. तिच्या बोलण्यावर या तिघांनीही होकारार्थी मान डोलावली.
रुपाने पांढराशुभ्र ड्रेस घातला. केस मोकळे सोडून केसांमध्ये एकच छोटेसे पांढरे गुलाबाचे फुल खोचले होते. ती आज खूपच सुंदर दिसत होती.
" व्वाॅव...! किती सुंदर दिसतेस ग आज तू रुपा. " नेहा तिला बघताच क्षणी म्हणाली.
" चल काही तरी काय." असे म्हणत रुपा थोडीशी लाजली.
कामिनी बरोबर वेळेवर गाडी घेऊन आली. तिच्या बरोबर सतेजपण आला होता.
" शशांक एकटाच मुलगा असणार आपल्या बरोबर म्हणून त्याला कंपनी देण्यासाठी सतेजला चल म्हटले मी. तसे पण आज रविवार आहे." कामिनी म्हणाली.
" बरं केले." नेहा म्हणाली.
शशांक ने सांगितलेल्या पत्त्यावर जाऊन कामिनी ने गाडी थांबवली .
शशांकचे घर पाहून,
शशांकचे घर पाहून,
" बापरे..! घर आहे की महल. किती सुंदर आहे न. " बाहेरून घर बघून तिघींच्या तोंडून एकच वाक्य आले.
" हाय ! " शशांक पटकन येऊन म्हणाला.
" ओ हाय...!" कामिनी ने गाडीचे दार उघडत म्हटले.
" शशांक हा माझा भाऊ सतेज. सतेज हा शशांक." कामिनी ने दोघांची ओळख करून दिली.
दोघांनीही हाय हॅलो केले.शशांक गाडीमध्ये बसला.सतेजने गाडी सुरू केली.
सगळेजण आनंदाने गाणे गात दंगा करत होते. आज सगळ्यात जास्त आनंदी रुपाच दिसत होती.
गाडी शहराजवळ असलेल्या एक छोट्याश्या पिकनिक स्पॉट जवळ आली. सगळेजण गाडीतून बाहेर पडले.
" व्वाॅव..! किती सुंदर निसर्ग सौंदर्य आहे न. असे सुंदर वातावरण आपल्याला शहरात मिळतच नाही." कामिनी म्हणाली.
" हो न." नेहा म्हणाली.
कामिनी नेहा दोघी एकसारख्या बडबडत होत्या. पण आज रुपा मात्र शांत होती. ती थोडीशी लाजलेली थोडीशी आपल्यातच हरवलेली वाटत होती. शशांक सतेजबरोबर बोलत होता. तेव्हा रुपा त्याला हळूच बघून गालातल्या गालात हसत होती. नकळतच शशांक ने रुपा कडे पाहिले. या दोघांची नजरानजर झाली तशी रुपाने पटकन आपली नजर दुसरीकडे वळवली.
" अहो मॅडम..! रुपा मॅडम..! कुठे हरवला आहात. आपण इथे पिकनिक साठी आलो आहोत. थोडे रिलॅक्स व्हा." नेहा म्हणाली.
" हो ग. " असे म्हणत रुपा आजीने दिलेले रव्याचे लाडू आणि मक्याचा चिवडा गाडीमधून घेऊन आली.
" वाह किती छान आहेत लाडू. मला गोड खूप आवडते." शशांक म्हणाला.
" आजीने बनवले आहेत. हिची आजी सुगरण आहे सुगरण. तू एकदा खाऊन बघ. कधीच चव विसरणार नाही." नेहा म्हणाली.
" खरंच एकदा जायला हवं. तसे आमच्या घरी स्वयंपाक करायला बाई आहे. तिच्या हातचे रोज रोज तेच तेच खाऊन कंटाळा येतो." शशांक म्हणाला.
" कधी येणार सांग. त्यादिवशी तुझ्या आवडीचा स्वयंपाक करायला सांगते आजीला." रुपा म्हणाली.
" हो सांगेन मी." शशांक म्हणाला.
फराळ झाल्यानंतर समोर असलेल्या झोपाळ्यावर बसण्यासाठी नेहाने कामिनी रुपाला घेऊन गेली. झोपाळ्यावर मनसोक्त झोके घेत तिघी मैत्रीणी आपला आनंद व्यक्त करताना दिसत होत्या.
दुपारी जेवणासाठी समोर असलेल्या हॉटेलमध्ये हे सगळेजण गेले. पाच जणांचा टेबल घेऊन एकेक करून सगळे आजूबाजूच्या खुर्चीवर बसले. कामिनी नेहा सतेज शेजारी शेजारी बसले तर रुपा शशांक दोघे एकमेकांच्या बाजूला बसले होते.
जेवताना हसत हसत बोलत जेवण करत होते. नेहाने आपल्या कॉलेजच्या पहिल्या दिवशीचा प्रसंग आठवून झालेल्या गमतीदार किस्सा सांगितला तो किस्सा ऐकून जो तो जोरजोरात हसू लागला. हसता हसता शशांक ला जोराचा ठसका लागला. तोच रुपा पटकन उठली तिने शशांकच्या पाठीवरून हात फिरवला. त्याला पाणी प्यायला दिले.
" अरे सावकाश रे. जेवताना बोलू नये किती वेळा नेहाला सांगते मी पण ही ऐकेल तर शप्पथ." रुपा म्हणाली.
रुपाच्या हाताचा स्पर्श होताच शशांकला अगदीच वेडावून टाकले. ती बोलत होती पण शशांक एकसारखे तिला बघतच बसला होता.
जेवण झाल्यानंतर सगळे हॉटेलच्या बाहेर आले. समोर असलेल्या मोठमोठ्या झाडाच्या सावलीत आरामात जाऊन बसले. तेव्हा कामिनी ने आपली मैत्री नेहमी अशीच टिकून रहावी असे म्हटले.तिच्या बोलण्यावर सर्वांनी होकारार्थी मान डोलावली.
सगळ्यांच्या मनसोक्त गप्पा रंगल्या होत्या. कामिनी ने आपली मैत्री रुपा नेहा बरोबर कशी झाली त्याआधी आपण कसे होतो हे शशांक ला सांगितले.
शशांक ने देखील आपले इथले शिक्षण पूर्ण झाले की परदेशात जाऊन उच्च शिक्षण पूर्ण करुन तिथेच कायमचा सेटल होणार असे सांगितले.
शशांक चे परदेशात सेटल होण्याचे ऐकून रुपा एकदम हिरमुसली गेली. तिचा एकदमच मूड आॅफ झाला. ती जरा शांतच बसली.
संध्याकाळी सगळेजण घरी परतले. रात्री रुपाला झोपच लागत नव्हती. तिच्या डोळ्यासमोर फक्त शशांक दिसत होता. त्याची ती दोनच वाक्ये तिच्या कानात ऐकू येत होती. उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणार. त्यानंतर तिथेच कायमचा सेटल होणार.
क्रमशः
©® परवीन कौसर
©® परवीन कौसर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा