कस्तुरी भाग २३

परशूराम आपल्या पत्नीसह दवाखान्यात पळतच गेला


कस्तुरी
भाग २३

" अरे तोच परशूराम ज्याने तुम्हाला फसविले जमीनीसाठी..!"

हे ऐकल्यावर राधा जरा उभारेलेल्या जागेवरून दोन पावले मागे सरकली. तिच्या चेहऱ्यावर वेगळेच हावभाव आले. ते दादाच्या नजरेतून सुटले नाही पण तरीही तो तिथे तसाच उभा राहिला आणि तिथे एक वेगळीच शांतता पसरली.

" हो का...?" दादाच्या मालकांनी ती शांतता भंग केली.

" हो...! एकुलता एक मुलगा आहे हा. तीन मुलींच्या पाठीवर झाला म्हणून लाडावलेला आहे." नंदकुमार म्हणाले.

" काही आठवतं का ? कोण आहात तुम्ही ? तुमचे नाव काय ?" नर्स ने विचारले.

" अं.....! हो....! मी...!
माझे नाव अमित...!"

" हो हा अमित आहे. मी याच्या वडिलांना ओळखतो. माझ्याकडे त्यांचा फोन नंबर आहे. करतो फोन त्याला." असे म्हणत नंदकुमारांनी आपल्या खिशातून मोबाईल फोन काढला.

" हॅलो...! परशूराम...! तुमच्या अमितचा एक छोटासा अपघात झाला आहे. दवाखान्यात ठेवले आहे त्याला.....!" असे म्हणत दवाखान्याचे नाव सांगून नंदकुमारांनी फोन ठेवला.

" चला जरा आपण चहा घेऊन येऊ." असे म्हणत नंदकुमारांनी या तिघांना बाहेर नेले.

" कुठे आहे माझे बाळ. अमित...! अमित...! अरे बाळा...!" असे ओरडतच रिक्षातून एक जोडपे बाहेर पडले आणि पळतच दवाखान्यात जाऊ लागले.

रिसेप्शनीस्टने त्यांना अमितला आताच त्याला आॅपरेशन थिएटर मधून रुममध्ये शिप्ट केले आहे .रुम नंबर २१२ असे सांगितले.

" आॅपरेशन थिएटर....! अरे देवा...! माझं लेकरु....!" असे म्हणत अमितची आई रडू लागली.

" अगं रडू नकोस.चल लवकर चल बघू जाऊन आधी चल चल . पाय उचल पटपट." असे म्हणत परशूराम तिचा हात धरुन ओढत नेऊ लागला.

रुमचा दरवाजा बंद होता. परशूरामच्या मनात वेगळीच धडक भरली पण आपणच असे घाबरलो तर आपली पत्नी काय करेल.असे मनात म्हणत उसने अवसान आणून हळूच दरवाजा उघडला.

" अरे अमित ऽऽऽऽ काय रे झाले बाळा तुला.....!" असे म्हणत पळतच आई अमितच्या जवळ गेली.

" अहो बाई हा दवाखाना आहे. इतके जोरात आवाजात ओरडा करु नये. पेशंटला आताच आणले आहे रुममध्ये. हवी तशी पूर्ण शुद्ध नाही आहे यांना. जरा हळू आवाजात बोला. तसे घाबरण्याचे कारण नाही." नर्स सलाईन लावता लावता म्हणाली.

परशूराम अमितजवळ बसला. त्याच्या सुजलेल्या चेहऱ्याकडे बघत आपले डोळे पुसले. त्याला एकसारखे निहारत त्याचे लक्ष त्याच्या पायाकडे गेले तसा तो जरा हादरलाच. त्याच्या डोळ्यात वेगळीच भिती दिसली.

" मी जरा डाॅक्टरांना भेटून येतो." असे म्हणत परशूराम बाहेर आला.

" डॉक्टर काही काळजी करण्यासारखे नाही न ?" असे अगदी काकुळतीने परशुरामाने विचारले.

" बसा...! असे आहे म्हणजे मी स्पष्टच बोलतो. तो भरधाव वेगाने येऊन धडकला तर त्याच वेगाने तो जोराने फेकला गेला. यामुळे त्याच्या डोक्याला जबरदस्त मार बसला आहे.त्यामुळे त्याला खोलवर जखम झाली आहे.चार टाके पडलेले आहेत. थोड्या दिवसात भरेल जखम ती पण...!

पण पाय त्याचे दगडात अडकल्याने असे काही अडकले की तिथेच ते चिरडून गेले. अंतरजखम झाली असलेमुळे कायमचाच तो निकामी झाला आहे."

ऐवढे ऐकून परशूरामाच्या पायाखालची जमीन सरकली. तसेच तो स्वतःला सावरत सावरत उठून अमितच्या रूममध्ये आला.

तिथे नंदकुमार उभे होते.

त्यांना बघून तो जरा थबकलाच पण पुन्हा त्यांची नजर चुकवून समोर बघू लागला.

" परशूराम हे खरंच खुप वाईट झाले. तरी ही नशीब चांगले म्हणून हे लोक भेटले. यांनी इथे आणले याला. नाही तर कोणी अशा अपघातात मदत करत नाहीत. एकतर बघ्याची भूमिका घेतात नाही तर बघून न बघितल्या सारखे निघून जातात."

" अं....! हो...!
कुठे आहेत ते. "

" बाहेर आहेत."

" ठिक आहे चला ."

" हेच परशूराम. अमितचे वडील." नंदकुमारांनी परशूरामला राधा समोर उभे करुन म्हणाले.

त्याला बघताच राधाची तळपायाची आग मस्तकाला गेली. ती काही बोलणार तोच

" अच्छा. काय बोलायचे. खूप वेगाने स्कुटर चालवत होता तुमचा मुलगा. आजकाल मुले इतक्या वेगाने का गाडी चालवतात हेच कळत नाही. आपल्या जीवाचे काही बरेवाईट होईल याची जरा देखील काळजी नसावी का यांना." अगदी हळू आवाजात दादाचे मालक म्हणाले.

" मी खरोखर आपला आभारी आहे. तुम्ही जर मदत केली नसती तर...! काय माहित अमित तिथे अजून किती वेळ तिथेच पडला असता." असे म्हणत परशूराम ने आपले डोळे पुसले.

हे सगळे आत रुममध्ये गेले. तिथे अमितची आई रडत बसलेली होती.

तिला असे पाहून राधाच्या पण डोळ्यात पाणी आले. तिने तिच्या पाठीवरून हात फिरवत म्हटले," काही काळजी करू नका ताई. होईल सारे ठिक."

ती पटकन उठली आणि राधाच्या गळ्यात पडून रडू लागली.

" काही समजत नाही बघा ताई. या आठवड्यात आमच्या बरोबर सगळेच वाईट घडत आहे. मोठी मुलगी टेरेसवर जात होती.कसा कोणास ठाऊक तिचा पाय घसरला आणि ती धाप्पकन खाली पडली. तिचा हात फॅक्चर झाला.

तोच दुसऱ्या दिवशी मधली मुलगी स्वयंपाक करत होती ‌. कुकरमध्ये काही बिघाड झाला आणि कुकर फाट्टकरून उडाला. त्यामधील गरम शिजलेले अन्न तिच्या हातांवर चेहऱ्यावर उडले त्यामुळे तिला भाजले गेले.

यातून सावरलो नाही तोपर्यंत आज हे अमितचे असे. काय ही परिक्षा घेत आहे तो आमची." असे म्हणत ती ओक्साबोक्शी रडू लागली.

हे ऐकून नंदकुमारांनी दादाकडे पाहिले. दादाने पण काही न बोलता शांत उभा राहिला.

" काही होणार नाही. असते एखादी वेळ. काही तरी आपले असतात हिशोब त्याच्याजवळ. त्याचीच बेरीज वजाबाकी होत असते. पण ती होऊ नये म्हणून आपण आधीच खबरदारी घेतली पाहिजे नाही का परशूराम." नंदकुमार म्हणाले.

हे ऐकून परशूरामाच्या चेहऱ्यावरचे रंगच उडाले. त्याने काय समजायचे ते समजून गेले.

" ठिक आहे काळजी घ्या. निघतो आम्ही." असे म्हणत नंदकुमारांनी परशूरामाच्या खांद्यावर हात ठेवला.

" हो . पुनः एकदा तुमचे आभार." असे म्हणत तो सर्वांसमोर हात जोडून उभा राहिला.

हे सगळे दवाखान्यातून बाहेर पडले.

" म्हणतात ना कर भला तो हो भला. असे काहीसे झाले आहे याच्याबरोर." नंदकुमार म्हणाले.

" हो सर. पण हे त्याच्या मुलांना असे व्हायला नको होते न. त्याची करणी तर त्यालाच काही व्हायला हवे. याच्या पापाची शिक्षा या निष्पाप मुलांना झाली." असे कळकळीने राधा म्हणाली.

क्रमशः
©® परवीन कौसर

🎭 Series Post

View all