करवल्या

Marathi comedy katha

त्याच काय झालं? आमचं वऱ्हाड राजापूरला जाऊन पोहोचलं. पण आम्हाला कार्तिकेयाच दर्शन काही झालं नाही. त्याचं काय झालं? आम्ही फोन केल्यावर पत्ता पाठवला आणि आम्ही लगेच तेथे पोहोचलो. हाॅलमध्ये जाऊन आमची ही ही हू हू चालूच होती. ते पाहून संजना मॅडम म्हणाल्या, "अगं, जरा हळू हसा, नाहीतर सगळे आपल्याला वेडे ठरवतील." तसेही होतेच म्हणा. आमचं खिदळन पाहून सगळे आपापसात बोलतच होते. "काय येड्या पोरी आहेत?"

"अरे! जणू स्वर्गातील अप्सराच जमल्या आहेत की काय?" अशी भावना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होती.

"कोण आहेत या मुली?" असा आवाज त्या गर्दीतून येत होता. इतक्यात सारंग सर पुढे सरसावले, "या सगळ्या माझ्या सोबत आल्या आहेत." तेव्हा सर्वजण फक्त त्यांच्याकडेच पाहू लागले.

"प्रिया, लई शायनिंग मारतंय ग हे. बांदावर बसून उगीचच शेळ्या हाकतंय. थांब मी बघतेच." असे म्हणून निशा पुढे जाऊ लागली. तोपर्यंत ईश्वर देवासारखे धावून आले. "अरे अरे, शांत रहा. आम्ही सर्व ईरावासिय आहोत." त्यांच्या बोलण्याने पुन्हा त्या गर्दीत चुळबूळ सुरू झाली. इतका आवाज का येतोय हे पाहण्यासाठी मयूरेश सरांनी स्टेजवरून पाहिले तर सर्व ईरावासिय त्यांना दिसले. तेव्हा त्यांनी एकच आवाज दिला, " अरे, या माझ्या मैत्रीणी आहेत." हे ऐकून दर्शनाचे दर्शन घेण्यासारखे झाले होते.

"म्हणजे या आदरणीय लेखिका आणि लेखकांचा मेळा आहे." नामदेव सरांचा मृदू आवाज ऐकून सगळे शांत झाले.

सगळ्या काही क्षणातच स्टेजवर जाऊन उभ्या राहिल्या. "अगं ए पोरींनो, वर काय करताय? खाली या." योगिता मॅडमचा आवाज ऐकून अख्खा हाॅल दुमदुमला. सगळे शांत झाले.

"मॅडम, आम्ही करवल्या म्हणून मिरवणार आहोत. हो ना काकू." योगिता मॅडमना समजावत तसेच कार्तिकेयाच्या आईची परवानगी घेत धनश्री बोलली.

"हो ग, तुम्ही सगळ्याच करवल्या आहात. मला मुलगी नाही, पण तुम्ही सर्वजणी आता माझ्या मुली बनल्या आहात. तुमच्यामुळेच जणू कार्यक्रमाची शोभा वाढली आहे." कार्तिकेयाच्या मातोश्री म्हणाल्या.

"काकू, म्हणजे आमची मुले तुमची नातवंडं होणार ना! तर मग त्यांनी थोडी दंगामस्ती केली तर चालेल ना!" किमया आणि शगुफ्ता एकदम बोलल्या.

"हो, चालेल. पण थोडोशीच दंगामस्ती हं." काकूंनी बोलल्यावर त्या दोघींनी एकमेकींकडे पाहिले.

"अरे, तुम्ही टेन्शन काय घेताय? आम्ही आहोत ना! आम्ही सगळ्या बच्चा कंपनीला घेऊन बालईरासाठी एक सुंदर व्हिडिओ बनवू. आई लोकं सर्वजणी मस्त लग्न एॅन्जाॅय करा." अपूर्वा आणि प्रतिक्षा बोलल्या. तेव्हा कुठे समस्त महिलामंडळाच्या डोक्यावरील टेन्शन कमी झाले.

"अगं पोरींनो, तिकडे चला. एक मस्त सेल्फी काढूया. उद्या सगळ्यांनी हाच डीपी ठेवायचा बरं." पूजा बोलली मग सगळ्या लगेच तिकडे वळल्या.

"मेघा, अगं तुझी स्माईल किती छान आहे?" मिनाक्षी ताई म्हणाल्या.

"ताई, तुमचा हा मोठेपणा आहे. खरंच तुमची स्माईल सुध्दा खूप छान आहे." मेघा

"अरे, काय स्माईल स्माईल करताय? छान पोज दिली तर खूप छान फोटो निघतात." आश्विनी मधेच म्हणाली.

"आता काढा रे सेल्फी, फक्त उभा रहायचं. फोटो छानच येतात." श्रावणी म्हणाली तसे सगळे एका रांगेत उभा राहिले. एक मस्त सेल्फी निघाला.

"ए बघू, माझा फोटो कसा आलाय? आम्ही पुणेकर ना खूप छान पोज देतो." जयश्री पुढे येत म्हणाली.

"हो ना, पुणे तिथे काय उणे?" संजालीने लगेच टोमणा मारला. मग परत दात खिदळायला सुरूवात झाली.

आता भटजी मंगलाष्टका म्हणू लागले. सगळे अक्षता घेऊन उभे होते. एक एक मंगलाष्टका सुरू झाल्या. आम्ही करवल्या मिरवत स्टेजवर जाऊन उभ्या राहिलो.
"ए पोरींनो तुम्ही खाली या. ही पोरं जाऊन उभा राहू देत." राधिकाचा आवाज ऐकून सगळ्या गपचूप खाली आल्या आणि लगेच शायनिंग मारत सारंग सर, ईश्वर सर, अमित सर, नामदेव सर, चंद्रकांत घाटाळ सर आणि राहुल सर अशी पुरूषांची अख्खी फौज स्टेजवर जाऊन उभा राहिली. मंगलाष्टका संपल्यावर एकमेकांना हार घालण्यासाठी भटजींनी सांगितले.

"कार्तिकेया, ताठ रहा. आत्ताच जर वाकलास तर आयुष्यभर पत्नीसमोर झुकायलाच लागतंय. तसंही आयुष्य झुकण्यातच जातंय म्हणा, पण आजचा दिवस तरी ताठ राहून समाधान करून घे रे बाबा." अमित सरांनी मोलाचा सल्ला दिला. तसे मयुरेश सर अगदी ताठ मानेने उभा राहिले. जणू काही यांचच वर्चस्व. दर्शना यांच्या तोडीस अगदी तोड देत ती तशीच उभी राहिली. हार घालून घ्यायचे असेल तर गपगुमान माझ्यापुढे वाका नाहीतर राहू दे असे म्हणून ती हाताची घडी घालून शांत उभी राहिली.

"अहो मयुरेश सर, हार घालून घ्या ओ. सगळं व्यवस्थित पार पडू दे." राहूल सर म्हणाले. तसे मयुरेश सर गपचूप दर्शनासमोर वाकले तेव्हा दर्शनाने अगदी सहजतेने त्यांना हार घातला.
"आता आयुष्यभर असे वाकलात तर ठिक, नाहीतर दात पाडून हातात देईन." इतके बोलून दर्शना शांत बसली आणि मयुरेश सर मात्र देवाची मदत मागू लागले.

"नको ग बाई, माझ्या पोटावर पाय आणू नकोस. हवे तर मी हात काढून देईन." सुप्रिया म्हणाली.

"नको ग, दात काढण्यापेक्षा माझ्या शाबुदाण्याच्या गोळ्या उपयोगी पडतील. दात काढून टाकण्यापेक्षा ते वाचवलेले बरे." वृंदा लगेच म्हणाली.

"अरे देवा, काय पोरी आहेत या? आमच्या कोल्हापूरच्या लोकांचा फक्त आवाज ऐकून लोकं गार पडत्यात. काटा किर्र जागेवर पलटी." अस्मिता म्हणाली.

"व्हय मॅडम, जगात भारी आम्ही कोल्हापूरी." सारंग सर परत री ओढत म्हणाले.

"हो ना. ईरावरसुध्दा कोल्हापूरचे जास्त लेखक आहेत." संजना मॅडम कौतुक करत म्हणाल्या.

"म्हणजे पुणे मुंबईकर काय चांगलं लिहित नाहीत काय?" जयश्री पटकन म्हणाली

"आले पुणेकर, मधेच पचकले." सारंग सर कोल्हापूरी ठसक्यात म्हणाले.

"अरे अरे, असे भांडू नका. आपण करवल्या म्हणून आलो आहोत ना! मग आपण आज फक्त मिरवायचं. लग्न व्यवस्थित पार पडू द्या ग." राधिका म्हणाली.

"तुम्ही करवल्या तर मग आम्ही कोण?" राहूल सरांनी परत प्रश्न केला. तेव्हा सगळ्या एकमेकींकडे टकामका पाहू लागल्या. आता काय बोलावे कोणालाच कळेना.

"अरे, करवल्या चला चला. नवरा बायको जेवायला चालले आहेत." अशी योगिता मॅडमची ऑर्डर आल्यावर सगळे तिकडे जाऊ लागले. पण झाले काय? तर मयुरेश सर आणि दर्शना स्टेजवरून खाली उतरत होते, इतक्यात मुलीकडील मंडळी मयुरेश सरांचे शुज पळवून नेत होते, पण त्यातील एकाचा धक्का लागल्यामुळे मयुरेश सर खाली पडले की राव! सगळे धावतच जवळ जाऊन कोठे लागले का ते पाहू लागले. थोडेजण घाबरले होते, पण हार मानतील ते मयुरेश सर कसले? ते अगदी हसत हसतच उठून उभे राहिले.

"आयुष्याची सुरुवातच तोंडावर पडण्यात झाली, आता पुढे काय होणार देवच जाणे." सगळे पुरूष मंडळी आपापसात कुजबुजत होते.

"देवाऽऽ" मयुरेश सर ओरडले.

"बोला काय म्हणताय?" ईश्वर सर पुढे गेल्यावर सगळे त्यांच्याकडेच पाहू लागले.

"बघताय ना!" मयुरेश सर

"उसमे क्या है! ये तो कुदरत का नियम ही है।" देवच असा म्हणतोय म्हटल्यावर आपण काय बोलणार म्हणून परत मयुरेश सर शांत बसले. सगळे जेवण्यासाठी गेले. जोडीने छान जेवण्यासाठी बसले असता निधी मॅडम लगेच आल्या. "चला चला.. आता मी शो घेणार आहे, लवकर जेवण करा."

"आता सगळे मिळून माझ्याशी पंगा घेताय तर मी तुम्हाला नंतर बघून घेईन.. मी परत येईन.. मी परत येईन.." मयुरेश सर ओरडले.

"अरे मयु, काय झालं? असे का ओरडतोस? उठ बघू ऑफिसला जायचं आहे ना!" आईने हलवत त्यांना उठवले.

"अर्र, हे स्वप्न होतं होय. ते ईराच्या शब्दांची मैफिल ग्रुपवर चर्चा करता करता सगळे माझ्याच स्वप्नात येऊ लागले. बापरे! लवकर लग्न आटोपून घ्यायला हवं." मयुरेश सर मनातच म्हणाले.

"आई, ते करवली म्हणजे काय ग?" मयुरेश सर.

"का रे?" आई

"नाही म्हणजे माझ्या काही मैत्रीणी करवल्या बनून लग्नात आल्या तर चालेल ना!" मयुरेश सर

"मला चालेल. पण तुझ्या बायकोला चालेल का ते बघ आणि हो अशा तुझ्या किती मैत्रीणी आहेत रे. आजपर्यंत कधी बोलला नाहीस. आता अचानक इतक्या वाढल्या कशा? बघ हं पुढे जाऊन काही समजायच्या आत आत्ताच सांग. नाहीतर मी दर्शनाला सांगेन." आई

"ए माझी आई, तसे काहीच नाही ग, सगळ्या लेखिका मैत्रीणी आहेत. ईरावरील लेखक लेखिकांचा मेळा येणार आहे." मयुरेश सर

"अच्छा, मग त्यांचे स्वागत अगदी जोरदार करू." आई

"तू कर त्यांचे स्वागत, ते सगळे मिळून माझी भाजी करतील." मयुरेश सर परत विचारात मग्न झाले.

(टीप: यातील कार्तिकेय आणि मयुरेश ही दोन्ही नावे एकाच व्यक्तीची आहेत. ही कथा एक विनोद म्हणून घ्यावा. जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्याला मी स्वतः किंवा ईरा जबाबदार राहणार नाही. चुकीने कुणाची नावे राहिली असतील तर ते स्वतःच्या जबाबदारीवर यावे. ही विनंती.)
धन्यवाद