Login

कसोटी.. काळ्या रंगाची! भाग -३

गोष्ट सुमेधाची.
कसोटी.. काळ्या रंगाची!
भाग -तीन.


मनोज आणि सुमेधाचे चांगले चालले होते. नव्याचे नऊ दिवस संपल्यावरही तो तिची व्यवस्थित काळजी घेत होता. सहवासाने प्रेम फुलते म्हणतात. तसेच सुरुवातीला फारसा आवडला नसला तरी आता मनोज तिला आवडायला लागला होता. एकमेकांच्या संगतीने त्यांच्यातील प्रेम फुलू लागले होते.

वर्षभराचा काळ लोटला आणि एक दिवस त्यांच्या प्रेमाची परिणती म्हणून सुमेधाला मळमळायला लागले. जेवणाकडे बघून कसेसेच वाटायचे. दोन महिन्यापासून पाळी चुकली होती. सकाळीच तीने घरी प्रेग्नन्सी टेस्ट करून बघितली आणि किटवरच्या दोन लाल रेघा बघून तिच्या काळजाचा ठोका चुकला.

त्याचवेळी सासूबाई तिच्या खोलीत डोकावल्या. तिच्या हातातील किट बघून त्यांनी तिच्याकडे पहिले आणि काय समजायचे ते त्या समजल्या.
"सुमेधा, ठीक आहे ना सगळं?" आत येत त्यांनी कानोसा घ्यायचा प्रयत्न केला.

"अं? हो. ठीक आहे ना." हातातील किट उशीखाली लपवून ती म्हणाली. 'यांनाही आत्ताच इथे यायचं होतं.' चेहऱ्यावर वेगळे भाव उमटले होते.

"काही हवे होते का?" सासूकडे बघून ती.

"नाही अगं, सहज आले होते." तिला इतक्यात काही सांगायचे नाहीये हे हेरून सासूबाईंनी तिथून काढता पाय घेतला.

'सॉरी, सासूबाई. मनोजशी बोलल्याशिवाय मी तुम्हाला काही सांगणार नाही.' पाठमोऱ्या जाणाऱ्या सासूकडे बघून सुमेधाने मनात माफी मागितली.

*****

"मनोज, मला अबॉर्शन करायचे आहे." डोळ्यात पाणी आणून ती मनोजशी बोलत होती. सकाळपासून समजलेली प्रेग्नन्सीची बातमी रात्री झोपताना तिने मनोजला सांगितली. दिवसभर स्वतःवर कसा आवर घातला तिलाच माहित.

"सुमेधा, अगं काय बोलतेस कळतंय ना? आपलं बाळ आहे ते. तुझं नि माझं. आईबाबा व्हायला किती भाग्य लागते तुला काय माहित? माझ्या कपंनीतील काही मित्रांना या आनंदासाठी अक्षरशः झुरुताना पाहिलेय आणि तू अबॉर्शन करायचं म्हणते आहेस?" त्याचा आवाज कठोर झाला.

त्याला असे कठोरतेने बोलताना सुमेधा पहिल्यांदाच पाहत होती.

"मनोज,आई व्हायला कोणत्या स्त्रीला आवडणार नाही. पण.." तिच्या डोळ्यात पाणी दाटले होते.

"पण काय सुमेधा?" त्याने तिचा हात हातात घेतला. आता तोही हळवा झाला होता.

"पण मनोज, मुलगी झाली तर?" कातर स्वरात ती म्हणाली.

"अगं तर काय झाले? आपल्या घरात मुलगा मुलगी भेद नाहीच आहे आणि तू हे कधीपासून मानायला लागलीस?"मनोज आश्चर्याने म्हणाला.

"तुम्हाला माझा मुद्दा कळलाच नाही. मनोज, अहो, आपल्याला मुलगी झाली तर ती अशीच होणार, रंगाने काळी. आपल्यासारखी. पुढे जाऊन तिलाही तेच फेस करावे लागेल जे एका काळ्या मुलीला करावे लागते. जे मी केलंय. म्हणून मला मुलगी नकोय." बोलताना तिचा आवाज कापत होता. 

तिच्या मनातील सल मनोजने ओळखली आणि त्याने तिला मिठीत घेतले.

"वेडी आहेस का सुमेधा तू?" तिला कुरवाळत तो म्हणाला. त्याच्या स्वरात मघाशी असलेली धार आता कमी होऊन तो अगदी मृदू आवाजात बोलत होता.

"अगं, आधी बाळाला या जगात येऊ तर दे. ते बाळ मुलगा आहे की मुलगी हे कळण्याआधीच असा निर्णय घेणे योग्य नाही ना?"

"पण जर मुलगी झाली तर?"

"तर काय? मी आहे ना."

"म्हणजे तिच्या जन्मापासूनच तिच्या लग्नाचा आपल्या मनाला घोर लागून राहील. आत्तापासून पैसा जमवून ठेवावा लागेल." ती आपल्याच विचारात हरवत होती.

"आणि मुलगा झाला तर?" मनोजने तिच्या डोळ्यासमोर चुटकी वाजवून विचारले.

"हं?" ती अजूनही आपल्याच विचारात होती.

"मुलगा झाला तर असे काही नसेल ना? मग एक चान्स देऊन पाहायला काय हरकत आहे?" तिच्या डोळ्यात पाहत तो.

"पण एकच चान्स." सुमेधाने त्याच्या एक चान्स शब्दाला पकडून म्हटले. "मनोज, आपण एकच चान्स घ्यायचा. पुन्हा पुढे आपण बाळासाठी प्रयत्न नाही करायचे." ती.

"ठीक आहे." मनोज हलके हसून म्हणाला.

"फक्त ठीक आहे नको, मला तुम्ही वचन द्या की आपण दुसरे बाळ ठेवणार नाही."

"दिलं वचन. खूष ना?" तिच्या हातावर हात ठेवून तो म्हणाला. तशी आश्वस्त होऊन ती त्याच्या मिठीत विसावली.

घरात नवीन सदस्य येणार म्हणून मनोजसह सासू सासरे दोघेही खूष होते. आपापल्या परीने सर्वच तिची काळजी घेत होते. मनोज तर तिला फार जपत होता. सारे काही नीट चालले होते पण सुमेधा मनातून कायम अस्वस्थ असायची. मनात एकच विचार, 'जर मुलगी होईल तर?' या जर तर च्या द्वन्द्वात ती अडकली होती. नाही म्हणायला गरोदरपणाचे तेज चेहऱ्यावर आले होते, पण मनातील युद्धाने ती आतून काळवंडत चालली होती.

सरता सरता नऊ महिने सरले आणि तिला प्रसवकळा सुरू झाल्या. त्या वेदनांपेक्षा आता काही तासांनी कोण या जगात येईल या वेदनेचा त्रास तिला असह्य होत होता. प्रसूतीगृहात बाळाचा टाहो घुमला आणि तिने प्रश्नार्थक नजरेने डॉक्टरकडे पाहिले.

"अभिनंदन! मुलगा झालाय." डॉक्टर हसून म्हणाल्या तेव्हा तिला साऱ्या वेदनांचा विसर पडला. आपल्याला मुलगा झाला हे तिला सुखवणारा होता. नऊ महिने स्वतःशी लढत असलेली ती, आता मातृत्वाचा खरा आनंद घेऊ शकणार होती.

दिवस जात होते. बाळाच्या आगमनाने ती सुखावली होती. त्याच्या बाळलिलेत रममाण झाली होती. 

'मुलगी झाली असती तर मी इतकी आनंदी असते का?'
कधीकधी उगाच हा प्रश्न तिला छळायचा. मुलगा आता वर्षभराचा झाला आणि तिने पुन्हा तिची नोकरी सुरू केली. घरात सांभाळायला सासू सासरे होतेच त्यामुळे तिला मुलाची काळजी नव्हती.
घरी बाळाच्या करामती शाळेत चिमुकल्या पिल्यांची चिवचिव.. सुमेधाचे आयुष्य मजेत चालले होते.


काळ पुढे सरकत होता. पाहता पाहता मुलगा आता आठ वर्षांचा झाला होता. चांगल्या शाळेत शिकत होता. सुमेधाचे एक सुखी जीवन जगत होती.
पण खरंच का ती आनंदी होती?
तिच्या आयुष्यात असे काही घडणार होते की तिच्या विचारांची दिशा बदलणार होती.

 काय घडेल असे? वाचा पुढील भागात.
:
क्रमश:
पुढील भाग लवकरच!
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*******
वाचकहो, सदर कथा ही एक सत्यकथा असून तिला काल्पनिक जोड दिलेली आहे. कथेच्या माध्यमातून कुणाच्या भावना दुखावण्याचा अजिबात हेतू नाहीय. समाज कितीही पुढरलेला असला, सुशिक्षित असला तरी लग्नाच्या बाजारात मुलीच्या सुंदरतेच्या व्याख्येत आजही रंगाला प्राधान्य दिले जाते. ही मानसिकता बदलावी यासाठी ही एक छोटी कथामालिका. आशा आहे की तुम्हाला नक्की आवडेल.