Login

कष्टाला पर्याय नाही

कष्टाला पर्याय नाही (मराठी बोधकथा)
बोधकथा
एका गावी एका साधारण कुटुंबातील कर्ता पुरुष सतत निराशावादी विचारांचा आणि आळशी होता. त्यामुळे त्याची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली होती. यावर कुणातरी वास्तुशास्त्रज्ञाने वास्तुदोष दूर करायला सांगितले. त्याने त्याच्या सल्ल्याप्रमाणे खूप खर्च केला. वास्तुत फेरबदल केले. पण परिस्थिती अजून हाताबाहेर गेली. कुणीतरी सल्ला दिला, भिंतीवर, धावणाऱ्या घोड्याचे आणि सूर्योदयाचे चित्र लाव. तो तसे चित्र विकत घ्यायला गेला. दुकानदार त्याचा मित्र होता. त्याने प्रयोजन सांगितले. तेव्हा दुकानदार म्हणाला, हवं तर तू असं चित्र जरूर लाव. पण यानेही काहीच फरक पडणार नाही. कारण प्रगती करायची असेल तर उगवत्या सूर्याचे व धावणाऱ्या घोड्यांचे चित्र लावून भागणार नाही. त्यासाठी सूर्योदयापासून ते रात्रीपर्यंत घोड्यासारखे धावत राहावे लागेल. तू केवळ दैवावर विसंबून राहू नको. हे बघ जिद्द आणि आत्मविश्वासाने प्रयत्न करीत रहा. परिस्थिती नक्कीच पालटेल.
तात्पर्य
कष्टाला पर्याय नाही. "असेल माझा हरि, तर देईल खाटल्यावरी" असे म्हणून केवळ आळशीपणात वेळ घालविल्यास काहीच साध्य होणार नाही. म्हणून कष्ट करण्याची तयारी ठेवा. एक दिवस त्याचे फळ तुम्हाला निश्चित मिळेल.
सौ. रेखा देशमुख