Feb 25, 2024
सामाजिक

कसोटी.. काळ्या रंगाची! भाग -५. (अंतिम)

Read Later
कसोटी.. काळ्या रंगाची! भाग -५. (अंतिम)


कसोटी.. काळ्या रंगाची!
भाग -पाच

"वाटतं ना." डोळ्यात पाण्याचा थेंब जमा होऊ न देण्यात विजयी झालेली सुमेधा निर्विकारपणे म्हणाली.
"जेव्हा माझ्या वर्गातील छोट्या छोटया निरागस मुली माझ्या गळ्यात हात गुंफतात, मला मिठी मारतात, फळ्यावर लिहिताना माझ्या चेहऱ्यावर उडालेले खडूचे बारीक कण त्यांच्या इवल्या हातांनी त्या पुसतात तेव्हा त्यांच्या स्पर्शाने कित्येकदा वाटते की मलाही एक मुलगी असायला हवी होती."
तिने एक पॉज घेतला.

"मॅडम, भावनिक विचार करणं वेगळं आणि व्यवहारिक वेगळं. आपल्या भावनांना कंट्रोल करून आम्ही दुसरा मार्ग निवडला."

"मला काय वाटते ते तुम्हाला सांगू? मुलगी व्हावी तर ती अतिशय सुंदर असावी किंवा खूप श्रीमंत घरातील असावी किंवा मग खूप हुशार तरी असावी. तेव्हाच तिला काही प्रॉब्लेम येणार नाही." सुमेधा मनात साचलेले सगळे बोलत होती.

"पण पुढे पंचवीस तीस वर्षांनी ही विचारसरणी बदलली असू शकते की.आणि तुम्ही म्हणता तसे केवळ सुंदर दिसणंच महत्वाचे नाहीय. तुमच्या कुटुंबियांनी तुमच्यावर ते लहाणपणापासून बिंबवलंय म्हणून तुम्हाला तसे वाटतेय. तुम्ही तुमच्या मुलांना हे शिकवा की चेहऱ्याच्या सुंदरतेपेक्षा उजळलेले कर्तृत्व जास्त सुंदर असते.
घरात खूप श्रीमंती असली, तरी पैसा काय येतो आणि जातो, आपल्या मुलांनी प्रत्येक परिस्थितीत खंबीर राहून कसे जगावे हे तुम्ही त्यांना शिकवा. स्वतः कॅपेबल बनवायला शिकवा."

"तुमचे जर बाळ असेल तर तो तुमचाच रंग घेऊन येईल, तुमची जी आर्थिक स्थिती असेल त्यातच ते वाढेल. हे आपण बदलवू शकत नाही. पण एक बदलवू शकतो, योग्य संस्कार देऊन समाजातील लोकांकडून निर्माण झालेल्या प्रॉब्लेम्स ला कसे फेस करायचे हे तर तुम्ही नक्कीच शिकवू शकता."
सुमेधाच्या चेहऱ्यावरचे भाव टिपत राधिका बोलत होती.

"आणि एक सांगू, तुम्ही सावळ्या असलात तरी खूप सुंदर आहात. आणि पुष्कळदा मुली आपल्या आईपेक्षा काकणभर जरा जास्तच सुंदर असतात." मिश्किल हसत राधिका म्हणाली.

सुमेधा केवळ हसली. "मी स्किनचे औषध घ्यायला आलेय. तुम्ही तर गप्पांचाच घाट घातला."

"हम्म. पेशंट जेवढं बोलतो, त्यावरून आम्ही औषधं देतो. ह्या गोळ्या घ्या. आठवड्याभरात तुमचा प्रॉब्लेम सॉल्व होईल." राधिकाने हसत तिला गोळ्यांचे पाकीट दिले.
सुमेधा जायला निघाली तसे पुन्हा राधिकाने आवाज दिला. "ताई, बाकी मी जे बोललेय, त्यावर विचार करून बघा."


सुमेधा घरी परतली ती विचारांच्या लाटेवर स्वार होऊनच. इतक्या वर्षापासून मनात दाबून ठेवलेल्या भावना आज उचंबळून वर आल्या होत्या. रात्री आरशासमोर उभे राहून ती स्वतःला निरखत होती. खरे तर ही नेहमीचीच सवय. आज मात्र काहीतरी वेगळे भासत होते हे खरे.

'तुम्ही खूप सुंदर आहात.' राधिकाने म्हटलेले तिला आठवत होते. आजवर तिला असे कोणी म्हणाले नव्हते. 'काळी' याच ठपक्यात वावरत होती. आज पहिल्यांदा तिला कोणी सुंदर म्हटले होते,तेही एका स्त्रीने.
आरशात पाहताना तिला ती खरोखरीच सुंदर भासत होती.


"मनोज, मला दुसरं बाळ हवंय." रात्री तिने नवऱ्याला गळ घातली. तो तिच्याकडे आश्चर्याने बघत राहिला.
"अहो, असे काय बघताय? आपल्या मोठ्याला सोबतीला कोणीतरी हवेच ना? नाहीतर एकटा राहून एकलकोंडा होईल तो."

"पण मी तुला वचन दिलं होतं त्याचं काय?"

"वचन तुम्ही दिलं होतं, मी नाही ना?" बारीक आवाजात ती म्हणाली.

"आणि मुलगी झाली तर?"

"चालेल मला." ती लाजून म्हणाली.

आजची त्यांची प्रणयाची रात्र खऱ्या अर्थाने सजली होती. पुढील महिन्यात पाळी आली तशी ती थोडी खट्टू झाली पण नंतर लगेच दुसऱ्या महिन्यात गुड न्यूज मिळाली आणि तिला आकाश ठेंगणे झाल्यासारखे झाले.

तिने राधिकाला स्पेशल भेटून ही बातमी दिली तेव्हा राधिका चकित झाली. आपल्या बोलण्याचा ती इतका पॉझिटिव्ह विचार करेल असे तिला वाटले नव्हते.

काही महिन्यांनी सुमेधा पुन्हा आली. आता तिचे पोट चांगलेच मोठे झाले होते. चेहरा तेजाने उजळला होता.

"अरे वा! सुमेधा ताई दिवस भरत आलेत दिसतेय." राधिका हसून म्हणाली.

"हो. या महिन्यात माझी डिलिव्हरी आहे. आज आईकडे जातेय. त्यापूर्वी तुम्हाला धन्यवाद द्यायला म्हणून आलेय. तुमच्यामुळे मी दुसरा चान्स घ्यायचे धाडस केले आणि तुम्हाला सांगू ही प्रेग्नन्सी मी भरभरून जगलेय. पहिल्या वेळी मुलगी होईल या चिंतेने शेवटच्या क्षणापर्यंत मला छळले होते. या खेपेला मात्र जे होईल त्यासाठी मी देवाची आभारी असेल." डोळ्यात पाणी आणि ओठावर हसू घेऊन ती बोलत होती. "आईकडून परतले की तुम्हाला भेटायला नक्की येईन." ती उठत म्हणाली.

"सुमेधाताई." केबिनच्या दाराजवळ पोहचलेल्या तिला राधिकाने आवाज दिला.
"याही खेपेला मुलगा होईल तर चांगलंच आहे. पण मुलगी होऊ दे म्हणून देवाला प्रार्थना करून बघा की."

राधिकाचे बोलणे ऐकून सुमेधाच्या चेहऱ्यावर स्मित उमटले. मुलगीच व्हावी असे मनोमन तिला वाटत होतेच की. ती चेहऱ्यावर गोड हसू घेऊन बाहेर गेली.

*******
"पण त्यानंतर तर तुम्ही कधी आलाच नाहीत." भूतकाळ आठवून आत्ता समोर बसलेल्या सुमेधाला राधिकाने विचारले.

"ती खूप मोठ्ठी स्टोरी आहे." एक आवंढा गिळून सुमेधा सांगू लागली. "डिलीव्हरीसाठी माहेरी जात असताना अपघात झाला. माझ्या पतीचे दोन्ही हात त्यात गेले. अपंगत्वामुळे त्यांची नोकरी गेली. घरी बसायची वेळ आली. मला मुलगी झाल्याचा आनंद होता पण तो साजरा करता आला नाही. बाळासाठी दुसरा चान्स घेतला आणि पूर्वी सुरू असलेला संसार वेगळ्याच वळणावर येऊन थांबला.

मग मीच माझ्या आयुष्याला \"सेकंड चान्स\" देऊन बघायचे ठरवले. मुलगी झाली नी घरात दुर्गती आली असे कोणी म्हणायच्या आत मुलीच्या कृपेने जीवावरचे हातावर बेतले असे बोलून गेले. मुलीचे नाव कृष्णा ठेऊन जणू काही तिला सारथीची भूमिका पार पाडायला लावले.

यांची नोकरी गेल्यामुळे आम्ही मग आईच्या गावाला थांबलो. सासू सासऱ्यांना बोलावून घेतले.जो पैसा मिळाला, त्याच्या मदतीने मी तिथल्याच माझ्या नोकरीच्या जुन्या शाळेत पर्मनंट नोकरी सुरू केली. मुलांना त्याच शाळेत शिकवून त्यांच्यावर योग्य संस्कार केले. पुढे मुलगा इंजिनियर झाला तर ही कृष्णा हट्टाने डॉक्टरकीकडे वळली. परवाच एका नवजात शिशुवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्याचा पेपरमध्ये फोटो आला होता."

"हो, तरीच मला हिला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटत होतं." राधिका आठवून म्हणाली.

"पोरगी खूप मेहनती निघाली मॅडम. तुम्ही म्हणालात म्हणून मी सेकन्ड चान्स घेतला आणि त्याचं फलित म्हणून तिने परवा एका चिमण्या जीवाला जीवदान दिले. परवा तिला तुमच्याबद्दल सांगितलं तशी तुम्हाला भेटण्यासाठी तगादा लाऊन बसली. म्हणून इतक्या वर्षानंतर आत्ता तुम्हाला भेटायला येऊ शकले." सुमेधा.

"अभिनंदन डॉक्टर कृष्णा, खूप छान काम केलेस तू." राधिकाने तिचे अभिनंदन केले त्यावर कृष्णाने गोड स्मित केले. तिचा सावळा चेहरा तेजस्वी दिसत होता.

"हे कोण?" इतका वेळ त्या दोघींसोबत बसलेल्या गोऱ्या तरुणाकडे पाहून राधिकाने विचारले.

"अरे, हो सांगायचे विसरलेच. हे डॉक्टर अर्जुन न्युरोलॉजिस्ट आहेत. कृष्णाचे होणारे हजबंड!"

"दोघांचे अभिनंदन हं." राधिका आनंदाने म्हणाली.

"मॅडम तुम्ही म्हणाला होतात ना पंचवीस वर्षानंतर विचारसरणी बदलेल म्हणून. खरंच सुरुवात झालीये. अर्जुन बघायला कृष्णापेक्षा कितीतरी सुंदर आहे पण त्याचे हिच्यावर खूप प्रेम आहे. त्या प्रेमात सावळा वर्ण आड आला नाही. तिचा स्वभाव तिची हुशारी या गुणावर तो भाळला."

"आणि तुमचा मुलगा?" राधिका.

"तो बंगलोरला आहे. इंजनिअर झालाय. बायको पण इंजिनियर आहे. आमच्यासारखीच काळीसावळी आहे. पण काळी म्हणून तिच्या वडिलांना आम्हाला पैसे द्यावे लागले नाहीत की आमची कृष्णा काळी म्हणून आम्हाला पैसे द्यावे लागणार नाहीत. उलट मुलांची मने त्यांच्या उजळलेल्या कर्तृत्वामुळे जुळली.
आता फायनलचा रिझल्ट आला की कृष्णाचा लग्नाचा बार उडवायचा आहे." सुमेधा भरभरून बोलत होती.


"मी म्हणाले होते ना? सुंदर गोरा रंग हीच सौंदर्याची परिभाषा नसते. सुंदरता अनेक निकषावरती तोलता येते. तुम्ही तुमचे विचार बदलवले, मुलांवर ते संस्कार केलेत आणि तुमच्या मुलांनाही त्याचा अवलंब केला हेही नसे थोडके.
सुमेधाताई काळ्या रंगाच्या कसोटीत तुम्ही जिंकलात बर!"
राधिका म्हणाली तशी केबिनमध्ये एक समाधानपूर्ण हास्य पसरले.

****समाप्त ****
कथेचा हा शेवटचा भाग. ही छोटीशी कथामालिका कशी वाटली ते नक्की सांगा.
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)

वाचकहो, सदर कथा ही एक सत्यकथा असून तिला काल्पनिक जोड दिलेली आहे. कथेच्या माध्यमातून कुणाच्या भावना दुखावण्याचा अजिबात हेतू नाहीय. समाज कितीही पुढरलेला असला, सुशिक्षित असला तरी लग्नाच्या बाजारात मुलीच्या सुंदरतेच्या व्याख्येत आजही रंगाला प्राधान्य दिले जाते. ही मानसिकता बदलावी यासाठी ही एक छोटी कथामालिका. आशा आहे की तुम्हाला नक्की आवडेल.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//