कस्तुरी भाग १४

आज घरी पुरणपोळीचा बेत आजीने केला.


कस्तुरी
भाग १४

" आता पुन्हा माझ्या लेकीच्या घरी गोकुळ नांदणार . देवा परमेश्वरा अशीच तुझी साथ मिळू दे लेकरांना . आज खरंच तू आहेस हे दाखवून दिले. तुझे खुप खुप उपकार झाले रे या माऊलीवर." असे म्हणत आजीने देवासमोर दिवा लावून साखर ठेवली.

रुपा आपल्या आईबरोबर घरी आली. आईचा चेहरा अगदीच लहान बाळासारखा निष्पाप निरागस दिसत होता. आजीने पटकन येऊन तिच्या पायावर तांब्याभर पाणी घालून हात थोडे ओले करून तिच्या डोळ्यांना लावले.

" ये गं गौराई माझी. आज अंगण केवढे फुललेले आहे. तुळस वृंदावनात बहरली आहे . बघं गौराई आली घरी." म्हणत आजीने आईचा हात धरून हळूहळू तिला आत घरामध्ये नेले.

तिच्या पाठोपाठ नेहा,रुपा आणि दादा हे तिघेही आले. आजीने सर्वाना पाणी प्यायला दिले. रुपाने आईची औषधे आत नेऊन ठेवली. दादा पण आत जाऊन कामावर जायला तयार झाला. ही दोघे धाकटी भावंडे आधीच कामाला निघून गेली होती.

" आजी आता खुपच वेळ झाला आहे आम्ही आज शाळेला जात नाही. आम्ही दोघी आत खोलीत अभ्यासाला बसतो. आईपण झोपू दे जरा. तू देखील आराम कर. रात्रभर झोपली नाहीस तू." रुपाने आजीला म्हटले.

तोच नेहा म्हणाली," रुपा मी आता घरी जाते गं. आई वाट बघत असेल." नेहा चे बोलणे होते न होते तोच

" रुपा...! ये रुपा...! नेहा...! नेहा...! अगं कुठे आहात ग दोघी...!"
नेहाची आई दारातच उभी होती.

" अगं आई मी येतच होती घरी."
" अगं काय गं . काल आलेली तू इथे . अजून घरी नाही आलीस. सगळे ठिक आहे न....! रुपाच्या आईची तब्येत बरी आहे न ग ?"

" अहो काकू या न आत या. " रुपा पळतच जाऊन नेहाच्या आईचा हात धरून घरामध्ये घेऊन आली.

" आई तुला आनंदाची बातमी द्यायची आहे. चल तू आधी आतल्या खोलीत ये आणि बघं." नेहाने आनंदी होऊन आईला म्हटले.

" बापरे......! काय बघतेय मी...! ताई चक्क तुम्ही तुमच्या पायावर स्वतः कोणाचीही मदत न घेता उभ्या आहात." रुपाच्या आईला उभी राहीलेली पाहून नेहाची आई आश्चर्य चकित होऊन म्हणाली.

" चमत्कार झाला ओ. मुलांच्या कष्टाला , सेवेला यश आले. देवाने वेळाने का होईना पण प्रार्थना ऐकली आमची." आजीने म्हटले.

" हो काकू काल खूप काही झाले. बसा तुम्ही सांगते मी...!" आईला हळूवारपणे पलंगावर बसवत रुपाने म्हटले.

रुपाने जे काही घडले ते सर्व सांगितले. ते ऐकून नेहाच्या आईचे डोळे पाणावले. तिने आपले डोळे पुसत म्हटले," देवा तुझे खरेच खूप खूप उपकार झाले बघं. मला तर रुपा कडे बघून खूप वाईट वाटायचे. हे तिघे लहान लहान भावंडे एकेकाळी काय यांचा थाट होता पण परिस्थिती अशी आली की यांच्या नाजूक खांद्यावर जवाबदारीचे डोंगर आले. यामध्ये नकळतच यांचे बालपण हिरमुसले गेले. पण काही का असेना आज यांच्या कष्टाला फळ मिळाले. आता सर्व काही पहिल्या सारखे होणार नक्कीच. आणि हो एक सांगायचे राहून गेले. रुपा माझ्या मैत्रिणीच्या मुलांना गणित शिकायला पाठविते ग दादा जवळ. नेहा बोलली न याविषयी तुला ?"

" हो काकू नेहा बोलली मला. पण दादा बरोबर बोलणे झाले नाही. कारण काल हे सर्व तेव्हाच तर घडले. आज बोलेन मी दादा बरोबर. आणि मला खात्री आहे दादा नाही म्हणणार नाही."

नेहा आईबरोबर आपल्या घरी निघून गेली. रुपाने आजीच्या मदतीने घरची कामे उरकली. आईला औषधं जेवण देऊन तिला झोपवले. रुपा आपला अभ्यास करत बसली.

संध्याकाळी तिघे भाऊ आपापल्या कामावरून घरी परतले. आज रात्रीचे जेवण आजी आपणच करणार म्हटली होती कारण तिला आज पुरणपोळी बनवायची होती. रुपा मदत करतो म्हटली पण आजीने तिला नको आज माझी मीच सर्व करणार असा हट्ट केला. आजीने नेहाला पण जेवायला बोलावले होते.

घरामध्ये पुरणपोळ्यांचा घमघमाट सुटला होता. ताजे ताजे तूप, गरम दूध,कटाची आमटी, तळलेले पापड कुरुड्या, गरमागरम पुरणपोळी अगदी सुग्रास जेवण. आज खूप दिवसांनी साऱ्यांनी मिळून जेवणाचा आस्वाद घेतला. आज आईपण आपल्या स्वतःच्या हाताने जेवण करत होती. तिला स्वतः च्या हाताने घास घेत आहे हे बघून आजीच्या डोळ्यांतून आनंदाश्रू तरळले.

जेवण झाल्यावर नेहाला घरी सोडायला रुपा आणि दादा हे दोघे निघाले तेव्हा आजीने नेहाच्या आईसाठी पोळ्यांचा डबा भरून दिला. हे तिघे निघाले. जाताजाता नेहाने शिकवणीचा विषय काढला .

" खूप चांगली संधी आहे. मुलांना शिकवणे पण होईल त्याच बरोबर
आर्थिकदृष्ट्या पण एक बाजू भक्कम होईल. बघं विचार करून. तसे असेल तर आत्ताच सांग म्हणजे मी आईला आणखीन काही विद्यार्थी आहेत त्यांना सांगायला सांगते."

" हो तुझे म्हणणे पटतंय मला पण ....!"

" आता पण काय रे दादा ?" रुपा म्हणाली.

" अगं पण आई आपली अजून काहीशी कमजोर आहे ग. मुले जास्त आली घरात तर जोरात बोलणे दंगा होणार तर ते आईला सहन होईल का गं ?"

" अरे दादा उलट आईचे मन रमेल त्यात बघ तू. आठवड्यातून एकच दिवस तर घ्यायची आहे शिकवणी.आणि हो तसे आईला काही त्रास झालाच तर तेव्हा आपण मुलांना सांगून बंद करू शिकवणी त्यात काय येवढं." रुपाने अगदी सहजपणे सांगितले.

यावर दादाने होकारार्थी मान डोलावली. नेहा पण आनंदाने घरी जाऊन आपल्या आईला मुलांना शिकवणीसाठी येण्यासाठी सांग असे सांगितले.

आता रुपा पण खुप खुष होती. तिची आई बरी झाली. दोघा भावांचेही आता एक दोन वर्षे शिक्षण पूर्ण होण्यासाठी राहीले होते.आता दादाचा पण निकाल आला की तो देखील दुसरीकडे नोकरी शोधेल . एकंदरीत सगळे सुख ओंजळीत घेऊन दिवस सुरू झाले होते.

क्रमशः
©® परवीन कौसर

🎭 Series Post

View all