भाग,२९
उद्या काॅलेजचा पहिला दिवस. नेहा रुपा दोघींनी कॉलेजला जायची तयारी केली. कॉलेजमध्ये रॅगिंग होतं हे त्यांनी ऐकले होते यामुळे या दोघी जरा घाबरल्या होत्या.
सकाळी लवकर उठून रुपा कॉलेजला जाण्यासाठी तयार होत होती.
" आज मी येतो तुम्हा दोघींना सोडायला कॉलेजला. मग उद्या पासून जा तुम्ही दोघी मिळून." दादा म्हणाला.
" हो हो दादा. तू येच. मला तर आधीच भीतीने गाळण उडाली आहे. तू सोबत असशील तर भीती नसणार." रुपाला जरा हायसे वाटले.
दादा रुपा नेहाला घेऊन कॉलेजला पोहोचला.
किलबिल करणाऱ्या लहान मुलांच्या शाळेत आणि कॉलेजच्या आवारात किती फरक असतो हे या दोघींना काॅलेजमध्ये गेल्यावर जाणवले.
शाळेच्या पटांगणात मुलांचे पालक आपल्या मुलांना घेऊन येतात तेव्हा ती मुले कधी कधी रडतात मग त्यांचे पालक त्यांना चॉकलेट किंवा काही तरी खाऊ देऊन शांत बसवून लवकर येईन न्यायला असे म्हणत त्यांना शाळेत सोडून जातात. ते बालपण ते बालिश प्रकार हे सगळे कितक्यात संपले हे या दोघींना काॅलेजमध्ये पाऊल टाकले तेव्हा जाणवले.
" रुपा...! नेहा...! " असे म्हणत समोरून कामिनी पळत पळत आली.
या तिघींनी सेमच ड्रेस परिधान केले होते. फक्त रंग वेगवेगळे होते.
तिघींना त्यांच्या क्लासरूमपर्यत सोडून दादा आपल्या कामावर निघून गेला.
कॉलेजची बेल वाजली.
शिपाई काही पेपर आणि हजेरी बुक घेऊन टेबलावर ठेवून,
" आता थोड्याच वेळात तुमचे क्लास टिचर प्रशांत सर येतील. हे सर थोडे कडक शिस्तीचे आहेत बरे का.ते जे काही प्रश्न विचारतील ते नीट उत्तरे द्या. नाहीतर पहिल्याच दिवशी तुम्हाला शिक्षा होईल." असे म्हणत तो क्लास बाहेर गेला.
" बापरे...! मला तर आता खूपच भीती वाटत आहे." रुपा म्हणाली.
" तू अशी घाबरली तर आम्ही काय करायचे गं रुपा." नेहा म्हणाली.
" ये ...! त्यात काय एव्हढे घाबरायचे. ते काही वाघ आहेत जे आपल्याला येऊन खाणार. काही तरीच. घाबरायचे नाही पोरींनों." असे म्हणत कामिनी ने दोघींचे हात आपल्या हातात धरले.
या तिघी बेंचच्या तिसऱ्या ओळीतील मधल्या बेंचवर बसलेल्या होत्या.
इतक्यात एका हातात मोठ्ठी मोठ्ठी पुस्तके, डोळ्यांवर मोठ्ठ्या भिंगाचा चष्मा दुसऱ्या हातात मोठ्ठे डस्टर गोरा वर्ण असलेले सरांनी क्लासमध्ये प्रवेश केला. त्यांना पहाताच सर्वांनी
" गुड मॉर्निंग सर...!" असे एका आवाजात एका सुरात म्हटले.
त्यांनी आपल्या हातातील वस्तू टेबलावर ठेवून डोळ्यांवरील चष्मा काढून सर्व विद्यार्थ्यांवर एक कटाक्ष टाकला आणि आपल्या करड्या आवाजात,
" माॅर्निंग...माॅर्निंग...! बसा बसा अजून उभे का. तुम्हाला काय वाटले इथे उभे राहिले तर प्रसाद मिळेल. बसा खाली. सर्वांनी एकेक करून आपापला परीचय द्या. "
\" बापरे...! आल्या आल्याच तोफेचे गोळे फेकले. आईऽऽऽ \" रुपा मनात म्हणत होती.
सर्वांनी उठून आपापला परीचय देण्यास सुरुवात केली.
" इथे वधुवर सूचक मंडळ नाही असा परीचय द्यायला. फक्त आपले नाव,शाळेचे नाव आणि शाळेत किती दिवे लावले हे सांगायचे. तुमच्या पालकांची माहिती आधीच फॉर्म भरताना दिली आहे ती माहित आहे आम्हाला. समजलं....!"
\" दिसायला तर देखणा राजबिंडा तरुण हिरो सारखे आहेत पण काय रे बाबा हा इतकी कडक शिस्तीचे पालन करत आहेत.\" रुपा पुटपुटत होती.
तिच्या पुटपुटण्याने कामिनी नेहाने पटकन तिचा चिमटा काढला तशी ती
" आई गं ऽऽऽऽ" असे ओरडली.
तिच्या आवाजाने सरांचे लक्ष एकदम रुपा कडे गेले. ती किती घाबरलेली होती हे तिच्या चेहऱ्याकडे पाहून समजत होते. तिला बघताच सरांनी डस्टर जोरात टेबलावर आपटला.
" आई का आठवली. चल उठ उभी रहा तू. आधी तुझा परीचय दे." रुपाला सरांनी जोरात ओरडून म्हणाले.
तशी रुपा घाबरत घाबरत उठली. तिने आपला परीचय देण्यास सुरुवात केली.
" मी...! मा...झे..! नाव...!"
" आता नाव सांगतेस की उखाणा घेत आहेस."
हे ऐकताच क्लासमध्ये एकच हशा पिकला.
" सायलेंट...! क्लासमध्ये हसणे मनाई आहे. खासकरून माझ्या तासाला. समजलं...!"
क्लासमध्ये भयाण शांतता पसरली.
परत त्यांचा कटाक्ष रुपा जवळ.तशी रुपा घाबरत आवंढा गिळत बोलू लागली .
घाबरत का होईना पण तिने आपला पूर्ण परीचय दिला. तिचे मार्क आणि शाळेचे नाव ऐकून सर जरासे शांत झाले.
" ठिक आहे सीट डाऊन. आता तुम्ही दोघी एकापाठोपाठ एक आपापला परीचय द्या." असे नेहा कामिनी ला सांगितले.
नेहा पण थोडीशी घाबरत घाबरत परीचय देऊन मोकळी झाली.
कामिनी ने मात्र न घाबरता आपला परीचय दिला.
" तुमच्या पालकांना वागळे की दुनिया हा सिरीयल खूप आवडायचा का ?" सरांनी विचारले.
आता या तिघींना वागळे की दुनिया काय माहित. त्यांनी प्रश्नार्थक मुद्रेने पाहिले.
तोच मागुन एक आवाज आला
" शंशाक बस कर. सर यायची वेळ झाली. पटकन चल. आपल्या क्लासची वेळ झाली आहे. येतीलच इतक्यात सर....!"
हे ऐकताच सो कॉल्ड प्रशांत सर आपल्या डोळ्यांवरील मोठ्या भिंगाचा चष्मा काढून सर्वांना बघून
" वेलकम इन अवर कॉलेज माय फ्रेंड्स. चला आजची क्लास इथेच समाप्त. भेटू रोजच काॅलेजमध्ये अशाच गंमती जमती करत. चला बाय....! " असे म्हणत तो पटकन क्लासबाहेर पळाला जसा पळाला तसा पुन्हा क्लासमध्ये येऊन म्हणाला," बाय द वे कशी वाटली माझी अॅक्टींग. वाटलो न खराखुरा दबंग प्रोफेसर. काय वागळे की दुनिया वालो. रुपा,नेहा आणि कामिनी...!" असे म्हणत तो पुन्हा पटकन पळाला.
" अरे बापरे बाप...! काय हा मुलगा आहे. आपण खरंच किती घाबरलो होतो न." सर्वांच्या तोंडी एकच वाक्य.
आज कॉलेजमध्ये पहिला दिवस सर्वांबरोबर ओळख करून देणे ओळख करून घेणे यामध्ये अगदीच आनंदाने गेला. काॅलेज सुटले तशा या तिघी क्लासबाहेर आल्या. कामिनीला तिचा ड्रायव्हर नेण्यासाठी बाहेर येऊन उभारला होता. रुपा नेहा तिला उद्या भेटू असे म्हणत कॉलेजच्या आवारातून बाहेर पडल्या. त्या दोघी चालत चालत बस स्टॉप वर जात होत्या तोच झुम्म करत एक बाईक समोरुन गेली .त्यावर बसलेल्या मुलाने जोरात ," वागळे की दुनिया....ओय वागळे की दुनिया...!" म्हणाले.
" शशांक...!" दोघी एकदम ओरडल्या.
" हो...बोला वागळे की दुनिया वालो. तुमने पुकारा और हम चले आये. जान हथेली पर लेके बाईकपरसे फास्ट फास्ट आये." असे अगदी वाऱ्यासारख्या तिव्रतेने शशांक या दोघीजवळ आला.
त्याला असा एकदम आपली डोळ्यांची पापणी लवते न लवते समोर आलेला पाहून या दोघी दचकल्या.
" आई ऽऽऽऽ "
" काय झाले मॅडम. काही हवंय का ? गाडी थांबवू का ? पुढे एक चांगले हॉटेल आहे तिथे थांबवितो गाडी." ड्रायव्हरने रुपाच्या तोंडातून आई हे ऐकून म्हणाले.
" ताई हे घ्या पाणी प्या. गाडीत बसल्याजागी तुम्हाला झोप लागली होती म्हणून मी तुम्हाला उठवले नाही. घ्या जरा पाणी प्या बरे वाटेल. आधीच रात्री झोपला नाहीत तुम्ही बरोबर. " असे म्हणत शांतामावशीने पाण्याची बाटली काढून रुपाला दिली.
" हो..हो..! झोप लागली होती मला. द्या जरा पाणी पिते. आणि हो नक्कीच तिथे थांबवा गाडी. जरा जेवण करून हात पाय मोकळे करुन मगच पुढच्या प्रवासाला लागू." असे म्हणत रुपाने आपला मोबाईल फोन हातात घेऊन काही मेसेजेस आहेत का ते चेक करु लागली.
क्रमशः
©® परवीन कौसर
©® परवीन कौसर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा