कर्तव्यनिष्ठ बाबा

Father's Day Special

कर्तव्यनिष्ठ बाबा

सुदामा तुटपुंज्या पगारात संसाराचे रहाटगाडे हाकत होता .

पाचवीत शिकत असलेला मुलगा अक्षय , लकवा मारलेले वडील अंथरुणाला खिळलेले , कंबरेत वाकलेली आई , अती घर कामाने सदा कुरकुरणारी बायको आणि अधुन मधुन पाहुण पणाला येणारी लग्न झालेली बहीण .

बहीणीचा निरोप आलेला राखी बांधायला ती येणार !

अक्षय ने सांगीतले मला घड्याळ हवी , काय करणार सुदामा ?

बहीणीला साडी घेतली आणि अक्षयसाठी घड्याळ घेऊन आला , बायको म्हणाली अहो तुमचा शर्ट फाटलाय किती वेळा शिवुन घालायचा दोन शर्ट आणायच्या ऐवजी हे काय घेऊन आलेत ? ताई साठी ठिक आहे पण अक्षयसाठी दीड हजाराची घड्याळ कशाला आणली ?

अगं अक्षयचा चेहरा बघ कसा आनंदाने खुलला तो !

शर्ट पुढल्या महीन्यात घेईन .

मुलाच्या चेहर्‍यावरच्या आनंदाची फिकीर फक्त बापाला !

००००००००००

दादाराव मिल मधे मजुरी करणारा , घरी दोन मुली , बायको आणि गावी आईवडील ते ही मजुरी करणारे , अधुन मधुन दादाराव गावी जाऊन यायचा , असले पैसे तर थोडे त्यांच्या हातावर ठेवायचा , आईकडून मजुरी होत नव्हती वडील कसेबसे शेतात मजुरीला जायचे , दादाराव ने वडीलांना पत्र पाठविले होते मुलीच लग्न आहे तो काही दिवसात त्यांना घ्यायला येईल , इकडे त्याला चिंतेने ग्रासले पैसे कसे जमा करु , जेवढे आहेत ते पुरेसे नव्हते , मग त्याने मिलमालकाच्या घरी जास्तीचे काम करायचे कबुल करुन ऊसणे पैसे घेतलेत आनंदातच घरी आला बघतो तर आईवडील आलेले , अरे तुम्ही कसे काय आलात मी येणारच होतो घ्यायला , हो पण तू कामात असशील म्हणुन आम्हीच आलोत , बरं लग्नाची व्यवस्था कशी ? त्याची काळजी तुम्ही करु नका , आमच आम्ही बघू , फक्त तुम्ही काही दिवस पैसे मागू नका , दादारावची बायको म्हणाली तसे ते चुप झाले , रात्री जेवण झाल्यावर दादाराव च्या हातात बाबांनी एका रुमालाची गाठोडी दिली , काय आहे हे ? गाठ सोडून बघ , गाठ ऊघडून बघीतले असता त्यात पैश्याचे बंडल रबर ने बांधलेले होते , अहो बाबा हे काय , अरे हे तुझ्यासाठीच तर जमा करत होतो , घे ! कामात येतील , दादाराव ने क्षणभर त्यांच्या चेहर्‍याकडे बघीतले आणि बाबा म्हणत त्यांना मिठी मारली , आज एका बापाने दुसर्‍या बापाची मदत केली होती .

०००००००

अहो मला छान मोबाईल घेऊन द्या बरं ! माझ्या सगळ्या मैत्रिणींकडे भले मोठ्ठे मोठ्ठे स्मार्ट फोन आहेत आणि माझा हा छोटासा मोबाईल अगदीच टपरुट दिसतो त्यांच्यासमोर .

तुला काय काम मोठ्ठ्या मोबाईलच ? बोलण्यासाठीच हवा ना ? हा अगदी योग्य आहे आणि त्यांनी मोठा घेतला म्हणुन तू मोठा घ्यायची गरज नाही .

पप्पा मला मोबाईल हवा ! कशाला बेटा आहे ना तुझ्या जवळ , अहो तो आऊटडेटेड झाला आहे , मला तो नवीन वन प्लस हवा , 12 मेगा पिक्सल कॅमेरा वाला पुढे कामी येईल मला , बरं बेटा ऊद्या जाऊ घ्यायला ! बायको अवाक मला नाही म्हंटले आणि हा बाप बघा मुलीने मागीतल्या बरोबर घेऊन द्यायला तयार ! बाप रे बाप .

००००००००

गाडी चालवता चालवता मागच्या सीट वर बसलेल्या मुलाला शेवटी न राहवुन विवेक ओरडलाच , तू जर आता गुपचुप बसला नाहीस तर बघ , चुप म्हंटल ना !

त्याचा तो दरडावण्याचा सुर ऐकुण राज घाबरलाच मग थोडावेळ गप बसल्यावर पुन्हा मला बाहेर जायच गाडीत बसायचे नाही म्हणुन पुन्हा गाडीचे दार ऊघडायचा प्रयत्न करत होता , सुजाता आणि मोठी बहीण त्याला आवरुन थकल्या बाबा हो कसे ह्याचे त्यांना रडू आवरेना शेवटी आपला राग आवरुन त्यांनी गाडीची स्पीड कमी करुन एका हाताने त्याचा हात पकडला त्याला पुढे ओढत आणि पुन्हा गाडी दामटत हाॅस्पीटल गाठले , पंधरा वर्षाच्या मुलाला जबरदस्तीने पाठीवर घेऊनच त्यांनी डाॅक्टरांच्या केबीन मधे प्रवेश केला आणि काही न बोलता बाहेर येऊन तिथल्या बाकावर अंग टाकलं राजला झोपेच इंजेक्शन देऊन शांत करण्यात आलं , त्याचा ताप डोक्यात जाऊन मग तो कुणालाच ऐकत नव्हता म्हणुन त्याला जबरदस्तीने दवाखान्यात घेऊन आले !

झोपलेला विवेक हलत नाही म्हणुन डाॅक्टरांनी तपासले असता , 104 ताप त्याला आणि हा बाबा बघा स्वतःची तब्येत बरी नसता मुलाला हाॅस्पीटलाईज करुनच मग टेकला !

बाप,,,असाच असतो,,,आणि असावा !

००००००००

सावनी आज वडीलांना मिठी मारुन ओक्साबोक्सी रडत होती ,

पाठवणीचा विधी सुरु होता , भाऊ पण त्यांना बिलगुन रडायला लागला , शेवटी चुलत मावशीने त्यांना शांत केले आणि बाबा ,भावा कडे बघतच सावनी नवरदेवासोबत गाडीत बसली आणि सासरी गेली .

आई जाऊन पंधरा वर्षे झाले पण बाबाने नोकरी सांभाळून त्यांच एका आई सारख सगळं केलं , दोघेही नोकरीला लागले सावनी मोठी मग तिच लग्नं ठरल , मावशीची मदत घेऊन सगळं व्यवस्थित पार पडलं , दुसर्‍या वर्षीच सावनी आई बनणार कळल तसे बाबा आणि भावाला खुप आनंद झाला , बाळंतपण माहेरीच करायचे बाबांना निक्षुन सांगीतले , मावशीने हात वर केलेत माझ्याच्याने होत नाही मी मदतीला येणार नाही , बाबांनी म्हंटले तुझा फक्त सल्ला हवा होता बाकी आम्ही केल असत गं ! पण ठिक आहे तू आता पर्यंत आम्हाला मदत करतच आली आहेस काही हरकत नाही !

बाळ झाले , सावनी आज बाबाला बाळोते धुताना बघतेय आणि तिचा ऊर अभिमानाने दाटून येतो,,, माझी आई माझे बाबा,,,,!

20/06/2021

०००००००