कस्तुरी भाग १८

विम्याची रक्कम फॅक्टरीतील मयत कामगारांच्या कुटुंबात पण मिळेल अशी शास्वती विमा अधिकारी म्हणाले.


कस्तुरी
भाग १८

सकाळी लवकर उठून आईने सगळा स्वयंपाक केला. दादा पण आज जरा लवकरच उठला होता. त्याने विम्याची सगळी कागदपत्रे पुन्हा एकदा बघितली आणि एका बॅगेत भरून ठेवली. मुलांना चहा नाश्ता देऊन आई तयार झाली. दादा आई दोघेही विमा आॅफिसमध्ये जाण्यासाठी निघाले. तोच आजीने आवाज दिला," अरे थांबा जरा. हे घ्या पिण्याच्या पाण्याची बाटली आणि हा जेवणाचा डबा.काय माहीत तुम्हाला तिथे किती वेळ लागेल. जरा निवांत बसून जेवा दोघे मायलेक. सांभाळून घेऊन जा रे बाळा आईला." असे म्हणत आजीने एक छोटीशी बॅग दादाच्या हातात दिली.

" अगं आजी कशाला डबा भरला. येऊन जेवू आम्ही."

" अरे तुला चालेल रे वेळ झाला तर . पण लेक माझी इतका वेळ उपाशी नको रे बाबा."

विम्याच्या आॅफिसमध्ये दादाचे मालक आधीच येऊन उभारले होते. दादाला बघताच त्यांनी जरा पुढे जाऊन आईंना नमस्कार केला.

" नमस्ते वहिनी.कशा आहात ? ओळखलतं का मला ? "

" नमस्कार भाऊजी. हो ...! हो ...! ओळखलं न. मी आता बरी आहे. तुमचे खूप उपकार आहेत आमच्यावर. आमच्या बिकट परिस्थितीत तुम्ही माझ्या लेकराला आधार दिलात."

" अहो उपकार काय त्यात . याचे बाबा अन् मी मित्र होतो. मैत्री मध्ये उपकाराची भाषा नाही पटत. बरं चला आपण आत जाऊ. बघू काय होतं ते." असे म्हणत त्यांनी या दोघांना आत आॅफिसमध्ये नेले.

विम्याची कागदपत्रे पाहून तिथल्या अधिकाऱ्यांनी होकारार्थी मान डोलावली.

" हो होईल तुमचे काम. नैसर्गिक आपत्तीत तुमची फॅक्टरीचे नुकसान झाले आहे . तेव्हा याच्यासाठी जेवढी रक्कम मिळते ती बघूया. याच बरोबर जिवीतहानी पण झाली आहे. तेव्हा त्याची पण भरपाई मिळणार. तुमच्या बाबांनी सर्व कामगारांचे विमे उतरविले होते. तर त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळणार.

तुम्ही एक काम करा . उद्या तुमच्या फॅक्टरीतील मयत कामगारांच्या कुटुंबात याबद्दल सविस्तर माहिती द्या. तिथे आता जे कोणी कर्ता पुरुष असेल त्यांना सांगून मयत व्यक्तीची माहिती घेऊन या. म्हणजे पुढची कामे करण्यास वेळ लागणार नाही. एका महिन्याभरात काम होईल." अधिकाऱ्यांनी सांगितले.

हे ऐकून दादा आई दोघांनाही खूप आनंद झाला. दादांच्या मालकांनी अधिकाऱ्याचे आभार मानले.

हे तिघे आॅफिसच्या बाहेर पडले.

" आता एक काम करायचे. फॅक्टरी मध्ये काम करणाऱ्यांची नावे आणि पत्ता या कागदपत्रांच्या आधारे आपल्याला मिळणार. त्या पत्त्यावर आपण उद्या जाऊ. सगळी माहिती देऊ.

काय माहित या आपत्ती नंतर त्यांच्या घरी काय झाले असेल. कर्ताधर्ता पुरुष अचानक गेला तर मागे असणाऱ्या कुटुंबाचे हाल झाले असतील.

विम्याची रक्कम मिळाली तर खरंच खूप आधार होईल त्यांना." मालकांनी दादाला सांगितले.

समोरच एक छोटासा बगीचा होता ते बघून दादाने तिथे जाऊन दोन घास खाऊन मगच पुढचे बोलू असा विचार करून या दोघांना तिथे नेले.

तिघांनी आजीने दिलेला डबा जरा वेळ निवांत बसून खाल्ला. यानंतर दुसऱ्या दिवशी कधी निघायचे याची वेळ निश्चित केली याचबरोबर ज्या गावी जमीन आहे तिथेही लवकरच जाऊन यायचा हे पण ठरवले.

" वहिनी तुम्ही खरोखर भाग्यशाली आहात. तुमची मुले लाखात एक आहेत. या मुलांना मी लहानपणी बघितले होते किती दंगामस्ती भांडणं करायची आता हीच मुले आपापल्या जबाबदारीवर अगदी कर्तबगारी झालेली आहेत.

हा तर खूप प्रामाणिकपणे मेहनत करुन आपले काम करतो. याच्या कामावर मी नेहमी खूश असतो. पुढे हा खूप प्रगती करणार बघा. याच्या काम करण्याच्या चिकाटीने कमी वयात याने खूप काही शिकले.

याला आपल्या लहान भावंडांसाठी शिक्षण मध्येच सोडावे लागले याची मला खूप खंत वाटत होती. म्हणून मी या नाईट कॉलेज मध्ये प्रवेश घेऊन द्यायचा निर्णय घेतला. याने देखील माझ्या बोलण्याचा मान ठेवून प्रवेश घेतला. आपले काम त्याचबरोबर अभ्यास. घरची जवाबदारी सगळे उत्तम रितीने पार पाडत आहे.

आता फॅक्टऱीचे विम्याचे पैसे मिळाले तर पुन्हा फॅक्टऱी सुरू करण्याचा प्रयत्न करु आपण. तोपर्यंत याचेही शिक्षण पूर्ण होईल." दादाचे मालक बोलत होते.

त्यांचे बोलणे ऐकून आईच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.

संध्याकाळी आई दादा घरी परतले. सर्वांना जे काही घडले ते सर्व सांगितले.

मुलांना खूप आनंद झाला. आजीने देवाचे आभार मानले.

रात्री आईने देवघरात जाऊन देवाजवळ आपली सगळी कामे लवकर पूर्ण होऊ देत कामगारांच्या कुटुंबाला लवकरात लवकर आर्थिक मदत मिळू दे. फॅक्टरी पुन्हा एकदा नव्याने उभी राहू दे अशी मनोमनी प्रार्थना केली.

" आई आज शाळेला सुट्टी आहे. मला आज तुम्हा दोघांबरोबर यायचे आहे." रुपा आईला म्हणाली.

" अगं तू काय करणार येऊन ? तू अभ्यास करत बस घरी. आम्ही लगेचच येतो ग." आईने म्हटले.

" नाही आई मी येणार आहे. मला पण त्या सर्वांना भेटायचे आहे ."

" बरं बाईसाहेब चला. तुम्ही अगदी तुमच्या वडिलांवर गेला आहात." आईने हसत हसत रुपाच्या डोक्यावर हात ठेवत म्हटले.

दादा ,रुपा आईबरोबर कागदपत्रांच्या आधारे मिळालेल्या पत्त्यांनुसार कामगारांच्या घरी निघाले.

शहरापासून दूर असलेल्या एका छोट्या वस्तीत वास्तव असणारी ही कुटुंबे. वस्ती बघितली तरच त्यांच्या गरीबीची जाणिव होत होती. अगदी छोटी छोटी झोपडी वजा घरे होती.

वस्तीमध्ये गेल्यावर ज्यांची नावे कागदपत्रांत होती ती नावे दादाने तिथे समोरच उभा असणाऱ्या मुलाला विचारले. त्याने नाव ऐकताच समोरच्या झोपडीसारख्या दिसणाऱ्या घराकडे बोट दाखवून दिले.

हे तिघे घरासमोर जाऊन घराचे दार ठोठावले.

" कोण..? कोण हाय..?" आतून एक बारीकसा आवाज ऐकू आला.

" मी ...! मी राधा...! सदानंद रावांची पत्नी...!"

एकदमच दार कर्रर्र आवाज करत एका महिलेने उघडले.

वयापेक्षा मोठी परिस्थीतीमुळे झालेली . जीर्ण झालेल्या साडीचा पदर सावरत हळूच तो आपल्या डोक्यावर घेण्याचा प्रयत्न करत ," मालकीणबाई तुमी...! गरीबाघरी आलाय...!" असे तिने आश्चर्यचकित होऊन म्हटले.

" हो मीच."

" या या आत या. घर तसं तुमच्या बसण्याजोग नाय हाय. "
असे आपले तोंड बारीक करून तिने आत येत म्हटले.

" असु द्या ओ." आईने तिच्या बोलण्याला दुजोरा दिला.

हे तिघे आत गेली. घरामध्ये एक छोटासा गंजलेला पत्र्याचा पलंग एका कोपऱ्यात होता. समोरच राॅकेलचा पंपाचा स्टोव्ह. नावालाच चार पाच भांडी. बाजूला एक दोरी बांधून त्यावर फाटलेली बेडसीट टाकली होती.बहुतेक तिथे आंघोळीसाठी छोटी न्हाणीघर असेल. पाठीमागील भिंतीला लागून एक कपाट. कपाट कसले दोन लाकडी फळ्या आजूबाजूला त्यामध्ये तुटक्या फळ्या लावून केलेले कपाट. त्यामध्ये जुन्या कापडाच्या गाठोडी ठेवल्या होत्या.

" बसायला हथंरते थांबा बाईसाहेब." असे म्हणत तिथे पलंगाखाली ठेवलेली सतरंजी काढली. जराशी झटकून जमीनीवर अंथरली.

हे तिघे जण सतरंजीवर बसली.

" बाईसाहेब त्या दिवशी खूप वाईट घडलं बगा. सपनात पण इचार केला नव्हता असं होईल. काय तो पाऊस नि काय ते वादळ. सगळ सगळ धुळीला मिळालं . माझा धनी पण....!" असे म्हणत ती रडू लागली.

आईने तिचे डोळे पुसत म्हटले," तुमचेच नाही माझे पण असेच झाले न. नशीब आपले.काय करायचे."

" ते तर हायच पण.एकटाच होता कमावणारा मालक माझा घरात. दोन ल्हान पोरं. म्हातारा म्हातारी . असे स्हा जण घरात. मालक गेले त्यांच्या पाठोपाठ म्हातारा म्हातारी पण एकेक करून एकापाठोपाठ एक गेली. र्हायलो आमी तिघच.आता या पोरांच्या पोटापाण्याचा प्रश्न. मग मी चार घरची धुणीभांडी करून आमची पोट भरायची ‌. पण तिथं पण नशीब गांडू निघालं.

त्यादिवशी ज्या घरात मी कामाला जायची त्या म्यडमची तब्येत बिघडली म्हणून त्यांना दवाखान्यात भरती केले होते. मग मला तिथे राहून स्वैपाक करायला सांगितले. मग मी दोन दिवस तिथेच राहीले मुलांना घेऊन.
तिसऱ्या दिवशी म्यडमचा भाऊ गावावरून आला. त्याने माझ्या वर वाकडी नजर टाकली. मला कळलंच नाही पण रात्री मी मुलांना झोपवत होते तेव्हा हळूच येऊन माझ्या अंगावर हात टाकला. तेव्हा मी घाबरले. मला पैशाची मदत करतो तू फक्त मला हवं ते दे रोज असे म्हणत काही नोटा माझ्या चोळीत कोंबू लागला. त्याचा दुसरा हात माझ्या पाठीवर होता. त्याचे ते घाणेरडे हात मी सरकन मागे सारले आणि माझा पदर सावरत मी पटकन उभी राहून फाटकन त्याच्या कानफाडात मारले.

माझ्या अशा अचानक मारण्याने तो धाडकन बाजूला पडला.

" मी विधवा आहे म्हणून तुझी मिळकत नाही रे चांडाळा. तुझ्या बहीणी साठी इथे राहीली आहे मी .आजारी बहिणीचा जरा तरी विचार कर रे लांडग्या." असे मी जोरात ओरडून म्हणाले. माझा आवाज ऐकून मालक पळत आले.

" काय झाले ? का ओरडतेस बायजा?"

" मालक हा तुमचा म्हेवणा माझ्या वर हात टाकतोय." मी रडतच म्हणाली.

" दाजी ही बाई खोटं बोलते. हीच माझ्या जवळ पैशासाठी आपला पदर टाकून उभी राहिली आहे. मी नाही म्हटले तर अशी ओरडते. बाहेर काढा हीला.आज माझ्यावर आरोप करते उद्या तुम्हाला पण सोडणार नाही.काढून टाका हिला." असे म्हणत माझे हात धरून ओढत ओढत मला त्याने घराबाहेर काढले.

त्यानंतर सगळ्यांची माझ्या बाबतीत चुकीची समजूत झाली. आता माझ्या पोरांना पण कोणी जवळ घेत नाहीत.मला काम पण कोणी देत नाहीत.मग मी भंगार गोळा करून ते विकते. तेव्हा काही पैसे मिळाले की पोरांना खायला आणून देते‌.नशीब फुटक घेऊन जन्माला आली बघा मी‌." असे म्हणत तिने आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

असे वाटत होते की आज खूप दिवसांनी ती व्यक्त झाली होती.

क्रमशः
©® परवीन कौसर

🎭 Series Post

View all