कसे पांग फेडू त्या माऊलीचे

आईला लवकरात लवकर आपल्या बंगल्यात घेऊन येऊ... मेधाने घेतलेल्या निर्णयाचा पाऊस आनंदाश्रू बनून श्रीधरच्या डोळ्यातून ओसंडून वाहत होता..

कसे पांग फेडू त्या माऊलीचे

-©®शुभांगी मस्के...

अष्टपैलू लेखक करंडक स्पर्धा

पहिली फेरी : लघुकथा


"आई, आई, अगं काय झालं??".. कन्हतेयस का अशी? सारखी या कडावरून त्या कडावर, अस्वस्थ वाटतेयसं.
काही दुखतयं का तुझं? दवाखान्यात वगैरे जायचयं का?


मागच्या आठवड्यात मोठया हौसेने पिकनिकला पाठवलं. पिकनिकवरून आली तेव्हापासून बघतोय. बरोबर खातपित नाही, आपल्यातच राहातेस, कसला एवढा विचार करतेसं गं.. काही सलतयं का मनात? काही सांगायचंय का?

"अगं बोलून प्रश्न मिटतात.. अस न बोलता आम्हाला कसं कळणारं", तुला काय होतंय ते.. श्रीधरने आईजवळ जाऊन विचारलं.

कड पलटून उमा ताईंनी, श्रीधरकडे भरल्या डोळ्यांनी पाहिलं... कोरड्या ठन्न ओठांवरून जीभ फिरवली..

तोंड किती सुकलयं बघ, ओठ ही किती कोरडे पडलेत. मेधा लगेच पाणी घेऊन आली. श्रीधरने पाण्याचा ग्लास समोर धरला तशा दोन हाताने ग्लास पकडुन त्यांनी, घटाघटा पाणी पिल.

काहीतर खूप आत आत सलतयं आईकडे बघून श्रीधर ला वाटलं. काय झालं? श्रीधर ने प्रेमाने पुन्हा विचारलं आणि उमा ताईंच्या डोळ्यातून अश्रूंचा धारा, अचानक गालावर ओघळायला लागल्या.

श्रीधर ने पुन्हा.. कपाळावर, हात फिरवला.. बरं वाटत नाही का? दवाखान्यात जायचयं का? उमाताईंनी, मान हलवतच, नाही म्हटलं... आणि त्या बोलत्या झाल्या.

श्रीधर तुझ्या जन्मापूर्वी खूप गरीब होतो रे आम्ही. हातावर पोट घेऊन जगत होतो. तू आमच्या आयुष्यात आलास आणि आम्ही फक्त आईबाबाच नाही तर, आम्ही खऱ्या अर्थाने श्रीमंत झालो.

खूप मेहनत केलीस, शिकलास, मोठा साहेब झालास.. घरदार.. एव्हढा मोठा बंगला.. मेधा सारखी गुणवान बायको... सरी आणि परीच्या रुपात संसारवेलं ही छान बहरली तुम्हा दोघांची. ... अजून काय पाहिजे रे जीवनात.. खूश आहे मी!!

खूप दिलय देवाने, कोणत्या शब्दात आभार मानावे तेच कळत नाही.. उमाताई बोलत होत्या.

हो अगं, तुझ्या आणि बाबांच्या आशीर्वादाशिवास का शक्य होत हे.. माझ्या यशाचं खरं श्रेय तुम्हाला.. मला घडवणारे तुम्ही सदैव, माझ्या पाठीशी होतात, म्हणून तर बघ हे सहज शक्य झालं... श्रीधरने आईचा हात हाती धरून कपाळाला लावला..

बाबा गेले आपल्याला सोडून, तुला नाही जाऊ द्यायचो मी एवढ्यात. म्हणून म्हणतो खूश राहत जा! म्हणतात ना "चिंता चीतेसारखी असते".. "सगळा भार आता माझ्या खांद्यावर टाकून, तू मोकळी होऊन जा.. छान खात पित जा, वाटलं तर फिरायला जा.. पण खूश राहत जा"..

काही कमी आहे का? का गं एवढी नाराज नाराज असतेस हल्ली... श्रीधर ने पुन्हा विचारलं.

बाळा, नऊ महिने पोटात बाळाला वाढवलं, जन्म देऊन आई झाले पण आईपण काही नशिबात नव्हतं, झाल्या झाल्या दोन पोरी गेल्या, उमा ताईंनी पदर डोळ्याला लावला.

दहा वर्षात, वांझोटेपणाचा लागलेला शिक्का तर मिटला होता पण.. आईपण अधुरच होतं..

पूजा पाठ, नवसायास, साकडे सुकडे सारं सारं केलं.. देव कुठे लपला होता काही कळेना.

एका बिल्डिंग साईटवर चौकीदारीचं म्हणून काम करायचो. तिथेच एका झोपड्यात राहायचो. अखेर देवाने ऐकलं.. देवाची कृपा आणि तुझा जन्म झाला..

आठव्या महिन्यात आला तू.. खूप नाजूक होता. पैसे नव्हते, काँट्रॅक्टर देवासारखा ऐनवेळी मदतीला धाऊन आला.

काचेच्या पेटीत बरेच दिवस ठेवावं लागलं होतं तुला. कसं बसं हॉस्पिटलमध्ये निभावलं, खरी परीक्षा तुला घरी सुट्टी मिळाल्यानंतर होती.

खूप औषध पाणी केलं, पण अंगावर थेंबभर दूध येईना. वरचं दुध ही पचत नव्हत.. वरच्या दुधाने पोट फुगून यायचं, आणि मग तू दम लागेस्तोवर रडायचा..

माझा पान्हा कुठे आटला होता कुणास ठाऊक? परिस्थिती समोर हतबल होते मी. भुकेने रडून रडून आतंक करणारं माझं बाळ, मोठ्या आशेने माझ्याकडे बघायचं. पदराआड घेऊन, तृप्तीची ढेकर देण्यात मात्र मी असमर्थ होते. बोलताना उमाताईच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या.

"अगं, रडतेयसं का अशी?" "दिवस निघालेच ना.. आला दिवस जातोच.. मोठा झालोच ना मी".. श्रीधर

"जन्म देऊन ही सुंदर दुनिया दाखवलीय, एवढं सुंदर आयुष्य दिलस", "मायेच्या सावलीत वाढवलंस, चांगले संस्कार केलेस. अजून काय हवं असतं एका बाळाला"

महागडा झुला नसेल देता आला पण, तुझ्या साडीच्या शिवलेल्या गोधडीच्या झुल्यात निवांत झोपलोच ना! तूझ्या कुशीत जेव्हा तू मला घेऊन झोपत असशील तेव्हा दूध काय पण पाणी पिऊन ही मला, चांगली झोप लागत असेल. श्रीधरचं संवेदनशील मन मायमाऊली समोर, कृतकृत्य भावनेने नतमस्तक झालं होत. जणू काही मायेचा पाझरच फुटला होता.

नाही रे बाळा, भूक भूक असते. पाणी पिऊन नाही भागवता येत.. काहीही करा पण दुधाची सोय करा.. डॉक्टरांनी सांगितलं..

शेजारच्या बिल्डिंगमध्ये आमच्या सारखीच चौकीदारी करणारी रखमा, घरकाम करायला एका मोठ्या बंगल्यात जायची.

बंगल्यातली मालकीण बाळंतीण होती. रखमाने बोलता बोलता माझी कर्म कहाणी मालकीणबाईला सांगितली.
देवासारखी धावून आली होती ती माऊली.

रडून रडून बेजार झालेल्या तुला एवढ्या मोठ्या बंगल्यातल्या मालकीणबाईने पदराआड घेतलं. पहिल्यांदाच तू असा रात्रभर शांत झोपला होता.

बंगल्यातले साहेब, मालकीणबाईला दररोज आपल्या झोपडीत घेऊन येत आणि घेऊन जातं.. फक्त पैशाने श्रीमंत नव्हते ते मनाने श्रीमंत होते. त्यांच्या मनाचा मोठेपणाच होता तो...

"आईच्या दुधाने बाळ बाळसत म्हणतात.. तू मालकीण बाईचं दूध पिऊन बाळसत होतास".

कोणत्या जन्मीचे ऋणानुबंध होते कुणास ठाऊक! तुला पदरा आड घेताना, त्यांनी आपल्या गरीब परिस्थितीचा, धुरकट, मळकट झोपडीचा ही विचार केला नाही कधी..

"श्री.. श्रीधर!" माझ्या हातात तुला सोपवताना, एक दिवस त्या तुला श्रीधर म्हणाल्या आणि आम्ही तुझं नाव श्रीधरच ठेवलं! ऐकून, आनंद झाला होता त्यांना खूप!!

उमाताईं बरोबर आता, श्रीधर आणि मेधाच्या ही डोळ्यांमध्ये अश्रू तरळले. "धन्य ती माउली" म्हणत, श्रीधरचे दोन्ही हात आपोआप जोडले गेले.

बाळा, तुला वाटतं असेल. आज मी हे का सांगतेय.. उमा ताईंच्या बोलण्यावर श्रीधरने हलकेच मान डोलावली.

मागच्या आठवड्यात ट्रीपला पाठवलं तू मला.. मालकीणबाई भेटल्या तेव्हा. ओळखूच नाही आल्या रे त्या. पण त्या माऊलीला या जन्मात तरी विसरणे शक्य नाही माझ्याच्याने, मी ओळखलचं त्यांना..

मालकीण बाईला, मी वाकून नमस्कार केला. जराशा ओशाळल्यागत झाल्या त्या. त्यांना तुझ्याबद्दल सांगीतलं, दोन्ही हातांनी आशीर्वाद दिला त्या माऊलीने..

त्यांच्याबद्दल ऐकून मात्र वाईट वाटलं. साहेबांच्या मृत्यूनंतर, शिक्षणासाठी आणि नंतर नोकरी लागल्यानंतर दूर देशात गेलेल्या त्यांच्या पोराने, मालकीण बाईकडे कधी फिरकुन ही पाहिलं नाही म्हणे.

पोराच्या शिक्षणासाठी, त्या माऊलीला मात्र स्वतःच घरदार विकून बेघर व्हावं लागलं.

कुठे आहेत त्या आता.. श्रीधरने विचारलं..

"आश्रय, वृद्धाश्रम".. उमाताई बोलल्या.

वृद्धाश्रमात आहेत, ऐकून श्रीधर आणि मेधा दोघे ही क्षणभर सुन्नच झाले.

श्रीधरची अस्वस्थता मेधाने ओळखली.

श्रीधर सांग कधी जायचं..

"आश्रयला"... मेधाने विचारलं

ऐकल्या लगेच, श्रीधरने.. मेधाला दोन्ही हातांनी कवटाळून घेतलं.
खरचं!! श्रीधरचा कंठ दाटून आला होता.

श्रीधर, लोकांना एकच आई असते.. तुला तर दोन दोन आईंचा सहवास मिळाला. दोन दोन आईंच्या मायेची ऊब तुला मिळाली. दोन आईंचा आशीर्वाद मिळाला..

"एक जन्म देणारी आणि एक दूधआई".. एका जन्मात फेडून होतील का रे हे पांग.. भाग्यवान आहोत आपण.. मेधाला गहिवरून आलं होतं..

चल लवकर, आईला लवकरात लवकर आपल्या बंगल्यात घेऊन येऊ... मेधाने घेतलेल्या निर्णयाचा पाऊस आनंदाश्रू बनून श्रीधरच्या डोळ्यातून ओसंडून वाहत होता..

आज तो वृद्धाश्रमातून त्याच्या "दूधआई" ला तिच्या लेकाच्या घरी घेऊन येणार होता...
-©®शुभांगी मस्के...