Feb 23, 2024
सामाजिक

कसोटी.. काळ्या रंगाची! भाग -१.

Read Later
कसोटी.. काळ्या रंगाची! भाग -१.


कसोटी.. काळ्या रंगाची!
भाग -एक.


"सुमेधा, चहा घेऊन ये हो." आजीने आत बघत आवाज दिला तशी स्वयंपाकघरात चुळबुळ सुरू झाली.

"सगळ्यांना चहा देताना ओठावर स्मित ठेव. उगाच धांदरटासारखी करू नकोस. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची निट उत्तर दे." स्वाती तिला सांगत होती.

"आई, हो अगं. किमान दहा वेळा तरी तुझे सांगून झालेय आणि तसेही ही माझी पहिली वेळ नाहीये ना? यापूर्वी पाच स्थळ बघून गेलीत की." सुमेधा.

"आणि नकारही देऊन गेलीत." स्वाती म्हणाली. "म्हणून किमान या स्थळाने तरी होकार द्यावा हीच अपेक्षा आहे." स्वाती देवापुढे हात जोडून उभी होती.

"खरंच लग्न होणं इतक्या गरजेचे आहे का?" चहा घेऊन हॉलमध्ये प्रवेशताना सुमेधा स्वतःला विचारत होती.

ती आली तेव्हा सगळे तिच्याकडेच पाहत होते. तिच्या चालीत आणि एकंदरीत देहबोलीत एक आत्मविश्वास जाणवत होता.

"नाव काय गं तुझं?" मुलाच्या आईने तिच्या चेहऱ्याकडे निरखून बघत विचारले.

"सुमेधा." ती नजर वर करून उत्तरली तेव्हा तिचे टपोरे काळे डोळे सुंदर भासत होते.

नाव ऐकून मुलाची आई फसकन हसली. मुलाच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत होती.

"नाव सुमेधा आणि वर्ण काळा. किमान तिच्या रुपाला साजेसे तरी नाव ठेवायचे हो." मुलाची आई.

"नाव रुपाला साजेसे नसले तरी कर्तृत्वाला आहे की. मी उच्च शिक्षण घेतले आहे. चांगल्या पगाराची नोकरी आहे. आणि.." सुमेधा बोलत होती की त्यांनी तिला मध्येच रोखले.

"हे सगळे आहे हो आमच्याकडे. आमच्या मुलाला चांगली नोकरी आहे आणि कर्तृत्वही आहे. त्यामुळे आम्हाला बाहेरच्या कुणाच्या कर्तृत्वाची गरज नाहीये. आम्हाला फक्त सून हवीये."

"सून हवीय की सुंदर दिसणारी शोभेची बाहुली?" सुमेधाच्या तोंडून निघून गेले.

"हो, सुंदर अशी शोभेची बाहुलीच हवीय. आमच्या मुलाच्या कर्तृत्वाला शोभेल अशीच." कर्तृत्व शब्दावर जोर देत त्या बोलल्या.

"चला हो. इथे काय आपण आपली शोभा करायला आलो आहोत का?"
मुलाच्या बाबाकडे वळून त्या म्हणाल्या. त्यांच्या शब्दासरशी तिघेही उठून बाहेर निघाले.

जाताना मुलाने सुमेधाकडे नजर टाकली त्या नजरेत राग आणि नाराजी स्पष्ट दिसत होते.

"सुमेधा, असे बोलायला नको होतेस गं. इथेतरी जुळण्याची आशा होती गं." स्वाती पाणावल्या डोळ्यांनी म्हणाली.

"आई, मी त्रासलीये गं या सगळ्यांना. प्रत्येक वेळी मुलांकडची लोकं म्हणतील ते आपण ऐकायचं आणि मग ऐन वेळेवर त्यांनी नकार द्यायचा. नको वाटते गं आता सगळं." सुमेधा रडत म्हणाली.

तू काळजी करू नकोस सुमू, या मुलापेक्षा जास्त श्रीमंत घरात तुझे लग्न जमवेन मी. बघच तू." विलासराव तिचे बाबा तिला समजावत म्हणाले.

"त्यापेक्षा मी लग्नच नाही केले तर?" सुमेधा बाबाकडे बघत म्हणाली.

"सुमा, कसलं अभद्र बोलतेस? बिनलग्नाचे राहणे आपल्या परंपरेत नाही समजलं? विलास बोलतोय ना, मग तो नक्कीच काहीतरी करेल. तू आत जा बघू." आजी कडक शब्दात म्हणाली तशी सुमेधा आपल्या खोलीत गेली.

खोलीत आल्यावर ती आरशासमोर बसून स्वतःला न्याहाळत होती. तिचे काळेभोर टपोरे डोळे तिच्या सावळ्या चेहऱ्यावर उठून दिसत होते. सरळ नाक आणि सुंदर असे तिचे ओठ. आता रडल्यामुळे चेहरा उतरला होता. एरवी चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि हुशारीचे तेज चमकत असे.

'लग्नाच्या बाजारात फक्त सुंदर चेहरा म्हणजेच सर्व काही असते का? माझा रंग काळा आहे यात माझी काय चूक?'
स्वतःला निरखत असताना ती स्वतःलाच विचारत होती.
बाजूच्या टेबलवर असलेल्या तिच्या आईबाबांच्या फोटोकडे तिचे लक्ष गेले.

आई नक्षत्रासारखी सुंदर. आरस्पानी सौंदर्य असलेली. तर तिचे बाबा एकदमच साधे, काळेसावळे. तिने तिचा रंग तिच्या वडिलांकडून घेतला होता. दादा आणि ताई आईच्या रंगावर गेलेली, ही मात्र वडिलांची कार्बन कॉपी.

बहीण मोठी होती त्यात सुंदर, त्यामुळे तिच्या लग्नात काहीच अडचणी आल्या नाहीत. भावाचेही लग्न दोन वर्षांपूर्वी पार पडले होते. सुमेधा म्हणजे शेंडेफळ. बाबाची लाडकी. अभ्यासातील हुशारी तिने बाबाकडूनच घेतली होती. तसे तिचे भाऊ बहीण देखील हुशारच होते, पण ही जरा जास्त कुशाग्र बुद्धीची. एवढं सर्व असताना केवळ काळा वर्ण म्हणून लग्न जुळत नव्हते आणि हिच तिच्या आयुष्याची शोकांतिका होती.

'काय गं आई, बाबांच्या हुशारीसोबत थोडा तुझा रंग मला दिला असतास तर काय बिघडलं असतं गं?' तिने पुन्हा एक हुंदका दिला.

उच्चशिक्षित कुटुंब असले तरी मुलीच्या जातीला विवाह हेच अंतिम सत्य मानणाऱ्या सनातन कुटुंबातील ती मुलगी होती. परंपरेचा पगडा घरात होताच. त्यामुळे तिच्यावरही तेच संस्कार होते. आपले लग्न जुळले नाही तर समाजात आईवडिलांचे नाक कापले जाईल या विचाराने सुमेधाची झोप उडाली होती.

इकडे झोप तर स्वाती आणि विलासरावांची देखील उडाली होती.
"लग्न जुळले नाही तर कसं होईल हो आपल्या सुमुचं?" डोळ्यात पाणी आणून स्वाती विचारत होती.


"काळजी करू नकोस गं. मी आहे ना? मी करेन काहीतरी. आणखी दोन-तीन स्थळ आहेत माझ्या पाहणीतील. त्यांना सुमेधाला दाखवावी म्हणतो."

मनातील काळजी चेहऱ्यावर न दाखवता विलासराव म्हणाले.
:
क्रमश :
पुढील भाग लवकरच!
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*******

जुळेल का सुमेधाचे लग्न? वाचा पुढील भागात.


वाचकहो, सदर कथा ही एक सत्यकथा असून तिला काल्पनिक जोड दिलेली आहे. कथेच्या माध्यमातून कुणाच्या भावना दुखावण्याचा अजिबात हेतू नाहीय. समाज कितीही पुढरलेला असला, सुशिक्षित असला तरी लग्नाच्या बाजारात मुलीच्या सुंदरतेच्या व्याख्येत आजही रंगाला प्राधान्य दिले जाते. ही मानसिकता बदलावी यासाठी ही एक छोटी कथामालिका. आशा आहे की तुम्हाला नक्की आवडेल.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//