Login

कस्तुरी भाग २५

रुपा नेहा दोघी नेहमी प्रमाणे चांगले नंबर घेऊन पास झाल्या.


कस्तुरी
भाग २५


रुपाची ती मिठी आईला खूप काही सांगून गेली. तिच्या पाठीवरून हात फिरवत आई म्हणाली," अगं हो गं राणी...! तू खूप शिकायचे खूप मोठे व्हावे हेच आमचे पण स्वप्न आहे. पण एक न एक दिवस तुझे लग्न करायचेच आहे न. पण त्याआधी या तुझ्या दादाचे करायचे. आधी सून येऊ दे घरी मग तुझे लग्न. नाही का ...! बरोबर बोलतेय न मी...!"

" हो ....! हो अगदी बरोबर." आजीने पण हो ला हो देत हसतच म्हटले.

बघता बघता पहिली चाचणी परीक्षा सुरू झाली. रुपा नेहा दोघी रुपाच्या घरी रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत बसायच्या. दोघींनाही पेपर खुपचं सोपे गेले. दोघीही एकमेकींना शुभेच्छा देत निकालाची वाट पाहू लागल्या.

पहिल्या चाचणी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. नेहमीप्रमाणे रुपाचा पहिला नंबर नेहाचा दुसरा नंबर आला.फक्त एक दोन मार्कांचा फरक होता. दोघींचे तोंडभरून कौतुक वर्ग शिक्षकांनी केले.

" अगं कामिनी...! हे काय गं ....! तू चक्क गणितात नापास.....! अगं तू तर तिथे शिकवणीला जातेस न . जिथे खूप फी पण आहे आणि तुझ्या सारखी मोठ्या पैसेवाल्यांची मुलेच येतात असं ऐकलं होतं मी. मग गं हे काय ?" कामिनी ची मैत्रीण तिला गणितात नापास झालेले पाहून आश्चर्यचकित होऊन म्हणाली.

कामिनी काहीही न बोलता तशीच ढम्म होऊन बसली. तिला काय बोलावे तेच सुचेना.

" आई , आजी,दादा ऽऽऽऽऽ लवकर बाहेर या. मी पहिल्या चाचणी परीक्षेत पहिल्या नंबरने पास झाले. आणि दादा तू ज्या ज्या मुलांना गणिताची शिकवणी घेतोस ना ती मुले पण खूप छान नंबरांनी पास झाली आहेत असे काकू म्हणत होत्या." रुपा घरात गेल्या गेल्या आनंदाने म्हणाली.

" अगं हो ....! हो...! हो...! जरा दमाने. आम्हाला माहितच होते तुझा पहिला नंबर येणार." आजी तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली.

चहा फराळ करत सगळेजण अंगणात बसले होते. तोच नेहा आली.

" दादा आई म्हणत होती की तिच्या मैत्रिणीची मुलगी जी इथे येते गणित शिकायला ती खूप छान मार्काने पास झाली. हे तिच्या नवऱ्याने आपल्या मित्राला सांगितले. तेव्हा त्याने आपल्या मुलांना इथे गणिताची शिकवणी घेण्यासाठी पाठवायची इच्छा व्यक्त केली. पण त्यांचे म्हणणे असे आहे की ते रोजच घ्यावी शिकवणी.कारण त्यांची मुले गणितात खूप कच्ची आहेत. जवळजवळ नापासच होतील असेच मार्क असतात. त्यामुळे त्यांना आठवड्यात एकच दिवस शिकवले तर इतका ही फरक पडणार नाही. ते यासाठी शिकवणीचे जास्तीत जास्त पैसे देण्यासाठी तयार आहेत." नेहा आल्या आल्या म्हणाली.

" रोज कसे जमेल. माझे काम पण असते न. एखादं वेळ मला यायला उशीर पण होतो." दादा म्हणाला.

" हो ते तर आहेच. पण मला असे वाटते की जेव्हा तुला आणि त्यांना जरा रात्री उशिराने जमत असेल तर काय वाईट. विद्या जितकी द्यावी तितकी वाढते. बघं तुला पटतंय का." आई म्हणाली.

" हो आई हे तुझे म्हणणे पटतंय. पण समज ती मुलगी असेल तर रात्री येणे जमेल तिला ?"

" अरे तिला ते आणून सोडतील आणि घेऊन ही जातील. जर त्यांना खरोखरच शिकायची इच्छा आहे तर ते इतके करु शकतीलच न." रुपा म्हणाली.

" ठिक आहे नेहा. रोज घेईन मी शिकवणी." दादा म्हणाला.

नेहाने होकारार्थी मान डोलावली आणि ती आपल्या घरी निघून गेली.

दुसऱ्या दिवशी सकाळीच रुपाच्या घराबाहेर एक मोठी कार येऊन उभारली. कारमधून ड्रायव्हर उतरला त्याने दार अदबीने उघडले . कारमधून काळ्या रंगाचा सुट, डोळ्यांवर महागातला चष्मा,पायात उंची महागातले बुट घातलेले असा एक रुबाबदार गृहस्थ उतरले.

ते तिथेच उभारले. त्यांचा ड्रायव्हर कारचे दार लावून पळतच येऊन रुपाच्या घराबाहेरील अंगणात येऊन," कोणी आहे का घरात ?" असे विचारले.

" कोण आहे ?" आजीने बाहेर येऊन विचारले.

" नमस्कार आजी. नाही ते मुलांना गणिताची शिकवणी देतात ते हेच घर का ?"

" नमस्ते. हो हो रे बाबा. इथंच माझा नातू शिकवितो." आजीने एकदम स्फुरण चढल्यासारखे म्हटले.

" बरं बरं. आमचे साहेब आलेत. आमच्या ताईसाहेब आणि भैय्याजींना प्रवेश घ्यायचा आहे त्यासाठी. आणतो बोलावून त्यांना आत." असे म्हणत ड्रायव्हर बाहेर जाऊन आपल्या मालकांना आत घेऊन आला.

" नमस्ते...! इथेच मुलांना शिकवणी दिली जाते न.‌आहेत का ते आता घरी ?" आजीला पाहून अगदी अदबीने नमस्कार करत त्यांनी विचारले.

\" हो. हो .आहे आहे....! या या तुम्ही आत या मी बोलावते हो त्याला . " असे म्हणत आजी पटकन आत येऊन दादाला म्हणू लागली," अरे बाहेर कोणी मोठे साहेब आले आहेत. चल लवकर चल."

दादा कामाला जाण्यासाठी तयार होत होता. आता कोण आले असेल बरे इतक्या लवकर असे मनात म्हणत तो बाहेर आला.

" नमस्कार सर."

" नमस्ते, मी सरळ मुद्यावरच येतो. माझ्या मुलांना मी इथे शिकवणी साठी प्रवेश घेण्यासाठी आलेलो आहे. तुम्ही तुमच्या फी चे आणि वेळेबद्दल सांगाल तर बरे होईल."

" हो सर . मी शिकवणी फक्त रविवारीच घेतो कारण मला आठवडाभर वेळ मिळत नाही. जेव्हा फायनल परीक्षा असेल तेव्हा मात्र रोजच संध्याकाळी वर्ग घेणार."

" अच्छा...! पण मला तर रोजच असतील वर्ग असे वाटले होते. रोज घेऊ शकाल का तुम्ही. कारण माझी दोन्ही मुले गणितात नापासच झाली आहेत. तुमच्या जवळ शिकलेली मुलांची प्रगती पाहूनच मी आलो आहे. तुम्हाला जर योग्य वाटेल तर रात्री तुम्ही कामावरून आल्यावर घेऊ शकाल का ? मी तर म्हणेन घ्याच तुम्ही. कारण इतक्या मोठ्या नावाजलेल्या शहरातील नामवंत व्यक्तीजवळ मी पाठविले माझ्या मुलांना शिकवणी साठी. पण काही उपयोग झाला नाही. ती दोघे पुन्हा नापासच झाली. तेव्हा मला माझ्या मित्राने तुमच्या बद्दल सांगितले. त्याची मुलगी आता खूप छान मार्क घेत आहे.त्याने सांगितले मला की तुम्ही रोज घेऊ शकाल म्हणून मी तुम्हाला त्याने दिलेल्या पत्त्यावर शोधत आलो. आशा आहे निराशा होणार नाही."

\"एका बापाची कळकळीची विनंती कशी नाकारता येईल. त्यात नेहाला पण घेईन रोज शिकवणी असेच सांगितले होते रात्री मी\" असे मनात म्हणत दादाने होकारार्थी मान डोलावली.

" खरंच खुप खुप धन्यवाद तुमचे. मी आज संध्याकाळी त्यांना इथे घेऊन येतो. तुमची फी किती द्यायची ते सांगा."

इतक्यात आजीने चहा आणून दिला. सर्वांनी चहा घेतला. संध्याकाळी येण्याचे सांगून ते गृहस्थ निघून गेले.

दादा पण कामाला गेला. ही तिघे पण आपापल्या शाळा कॉलेजला गेली.

संध्याकाळी सगळी घरी परतली. जो तो आपापल्या कामात व्यस्त होता. आई आजी स्वयंपाक घरात होत्या. रुपा आपल्या खोलीत अभ्यासाला बसली होती. दादा आपल्या मालकांनी दिलेल्या काही कामाची कागदपत्रे चाळत बसला होता तोच दारासमोर गाडी येऊन उभारली.

" कोणी आहे का घरात ?"

" हो हो. आलो हा ." असे म्हणत दादा उठून बाहेर आला.

" नमस्ते सर. या या आत या."

" नमस्ते..! या मुलांनो. आत या...!" असे म्हणत ते गृहस्थ हळूहळू आत येऊं लागले.

ड्रायव्हरने मुलांना अंगणातून आत येण्यास सांगितले.

" श्शी श्शी ऽऽऽऽ कसले हे अंगण. इथे कुठे आणले मला पप्पा....!" त्यांच्या मुलीने एकदम जोरात म्हटले.

तिच्या बोलण्याला काही उत्तर न देता त्यांनी फक्त डोळे मोठे करून तिच्या कडे बघितले. तशी ती चुपचाप उभी राहिली.

तिचा आवाज रुपाला ऐकू गेला. ती तशीच बाहेर पळत आली.

" कामिनी......!" रुपा समोर उभारलेल्या कामिनीला बघून आश्चर्य चकित होऊन म्हणाली.


क्रमशः
©® परवीन कौसर

🎭 Series Post

View all