कस्तुरी भाग २७

राधा कागदपत्रे पाहून रडू लागली. ती का रडतेय हे दादाला कळत नव्हते.


कस्तुरी
भाग २७


कामिनी नेहा रुपा या दोघींच्या मध्ये बसून गप्पा मारत होती.‌ती आज खूप आनंदात होती. तिला या दोघींबरोबर काय बोलू आणि किती बोलू असे झाले होते. या तिघींच्या रंगलेल्या गप्पा बघून आजी ,\" अशीच यांची मैत्री बहरत जाऊ दे.\" असे मनात म्हणत आत स्वयंपाक घरात जाऊन गरमागरम बदामाचा शिरा करुन आणून सर्वांना दिला.

आता या तिघी शाळेत एकत्र बसायच्या. ज्या ज्या मुलींना कामिनी ने वेडेवाकडे बोलले होते त्या सर्वांची माफी मागितली. सर्वांनीच तिला आपली मैत्रीण म्हणून आनंदाने स्विकारले.

बघता बघता फायनल परीक्षा जवळ आली. परीक्षा फॉर्म भरून घेतले. सर्वांचे हाॅलतिकीट आले. आता जो तो आपापल्या घरी मनलावून अभ्यास करु लागले.

परीक्षेचा दिवस आला.

" आई ...! मला का कुणास ठाऊक या वेळी खूप भीती वाटते ग. मी चांगले मार्क्स घेईन न ग ?" रुपा आपल्या आईच्या मांडीवर डोके ठेवून म्हणाली.

" अगं त्यात काय घाबरायचे. वेडीच आहे. माझा विश्वास आहे तू खूप चांगले मार्क्स घेणार . " असे म्हणत आईने तिच्या डोक्यावरून हात फिरवला.

एकेक करून सगळे पेपर झाले. परीक्षा संपल्यावर कामिनीच्या आईवडिलांनी रुपा नेहा त्याचबरोबर रुपाच्या तिन्ही भावांना आठ दिवसांसाठी बाहेरगावी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला.

" सर मला शक्य होणार नाही येणे. कारण माझे काम आहे. वारंवार सुट्टी घेणे बरोबर नाही वाटत." दादा म्हणाला.

" मी बोलेन त्यांच्या बरोबर. जर त्यांनी सुट्टी दिली तर मग येणार ना."

" हो नक्कीच सर."

दादाच्या मालकांनी पण दादाला जाण्याची परवानगी दिली.

हे सगळे एका मोठ्या गाडीतून शहरापासून दूर असलेल्या एका रम्य अशा पर्यटन स्थळावर गेले.

" आहाहा...! किती सुंदर निसर्ग आहे.झाडे, वेली ,पाने फुलांनी नटलेली धरणी. एकदमच सुंदर." रुपा गाडीतून बाहेर आल्यावर निसर्ग सौंदर्य पाहून म्हणाली.

सगळी मुले अगदीच खुश झाली. आनंदाने हसत खेळत कधी आठ दिवस गेले हे कळलेच नाही.

घरी परतताना कामिनीच्या वडिलांनी दादाला विचारले की रुपाला पुढे काय करण्याचा मानस आहे.

यावर दादाने रुपाचे स्वप्न सांगितले.

" अरे व्वा मस्तच. खरंच बेटा तू जे स्वप्न पाहिले आहेस ते नक्कीच पूर्ण होईल. कामिनीला मला डॉक्टर करायचे स्वप्न आहे बघुया आता ती किती मार्क घेते. तिच्या मार्कांवर सगळे अवलंबून आहे." कामिनी चे वडिल म्हणाले.

घरी आल्यावर सर्व मुले आनंदाने आई, आजीला आम्ही तिथे किती आणि कशी धमाल केली हे सांगू लागले.

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच दादा कामावर गेला. तिथे गेल्यावर त्याला मालकाने नंदकुमार सरांचा फोन आलेला त्यांनी तिकडे बोलावले आहे आपल्याला. आपण येत्या रविवारी जाऊ आणि हो वहिनींना पण आणा म्हटलेत ते." असे सांगितले.

रविवारी हे तिघे नंदकुमार सरांच्या घरी गेले. आईने आजीने दिलेले पापड,शेवया लोणची याच बरोबर भुईमूगाच्या शेंगा असलेली पिशवी दिली.

" अगं बाई हे काय..!" पिशवी हातात घेताच नंदकुमारांची पत्नी म्हणाली.

" काही नाही ओ. घरात केलेले पापड,लोणची आहेत. तुम्हाला आवडतात न म्हणून आणले." राधा म्हणाली.

इतक्यात दिपक पण आले. त्यांच्या हातात काही कागदपत्रे होती. त्यांनी आल्याआल्या राधा समोर कागदपत्रे ठेवली.

" यावर तुमच्या सह्या हव्या."

राधा ने सह्या करण्यासाठी कागदपत्रे घेतली. ती कागदपत्रे वाचू लागली. वाचता वाचता तिच्या डोळ्यांतून टपटप अश्रू ओघळू लागले.

" अगं आई...! काय झाले ? का रडतेस? कशाची कागदपत्रे आहेत ही ?" दादा म्हणाला.

" मी सांगतो..! " असे म्हणत नंदकुमार सर पुढे म्हणाले

" चार दिवसांपूर्वी परशूरामाचा मला फोन आला. त्याचा फोनवर आवाज अगदीच कसा तरी वाटत होता. म्हणजेच तो परशूरामच बोलतो आहे की कोण दुसरा असे वाटत होते. त्याने आपण केलेले हे दुष्कृत्य मान्य केले. त्याने याची माफी मागितली आणि जे काही पैसे घेतले त्याची काही रक्कम खर्च झाली तर एके ठिकाणी एक छोटेसे घर घेऊन भाड्याने दिले आहे हे कबूल केले. आता ते घर तो राधाच्या नावावर करून देणार आहे त्याचबरोबर त्याने जी काही रक्कम खर्च केली ती थोडी थोडी करून परतफेड करणार आहे . त्याने त्या घराची कागदपत्रे दिपक कडे दिली.दिपकने सर्व कागदपत्रे पाहून ते घर राधाच्या नावावर केले ते हेच कागदपत्रे आहेत."

" पण हे अचानक...! इतका बदल कसा काय?" दादाने विचारले.

" हो तेच सांगत होतो मी. तर त्यादिवशी आपण दवाखान्यात होतो त्याच्या मुलाबरोबर आठवतं न. तेव्हा त्याने आपल्या घरात रोज काही ना काही घडतच आहे ते पण त्याच्या मुलांना हे ही सांगितले बरोबर...! आता त्याच्या मुलाला डिस्चार्ज मिळाला. त्याला घरी नेले. तो तसा पायाने अधू झाला. तरुण मुलगा आपला असा झाला या विचाराने परशूरामाची पत्नी आतून तुटून गेली. तिला आपल्या मुलाच्या वेदना सहन होत नव्हत्या. ती रात्रंदिवस रडत बसली. तिचे लक्ष आपल्या जेवणाकडे पण नव्हते. ती वेळी अवेळी झोपेतून उठून आपल्या मुलांना बघून त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत बसू लागली.

त्यादिवशी अशीच ती रात्री उठली आणि आपल्या मुलाच्या खोलीत जाऊ लागली तशी तिला चक्कर आली आणि ती धाप्पकन खाली पडली. तिच्या पडण्याच्या आवाजाने परशूराम पळत पळत आला. बघतोय तर ती जमिनीवर पालथी पडलेली. तिचा उजवा हात किंचितसा वाकडा झालेला.

पटकन तिला उचलून पलंगावर झोपवले. ती पडलेल्या आवाजाने त्याच्या मुलीपण जाग्या झाल्या. त्या उठून येऊन आपल्या आईला अशी पडलेली बघून रडू लागल्या.

आता यावेळी कोण डॉक्टर भेटणार. हिला दवाखान्यात न्यायचे तरी कसे या विचाराने परशूराम रडकुंडीला आला. तशातच तो मुलींना आईजवळ बसायला सांगून बाहेर पडला. पळतच जाऊन बाहेर कोणी दिसतंय का ते बघू लागला. नशीबाने त्याला एक रिक्षा दिसली. जो नुकताच रेल्वे स्टेशनवर जाऊन पॅसेंजर सोडून परत घरी जात होता. परशूरामाने रिक्षा थांबवली. पटकन रिक्षातून तिला दवाखान्यात नेले. तिथे नेल्यावर पटापट तिच्या वर उपचार सुरू केले.

दोन दिवसात तिच्या तब्येतीत सुधारणा झाली. तिला घरी आणले.

तिने परशूरामाला आपल्या समोर बसवून म्हटले की हे जे काही आपल्या बरोबर घडत आहे हे खरोखरच तुम्ही केलेल्या तुमच्या मित्राला फसवणूकीमुळेच. त्याची विधवा पत्नी आणि त्याची मुले यांचा हक्क होता त्या जमिनीवर ते तुम्ही खोटे सांगून आपले केले. आणि परस्पर विकून टाकले. त्यांनी तोंडातून जरी शिव्या शाप दिले नसले तरी त्यांच्या अंतर आत्म्याची हाय लागायची ती लागतेच. आणि हेच झाले आहे. यामुळेच असे होत आहे. तुमचे पाया पडते मी हे सर्व पैसे त्यांचे त्यांना परत द्या. नकोय मला हे सर्व. नाही तर आणखीन काय होईल ते सांगता येणार नाही. हे ऐकून परशूरामाला आपली चूक कळून चुकली. त्याने आपली चूक कबूल केली."

हे ऐकताच दादाच्या पण डोळ्यांतून राधा सारखे अश्रू वाहू लागले.

नंदकुमारांनी दादाच्या पाठीवरून हात फिरवला. इकडे राधाला पण नंदकुमारांच्या पत्नीने आपल्या जवळ घेत म्हटले ," म्हणून कधीही कोणाला फसवू नये. कोणाच्या पाठीत असे वार करु नयेत. परशूरामाने केलेल्या कामाची शिक्षा या सर्वांना मिळाली ते सर्व निर्दोष असताना. पण काहीही असो त्याचे डोळे उघडले. राधाच्या हक्काचे पैसे तिला मिळाले यातच समाधान आणि आनंद वाटतो आहे."

क्रमशः
©® परवीन कौसर

🎭 Series Post

View all