करुणाचा संघर्ष

Gost choti Dongarevdi karunacha sanghrsh I

आज तो आश्रमात आलेला तिच्या अंतसंस्काराला, झर्रकन त्याच्या डोळ्यासमोरून तो चलचित्रपट गेला. ति म्हणाली, 

  तु सहज बोलून गेलास, वेगळे व्हायचे मला? कारण तुला स्वैराचार हवा होता. एकातच गुंतून राहण्याचा तुझा स्वभाव नव्हता.मलाही गुंतून पडण्यात अर्थच नव्हता. 

तिथून खरा संघर्ष सुरू झाला.जिथे सगळे अभाळच फाटले होते तिथे ठिगळ तरी कुठे आणि कसे लावणार? 

आता कोर्टाच्या समझोत्याची मला गरज नव्हती.कारण खोटे पुरावे मी कोर्टात सादर करू शकणार नाही आणि खरे कितीही ओकले तर ते कोर्टात पचणार नाही.

 शेवटचे निरोपाचे संभाषण करून करूणाने सतीशचा निरोप घेतला तो कायमचाच. पुढे बरेच दिवस आपल्याच धुंदीत मी तिचा शोध घेतला नाही. 

  तिचे तारूण्य उफाळून वाहत होते.एक घटस्फोटित  नवऱ्यानी टाकलेली हीच तिची खोटी प्रतिमा जगासमोर आली. 

  मग आशाळभूत नजरा तिच्या अंगावर खिळत. कायमची ब्याद गळ्यात पडेल या भितीने सोयिस्करपणे बहिण भावाने या प्रकरणातून हात काढून घेतले. 

 मग काय माहेरही दुरावले.मग एकटीच ऊभी राह्यली  सगळ्या प्रसंगाला सामोरी जायला.
 
  निसर्गाने आपले काम चोख  बजावले. पोटी सतीशचा अंकूर अकार घेत होताच, ज्याचे पालकत्व सतीशने झटकले होते. 
    
  खुपदा मनात विचार आला. संपवूया का या जिवाला? जगात  येण्या आधीच?

 पण त्याचा काय दोष?मग ठाम निर्णय घेऊन अनाथाश्रमात दाखल झाली. होईल तेवढे समाजकार्यात तिने स्वतःहाला झोकून दिले. स्वतःची ओळख स्वबळावर निर्माण केली. विश्वासाने आज ती अनाथाश्रमाची विश्वस्त झाली.

  गोड परी जन्माला आली. आश्रमातल्या वातावरणात ती वाढली.तिच्या बाललीलात रमता रमता ति किशोरवयीन झाली. तिला स्वतःच्या पायावर उभे केले.संघर्षाचे बाळकडू तिला जन्मजात पाजले.
   
 आता थोडे डोक्यावरचे ओझे खांद्यावर आले. पण संघर्ष तिचा पिच्छा सोडत नव्हताच.

 शरीर थकत होते. एकेक अवयव निवृत्ती घेत होते. सगळ्या भुमिका निभावताना शरीराकडे मात्र पार दुर्लक्ष झाले.

  शेवटी शरीराने असहकार पुकारला. तेंव्हा शरीराची तपासणी केली तेंव्हा ध्यानात आले. जर्जर रोगांची लागण शरीराला झाली होती. सगळ्या शरीरभर त्याची पानंमुळे पसरलेली होती.

  आता शरीर पण हिचा शत्रू बनले. पुसटशी कल्पना देखील हिला येऊ दिली नाही. सगळे संपले होते.तिला आता मार्गस्थ होणे कर्ममात्र होते. 

    हा एकच संघर्ष तिला पुसटशी कल्पना न देता घेऊन जाणार होता.एका संघर्षाचा अंत झाला.
 
 आश्रमातील सगळे हळहळले. सुटली बिचारी म्हणून त्यांचे डोळे पाणावले.

  आज  त्याला समजले. म्हणून तो आला होता आश्रमात करूणाच्या फोटोपुढे हात जोडून म्हणाला,.

 "करूणा मी चुकलो माफ कर"! इतक्यात मुलगी तिथे आली आणि ती म्हणाली,चालते व्हा इथून माझ्या आईला मोक्षप्राप्ती मिळाली.परत तिला अडकवू नकात.तिला आपल्या गलिच्छ शब्दांची श्रद्धांजली नाही वाहिलीत तर बरे होईल. 

    पण एक आता तुम्ही मात्र लक्षात ठेवा, खऱ्या अर्थाने तुमची मात्र आता संघर्षाला सुरुवात झाली.आता गाठ माझ्याशी. 

  आकाशात एक तारा लुकलुकला जणू काही तो म्हणत होता तथास्तू बाळा!

©️®️सौ. ऊज्वला रवींद्र राहणे