भाग ,३१
हास्याचे चौकार षटकार मारत शशांक म्हणाला," कुठल्या जगात राहता ग तुम्ही ? वागळे की दुनिया माहित नाही म्हणजे....!"
शशांकच्या बोलण्यावर या दोघी मैत्रिणी एकमेकांना बघून पोट धरून हसू लागल्या.
इतक्यात यांची बस आली. दोघीही पळत पळत जाऊन बसमध्ये चढल्या. बस मध्ये बसल्यानंतर रुपाने नकळतच खिडकीतून बाहेर बघितले तर शशांक आपल्या बाईक वरुन भरधाव वेगाने निघून गेला. ती एकसारखी त्याच वाटेवर डोळे लावून बघत बसली. तिच्या शेजारी नेहा बसली होती. ती बसमध्ये चढल्या पासून रुपाला काहीतरी सांगत होती पण रुपाला ते ऐकूच जात नव्हते. तिच्या कानात शशांकचे ते हास्य आणि शशांकचा चेहरा डोळ्यासमोर दिसत होता.
" ओ मॅडम...! कुठल्या विश्वात रममाण होऊन बसल्या आहात. मी कधीची बोलतीय. रुपा मॅडम...! अहो रुपा...!" नेहाने रुपाच्या खांद्यावर हात ठेवून म्हटले.
" हो...! हो...! काय ? काय म्हटलीस का तू ?" रुपा एकदम दचकून म्हणाली.
नेहा जोरजोराने हसायला लागली.
" ये नेहा आपण बसमध्ये आहोत. बघतात सगळे इतके जोरात हसू नकोस." असे म्हणत रुपा जराशी आपल्या गालातल्या गालात हसत होती.
" आई ,आजी आज न खूप मज्जा झाली कॉलेजमध्ये." असे म्हणत घरी गेल्या गेल्या रुपाने आपल्या आई, आजीला सगळे सांगितले.
त्या दोघी पण खूप हसू लागल्या.
रात्री जेवताना सगळी भावंडे रुपाच्या कॉलेजचा पहिला दिवस छान गेला. हे ऐकून खूश झाले.
रुपा,नेहा कामिनी या तिघींना आता कॉलेजमध्ये वागळे की दुनिया या नावाने ओळखले जाऊ लागले. वर्गातील सर्व मुले मुली अभ्यासात अगदींच सिरीयस होती. तरीदेखील यामध्ये काही टवाळक्या करत होती तर काही विनोद करत होते. पण एकेका विद्यार्थ्यांमध्ये काही सुप्त गुण होते. कोणी गाणे गात होता तर कोणी डान्स करत होता तर कोणी पेंटिंग्ज बनवत होता. एकापेक्षा एक कलागुणांनी निपुण असलेल्या विद्यार्थ्यांची खाणच होती.
राधा ने दादाला फॅक्टऱी सुरू करण्याबाबत सांगितले.दोघा भावांनी देखील दादाला आता फॅक्टऱी पूर्ववत सुरू करुन दादानेच त्याची धुरा सांभाळावी असे सांगितले.
या दोघांना त्यांच्या परीने दुसऱ्या शहरात चांगल्या कंपनीत नोकरी मिळाल्या. दोघेही तिथे एक छोटेसे घर घेऊन राहण्यासाठी निघून गेले.
दादाने फॅक्टऱी पूर्ववत सुरू केली. तिथे कामाला सुरुवात झाली. सर्वप्रथम वस्तीमधील तरुण मुलांना कामावर घेतले. बायजाला राधा ने फॅक्टऱी समोर छोटेसे हॉटेल काढून दिले. हॉटेलमध्ये चहा,भजी, मिसळपाव, पोहे उपमा बायजा अगदी आनंदाने करत होती. तिने आपल्या मदतीला वस्तीमधील दोन महिलांना घेतले होते. या तिघी मिळून आता हॉटेल अगदी उत्तमरीत्या चालवत होत्या.
बायजा रोज संध्याकाळी घरी जायच्या आधी राधाचे आभार मानत होती.
" हे काय रोजच तुम्ही माझे असे आभार मानतात. नको हो असे करत जाऊ. मी काही खूप मोठे काम केले नाही. " राधा म्हणाली
" नाही नाही असे नाही काही. जर तुम्ही मला हॉटेल काढून दिला नसता तर मी माझे आयुष्य कसे जगले असते. तुम्हाला तर माझी सगळी कहाणी माहित आहेच न. या जगात एकट्या बाईने जगणे इतके सोपे नाही ओ. पण तुमच्या मुळे मला माझ्या पायावर पुन्हा एकदा उभे राहता आले. माझी बदनामी करणारी तोंडे आपोआप बंद झाली हे फक्त तुमच्या मुळेच शक्य झाले." असे म्हणत बायजाने आपले डोळे पुसले.
घरातील सर्व सुख बघून आजी मनोमनी देवाचे आभार मानत होती.
" राधा आता मी काय म्हणते की घर हे जरासे जुने झाले आहे. देवाच्या कृपेने आता तसा पैसा पण येत आहे घरात. तर हे घर जरा नवे बांधकाम करुया का ? कारण हे बघ आता आपली तीन मुले आहेत. आज न उद्या यांची लग्न होणार. तीन सुना येणार. रुपाचे लग्न झाले तर आपले जावई येणार. तेव्हा हे घर छोटेसे वाटणार न. बघ समोर अंगण आहे मोठे. मागे पण परसबाग आहेच. तर हे सर्व मिळून एक सुंदर मोठे अलिशान घर होईल गं." आजी म्हणाली.
" हो न. याचा मी विचारच केला नव्हता. येऊ दे रविवारी त्या दोघांनाही. बोलू आपण." राधा म्हणाली.
प्रत्येक रविवारी ही दोघे भाऊ घरी येऊन आईला भेटून जात होते. त्याचप्रमाणे या रविवारी देखील आले.
राधा ने आजीने सांगितलेले घराच्या बांधकामाचा विचार सांगितला. हे ऐकून तिघांनीही एकत्र होकार दिला.
घराचे बांधकाम होईपर्यंत राधाने समोरचेच घर भाड्याने घेतले.
घर थोडे बांधून होत होते तेव्हा दादाचे मालक घरी आले.
" या या .बसा मी पाणी आणते. " असे म्हणत आजी आत गेली.
" वहिनी कुठे दिसत नाहीत."
" ती फॅक्टऱीला जाते. येईलच इतक्यात. काही काम होत का ?" आजी म्हणाली.
" काम म्हणजे तसे काम नाही. पण ...! जाऊ दे कोड्यात बोलत नाही. माझ्या मित्राची मुलगी आहे तिच्या साठी मी रुपाच्या मोठ्या भावाचे नाव सुचवले आहे. त्यांना देखील हे मान्य झाले आहे. मुलगी बघायला या रविवारी यावे असे त्यांनी सांगितले आहे. म्हणून मी वहिनींना सांगायला आलो होतो."
" अगं बाई ...! माझा नातू ...! " असे म्हणत आजी पटकन आत जाऊन हातात साखर घेऊन आली.
" ठिक आहे मी संध्याकाळी येऊन बोलतो वहिनी बरोबर."
संध्याकाळी राधा, दादा घरी परतले तेव्हा आजीने सगळे सांगितले. हे ऐकून रुपा दादाला चिडवायला लागली.
" गोरी गोरी पान फुलासारखी छान
दादा मला एक वहिनी आण."
दादा मला एक वहिनी आण."
हे ऐकून दादा तिला मारायला जाऊ लागला.
" अरे ...! अरे...! नको रे चेष्टा करतेय ती." राधा म्हणाली
भावाबहिणीचे हे पोरखेळ पाहून आजी हसू लागली.
" हे बघा ही अजून लहानच आहेत. तोपर्यंत यांना स्थळे येऊ लागलीत." आजी हसत हसत म्हणाली.
" अरे काय दंगा सुरू आहे घरात." दादाचे मालक आत येत येत म्हणाले.
त्यांना बघताच रुपा आणि दादा एकदम शांत होऊन उभारले.
दादाच्या मालकांनी राधाला मुलींविषयी सांगितले.मुलगी सुसंस्कृत आहे दिसायला सुंदर आहे. आणि विशेष म्हणजे घराला शोभणारी आहे. या रविवारी कांदापोहेचा कार्यक्रम ठेवला आहे.
रविवारी मुलगी बघायचा कार्यक्रम ठेवला.
ही दोघे भाऊ पण यावेळी शनिवारी घरी आली.
रविवारी आजीने मुलगी बघायला जाताना काय काय न्यायचे हे सविस्तर सांगितले. आजीच्या सांगण्यानुसार राधाने सगळ्या वस्तू घेतल्या.
हे सगळे जण मुलगी बघायला गेले.
" नमस्ते .या या..! स्वागत आहे तुमचे." एक गृहस्थ होते ते म्हणाले.
" नमस्ते..! नमस्ते." दादाचे मालक म्हणाले.
" अरे व्वा...! किती सुंदर घर आहे." रुपा घरात गेल्या गेल्या म्हणाली.
सर्वांना एका मोठ्या हॉलमध्ये बसवून ते गृहस्थ आत गेले. आतून एक महिला हातामध्ये पाण्याचे ग्लास ट्रे मध्ये घेऊन आली. तिच्या पाठोपाठ ते गृहस्थ पण आले.
" मी ओळख करून देतो. हे मुलीचे आईवडील. " दादाचे मालक म्हणाले.
राधा ने आपल्या गालात मंद हास्य करत त्यांना नमस्कार केला.
" या राधा वहीनी." दादाच्या मालकांनी असे म्हणत एकेक करून सगळ्यांची ओळख करून दिली.
दादाची ओळख करून दिली तेव्हा दादाने उठून त्या दोघांच्या पाया पडल्या.
\" किती सुसंस्कारित मुलगा आहे. \"मुलीच्या आईने मनात म्हटले.
" सुषमा ...! ये बाळा ...!" मुलींच्या वडिलांनी म्हटले.
बांगड्यांचा किनकिनाट त्याचबरोबर पायातील पैंजणाचा रुणझुण आवाज ऐकू आला तसा त्या आवाजाच्या दिशेने दादाने पाहिले तर एक गोड सुंदर मुलगी हातामध्ये पोह्यांच्या प्लेट्स ठेवलेला ट्रे घेऊन हळूहळू येत होती.तिचे सुंदर रुप बघताच क्षणी दादा अक्षरशः घायाळ झाला.
क्रमशः
©® परवीन कौसर
©® परवीन कौसर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा