कर्मयोगिनी परमपुनीता ! पार्ट 3 ( अंतिम भाग )

.
" सीता. " राजा जनक ओरडले.

त्यांनी इकडेतिकडे पाहिले तर कुणीच नव्हते. देहाला घाम फुटला होता. त्यांना जाणवले की पाहिलेले ते सर्व स्वप्न होते.

" कुणी आहे का तिकडे ?" राजा जनक यांनी आवाज दिला.

एक सेवक धावत आला.

" सारथी शुभकेतूला आताच रथ सज्ज करायला सांगा. आम्ही लगेचच महर्षी वाल्मिकीच्या आश्रमाकडे प्रस्थान करू. " राजा जनक म्हणाले.

" जशी आज्ञा महाराज. " सेवक म्हणाला.

थोड्यावेळाने सारथी शुभकेतू महालाबाहेर उपस्थित झाला. सोबत त्याच्या दोन कन्या निरोप द्यायला आल्या होत्या.

" पिताश्री , मी माहेरी आले आणि तुम्ही लगेचच जाताय. " थोरली विवाहित मुलगी तक्रारीच्या सुरात म्हणाली.

" पुत्री , राजाचा आदेश आहे. नाकारू शकत नाही. मोठ्या भाग्याने असा राजा लाभतो. " सारथी म्हणाली.

" पिताश्री , माझ्यासाठी बाहुली आणाल ना ?" छोटी मुलगी म्हणाली.

" हो बाळा. नक्की आणेल. " सारथी म्हणाला.

पितापुत्रीमधला हा प्रेमळ संवाद ऐकून राजा जनक यांचे डोळे पाणावले.

" भाग्यवंत आहेस शुभकेतू , तुझ्या दोन्ही मुली तुझ्यासोबत आहेत. " राजा जनक म्हणाले.

नंतर राजा जनक महर्षी वाल्मिकी ऋषींच्या आश्रमाकडे निघाले. वाटेत त्यांनी हजारवेळा तरी महादेवाकडे देवी सीतेसाठी प्रार्थना केली. आयुष्यात पहिल्यांदाच ते इतके अस्वस्थ होते. अखेरीस महर्षी वाल्मिकींचे आश्रम आले. आश्रम येताच राजा जनक रथातून खाली उतरले. एका साध्वीला त्यांनी प्रणाम केला.

" मला देवी सीतेला भेटायचे आहे. " राजा जनक म्हणाले.

" देवी सीता म्हणजे आमच्या वनदेवी. आम्हालाही कालच कळले की त्या वनदेवी नसून अवधेच्या राणी जनकनंदिनी सीता आहेत. " ती साध्वी म्हणाली.

" कुठे आहे माझी पुत्री वैदेही ?" राजा जनक यांनी विचारले.

" त्या महर्षी वाल्मिकी आणि पुत्र लवकुशसोबत अवधेला निघून गेल्या. कानावर पडले की त्यांना अवधेच्या सर्व प्रजेसमोर पावित्र्याची शपथ घ्यावी लागणार. " ती साध्वी म्हणाली.

" हे महादेवा. तुला का दया येत नाही माझ्या पुत्रीवर ?" राजा जनक उद्गारले.

" महाराज , तुम्ही चिंता नका करू. राजकुमारी सीता यांना काहीच होणार नाही. तुम्हाला आठवत नाही का तेव्हा मिथिला राज्यात दुष्काळ पडला होता आणि देवी सीता भूमीत सापडली की लगेच राज्यात पाऊस सुरू झाला. लक्ष्मीस्वरूप आहेत त्या. आपण देवी सीतेला जनकपूरला आणू. आम्ही मिथिलावासी त्यांनाच आमची राणी मानू. त्या देवीसमान आहेत आमच्यासाठी. " सारथी शुभकेतू म्हणाला.

" होय. " राजा जनक म्हणाले.

" रावण काही बिघडवू शकला नाही मग इतर काय करतील ?" शुभकेतू म्हणाला.

" लंकेच्या रावणाला मारता येऊ शकते पण समाजाच्या मनात जो रावण आहे त्याला मारणे कठीण. सारथी , आज वाऱ्याच्या वेगाने मला अवधेला घेऊन चल. " राजा जनक म्हणाले.

मग राजा जनक रथावर विराजमान झाले.

***

अवधेला पोहोचल्यावर राजा जनक लगेच राजदरबाराच्या दिशेने जाऊ लागले. तिथे खूप गर्दी होती. देवी सीता महर्षी वाल्मिकी , पुत्र लवकुश समवेत उपस्थित होती. राजसिंहासनावर प्रभू श्रीराम विराजमान होते. दरबारात लक्ष्मण , भरत , शत्रुघ्न , हनुमान अशी अनेक मंडळी उपस्थित होती. देवी सीतेच्या सर्व बहिणी देवी उर्मिला , देवी श्रुतकीर्ति , देवी मांडवी व सर्व माता म्हणजेच देवी कैकेयी , देवी कौशल्या , देवी सुमित्रा या देखील तिथेच उपस्थित होत्या. सासरकडच्या सर्व मंडळींना देवी सीतेने डोळे भरून बघितले. " माझ्यानंतर माझ्या मुलांना आईचे प्रेम द्या. " असेच जणू देवी सीतेचे नेत्रे तिच्या बहिणींना सांगत होते.

" देवी सीता पवित्र आहे यात मला किंचितही शंका वाटत नाही. परंतु , राजधर्मअनुसार मला हा निर्णय घ्यावा लागत आहे. देवी सीतेला त्यांच्या पवित्रतेची शपथ घ्यावी लागेल. मगच त्यांना राणीपदावर पूर्ववत करण्यात येईल आणि या दोन ऋषीकुमारांना युवराज म्हणून घोषित करण्यात येईल. " प्रभू श्रीराम म्हणाले.

" महाराज , मी महर्षी वाल्मिकी. ही स्त्री निर्मळ आणि पवित्र आहे. हिचे चारित्र्य हंसासमान पांढरेशुभ्र आहे. जर मी असत्य बोलत असेल तर महादेव माझी सर्व तपस्या निष्फळ करतील. " महर्षी वाल्मिकी उद्गारले.

" महाराज , आज जरी आपण देवी सीतेला पवित्र मानले तरी भविष्यात या राजकुमारांचे खरे पिता कोण यावर प्रश्न उपस्थित होऊ शकतो. " काही ब्राह्मणऋषी समोर येऊन म्हणाले.

त्यानंतर देवी सीता पुढे आली.

" उपस्थित अवधनरेश दशरथनंदन महाराज श्रीराम , उपस्थित ऋषीमुनी , वेगवेगळ्या राज्यांचे नरेश , राजपरिवाराचे सर्व सदस्य , अंजनीपुत्र वीर हनुमान , माता कौशल्या , माता सुमित्रा , माता कैकेयी आणि अवध राज्याची सर्व प्रजा यांना जनकनंदिनी सीतेचा प्रणाम. जेव्हा जेव्हा माझ्या चारित्र्यावर संशय उपस्थित केला जाईल तेव्हा तेव्हा माझे पिता पुण्यश्लोक राजा जनक , गुरू याज्ञवल्क्य , विदुषी देवी गार्गी , देवी अहिल्यापुत्र कुलगुरू शतानंद यांनी मला दिलेल्या संस्कारावरही प्रश्न उपस्थित होतील. एक स्त्री कधीच आपल्या माहेरच्या विरोधात काहीच ऐकून घेऊ शकत नाही. शिवाय माझी अशी इच्छा नाही की माझ्या पुत्रांनीही जन्मभर तोच त्रास सहन करावा. म्हणून मी हा वाद आज कायमचा संपवणार आहे. हे जननी माता वसुंधरा , जर मी राजा राम सोडून इतर कुण्या पुरुषाचा विचारही मनात आणला नसेल तर मला तुझ्या कुशीत स्थान दे. हे माता वसुंधरा , जर माझे चारित्र्य शुद्ध असेल , मी पवित्र असेल , लवकुश जर खरच माझे आणि श्रीराम यांचे पुत्र असतील तर मला तुझ्या कुशीत स्थान दे. जर मी पत्नी , कन्या , स्नुषा , माता हे सर्व कर्तव्य निष्ठेने निभावले असतील तर मला तुझ्यात सामावून घे. "

देवी सीतेचे स्वर विजेसम दरबारात गर्जले. क्षणार्धात एक अग्नीचे वर्तुळ देवी सीतेच्या भोवती प्रकट झाले. जमिनीला छिद्र पडले. भूमी फाटली. नभात विजा चमकू लागला. सर्वत्र अंधकार दाटला होता. वादळ आले. ती फाटलेली गोलाकार भूमी खाली जाऊ लागले. त्याच क्षणी पुण्यश्लोक राजा जनक धावत दरबारात आले. त्यांना देवी सीता भूमीत शिरताना दिसली.

" सीता.." महाराज जनक ओरडले.

नेत्रांनीच आपल्या पित्याला शेवटचा प्रणाम करून देवी सीता जमिनीत शिरून लुप्त झाली. वातावरण पूर्ववत झाले. महाराज श्रीराम सिंहासन सोडून त्या जमिनीवर टेकून बसले. शोक करू लागले.

" सीते..सीते परत ये. मी ब्रह्मास्त्र सोडून माझ्या वैदेहीला परत आणेल. " प्रभूंनी शिवधनुष हाती घेतला.

" थांबावे कौशल्यानंदन. लक्ष्मीला एकदा लाथाडले तर ती परत येत नाही. तसच सीताही आता परत येऊ शकत नाही. हेच प्रारब्ध आहे. त्याचा स्वीकार करावा. तुमचे मिलन आता वैकुंठात होईल. मी जन्मापासून मृत्यूपर्यंत हिचा संपूर्ण प्रवास बघितला. ती जगाच्या कल्याणासाठी आली होती. तिचे अवतारकार्य संपले. " राजा जनक म्हणाले.

प्रभू श्रीरामांच्या नेत्रातून आसवे गळू लागली. सर्वच जण शोक व्यक्त करू लागले. अवधेच्या प्रजेला पश्चाताप झाला. राजा जनक त्या जमीनीवर टक लावून बघू लागले. मनोमन म्हणाले ,

" अशीच एक जमीन विदेहात होती. जिथे नांगर चालवताना तू मला गवसली. माझे जीवन समृद्ध झाले तुला कन्यारूपात प्राप्त करून. पुत्री , लग्नानंतर माहेर इतकं परके होते का की मरण्यापूर्वी पित्याला भेटण्यासाठी तुला स्वप्नात यावे लागले ? स्वप्नात येऊन तू माहेरवाशीण म्हणून मिरवले ? अभिमान वाटतो मला तुझा. अनंत काळापर्यंत लोक तुझे आदर्श नारी म्हणून स्मरण करतील आणि तुझा पिता म्हणून मलाही अभिमान वाटत जाईल. "

©® पार्थ धवन

कथा जनकनंदिनी कर्मयोगिनी परमपुनीता माता सीता यांना समर्पित..??

( ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून रामायणातील काही घटनांचा आधार घेऊन लिहिलेली आहे. प्रस्तुत कथेतून कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. चुकभुल झाली असल्यास क्षमस्व. )

🎭 Series Post

View all