कस्तुरी भाग १७

आईने दादाला छोट्या कपाटात ठेवलेल्या किंमती वस्तू दाखविल्या.


कस्तुरी
भाग १७

आता घरात खुपचं आनंदी वातावरण होते. आई पण थोडी थोडी सावरली होती. आजी आई दोघीही आता आपल्या वयाचे अंतर विसरून जीवाभावाच्या मैत्रिणी बनल्या होत्या. त्यांचा दिवस अगदी हसत खेळत मजेत जाऊ लागला होता.

मुले आपापल्या कामात व्यस्त होती. रुपा नेहा शाळा अभ्यास यामध्ये मग्न होत्या. दादाने देखील आता मुलांना शिकवणी वर्ग सुरू केले होते. रुपा नेहा दोघी दादाकडून आपले दुसरे विषयांची देखील उजळणी करुन घ्यायच्या. एकंदरीतच घरचे वातावरण आनंदी झाले होते.

सोमवारी सकाळी सर्वांची कामावर जायची गडबड सुरू होती . रुपा पण आपल्या शाळेला जाण्यासाठी तयार होत होती. आई आजी दोघींनी मुलांचे दुपारचे जेवणाचे डबे भरले होते. दादा लवकरच बाहेर पडायचा. तो जाण्याआधी नेहमी देवाला नमस्कार करायचा . तसाच आजही तो देवघरात गेला . जरा वेळ उभारुन देवासमोर सर्वांसाठी मनोमनी प्रार्थना केली दोन फुले वाहिली आणि तो मागे फिरला. तर तिथे त्याच्या मागे आई उभी होती.

" बाळा जरा थांब. काम आहे तुझ्या जवळ." आई हळू आवाजात म्हणाली.

" हो बोल न आई . काही हवंय का तुला. औषधे संपली का ? थांब आणून देतो मगच कामावर जातो."

" अरे नाही रे बाळा. मला काही ही नको . औषधे पण आहेतच शिल्लक. तू जरा चल माझ्या खोलीत ‌."

हे दोघे मायलेक आत खोलीत गेले. आईने आपले कपाट उघडले. कपाटात तिच्या साड्या ठेवलेल्या होत्या. त्या साड्या अलगदपणे तिने उचलून समोरच्या टेबलावर ठेवल्या. त्यासाड्यांच्या खाली असलेला तो खाना हळूच आईने उचलला. त्यामध्ये एक छोटीशी चावी होती. ती चावी तिने दाराजवळ दिली ," ही चावी आपल्या देवघरात असलेल्या छोट्या कपाटाची आहे. म्हणजे ते कपाट आहे असे कोणालाही वाटतच नाही कारण त्यावर आम्ही आपले सगळे देव ठेवलेले आहेत. त्या कपाटात तुझ्या बाबांनी काही पैसे, दागिने आणि फॅक्टऱीच्या विम्याचे पेपर त्याचबरोबर गावी एक मोठी जमीन घेतली होती त्याची कागदपत्रे आहेत. विम्याची कागदपत्रे घेऊन तू त्या आॅफिसमध्ये जा. बघं काही होतं का. कारण आपली फॅक्टऱी त्या जीवघेण्या वादळात समुळ नष्ट झाली त्याचबरोबर तुझे बा..बा..!" आईचा कंठ दाटून आला होता.

हे सगळे ऐकून दादा आ वासून उभा राहिला. आईच्या साड्या ठेवतात तिथे एक असा कप्पा आहे हे त्याला काय घरी कोणालाही माहीत नव्हते त्याचबरोबर देवघरात ते छोटे कपाट आहे याची देखील कुणाला कल्पना नव्हती. आजीला तर ती एक छोटीशी पेटीच वाटली होती ज्यामध्ये देवाच्या पोथ्या पुराणे ठेवल्या आहेत असेच.

दादाने छोट्या कपाटावर अंथरलेले मखमली कापड हळूवारपणे उचलून कपाट उघडायचा प्रयत्न करू लागला. कपाट इतकी वर्षे उघडले नसल्याने थोडे उघडण्यासाठी त्रास देऊ लागले. मग पुन्हा एकदा प्रयत्न केला तर ते पटकन उघडले. बाहेरून इवलेसे दिसणारे पेटी सारखे कपाट आत इतके नीटनेटकेपणाने ठेवलेल्या वस्तू पाहून दादाला आश्चर्य वाटले.

एका रकान्यात काही कागदपत्रे एकावर एक असे व्यवस्थितपणे ठेवली होती. दुसऱ्या रकान्यात एक लहानशी लाकडी पेटी होती. जी आता धुळकटलेली होती. ती दादाने हळूच बाहेर काढली. काहीशी काळपट पडलेली पेटी समोर त्याच्या छोटासा लाॅक होता. तो थोडा गंजला गेला होता. आईने आपल्या साडीच्या पदराने तो लॉक पुसला आणि पेटी उघडली. करकर असा आवाज पेटीचा आला. खुप वर्षे बंद असल्यामुळे पेटीच्या बिजागऱ्या गंजलेल्या होत्या. पेटी होती तर लाकडाची पण आतून मखमली कापडाचे आवरण होते त्यामध्ये सोन्याचे दागिने ठेवले होते. त्या दागिन्यांना स्पर्श करता करता आईचे डोळे पाणावले होते.

तिने ती पेटी बाजूला ठेवली. नंतर शेवटच्या रकान्यात छोट्या छोट्या कापडाच्या चंच्या बांधून ठेवल्या होत्या.

" अगं आई हे काय आहेत ? छोट्या छोट्या गाठोड्यात काय बांधून ठेवले आहे गं?" दादाने विचारले.

" अरे बाळा तुमच्या शिक्षणासाठी आम्ही दोघांनी पैसे बाजूला काढून ठेवले होते. तेव्हा तुम्ही तिघेही वसतिगृहात होतात . शालेय शिक्षण झाले की तुम्हाला उच्च शिक्षणासाठी होणारा खर्च आम्ही आधीच आखून ठेवला होता. त्याचबरोबर रुपाचा लग्नासाठी पण बॅकेमध्ये ठेवी केल्या आहेत.

तुझ्या बाबांचे स्वप्न होते रे मुलांना खूप शिकवायचे. मोठ्या पदावर नोकऱ्या करावी आपली मुले. रुपाला पण चांगले शिकवायचे तिला चांगल्या घरात लग्न करून द्यायचे. यासाठी जितका होईल तितका खर्च करायला मागे पुढे बघणार नाही. आपल्या मुलांना काही कमी पडता कामा नये. यासाठी ते दिवस रात्र काम करत होते. पण..

पण

नियतीने आपला डाव साधला. हे घडले . सारी स्वप्ने धुळीस मिळाली. " असे म्हणत आई रडू लागली.

" आई तू रडू नकोस. आम्ही आहोत ना. आता तू पण बरी झाली आहेस‌. आता आपण सगळे मिळून बाबांची स्वप्ने पूर्ण करूया." दादाने आईचे डोळे पुसत म्हटले.

आईने देखील दादाच्या बोलण्यावर होकारार्थी मान डोलावली.

" अरे दादा काय करतो आहेस ? तुला वेळ होत आहे न जायला ? आणि हे काय आहे?" रुपा देवघरात येऊन सगळ्या वस्तू बघून म्हणाली.

" हो हो निघालोच आहे गं. आईचे काम होते म्हणून थांबलो. बरं तू पण जाऊन ये शाळेला. संध्याकाळी आपण सर्व जण बसून बोलू याविषयी." दादा म्हणाला.

" बर आई मी निघतो. येईनच मी लवकर घरी. मग आपण सर्व जण एकत्र बसून बोलू." असे म्हणत दादा बाहेर पडला.

रुपा पण शाळेला गेली. आजी आई दोघी आपापली कामे करून बोलत बसल्या. नंतर दुपारी थोडा वेळ वामकुक्षी घेण्यासाठी आत खोलीत गेल्या.

दिवसभर या दोघीच घरी असल्यामुळे घर शांत असायचे तेच घर संध्याकाळी मुले घरी परतली की त्यांचा किलबिलाट सुरू व्हायचा. मुलांपेक्षा आता रुपा जास्त बडबड करायची. जी रुपा आईच्या आजारपणात अबोल झाली होती ती आता खळखळून हसत होती. आता तिचा चेहरा अधीकच सुंदर दिसत होता. चेहऱ्यावरचे काळजी वजा भीतीचे भाव कुठेतरी दूर सारून ती आनंदात न्हाऊन निघत होती. आता जणू काही तिचे बालपणच सुरू होते. आईकडून लाड पुरवून घेणे आजी बरोबर लाडी गोडी करणे. दारासमोर हट्ट करणे . असे बदल तिच्या मध्ये होत होते. तिच्या चेहऱ्यावर येत असलेले सौंदर्य पाहून आई आजी पण आनंदी झाल्या होत्या. एक वेगळीच रुपा जन्मली होती आता. आजपर्यंत ती एका जवाबदारीच्या ओझ्याखाली वावरत होती ती आता खळखळून वाहणाऱ्या झऱ्यासारखी झाली होती. तिच्या या बदलत्या रूपामुळे तिची भावंडे देखील आनंदी झाली होती.

संध्याकाळी आजीने गरमागरम साजूक तुपाचा शिरा केला होता.मुले परतण्याची वेळ झाली होती. आई आजी दोघीही मुलांच्या येण्याची वाट पाहत होती. इतक्यात एक एक करुन पाखरे घरट्यात परत फिरली. सर्वांनी घरात येताच

"आहाहा....! शिऱ्याचा खमंग सुवास दरवळत आहे." असे म्हणू लागली.

सर्वांनी गरमागरम शिऱ्या वर ताव मारला. त्यानंतर दादाने सर्वांना काही तरी सांगायचे आहे तुम्हाला असे म्हणत आईने सकाळी जे काही सांगितले ते सर्व सांगितले.

" मी चार दिवस सुट्टी घेतली आहे. आई तू आणि मी विम्याचे पेपर घेऊन विमा आॅफिसमध्ये जाऊया. बघू तिथे काय काय होतं ते. मी माझ्या मालकांना देखील तिथे बोलावले आहे. त्यांची पण मदत होईल आपल्याला. कारण मला काहीच माहिती नाही तिथे काय करायचे ते. त्यानंतर परवा बॅंकेत जाऊन हे सर्व पैसे जमा करून येऊया. जी काही होतील तितकी कामे चार दिवसांत करून घेऊ. मग पुढच्या महिन्यात सलग दोन दिवस सुट्टी आहे मला तेव्हा गावी असलेल्या जमीनीची कागदपत्रे घेऊन जाऊन तुझ्या नावावर करून घेऊ . "

दादाच्या बोलण्यावर आईने मनात म्हटले,\" इतक्या लहान वयात इतके शहाणपण कसे आले माझ्या मुलाला. देवा परमेश्वरा खरंच तुझे खूप उपकार आहेत बघं. लहानपणी इतका त्रास देणारी दंगामस्ती भांडणं करणारी मुले आज इतकी शहाणी झालीत यावर खरंच माझा विश्वास बसत नाही. माझ्या लेकरांवर अशीच कृपादृष्टी ठेव देवा.\" असे म्हणत मनोमनी देवाला नमस्कार केला.

क्रमशः
©® परवीन कौसर

🎭 Series Post

View all