Mar 01, 2024
सामाजिक

कसोटी.. काळ्या रंगाची! भाग -२

Read Later
कसोटी.. काळ्या रंगाची! भाग -२

कसोटी.. काळ्या रंगाची!

भाग -दोन.

 

 

 

'काय गं आई, बाबांच्या हुशारीसोबत थोडा तुझा रंग मला दिला असतास तर काय बिघडलं असतं गं?' तीने पुन्हा एक हुंदका दिला. उच्चशिक्षित कुटुंब असले तरी मुलीच्या जातीला विवाह हेच अंतिम सत्य मानणाऱ्या सनातन कुटुंबातील ती मुलगी होती. परंपरेचा पगडा घरात होताच. त्यामुळे तिच्यावरही तेच संस्कार होते. आपले लग्न जुळले नाही तर समाजात आईवडिलांचे नाक कापले जाईल या विचाराने सुमेधाची झोप उडाली होती.

 

इकडे झोप तर स्वाती आणि विलासरावांची देखील उडाली होती.

"लग्न जुळले नाही तर कसं होईल हो आपल्या सुमाचं?" डोळ्यात पाणी आणून स्वाती विचारत होती.

 

"काळजी करू नकोस गं. मी आहे ना? मी करेन काहीतरी. आणखी दोनतीन स्थळ आहेत माझ्या पाहणीतील. त्यांना सुमेधाला दाखवावी म्हणतो."

मनातील काळजी चेहऱ्यावर न दाखवता विलासराव म्हणाले.

 

 

पाच सहा महिन्यात पुन्हा चार नकार पचवल्यानंतर एक दिवस विलासराव आनंदानेच घरात आले. हातात पेढ्यांचा पुडका होता.

"स्वाती, सुमेधा बाहेर या, आनंदाची वार्ता आहे." विलासराव दारातूनच बोलले.

 

"काय हो काय झाले?" स्वाती बाहेर येत म्हणाली.

 

"अगं सुमेधा कुठे आहे? तिला बोलाव आधी."

हो ती येतच आहे. आत्ताच शाळेतून आलीये, तिचे आवरत आहे." स्वाती.

 

"बाबा काय झाले?" सुमेधाने विचारले. सोबत आजीही बाहेर आली होती.

 

"अगं, परवा एक स्थळ येत आहे. त्यांना तू पसंत आहेस, फक्त बघायचं म्हणून ते येणार आहेत. घे पेढा खा." त्यांनी तिच्या समोर पेढा धरला.

 

"अहो बाबा, आधी त्यांना येऊन मला बघू तर द्या. त्यानंतर होकार कायम राहिला तर मग खाऊयात की पेढे." ती खिन्नपणे म्हणाली.

 

"अगं, ते नाही म्हणणारंच नाहीत. आणि परवा पूर्ण होकार कळल्यावर मी फक्त हे साधे पेढे थोडीच तुला भरवणार? मी तर तुझ्यासाठी तुझी आवडती काजुकतली घेऊन येईन. तू परवाच्या तयारीला लग." विलासराव तिच्याकडे बघून म्हणाले.

 

"मी कंटाळले हो बाबा आता." सुमेधाचा खिन्न स्वर अधिक खिन्न झाला.

 

"हे स्थळ शेवटचे बाळा, त्यानंतर तुला पुन्हा दुसऱ्या मुलापुढे उभे करणार नाही. विश्वास ठेव माझ्यावर." तिच्या डोक्यावर हात ठेवून विलासराव म्हणाले.

 

दोन दिवसांनी पुन्हा कांद्यापोह्यांचा कार्यक्रम पार पडला. मुलगी बघून मागच्या इतर स्थळाप्रमाणे नकार मिळाला नव्हता ही जमेची बाजू होती. सुमेधाच्या चेहऱ्यावर थोडा आनंद पसरला होता. आता काही दिवसांनी आपलेही लग्न होईल या कल्पनेने गाल फुलले होते. त्या आनंदाच्या भरात तीने हळूच नजर वर करून नवऱ्या मुलाकडे एक कटाक्ष टाकला आणि तिचा चेहरा पूर्ण पडला.

साखरपुड्याची तारीख पक्की करून वरमंडळी परतली तशी इतका वेळ गप्प बसलेली सुमेधा हुंदके द्यायला लागली.

 

"काय झालं बाळा? आता का रडते आहेस?" लग्न जुळले तरी डोळ्यात पाणी बघून आजीने जवळ येत विचारले.

 

"आजी, बाबा त्या घरातील सगळी लोकं काळ्या रंगाची आहेत. आणि नवरा मुलगा तर जास्तच डार्क आहे. तुम्ही माझे लग्न असे कसे त्याच्याशी लाऊन देत आहात?" ती अजूनही मुसमसत होती.

 

"सुमेधा, अगं मागे एकदा बघायला आलेला मुलगा तर याच्यापेक्षाही काळा होता तरीसुद्धा त्याचे नखरे पाहिले होतेस ना? त्यापेक्षा हे स्थळ कैकपटींनी चांगले आहे. तुला तर एक प्रश्नही न विचारता त्यांनी तुला पसंत केलेय." बाबा तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले.

 

"बाबा, खरं सांगा. या स्थळासाठी किती पैसे मोजलेत?" विलासरावांच्या डोळ्यात डोळे घालून सुमेधा विचारत होती.

 

"त्याचे तुला काय करायचे आहे?" तिच्याशी नजर चोरत विलासराव.

 

"बाबा.."

 

"सुमेधा, अगं बाबा आहे मी तुझा. तुझे चांगले व्हावे यासाठीच माझे प्रयत्न चाललेत ना? तसेही जास्त काही करत नाहीये मी. तुझ्या होणाऱ्या नवऱ्याच्या नोकरीसाठी लागणारे डोनेशन तेवढे देणार आहे." विलासराव म्हणाले.

"बाबा पण.. "

"आता या विषयावर पुन्हा चर्चा नको." विलासराव.

 

रात्री गॅलरीत उभी राहून ती एकटीच विचार करत होती. 'आता लग्न होईल पुढे जाऊन मुलं होतील. आणि मुलगी झाली तर? तीही माझ्यासारखीच काळी असेल. मग तिच्याही लग्नाला अशाच अडचणी येतील.'

 

विचार करूनच तिच्या अंगावर काटा आला. 'नको, मला मुलगी नकोच. कधीच नको. एकदाचे वांझ असलेले बरे पण काळी मुलगी होऊन तिला झालेला त्रास नाही बघवणार मला. माझ्या काळेपणाच्या सावलीने तीही काळवंडणार. त्यापेक्षा लग्नही नको आणि मुलदेखील नको.'

 

"काय गं सुमू झोपली नाहीस?" अचानक स्वातीचा हात तिच्या खांद्यावर पडला आणि ती भानावर आली.

"इतका कसला विचार करते आहेस?" स्वाती.

 

"आई ते लग्न.." सुमेधा जरा बावचळत म्हणाली.

 

"अगं सुमू, लग्नाचा विचार तू करूच नकोस. खरं तर तेच सांगायला मी आले होते. नवऱ्या मुलाच्या बाबाचा आत्ताच फोन आला होता. साखरपुड्यानंतर पुढच्या महिन्यात लग्नाचा मुहूर्त आहे म्हणाले. त्यानंतर सहा महिने योग नाही. तेव्हा लग्न पुढच्या महिन्यात ठरलेय." स्वाती तिला मिठी मारत म्हणाली.

 

"इतके दिवस लग्न जुळत नव्हते म्हणून काळजी आणि आता जुळले तर महिन्याभरात तू सासरी जाशील. आनंद आणि दुःख दोन्ही सोबतच आले बघ. पण दुःखी होण्यापेक्षा आम्ही सगळे फार आनंदी आहोत. आता तूही आनंदाने लग्नाच्या तयारीला लाग."

 

घरातील लोकांचा उत्साह आणि आनंद बघून सुमेधा पुढे काहीच बोलली नाही.

 

यथासांग लग्न पार पडले. सुमेधा सासरी आली. सासर तसे बरे होते. घरात इन मिन तीन लोकं. सासूबाई सासरे आणि नवरा. आता सोबतीला ही आली आणि ते त्रिकोणी कुटुंब चौकोनी झाले. सासरे एका सरकारी नोकरीवरून निवृत्त झाले होते. महिन्याअखेर त्यांची बऱ्यापैकी पेन्शन मिळत होती. सासूबाई घरीच असायच्या, घरात हवं नको ते बघायच्या. सुमेधाच्या वडिलांनी डोनेशनचे पैसे दिल्यामुळे मनोज, सुमेधाचा नवरा देखील एका कपंनीमध्ये पाच आकडी पगारावर होता, सुमेधाची नोकरी सुरू होतीच. एकंदरीत घरात पैशांची चणचण नव्हती. खाऊन पिऊन घरातील मंडळी बऱ्यापैकी सुखी होते.

 

मनोज आणि सुमेधाचे चांगले चालले होते. नव्याचे नऊ दिवस संपल्यावरही तो तिची व्यवस्थित काळजी घेत होता. सहवासाने प्रेम फुलते म्हणतात. तसेच सुरुवातीला फारसा आवडला नसला तरी आता मनोज तिला आवडायला लागला होता. एकमेकांच्या संगतीने त्यांच्यातील प्रेम फुलू लागले होते.

 

वर्षभराचा काळ लोटला आणि एक दिवस त्यांच्या प्रेमाची परिणती म्हणून सुमेधाला मळमळायला लागले. जेवणाकडे बघून कसेसेच वाटायचे. दोन महिन्यापासून पाळी चुकली होती. सकाळीच तीने घरी प्रेग्नन्सी टेस्ट करून बघितली आणि किटवरच्या दोन लाल रेघा बघून तिच्या काळजाचा ठोका चुकला.

:

क्रमश :

पुढील भाग लवकरच!

©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)

*******

वाचकहो, सदर कथा ही एक सत्यकथा असून तिला काल्पनिक जोड दिलेली आहे. कथेच्या माध्यमातून कुणाच्या भावना दुखावण्याचा अजिबात हेतू नाहीय. समाज कितीही पुढरलेला असला, सुशिक्षित असला तरी लग्नाच्या बाजारात मुलीच्या सुंदरतेच्या व्याख्येत आजही रंगाला प्राधान्य दिले जाते. ही मानसिकता बदलावी यासाठी ही एक छोटी कथामालिका. आशा आहे की तुम्हाला नक्की आवडेल.

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//