कस्तुरी भाग २४

राधाने विम्याची रक्कम मिळाली तीपासबुक वस्तीवर सर्वांना दिली
कस्तुरी
भाग २४

परशूरामच्या काळ्या कामाची शिक्षा त्याच्या मुलांना भोगावी लागली हे पाहून राधाला खूप वाईट वाटले.

दिपक बरोबर काही वेळ केस बाबत चर्चा करुन राधा म्हणाली," आता जरा काही दिवस या केसबाबत तुम्ही परशूरामाला भेटू नका किंवा काही फोन पण करु नका. त्याची मानसिक स्थिती बरोबर नाही आता. अमितचा इलाज होऊ दे आधी. मग बघू. आणि हो तोपर्यंत जर त्याच्याकडून काही वकीलाचे कागदोपत्री व्यवहार आलेच तर तुम्ही तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. आम्हाला काही गडबड नाहीये. जमीन तर आमचीच आहे. आता नंदकुमार सरांनी ती घेतली आहे ते आम्हाला पूर्ण पणे पाठिंबा देणार याची खात्री आहे आम्हाला. आता इतकी वर्षे गेली त्यात आणखीन काही दिवस किंवा महिने लागतील यात काही बिघडणार नाही.

हो न सर..! मी जे बोलतेय ते कसे वाटते तुम्हाला !"

" हो..! हो अगदी बरोबर बोललात तुम्ही.‌ तुमच्या विचारांशी सहमत आहे मी देखील." नंदकुमार म्हणाले.

हे सगळे परतीच्या प्रवासाला निघाले.

राधाच्या मनात एकसारखे परशूरामाच्या मुलांचेच विचार घोळत होते. काय दोष होता त्या निष्पाप मुलांचा. बापाच्या कृत्यांची फळे यांना विणाकारणी भोगावी लागली.

घरी परतल्यानंतर जे काही घडले ते राधाने आपल्या मुलांना सांगितले.

ते ऐकून आजी म्हणाली," म्हणून कधी कोणाच्या जीवाचा असा तळतळाट घेऊ नये बघा. जरी आपण तोंडाने काही वाईट बोललो नाही तरी आपला अंतर आत्म्याची हाय लागायची ती लागतेच . जाऊ दे काही ही असो देव त्याला लवकर सद्बुद्धी देऊ दे. अमित लवकर बरा होऊ दे." असे म्हणत हात जोडत आजी स्वयंपाक घरात गेली.

रुपाचे शाळेच्या सुट्टीतील वर्ग संपले होते.‌जून मध्ये रेग्युलर शाळा सुरू झाली. दिवसभर शाळा त्यानंतर शाळा सुटली की पुन्हा एक तास एक्स्ट्रा क्लास शिक्षक घेत होते. मुलांना असणाऱ्या शंका निरसन करून त्यांना पुन्हा उजळणी करण्यासाठी हे क्लास घेत असत.

रुपा नेहा मनलावून अभ्यास करत होत्या. या दोघींची मैत्री आणि त्यांना शिक्षकांकडून मिळणारा चांगला प्रतिसाद बघून कामिनीचा जळफळाट व्हायचा.

" आता बघ मला पप्पा आमचे शिकवणी लावणार आहेत. तिथे न माझ्या सारख्याच मुली येतात. कोणी भिक्कारडी येत नाहीत. मग बघ मी यावेळी वर्गात पहिल्या नंबरने पास होते की नाही. " कामिनी असे जोरात आपल्या मैत्रिणीला म्हणाली जेणेकरून तिचा आवाज रुपाला ऐकू जाईल.

रुपाने ऐकून न ऐकल्या सारखे केले पण नेहा मात्र आपले दात ओठ खात होती. ती काही बोलू शकत नव्हती कारण रुपाने तिचा हात आपल्या हातात धरून न बोलण्यासाठी नजरेतूनच इशारा केला होता.

" तू पण रुपा. काही ही ती बरळतेय तू मला गप्प बसायला सांगतेस.‌अस्सा राग येतो न तिचा....! हातात जे असेल ते फेकून मारावे असे वाटते बघं." नेहा शाळा सुटल्यावर शाळेतून बाहेर पडता पडता रुपाला म्हणत होती.

" जाऊ दे गं. तिचा स्वभाव तुला माहितच आहे न . मग कशाला आपण एवढा त्रास करून घ्यावा. चल आज तू घरी चल माझ्या बरोबर. आज आई अळूवडी करणार आहे. तुला आवडतात न. "

" गोड बोलून राग घालवण्याची कला तुझ्याकडून शिकावी बघं." असे म्हणत हसत हसत रुपाच्या पाठीवर हळूच हाताने टपली मारत नेहा म्हणाली.

दादाचे मालक पण आता दादा बरोबर विम्याची रक्कम त्वरित मिळावी या कामात व्यस्त होते. काहीही करुन लवकरात लवकर रक्कम मिळाली तर फॅक्टऱी पूर्ववत सुरू करुन द्यायची हा विचार नेहमी त्यांच्या डोक्यात असायचा.

बघता बघता दोन महिने झाले.‌त्यादिवशी विमा अधिकाऱ्यांचा फोन दादाच्या मालकांना आला.

" तुमचे सगळे पेपर तयार आहेत. जितकी मिळणार तितकी रक्कम तुम्हाला मिळणार आहे.ही रक्कम तुमच्या वडिलांच्या बॅकेच्या खात्यात जमा होणार. ते खाते तुमच्या आईबाबांचे जॉईंट अकाऊंट आहे त्यामुळे काही प्राॅब्लेम होणार नाही. आणि हो कामगारांच्या कुटुंबाला मिळणारी रक्कम त्यांचे देखील अकांऊट आहेत तिथेच जमा होणार आहे. तेव्हा तुम्ही बॅकेमध्ये जाऊन पासबुक अपटेड करा एक दोन दिवसात. " विमा अधिकाऱ्यांनी दादाला सांगितले.

दोन दिवसांनी दादा आपल्या मालकांबरोबर आईला घेऊन बॅकेत गेला. सर्व पासबुक अपटेड केली.

राधाने पासबुक हातात घेतले तसे तिच्या डोळ्यांतून टपटप अश्रू वाहू लागले.

" आजच आपण वस्तीवर जाऊन ज्यांची त्यांची पासबुके त्यांच्या हातात देऊया. या मोठ्या जवाबदारीतून सुटेल मी. तुझ्या बाबांना पण हिच खरी श्रद्धांजली ठरेल." राधा म्हणाली.

" हो आई. तू जे म्हणशील तेच करु. चल हे घे पाणी पी. निघू आपण." असे म्हणत दादाने आईला पिण्याच्या पाण्याची बाटली दिली.

हे तिघे रिक्षातून वस्तीवर गेले. तिथे जाऊन प्रत्येकाला पासबुक देऊ लागले. जो तो पासबुक हातात घेऊन रडू लागला. कोणी आपल्या बापाला आठवून तर कोणी आपल्या भावाला,कोणी आपल्या नवऱ्याला तर कोणी आपल्या कर्त्या धर्त्या तरुण मुलाला आठवून खूप रडू लागले होते. हे दृश्य अगदी हृदय पिळवटून टाकणारे होते.

थरथत्या हाताने एक महिला," काय करु पोरी या समद्या पैशाचं मी. माझं कुंकू पुसलं गेलं त्याचबरोबर माझं लेकरू पण . आता मी एकलीच हाय. आजवर मला या वस्तीवाल्यांनीच भाकरीचा तुकडा दिला. ते खाऊनच मी जित्ती हाय. मी काय म्हणते हे पैशे सगळे यांनाच दे वाटून. माझी मूठमाती पण हीच करणार हायित ."

हे ऐकून राधा स्तब्ध होऊन उभी राहिली. ती महिला इतकी पण वयस्कर नव्हती जितकी ती तिच्यावर ओढावलेल्या प्रसंगाने वाटत होती.

" ठिक आहे माई. जी तुमची इच्छा. मी सर्वांना विचारते मग सर्वांनी होकार दिला तर मी ही रक्कम सर्वांना वाटून देते." राधा म्हणाली.

" नको नको.म्हातारीचे पैशे असुदेत तिच्या जवळ. तिच्या औषधाला उपयोगी पडतील. जेवणाच काय रोज सारखं खायिल आमच्या जवळ." सर्वांनी एकदम मिळून म्हटले.

\" गरीब आहेत. स्वतः ला खायला मिळेल का नाही याची शाश्वती नाही. दिवसभर मोलमजुरी करतात. राब राब राबतात. पण तरीदेखील एका महिलेला इतकी वर्षे आसरा दिला आहे. हिच खरी माणुसकी आहे. यांनीच माणुसकी जगवली आहे. मानाचा मुजरा यांना.\" असे मनात म्हणत राधाच्या चेहऱ्यावर एक गोड मंद हास्य आले.

घरी परतल्यानंतर ," आज खुप मोठे कर्ज उतरले माझ्या डोक्यावरून. आज खूप दिवसांनी मला रात्री छान झोप लागणार आहे बघं." राधा दादाला म्हणाली.

" हो आई . आज तू पाहिलेस का त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता. या आनंदात अधूनमधून त्यांचे आपले माणूस नाही आपल्या बरोबर याचे दुःख पण दिसत होते."

" हो रे बाळा. बघं न आपण तरी कुठे विसरलो आहोत का . रोज मला यांची आठवण येतेच. मन आतून इतके रडते रे पण ...! पण तुमच्या समोर रोज एकच दुःख घेऊन मी बसले तर बरे वाटत नाही न."

" अगं कशाला इतकी उदासीन होतेस राधा. तू खरंच खुप नशीबवान आहेस लेकी. तुझ्या पोटी अशी मुले जन्मली. बस आता थोडेच दिवस. मुलांची शिक्षणे पार पडली की जो तो आपापल्या कामाला लागतो. फॅक्टऱी पण जोमाने सुरू करायची. मग आपल्या ह्या ह्या गोडूलीचे लगिन करायचे....!" असे म्हणत आजीने जोराने हसत हसत रुपाचा पापा घेतला.

" आजी काय हे...! सारखे लग्न लग्न लग्न. मी नाही जा....! मला खूप शिकायचे आहे. मी खूप मोठ्या पदावर काम करणार आहे. त्यासाठी किती ही अपार कष्ट घेण्यासाठी मी तयार आहे. यामुळे मी लवकर लग्न करणार नाही." असे म्हणत रुपा आपल्या आईला मिठी मारली.

क्रमशः
©® परवीन कौसर

🎭 Series Post

View all