कस्तुरी भाग १०

रुपाने आपल्या बाबांची फॅक्टरी पुन्हा उभी करणार हे ऐकताच आईच्या हातापायाची हालचाल नकळत झाली.


कस्तुरी
भाग १०

कानामध्ये सुमधूर गाण्यांचे बोल ऐकू येत होते तसेच मिटलेल्या पापण्यांवर आठवणींचे तोरणे सजत होती. रुपा त्या आठवणींच्या गाठोड्यात आपला भूतकाळ बघत होती. नकळतच तिचे मन पुन्हा तिच्या शालेय जीवनात गेले.

कामिनी ने केलेले छद्मी हास्याने अक्षरशः तिच्या कानठळ्या बसल्या होत्या. तिचे ते भयानक रुप तिच्या डोळ्यांसमोर अंधारी आणत होते. तिचे मन आतून उदासीन झाले होते . खरं तर तिला तिचा खूप राग येत होता पण ती आपल्या रागाला आवर घालण्यासाठी आपले लक्ष सरांच्या निरोपाच्या भाषणाकडे लावून बसली.

कार्यक्रम संपल्यावर संध्याकाळी रुपा घरी आली. घरी येऊन हातपाय धुवून आधी आपल्या आई आजीच्या खोलीत गेली. तिथे आजी आईच्या पलंगाजवळ खुर्चीवर बसून हातात माळ घेऊन जप करत बसली होती. रुपाच्या पायातील पैंजणाचा बारीकसा आवाज कानी पडताच आजीने मागे वळून पाहिले आणि म्हणाली," आलीस बाळा . बस आईजवळ मी तुला गरम चहा करून आणते. आताच दादा तुझा तू आली नाही का अजून हे विचारुन भाजी आणायला बाजारात गेला आहे."

" नको नको आजी . तुम्ही बसा मीच करते चहा. आणि हे बघा आज न नेहाच्या आईंनी घरी केक बनविले आहे ते तुम्हाला आणि आईला पाठविले आहे ते तुम्ही चहा बरोबर खा." असे म्हणत रुपाने पळत जाऊन चहा ठेवला.
" काय म्हणायचे या मुलीला. मला एकपण काम करु देत नाही. मी काय पाहुणी आहे होय." असे आजी आपल्या आपल्याला म्हणू लागली.

रुपाने एका ट्रे मध्ये चहा ,केक घेऊन आली. आजीला चहा केक दिला. आपल्या आईला हळूवारपणे उठवून बसविले तिच्या मानेभोवती एक मोठा रुमाल बांधला आणि तिला चहा मध्ये केक बुडवून खाऊ घालू लागली.

" छान आहे ग केक."आजी म्हणाली.

" हो आजी. आता मी पुढच्या रविवारी तिच्या घरी जाऊन केक बनवायचे शिकणार आहे." रुपाने उत्तर दिले.

" आज काय होते शाळेत रुपा? सगळेजण आले होते का ? "

" अहो आजी आज न शाळेत आमच्या सगळे माजी विद्यार्थी आले होते. ते इतके पुढे गेले आहेत की काय सांगू. त्यांना बघून मला खूप आनंद झाला. सगळ्यांनी आपापले अनुभव सांगितले. मार्गदर्शनपर भाषणे झाली......
रुपा दिवसभरात जे काही झाले ते सगळे आजीला सांगत होती. सांगता सांगता ती तिला सरांनी स्टेजवर येण्यास सांगितले इथपर्यंत आली आणि थोडावेळ शांत बसली . मग तिने आपल्या आईकडे बघितले आणि पुन्हा तिने सांगण्यास सुरुवात केली .

" आणि आजी मी जेव्हा म्हटले की मलापण तुमच्या सारखे उंच आकाशात झेप घ्यायची आहे. मलापण शिक्षण पूर्ण करुन नोकरी करुन बाबांची फॅक्टरी पुन्हा उभी करायची आहे....!
रुपा असे म्हटली तोच....!
तोच तिच्या आईच्या पायाची जराशी हालचाल झाली. आईने नकळतच आपला पाय थोडासा हलवला आणि तिचा उजवा हात किंचितसा वर उचलून घेतला .

" अगं रुपा ऽऽऽऽ ते बघं....!
अगं पोरी....! आईने आज इतक्या वर्षांनी आपल्या अवयवांची हालचाल केली." आजीने एकदम आनंदाने जोरजोरात टाळ्या वाजवत म्हटले.

रुपा पण आश्चर्य चकित झाली. तिने पण आपले डोळे विस्फारून विस्मयचकित होऊन बघत बसली. तिला तिच्या आईच्या चेहऱ्यावर आज वेगळीच चमक दिसून आली.
तिने आनंदाने आपल्या भावांना ," दादा ऽऽऽ ये दादा लवकर ये...! अरे बघं न...! आई....! अरे आपली आई...!"
आनंदाच्या भरात तिला काही सुचत नव्हते आणि तिला आपला दादा बाजारात गेला आहे हे पण ती विसरली होती.

काही वेळाने तिचे भाऊ घरी आले. ते आल्यावर रुपा आणि आजीने दोघींनी आईबद्दल सांगितले. हे ऐकून हे तिघे पण पळतच आईजवळ गेले. खरोखरच आज आईचा चेहरा खुलला होता. सर्व भावंडांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.

आजीने पटकन मुलांना आपल्या जवळ घेतले आणि म्हणाली," बाळांनो का रडता. आता आई लवकर बरी होणार बघा. "

रात्री सर्व जण जेवायला बसले तेव्हा रुपाने आपल्याला शाळेत पुढील शिक्षणासाठी मदत करणार आहेत असे सांगितले. हे ऐकून तिचे भाऊ एकदम म्हणाले," तू काही काळजी करू नकोस रुपा. आम्ही रात्रीचा दिवस करून मेहनत करुन तुझे शिक्षण पूर्ण करणारच . तुझी हुशारी वाया घालवायची नाही आम्हाला."

मुलांचे बोलणे ऐकून आजीच्या डोळ्यात पाणी आले.,\" असेच प्रेम या भावंडात कायम राहू दे रे देवा परमेश्वरा ‌\" असे ती आपल्या मनात म्हणू लागली होती.

आता आईच्या प्रकृतीत थोडी थोडी सुधारणा दिसत होती. ती काही तरी बोलण्याचा प्रयत्न करत होती. थोडे थोडे बोबडे बोल बोलत होती. मुले शाळेला गेले की आजी आईबरोबर काही न काही बोलत बसायची जेणेकरून आईपण आपल्या ओठांची हालचाल करत जाईल. तिच्या समोर कधी पसायदान तर कधी अभंग कधी गावांमध्ये शेतात गाणी गातात ती गाणी असे रोज वेगवेगळ्या प्रकारची गाणी किंवा देवाची प्रार्थना सगळे आजी आईसमोर बसून गायची. हे बघून आईपण जरा जरा आपल्या हातापायाची हालचाल करायची किंवा जराशी मान डोलावून आजीच्या गाण्याला दुजोरा द्यायची. आईची प्रगती बघून मुले खुपचं सुखावली होती.

आता वार्षिक परीक्षेचे दिवस जवळ आले होते. मोठ्या भावाची पण परीक्षा होती. त्याला त्याच्या मालकाने परीक्षेसाठी पंधरा दिवसांची पगारी रजा दिली होती. आई आजी बरोबर मुलांचा दिवस कसा जायचा समजायचेच नाही. रात्री जेवण झाल्यावर आई आजी झोपल्या की ही चारी भावंडे बाहेरच्या खोलीत अभ्यासाला बसायची.

अर्धी रात्र झाली की आजी हळूच उठून मुलांना गरमागरम चहा करून आणायची.
" हे काय आजी किती वेळा सांगितले आहे तुम्हाला आम्ही आमची कामे करतो. तुम्ही आराम करा आजी." सगळेजण एकदमच ओरडायची.

" अरे पोरांनो असे बोलून मला परकी करता होय रे. अरे मी रक्ताची नसली तरी आजीच आहे न तुमची . तुम्ही दिवसभर राबता आणि रात्री जागरण करून अभ्यास करतात . मग मी जरा चहा केला तर काय बिघडले. नाही तर मी जातेच बापडी आपल्या घरात." असे नाराजीचा सूर काढून आजी म्हणाली.

" ये आजी . अगं आजी...! रुसलीस का ग..! आता काही बोलणार नाही आम्ही तुला. " असे म्हणत ही चारी भावंडे आजीला पळत जाऊन घट्ट मिठी मारत म्हणू लागली.

क्रमशः

©® परवीन कौसर

🎭 Series Post

View all