कस्तुरी भाग २८

दहावीचा निकाल लागला रुपा कामिनी नेहा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्या.


कस्तुरी
भाग ,२८

" राधाच्या हक्काचे पैसे तिला मिळाले यातच समाधान आणि आनंद वाटतो आहे." असे म्हणत नंदकुमारांच्या पत्नीने राधाचे डोळे पुसले.

दादाच्या देखील पाठीवरून हात फिरवत नंदकुमारांनी ," अरे वेड्या रडतोस काय. आता तुमच्यावर आलेले दुःखाचे सावट दूर झाले आहेत. आतापर्यंत जितके कष्ट केले ते देखील अगदी कमी वयात याचे चीज झाले आहे. हे सर्व तुमच्या वडिलांचे आशीर्वाद आहेत. आणि ते सदैव तुमच्या पाठीशी राहणार आहेत. नेहमीच खऱ्याचा विजय होतो. थोडा वेळ लागतो पण होतोच." असे म्हणत दादाला आपल्या जवळ घेतले.

दादाच्या मालकांचे देखील डोळे नकळत पाणावले होते.

नंदकुमारांनी सर्वाना मिठाई दिली. राधा नंदकुमारांच्या पाया पडण्यासाठी खाली वाकली तोच ," अरे नको नको माझ्या काय पाया पडता मी काही देवता नाही ओ." असे हसत हसत नंदकुमार म्हणाले.

" माणसाच्या रूपात देवताच भेटला आम्हाला. आजच्या युगात कोण सख्खे नातेवाईक देखील कोणाला एवढी मदत करत नाही. पण तुम्ही आमच्या साठी खूप केले." राधा म्हणाली.

" बरं ते जाऊ द्या. जे घर परशूरामाने तुमच्या नावावर केले आहे. मला वाटते ते घर भाड्याने देऊ. तेवढेच भाडे सुरू राहील. जर तुम्हाला द्यायचे असेल तर . माझ्या मते दिलेलेच बरे कारण मोकळे घर ठेवले तर पुन्हा कोणी दुसरा परशूराम उगवेल. नाही का दिपक." नंदकुमार म्हणाले.

" हो सर. आपण योग्य बोललात. विकावे हे मला पण पटत नाही. घर पुढे यांनाच कामाला येईल न." दिपक म्हणाले.

" हो सर आपण जे बोललात ते योग्यच आहे. तुमच्याजवळ घराची चावी देतो आम्ही. तुम्हाला जे योग्य वाटतील अशा कुटुंबाला द्या भाड्याने." राधा म्हणाली.

" ठिक आहे. भाडे प्रत्येक महिन्याला तुमच्या बॅंकेच्या खात्यात जमा होतील अशीच व्यवस्था करतो आणि परशूराम जे पैसे देईल ते देखील तिथेच जमा होतील." नंदकुमार म्हणाले.

" ठिक आहे सर. मग निघतो आम्ही." असे म्हणत दादाने निरोप घेतला.

हे सगळे संध्याकाळी घरी परतले.

राधा ने आपल्या मुलांना सर्व काही सांगितले.

हे ऐकताच आजी म्हणाली," म्हणून कधी कोणाचा असा विश्वास घात करु नये. तो वर बसलेला आहे न त्याच्या कडे सगळ्याचेच मुल्यमापन होते . तो काही डोळे झाकून बसलेला नाही."

हे ऐकून मुलांपण एक प्रकारे शिकवणच मिळाली की कधीही कोणाचा विश्वास घात करु नये.

आता रुपाच्या दोन्ही धाकट्या भावांच्या ही परीक्षा झाल्या. एकाचे फायनल इयर तर एकाचे सेकंड इयर. दोघांचा निकाल लवकरच लागणार होता.

आता रुपाचा दहावीचा निकाल जवळ आला होता. तशी रुपाच्या मनात भीतीचा गोळा येत होता. ती रोज संध्याकाळी आजीच्या मांडीवर डोके ठेवून म्हणत असे," ये आजी माझ्या साठी जरा जास्तच प्रार्थना कर गं. मला भीती वाटत आहे ग. आता निकालाचा दिवस जवळ येत आहे."

" अगं वेडा बाई इतकी काय घाबरतेस. तू नेहमीप्रमाणेच चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणार आहेस बघं. मी तर देवळात जाऊन पेढे वाटणार आहे." आजी तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणायची.

दोघां भावांचा निकाल जाहीर झाला. दोघेही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. दादाने दोघांची पाठ थोपटली. आता छोट्या भावाचे एकच वर्ष राहिले तर मधल्याचे पूर्ण झाले. त्याने आपण नोकरी करणार असे सांगितले.यावर दादाने त्याला वडिलांची फॅक्टऱी सुरू करुन तिथेच तू रहावे असे सांगितले. पण त्याने दादाला तू सर्वात मोठा आहेस तूच बाबांची फॅक्टऱी चालवणार आम्ही नाही असे सांगितले.

राधा ने आपल्या मुलांना अगदी कौतुकाने पाहत होती.

" किती ते शहाणपण आले माझ्या या लेकरात. खरंच तुम्ही खूप चांगले संस्कार दिलेत यांना." आजीला गळाभेट देत राधा म्हणाली.

" छ्छे ग....! मी काही नाही संस्कार दिले हो. जन्मजात आहेत हे. तुझी सगळीच मुले अगदीच दृष्ट लागण्यासारखी आहेत." आजी म्हणाली.

रात्रभर रुपा झोपलीच नाही कारण दुसऱ्या दिवशी तिचा निकाल होता.सकाळी रोजच्या पेक्षा लवकरच ती उठली. आपली रोजची कामे पटापट करुन देवासमोर जाऊन हात जोडून उभी राहिली.

\" देवा परमेश्वरा आज माझा निकाल आहे. माझा विश्वास आहे मी नक्कीच चांगले गुण घेणार. मी जेवढी मेहनत घेतली आहे त्याचे फळ मला मिळणार आहे याची खात्री आहे मला. पण माझ्या मैत्रिणी नेहा, कामिनी या दोघीं चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊ दे. आम्हाला तिघी एकाच कॉलेजमध्ये प्रवेश मिळू दे.\" अशी मनोमन प्रार्थना करु लागली. तोच

" रुपा...! ये रुपा...! कुठे आहेस...!" नेहाचा आवाज आला.

" अगं हो हो...! आले आले...!"

रुपा गडबडीने बाहेर आली. तिला बघताच नेहाने पळत जाऊन तिला गच्च मिठी मारली.

" रुपा तू ...! रुपा तुझा...! रुपा...!"

\" अगं काय ते सांगशील का ?"

" अगं रुपा तू ९०% मार्क घेऊन शाळेत पहिली आली आहेस. बापरे....! काय तुझे मार्क. उद्या सगळ्या वर्तमानपत्रात तुझा फोटो झळकणार आहे. मला अभिमान वाटतो आहे मी तुझी मैत्रीण आहे याचा."

" ये काही तरी काय सांगू नकोस."

" अगं हो हे बघ आताच आईने फोनमध्ये तुझा निकाल बघितला." असे म्हणत नेहाने रुपाला आपल्या आईचा फोन दाखविला.

रुपा फोन बघत होती इतक्यात घराबाहेर कामिनीच्या वडिलांची गाडी येऊन उभारली.

कामिनी आपल्या आईवडिलांच्या बरोबर रुपाच्या घरी आली.

" अभिनंदन रुपा तुझे हार्दिक अभिनंदन." असे म्हणत तिला गळाभेट देत कामिनी म्हणाली.

मुलींचे आवाज ऐकून आई आजी दोघी बाहेर आल्या. त्यांना बघताच कामिनीच्या आईने राधाच्या तोंडात पेढा भरविला.

" अभिनंदन तुमचे. रुपाने शाळेत पहिला क्रमांक पटकावला. शहरात ती टॉप टेन मुलांमध्ये आली आहे. आणि कामिनी ने तर कमालच केली आहे ‌. तिने ८० % मार्क घेतले आहेत. मला तर अजूनही विश्वास बसत नाही यावर."

हे ऐकताच राधाच्या डोळ्यात टचकन पाणी आले. आजीने तर पटापट रुपाचे पापे घेतले.

" मी म्हटलं होतं न तू खूप चांगले गुण घेणार. गुणाची पोर आहे माझी रुपा." असे म्हणत आजी पटकन आत जाऊन देवासमोर दिवा लावून साखर ठेवली.

कामिनीच्या वडिलांनी रुपाची पाठ थोपटून म्हणाले," तुझ्या सारखी हुशार मुलींची आपल्या देशाला गरज आहे. तू खूप मोठी होणार बाळा. तुझे स्वप्न पूर्ण होणार. तुला कशाचीही कमतरता भासणार नाही. तुला पुढील शिक्षणासाठी जितकी होईल तितकी मदत मी करेन बेटा. तू पण अगदी हक्काने मागायचे माझ्या जवळ. मला कोणी परका समजू नकोस. मला तू फक्त तूच नाही तर तुम्ही सगळी भावंडे मला आजपासून मामा म्हणायचे. "

कामिनी पण खूप आनंदात होती. नेहाने कामिनी पेक्षा थोडे जास्त मार्क घेतले होते.

आता या तिघींना एकाच कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा निर्णय कामिनीच्या वडिलांनी केला.रुपाला बक्षीस म्हणून चांगला मोबाईल फोन घेऊन दिला.

शाळेमध्ये रुपाचा सत्कार करण्यात आला.‌शिक्षकांनी तिचे खूप कौतुक केले.

शहरातील नामवंत कॉलेज मध्ये या तिघींना प्रवेश मिळाला.

काॅलेज सुरू होण्यासाठी आता फक्त दोन आठवडेच राहिले होते.

शाळेच्या गणवेशाची सवय असलेल्या या तिघींना आता कॉलेजला जाण्यासाठी नवीन ड्रेस घ्यायचे होते.

कामिनीच्या वडिलांनी या तिघी मैत्रीणीना कपड्यांच्या मोठ्या दुकानातून सुंदर सुंदर ड्रेसेस घेऊन दिले.

कॉलेज रुपा, नेहाच्या घरापासून लांबच होते त्यामुळे या दोघींनी बस पास काढला. कामिनी तिच्या गाडीतून येणार होती.

उद्या काॅलेजचा पहिला दिवस. नेहा रुपा दोघीजणींनी काॅलेजला जायची तयारी केली. या दोघी आता तिथे रॅगिंग होईल का यामुळे घाबरल्या होत्या.

क्रमशः
©® परवीन कौसर

🎭 Series Post

View all