कस्तुरी भाग १६

रुपाने शेवंताला आईला भेटण्यासाठी घरी घेऊन आली.


कस्तुरी
भाग १६

रुपाने ती अंगठी आपल्या हातात घेतली तोच तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तिला ती अंगठी नव्हे तर आपल्या बाबांचा हातच आपल्या हाती आहे असे भासू लागले. नेहाने तिला आपल्या जवळ घेतले आणि तिचे डोळे पुसत म्हटले," रुपा अगं रडतेस का अशी. उलट तुला आनंद व्हायला हवा. आई बरी झाली तोच बाबांची अंगठी मिळाली त्यांची शेवटची आठवण गं. बघं न काही तरी वैशिष्ट्य असेल बघ सगळ्या गोष्टी अशा जमवून आणल्यासारख्या घडत आहेत नाही का. अरे हो आपल्याला शाळेत जायला वेळ होत आहे. आपण एक काम करुया . यांना माझ्या घरी सोडूया. आई आहेच घरी. दुपारी लवकर सुटतेच शाळा आपली. मग तू यांना तुझ्या घरी घेऊन जा."

" अरे नको नको.मी जाते परत. आधीच पाहुण्यांच्या घरी आले आहे मी. ते लोक काय म्हणतील . नवरीची बहीण अशी फिरत बसली आहे. मग उगीच माझ्या बहिणीला त्रास देतील."

" बरं...! मग तुम्ही एक काम करा. तुमच्या पाहुण्यांच्या घरात जे काही काम आहे ते किती वेळा पर्यंत होईल अंदाजे ते सांगा. म्हणजे त्या वेळी आम्ही येऊन तुम्हाला घेऊन जातो. आईला भेटा तुम्ही. पण आईला भेटला तर बाबांविषयी जास्त काही बोलायचे नाही बरं का . ती आताच बरी झाली आहे ओ. आणि हो या अंगठी बदल पण सांगायचे नाही तिला. तिने जर अंगठी पाहिली तर ती पुन्हा जुन्या आठवणीत जाईल हे आपल्याला नको आहे. त्यामुळे फक्त तुम्ही तिला भेटायला आली आहे असेच सांगा.
नेहा आपण ही अंगठी तोपर्यंत तुझ्या घरातच ठेऊया. दादाला सांगते मी आई झोपली की." रुपा म्हणाली.

" हो हो मी काही बोलणार नाही याविषयी तू निर्धास्त रहा बाळ. मी पण याच दुःखात आहे .अजून सावरले नाही.उगीच लहान बहिणीकडे बघून आपले मन रमवायचे बघं.आता हिचे लग्न झाले की धाकटी राहते शांता . मग तिला पण कुठेतरी चांगले घर बघून दिले की मी मोकळी झाली. आता हे बघ तिथे पाहुण्यांच्या घरी दुपारचे जेवण होईल मग लग्नाची बोलणी. तरीपण दुपारचे तीन चार वाजतील."शेवंता म्हणाली.

" ठिक आहे कुठे आहे घर हे सांगा. येतो आम्ही न्यायला तुम्हाला." नेहा म्हणाली.

शेवंताने घरचा पत्ता दिला. तशा या दोघी शाळेला निघाल्या त्याआधी नेहाच्या घरी जाऊन अंगठी नेहाच्या आईजवळ देत सगळी गोष्ट सांगितली. नेहाच्या आईने ती अंगठी छोट्या डबीत घालून कपाटात ठेवून दिली.

दोघींना शाळेत जायला वेळच झाला. सरांनी वेळाने येण्याचे कारण विचारले तेव्हा रुपाने सगळी हकीकत थोडक्यात सांगितली.

दुपारी शाळा सुटल्यावर दोघी मैत्रिणी शेवंताने सांगितलेल्या पत्त्यावर गेल्या. शेवंता रुपाला बघताच घराच्या बाहेर आली.

" ये ये बाळा आत ये." शेवंताने रुपाचा हात धरत घरात नेले.

" हिच बघ रे रुपा. तुला सांगितले होते न ती हिच. हिच्या बाबांनीच मला मदत केली होती ." असे ती रुपाला दाखवत आपल्या भावाला म्हणाली.

" हो का ...! ये बाळ ये." तिचा भाऊ अगदी आनंदी होऊन म्हणाला.

" नको नको काका. वेळ होतोय. आई वाट बघत असेल. चला तुम्ही घरी." रुपा म्हणाली.

इतक्यात आतून एक वृद्ध महिला आली . " बस पोरी. हे घे तोंड गोड कर. आज माझ्या नातवाचे लग्न जमले आहे." असे म्हणत रुपा,नेहा या दोघींच्या हातात एकेक पेढा ठेवला.

रुपा शेवंताला घेऊन आपल्या घरी निघाली. या दोघींबरोबर शेवंताचा भाऊ पण येत होता. वाटेत चालता चालता रुपाने शेवंताच्या भावाला देखील आपल्या आईबद्दल सांगितले. तिच्या समोर आता जुन्या काहीच आठवणी काढायच्या नाहीत हे ही सांगितले.

आई अंगणात खुर्चीवर बसली होती. आजी समोर एक चटई अंथरुण मेथीची भाजी निवडत बसली होती.

" आई , आजी बघा आज कोण आले आहे तुम्हाला भेटायला. ओळखा पाहू." रुपा अंगणात येऊन म्हणाली.

आईने शेवंता कडे पाहिले पण ती ओळखू शकली नाही. आजी देखील तिला बघतच बसली.

" अगं या आहेत शेवंता काकू. यांची चहाची टपरी होती आपल्या फॅक्टरी समोर . पण यांच्या आई आजारी होत्या म्हणून यांनी हे गाव सोडून आईजवळ जाऊन राहिल्या. आता योगायोगाने यांच्या बहिणीला इथंलच स्थळ आले म्हणून आज या इथे आल्या.

आम्ही शाळेला जात होतो तेव्हा यांची भेट झाली . मग यांनी तुला भेटायला येणार आहेत असे सांगितले. तेव्हा यांना मी घरी घेऊन आले." रुपा आईला म्हणाली.

शेवंता ने आजीच्या पाया पडून त्यांचा आशिर्वाद घेतला. आईजवळ जाऊन म्हणाली," माझी खूप इच्छा होती बाईसाहेब तुम्हाला भेटायची‌ . पण वेळच मिळत नव्हता. नंतर मी आईसाठी गावी निघून गेली. आई गेली लहान बहिणींची जवाबदारी माझ्यावर आली‌ . बाबा तर आईच्या अशा अचानक जाण्याने एकटेच पडले भाऊ पण एकटा काय करेल. म्हणून मी तिथेच राहिले. आता एकीला इथलेच स्थळ आले .आज तिचे लग्न ठरवून टाकले बघा. धाकटी बहीण अजून लहान आहे. बघू तिचे पण वर्ष दोन वर्षांत लग्न करून दिले की मी मोकळी झाली. भावाला मामाचीच पोरगी केली आहे. आता या दोघांचे लग्न एका मांडवातच करायचे आहे.

बरं ते जाऊ दे. माझ्या बडबडण्यात तुमची खुशाली विचारायचेच विसरले बघा मी. कशा आहात बाईसाहेब तुम्ही ? मुले कशी आहेत ?"

" हो आता मी आहे बरी. मुले पण आपापल्या कामात ,शिक्षणात व्यस्त आहेत. " आईने हळू आवाजात म्हटले.

" बसा तुम्ही बोलत. मी चहा फराळाचे घेऊन येते." असे म्हणत आजी उठली.

" नको नको फराळ बिराळ काही नको. तिथे जेवण वेळाने झाले आहे. पोटात जरा पण जागा नाही. तुम्ही बसा निवांत. आम्ही पण जरा वेळ बसून निघतो. बसची वेळ झाली आहे." असे म्हणत शेवंता ने आजीच्या हाताला धरून खाली बसवले.

शेवंता बरोबर बोलत बोलत तास कसा गेला हेच कळले नाही.

" अक्का चल ऊठ की. बस निघून जाईल. गावी जायचं आहे न ." शेवंताचा भाऊ हसत हसत म्हणाला.

" अरे हो रे बाबा. बोलण्यात कसा वेळ गेला कळलेच नाही बघं. चल चल. बरं बाईसाहेब येतो आता आम्ही. लग्नाला यायच बरं का सर्वांनी." असे म्हणत शेवंता गडबडीने उठली.

शेवंताच्या पाठमोरी आकृती कडे आई एकटक लावून बघत होती. न जाणे तिच्या डोळ्यात लपलेले दुःख आईने कसे काय हेरले होते पण ती काहीच बोलली नाही.

रात्री सर्व जण जेवायला बसले होते ‌. आज रात्रीचा स्वयंपाक आजी रुपा दोघींनी मिळून केला होता.

" रुपा शेवंता चे लहान मुल पण त्या घटनेत गेलं न ग." आईने रुपाला विचारले.

" हो का . मला माहित नाही आई." रुपाने आईला खोटेच सांगितले.

सर्व जण दिवसभरात जे काही घडले ते सांगत जेवण करत होती पण रुपाच्या मनात वेगळेच विचार सुरू होते.

रात्री सगळेजण झोपले होते. रुपा अभ्यास करत बसली होती.

" रुपा तुला काय हवंय का ?" दादाने विचारले.

" अरे दादा तू झोपला नाहीस अजून ? रुपाने विचारले.

" अगं नाही झोपयलाच जात होतो. तर तुझ्या खोलीत लाईट दिसली म्हणून बघितले तर तू अभ्यास करत आहेस. म्हणून विचारले."

" अरे नको नको मला काही नको. बरं झाले तू आलास. अरे तुला मला काही तरी सांगायचे होते. पण आईसमोर कसे सांगू म्हणून सांगितले नाही. बस दादा आणि ऐक....!

असे म्हणत रुपाने आज जे काही घडले ते सर्व सांगितले.

हे सर्व ऐकून नकळतच दादाच्या डोळ्यांतून पाणी आले.

" दादा ऐक ना. मला असे वाटते. म्हणजे माझ्या मनात असा विचार आला आहे की. शेवंता काकूंच्या बहिणीचे लग्न झाले की काही दिवसांकरता त्यांना आपल्या घरी घेऊन येऊया का.म्हणजे त्यांनाही जरा बरे वाटेल आणि आई आजीला पण तेवढीच सोबत. बघं तुला कसे वाटते ते." रुपा म्हणाली.

" हो हो चालेल न. आधी त्यांच्या घरातील कार्य होऊ दे . मग आणू आपण . चल तू जरा वेळ अभ्यास करून झोप . खूप वेळ जागत जाऊ नकोस ." असे म्हणत दादा रुपाच्या खोलीतून बाहेर पडला.

क्रमशः
©® परवीन कौसर

🎭 Series Post

View all