कस्तुरी भाग १३

आई हळूहळू चालत बाहेरच्या खोलीत आली आणि भिंतीवर असलेल्या रुपाच्या बाबांच्या फोटोकडे बघत रडू लागली.


कस्तुरी
भाग १३

पहाटे पहाटे मुलांना नकळतच डुलका लागला होता . आजीच्या दोन्ही खांद्यावर एकीकडे नेहा तर एकीकडे रुपा दोघींनी आपली डोकी टेकवली होती. त्यांच्या पण डोळ्यांच्या पापण्या हळूहळू मिटून गेल्या होत्या. आजी पण आपली मान भिंतीवर टेकवून डोळे मिटून बसली होती. तोच

" रुपा... सुरेश... अशोक...प्रकाश....!" असा बारीकसा नाजूक असा आवाज ऐकू आला. आवाजाने मुले एकदम दचकून जागी झाली. आजी पण पटकन आपला पदर सावरत मुलींना हळूच बाजूला सारून गडबडीने उठायचा प्रयत्न करु लागली. रुपा आणि नेहा या दोघींना काही समजेना की आवाज कुणाचा, कुठून येत आहे. तोच त्यांची नजर समोर आईच्या पलंगावर गेली बघतात तर आई पलंगाचा आधार घेत हळूहळू उठण्याचा प्रयत्न करत होती . तिचे हात कापत होते कधी कधी ते पलंगावर टेकविलेले हात सटकन खाली पडत होते तरीदेखील ती पुन्हा हात आहे त्या ताकदीने उचलून पुन्हा पलंगावर ठेवून उठायचा प्रयत्न करत होती तेव्हा तिच्या तोंडातून मुलांची नावे येत होती.

" नेहा.....! मी जे बघतिये न ते तुला पण दिसत आहे न....! " रुपा आपले डोळे विस्फारून म्हणत होती.

" दादा ....! अरे आई....! आई आपली नावे घेत आहे रे...! " रुपा आपल्या दादाला म्हणू लागली.

आजी पण आनंदाने ," पोरांनो माझी प्रार्थना ऐकली रे त्याने. आई बघा तुमची तुम्हाला बोलावत आहे." असे म्हणत पळतच पलंगाजवळ गेली. तिच्या पिठोपाठ मुले पण पळतपळत आईजवळ गेली.

" आई....! आई....!... आई....!" असे म्हणत
एकच गोंधळ सुरू केला .

रुपा तर नेहाच्या गळ्यात पडून रडूच लागली. नेहाने पण रुपा बरोबर आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. या दोघींना बघून तिघे भाऊ हसू लागली .

" या बघा दोघी आनंद झाला की रडतात , दुःख झाले की रडतात. मुली कशा असतात वेड्या ." असे म्हणत हसू लागले.

" अरे ....! हळू हळू ...! अरे मुली अशाच असतात रे हळव्या. तुम्हाला समजायचे नाही. आता जरा दमाने घ्या रे बाळांनो. चला आधी आईला उठवून बसवू. मग तिला दुध पाजू.चला तुम्ही पण पटापट तोंड धुवून या बरं. मी सर्वांना गरमागरम चहा ठेवते. रुपा चल बाळ ये जरा आत. नेहा तू पण ये ग. आज आपण तिघी मिळून पंचपकव्वान बनवू या.चला गं...!" आजी म्हणाली.

" ये आजी जरा वेळ बसू दे न आईजवळ. तिच्या बरोबर बोलू दे न मला. किती वर्षे तिच्या बरोबर न बोलता काढली आहेत आम्ही." दादा कळकळीने सांगत होता.

" बरं बाबा तू बस ....! बसू दे दादाला आईजवळ. चला रे सर्वानी उठा आता." आजी हसत हसत म्हणाली.

" रुपा आज खरंच मला खूप आनंद झाला बघं. अगं मी जेव्हा इथून येऊन जायची न तेव्हा घरी जाऊन खूप रडायची. तुझी , तुझ्या आईची अवस्था बघवत नव्हती ग मला. मी जेव्हा कधी माझ्या आईच्या कुशीत जाऊन झोपायचे तेव्हा मला तुझीच आठवण यायची. रात्री झोपताना आई माझ्या केसांत तेल लावून मालिश करायची तेव्हा मला तुझीच आठवण यायची. मी आईचे खुप सुख भोगत आहे ग पण तुला मात्र असे काहीच मिळाले नाही ग. उलट तूच तुझ्या आईची आई अगदी कमी वयात झाली. हे पण तुझे काम कौतुकास्पद आहे गं. मला खरंच अभिमान वाटतो माझी मैत्रीण तू आहेस याचा." नेहाने म्हटले.

आईने मुलांना ओळखले,त्यांची नावे घेतली इतकेच नव्हे तर स्वतः उठायचा प्रयत्न करत होती .हे पाहून मुलांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता.

" दादा मी काय म्हणते तू जाऊन डॉक्टरांना भेटून ये. हवे तर मी नेहा आम्ही दोघी पण येतो आईला घेऊन. बघूया काय म्हणतात डॉक्टर. आहेत ती औषधे ठेवावी की बंद करावी हे तर सांगतील न." रुपा म्हणाली.

" हो आपण जाऊ आईला घेऊन. " दादा म्हणाला.

आज घरात दिवाळीच होती जणू. नेहा पण यांच्या आनंदात सहभागी होती. आई हळूहळू भिंतीचा आधार घेत चालत बाहेरच्या खोलीत आली. समोर भिंतीवर रुपाच्या बाबांचा फोटो होता .फोटोवर तिने आपले हात फिरवले .," मला एकटीला सोडून गेलात तुम्ही." असे फोटोकडे बघत म्हणत ती रडू लागली. तिच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी दादाने हळूच आपले हात पुढे केले तोच आजीने दादाचे हात ओढले.

" नको बाळा . मोकळी होऊ दे तिला. इतकी वर्षे कोंडलेली अश्रू आहेत. करु दे वाट मोकळी तिला. " आजी म्हणाली.

रुपा,नेहा आणि दादा तिघांनी मिळून आईला दवाखान्यात नेले. आई रुपा नेहाचा हात धरून हळूहळू चालत आली.चालताना तिला थोडा धाप लागली तसा ती जरावेळ एका बाकड्यावर बसली नंतर पुन्हा हळूहळू चालू लागली.

" अरे व्वा . आज पेशंट स्वताच्या पायावर चालत आलेला आहे. व्हेरी गुड." डॉक्टर म्हणाले.

दादाने कालपासून जे काही घडले ते सर्व सांगितले. हे ऐकून डॉक्टर म्हणाले," छान . म्हणजे ज्या घटनेमुळे यांची अवस्था अशी झाली होती तशाच एका वादळी वाऱ्यासह पावसाने यांना पहील्या सारखे केले. आता तब्येत आहे यांची बरी. पण....!"

" पण..!"
ऐकून मुले घाबरली

" नाही तसे घाबरण्याचे काही कारण नाही. फक्त एकच म्हणजे यांची तब्येत आता जरा नाजूकच आहे. म्हणजे इतकी वर्षे या एक वेगळेच आयुष्य जगत होत्या. वेगळ्याच दूनियेत होत्या. तेव्हा त्या एका लहान बाळासारख्याच होत्या. पण आता तसे नाही. आता त्यांची कामे त्या स्वतः करणार तेव्हा तुम्हाला काळजी घ्यावयाची आहे. काळजी म्हणजे कधीही यांना एकटे सोडू नका कारण या कधीही आपल्या जुन्या आठवणीत जातील तेव्हा तुमच्या बाबांच्या आठवणी यांना सतावतील तेव्हा साहजिकच आहे त्या खुप दुःखी होतील. समजा तेव्हा त्या स्वयंपाक करत असतील तेव्हा त्या आपल्या जुन्या आठवणीत जातील तर नकळतच त्या जे करत आहेत ते काम विसरतील आणि नकळतपणे कोणतीही आपत्ती येऊ शकते. म्हणजे गॅस बंद करण्यास विसरणे किंवा कुकर लावला तर शिट्या झाल्या तरी बंद न करणे. असे छोटे मोठे काम पण जोखमीचे जे करताना अपघात होतात. तर ते टाळले पाहिजे.

आणखीन एक यांना एकटे राहूच देऊ नका. एकांतात माणूस पुन्हा एकटा पडतो आणि तो घाबरतो. नेहमी यांच्या सोबत रहा. यांना बोलत करा. जर या रडल्या तरी त्यांना रोकू नका. मनसोक्त रडू द्या. नेहमी यांचे मन प्रसन्न ठेवा. "

" हो डाॅक्टर आम्ही आईला जरावेळ पण एकटे सोडणार नाही. कोणी न कोणी तिच्या बरोबर राहणार. जर आम्ही शाळा कॉलेजला गेलो तरी आजी असणारच तिच्या जवळ." दादा म्हणाला.

" गुड. बस आता यांची औषधे थोडीफार कमी करतो. बाकीचे पत्थ वगैरे काही नाही. जेवण वेळेवर देत जा. संध्याकाळी फिरायला न्या. जितके होईल तितके आनंदी वातावरण ठेवा."

घरी येतेवेळी वाटेवर असलेल्या गणपती मंदिरात जाऊन बाप्पाचा आशीर्वाद घेऊन या असे आजीने सांगितले होते त्याप्रमाणे हे सगळे मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले त्यांचा आशीर्वाद घेतला . बाप्पाजवळ प्रार्थना केली आणि घरी परतले.

क्रमशः
©® परवीन कौसर

🎭 Series Post

View all