कसोटी.. काळ्या रंगाची! भाग -४

कथा सुमेधाच्या विचार परिवर्तनाची.


कसोटी.. काळ्या रंगाची!
भाग -चार.

'मुलगी झाली असती तर मी इतकी आनंदी असते का?'
कधीकधी उगाच हा प्रश्न तिला छळायचा. मुलगा आता वर्षभराचा झाला आणि तिने पुन्हा तिची नोकरी सुरू केली. घरात सांभाळायला सासू सासरे होतेच त्यामुळे तिला मुलाची काळजी नव्हती.
घरी बाळाच्या करामती शाळेत चिमुकल्या पिल्यांची चिवचिव.. सुमेधाचे आयुष्य मजेत चालले होते.

काळ पुढे सरकत होता. पाहता पाहता मुलगा आता आठ वर्षांचा झाला होता. चांगल्या शाळेत शिकत होता. सुमेधाचे एक सुखी जीवन जगत होती.
पण खरंच का ती आनंदी होती? की आनंदाचा मुखवटा चढवून ती वावरत होती तिलाही उमगले नव्हते.

*******

"मॅम, एक मॅडम तुम्हाला भेटायचे म्हणताहेत. त्यांना पाठवू का?" डॉक्टर राधिकाच्या केबिनमध्ये येत रिसेप्शनिस्ट विचारत होती.

"पेशंट आहे?" राधिकाचा प्रश्न.

"नो मॅम, पण फक्त पाच मिनिटांसाठी अर्जंट भेटायचं म्हणताहेत. खूप लांबून आल्याहेत." रिसेप्शनिस्ट.

"ठीक आहे. दोन पेशंट झालेत की पाठव त्यांना."

डॉक्टर राधिका, एक होमिओपॅथ, स्पेशालिस्ट. वयाने जवळपास पंचावन साठच्या घरातील. पण अजूनही तिने स्वतःला मेंटेन ठेवले होते. तिला पाहून तिच्या वयाचा अंदाज बांधणे कठीण होते.

राधिकाने रिसेप्शनिस्टला बाहेर पाठवले आणि समोरच्या लॅपटॉपवर बाहेरच्या त्या स्त्रीकडे पाहू लागली. जराशी स्थूल, मध्यम वयाची ती स्त्री कोण असेल? तिला काही अंदाज आला नाही. मग ती परत आपल्या पेशंटमध्ये गुंतली.

दोन पेशंटनंतर रिसेप्शनिस्टने बाहेरच्या स्त्रीला आत सोडले. तिच्यासोबत एक तरुणी आणि एक तरुण मुलगा सुद्धा होते.


"बसा." नेहमीच्या सवयीप्रमाणे ओठावर स्मित ठेवून राधिकाने त्यांना बसायला सांगितले.

ते बसल्यावर तिने तिघांकडे एकवार नजर टाकली पण ओळखीची पुसटशीही खुण दिसत नव्हती. त्यातल्या त्यात त्या तरुणीचा चेहरा कुठेतरी पहिल्यासारखा वाटत होते.

"मॅडम, मला ओळखलंत?" त्या स्त्रीने बसल्यावर लगेच राधिकाला विचारले.

राधिकाने हसून नकार दिला.

"कसे ओळखणार? तब्बल अठ्ठावीस वर्षानंतर तुम्हाला भेटतेय. मी सुमेधा. आणि ही माझी मुलगी, डॉक्टर कृष्णा. डीएम इन कॉर्डीओलॉजीच्या शेवटच्या वर्षाला आहे." सुमेधाने ओळख करून दिली.

"अरे वाह! अभिनंदन." राधिका बोलली खरी पण तरीही सुमेधा म्हणजे कोण? आणि इथे का आलीये? याचा तिला अंदाज येत नव्हता.

"तुम्ही गोंधळलात ना की आम्ही इथे का आलोय ते? खरं तर मी तुम्हाला धन्यवाद द्यायला आलेय."

"मला? पण का?" राधिका खरंच गोंधळली होती.

"कारण तुमच्यामुळेच मी सेकंड चान्स घ्यायचा आणि मुलगी जन्माला घालायचा निर्णय घेतला होता. आणि आज माझी मुलगी शिकून इतकी मोठी डॉक्टर होते आहे. मॅडम तुम्हाला आठवत नसेल, पण अठ्ठावीस वर्षांपूर्वी मी तुमच्याकडे पेशंट म्हणून आले होते आणि त्यावेळी तुम्ही माझ्या शारीरिक समस्येबरोबर माझा मानसिक इलाज देखील केला होतात." सुमेधा सांगत होती.

तिने हळूहळू आपला भूतकाळ राधिकासमोर मांडला आणि राधिकालाही त्या धुसर आठवणी आठवायला लागल्या.

अठ्ठावीस वर्षांपूर्वीचा काळ म्हणजे तिच्या स्वतःच्या मेडिकल प्रॅक्टिसचा सुरुवातीचा काळ. त्या काळातील काही पेशंटच्या आठवणी आजही मनाच्या गाभाऱ्यात दडलेल्या होत्या. तशीच एक आठवण होती सुमेधाची.

धुसरसे आठवायला लागले आणि मग सुमेधाने त्या निगडित काही गोष्टी सांगितल्या तशी ती पुसट आठवण लख्ख झाली.

अशाच एका सायंकाळच्या ओपीडी ला सुमेधा आली होती. सोबत मुलगाही होता. काही दिवसांपासून हातावर कसलेसे डाग दिसू लागले त्यामुळे ती काळजीत होती.

तिला चेक केल्यानंतर रुटीन म्हणून राधिका सुमेधाशी गप्पा मारू लागली. अर्थात हा तिच्या केस टेकिंगचा एक भाग होता. पण त्यात कसलीच औपचारिकता जाणवत नव्हती. लग्नाला किती वर्ष झालीत, मुले किती आहेत हे जनरल प्रश्न विचारत असताना राधिकाला तिच्यात इंटरेस्ट येऊ लागला होता.
लग्नाला दहा वर्ष आणि आठ वर्षाचा एक मुलगा हे ऐकून राधिकाने खडा टाकला.

"आठ वर्षांचा एक मुलगा असताना दुसऱ्या बाळाविषयी विचार केला नाही का?" तिने सहज विचारले.

"नाही." सुमेधाचे उत्तर आले.

"का?" हिचा पुढचा प्रश्न. कधी आर्थिक स्थितीमुळे कोणी दुसरे मुल होऊ देत नाही तर कोणाला एकच अपत्य हवे असते. हिच्या मनात नेमके काय आहे हे जाणून घ्यायची राधिकाला उत्सुकता लागली होती.

ती बोलू लागली तसे राधिकाच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते. " मॅडम, मी अशा रंगाची, माझे हजबंड माझ्याहून काळे. त्याचा रिझल्ट म्हणून माझा मुलगा तुम्ही बघताच आहात. दुसरे अपत्य झाले आणि ती मुलगी झाली तर पुढे तिला लग्नाला खूप त्रास होईल. म्हणून आम्ही एकच बाळ असावे म्हणून थांबलो." ती अगदी स्पषपणे बोलत होती.

राधिका तिच्याकडे एकटक पाहत होती. सुमेधा काळी असली तरी रेखीव होती. तिचे टपोरे डोळे, सरळ नासिका, सुंदर ओठ.. तिला तरी ती खूप आवडली होती. एकदम ब्लॅक ब्युटी अशी वाटली. पण तिच्या मनातील सल ऐकून कसेतरी वाटले.

आपण एका बाळावरच कसे थांबलो हे सुमेधा तिला पटवून देत होती. पण राधिका मात्र तिच्या बोलक्या टपोऱ्या डोळ्यातून तिच्या अंतर्मनाचा ठाव घेत होती.

"ताई खरंच सांगा, तुम्हाला कधीच वाटले नाही का की एक मुलगी असावी किंवा याला सोबत म्हणून दुसरं कोणी बाळ असावं?" सुमेधाच्या डोळ्यात डोळे घालून राधिकाने विचारले तेव्हा सुमेधा आतून ढवळून निघाली.

"वाटतं ना." डोळ्यात पाण्याचा थेंब जमा होऊ न देण्यात विजयी झालेली सुमेधा निर्विकारपणे म्हणाली.

"जेव्हा माझ्या वर्गातील छोट्या छोटया निरागस मुली माझ्या गळ्यात हात गुंफतात, मला मिठी मारतात, फळ्यावर लिहिताना माझ्या चेहऱ्यावर उडालेले खडूचे बारीक कण त्यांच्या इवल्या हातांनी त्या पुसतात तेव्हा त्यांच्या स्पर्शाने कित्येकदा वाटते की मलाही एक मुलगी असायला हवी होती."
तिने एक पॉज घेतला.

"मॅडम, भावनिक विचार करणं वेगळं आणि व्यवहारिक वेगळं. आपल्या भावनांना कंट्रोल करून आम्ही दुसरा मार्ग निवडला."

"मला काय वाटते ते तुम्हाला सांगू? मुलगी व्हावी तर ती अतिशय सुंदर असावी किंवा खूप श्रीमंत घरातील असावी किंवा मग खूप हुशार तरी असावी. तेव्हाच तिला काही प्रॉब्लेम येणार नाही." सुमेधा मनात साचलेले सगळे बोलत होती.

बदलतील का सुमेधाचे हे विचार, वाचा पुढील अंतिम भागात.
:
क्रमश:
पुढील भाग लवकरच!
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*******
वाचकहो, सदर कथा ही एक सत्यकथा असून तिला काल्पनिक जोड दिलेली आहे. कथेच्या माध्यमातून कुणाच्या भावना दुखावण्याचा अजिबात हेतू नाहीय. समाज कितीही पुढरलेला असला, सुशिक्षित असला तरी लग्नाच्या बाजारात मुलीच्या सुंदरतेच्या व्याख्येत आजही रंगाला प्राधान्य दिले जाते. ही मानसिकता बदलावी यासाठी ही एक छोटी कथामालिका. आशा आहे की तुम्हाला नक्की आवडेल.

🎭 Series Post

View all