कष्टाविना फळ नाही

कष्टाविना फळ नाही

एका गावात गणपतराव नावाचे एक शेतकरी व्यक्ती राहत होते. त्यांना चार मुले होती. गणपतराव कष्टाळू होते पण चारही मुले मात्र अतिशय आळशी होते. वडिलांना त्यांची सतत काळजी लागून राहत होती. आपण गेल्यानंतर यांचे कसे होईल या विचाराने गणपतराव दिवसेंदिवस खंगत चालले होते. एके दिवशी त्यांच्या डोक्यात एक शक्कल आली. आणि त्यांनी ती गोष्ट आपल्या पत्नीजवळ बोलून दाखवली.

पत्नीलाही गणपतरावांचे म्हणणे पटले. एक दिवस गणपतरावांनी आपल्या चारही मुलांना जवळ बोलावले आणि त्यांना सांगितले"पहा मुलांनो आता मी दिवसेंदिवस थकत चाललो आहे. मी जास्त दिवस जगेल असे मला वाटत नाही पण त्यापूर्वी मला तुम्हाला काही महत्त्वाचे सांगायचे आहे" मुले लक्ष देऊन ऐकू लागली.

गणपतरावांनी सांगायला सुरुवात केली. आपल्या गावाला लागून जे गाव आखर आहे म्हणजे शेती आहे. त्यात तुमच्या आजोबांनी एक सोन्याचा हंडा गाडून ठेवला होता. ही गोष्ट त्यांनी फक्त मलाच सांगितली होती. पण आता वार्धक्यामुळे मला तो हंडा नेमका कुठे आहे ते आठवत नाही. जर ते सोने तुम्हाला हवे असेल तर तुम्हाला ते संपूर्ण शेत खोलवर खोदावे लागेल.

काही दिवसांनी गणपतरावांचा मृत्यू झाला. मुलांचा आधार तुटला. पण तरीही शेतीमध्ये काम करावेसे मात्र कुणालाही वाटत नव्हते. त्यांना आपल्या वडिलांनी सांगितलेली सोन्याच्या हंड्याची गोष्ट आठवली. आणि त्यांच्या मनात लोभ उत्पन्न झाला. त्या चारही मुलांनी शेत खोदायला सुरुवात केली.

दिवस रात्र एक करून त्यांनी संपूर्ण शेत खोदून काढले. पण सोन्याचा हंडा मात्र कोठे सापडला नाही. आपल्या वडिलांनी आपल्याला खोटेच सांगितले तर... असे म्हणत ती मुलं घरी आली. पुढे काही दिवसांनी पावसाळा आला. त्या शेतामध्ये मुलांनी पेरणी केली. आणि काय आश्चर्य मशागत चांगली झाल्यामुळे त्या शेतात भरघोस पिके डोलू लागली. मुलांना खूप आनंद झाला त्यांच्या आईने त्या मुलांना समजावून सांगितले.

" बाळांनो हाच तो सोन्याचा हंडा " 

तुम्ही शेत खोदून काढल्यामुळे जमिनीत पाण्याचा चांगला निचरा झाला आणि त्यामुळे पिके चांगली आली. म्हणजेच मेहनत केल्याशिवाय फळ कसे मिळणार? तुम्ही शेतात मेहनत करावी असे तुमच्या वडिलांना अपेक्षित होते. मुलांना आपली चूक समजली दुसऱ्या दिवसापासून ती चारही मुले शेतात राबू लागली. आणि त्यामुळे त्यांना चांगले उत्पन्न सुद्धा मिळू लागले. अशा तऱ्हेने चारही भाऊ आपापल्या कुटुंबीयांसमवेत सुखाने राहू लागले.

तात्पर्य- 

कोणतीही गोष्ट कष्टाशिवाय साध्य होत नसते. तुम्ही जेवढे मेहनत कराल तेवढे तुम्हाला त्याचे फळ निश्चित मिळते. "जिथे राबती हात, तेथे हरी " हेच तर खरे कष्टाचे फळ आहे. आपण क्रिकेटचे सामने पाहतो क्रिकेट वीरांना सातत्याने सराव करावा लागतो, मेहनत घ्यावी लागते म्हणूनच ते एवढे चांगले खेळू शकतात. विद्यार्थ्यांच्या बाबतीत सांगावयाचे झाल्यास विद्यार्थ्यांनो, तुम्ही अभ्यासाच्या बाबतीत सुरुवातीपासूनच सातत्य ठेवा. म्हणजे ऐन परीक्षेच्या वेळी तुम्हाला टेन्शन येणार नाही.

सौ.रेखा देशमुख