कर्म येती फिरुनी..

Karm Yeti


कर्म येती फिरून

भावांचे रोज फोन येत, तशी ती नेहमी चिंता करीत, आता भावांच्या वाटण्या होणार ,तश्या आई वडिलांच्या ही वाटण्या होणार, मग त्यांची ओढाताण होणार. इथे तिला वाटत होते आई वडील अशी प्रॉपर्टी आहेत की ते कोणाच्या ही नको असणार..

ती विचार करत होती ,आपण जर वाटणी घेणार नाहीत मग आपण आई वडिलांना ह्या छोट्या घरात कसे घेऊन येणार, घर छोटे होते म्हणूनच तर आपण सासू सासऱ्यांची अडचण नको या कारणाने त्यांना वाद घालवून त्यांच्या विषयी नवऱ्याच्या मनात भलते सलते भरून त्यांची सोय वृद्धाश्रमात केली होती.. त्यात माझ्या आईने मला हा मार्ग सुचवला होता.. आणि मग मी ही चांगल्या वृद्धाश्रमाचा शोध घेऊन त्या दोघांना तिथे पाठवले होते... नवरा नाराज झाला होता..त्याने माझ्याशी बोलणे सोडले..तो हर रविवार त्यांच्या सोबत गप्पा मारत आणि वेळ घालवत होता.. त्याची ही खंत होती की मी ठाम पणे नकार देवू शकलो असतो तर ही वेळ आली नसती... माझी अडचण बघून खुद्द आई वडील म्हणाले.."आम्ही लांब राहू ,तुमचा आनंदात आमच्या मुळे विरजण नकोत "

त्या विचारा गर्तेत असतांना तिला एकच मनात येत होते... जर त्यांचे आई वडील मला नको होते तर त्यांना ही माझे आई वडील नक्कीच नको होतील, मग पुन्हा आमच्यात नको असलेले वाद सुरू होतील, आणि तसे ही मी कोणत्या तोंडाने म्हणू , / आई वडिलांना वृद्धाश्रमात जोपर्यंत सोय होत नाही तोपर्यंत त्यांना आपल्याकडे ठेवू /

दुसरे म्हणजे ज्या माझ्या आईने मला ,सासू सासऱ्यांना वृद्धाश्रमात पाठवण्याचा सल्ला दिला तिला आज ही वेळ आली हे तिचे कर्म म्हणावे ,म्हणजे आपण जे कर्म करत असतो ते इतक्या लवकर आपल्याच वाट्याला येतील ,आणि आपलेच भाऊ आपले गुण वागणूक पाहून आपल्या आई वडिलांना ही घरातली अडचण म्हणून मलाच वृद्धाश्रमाचा पत्ता विचारतील असे वाटले नव्हते... मलाच माझ्या आई वडिलांसाठी चांगले वृद्धाश्रम बघण्याची वेळ येईल याची कल्पना ही मी केली नव्हती..

मी किती खुश होऊन आई वडिलांना आणि दादाला सांगितले होते,/ आज मी सासू सासऱ्यांचा कर्तव्यातून मोकळी झाले ,आता माझे घर कसे मोकळे मोकळे वाटत आहे , आणि कसे त्यांचे सर्व काम करणे म्हणजे एक कटकट आहे , त्यात त्यांना वृद्धाश्रमात किती सोयी सुविधा आहेत ,आणि ते किती मजेत आहेत ..तेव्हा विचार नव्हता केला की आपल्या वाहिन्या ही माझे हे बोलणे ऐकत होत्या, त्यांच्या मनावर माझ्या ह्या स्वार्थी वागण्याची छाप पडत होती, आणि त्यांचा मी नकळत आई वडिलांच्या कटकटी तून कशी सुटका करावी हा मार्ग मीच दाखवत होते... झाले त्यांनी ही मग दादांच्या मागे आई वडिलांना वृद्धाश्रमात टाकूया ही रट लावायला सुरुवात केली...

इकडे वाटणी होणार आहे ,तर तू तुझा हिस्सा घ्यायला ये,म्हणून दादा बोलवत, हो आणि अवी बाबांचे ही तेव्हाच ठरवू..त्यांना कोण सांभाळणार आहे..की त्यांना सुख सोयी युक्त वृद्धाश्रमात पाठवू तुझ्या सासू सासऱ्यांच्या सोबत ते ठरवू..

इकडे आई वडिलांना दादा वृद्धाश्रमात पाठवण्याचा विचार तरी कसा करू शकतो ह्या विचाराने तिला रडू कोसळले होते..

नवऱ्याला ह्या बाबत तिने काहीच सांगितले नव्हते, कारण जे कर्म आपण केले आहेत हे त्याचेच पाप आहे...आणि ते फिरून आले आहे..

त्यात तिला आईचा फोन आला होता ,ती रडत होती, कर्माला दोष देत होती ,म्हणत होती , "आम्ही काय कोणाचे पाप केले नाही कधी, ना कोणाचे वाईट चिंतले तरी आमच्या वर आमच्या लेका सुनांनी ही वेळ आनली आहे ,अग मला घर सोडून नातू नात सोडून ,आम्ही कमावलेले घर सोडून तिकडे वृद्धाश्रमात कसे करमणार, तिथे आमच्या शी बोलायला कोण असणार, कोण आम्हाला भेटायला येणार ,कोण आमची काळजी घेणार, तिथे खूप एकटे एकटे वाटणार ,आम्ही दुर्लक्षित होणार..ताई तू काही तरी कर आम्हाला नको पाठवू...तू नको शोध घेऊ..आम्हाला तुझ्या घरी बोलव ग..आम्ही कशी ही चटणी भाकरी खाऊ.. पण आम्हाला नको पाठवू.."

नवऱ्याने तिच्या ह्या दुःखाचा अंदाज घेतला, तिच्या दादाला फोन लावला तर तेव्हा त्याला खरी परिस्थिती समजली...

आणि आता तिला ही खरी परिस्थितीची जाणीव झाली आहे हे कळत होते..

मग त्याने ठरवले...


नवरा,बायकोला म्हणाला ,तू तुझ्या माहेरी जाऊन तुझ्या हीस्स्या ची प्रॉपर्टी घेऊनच परत ..

ती चालाक होती आणि नवऱ्याचा रोख काय होता, हेतू काय आहे हे समजल्यावर तिने माहेरी जाण्याचे ठरवले.

आज माहेरी गेली आणि परत येतांना सोबत आई वडिलांना घरी घेऊन आली

नवऱ्याने दार उघडले ,तसे तो तिला म्हणाला, तू माझ्या परीक्षेत पास झालीस..तुला प्रॉपर्टीचा खरा अर्थ कळाला..पण माझ्या प्रॉपर्टी ला मात्र मी वृद्धाश्रमात खितपत पडावे लागले..

तिचे आई वडील मुलीच्या घरी आले तसा त्यांना मुलाचा फोन आला ,तो म्हणाला, "आई बाबा , मी तुमची सोय केली आहे ,तुम्हाला आपले घर सोडून कुठे ही जावे लागणार नाही..आणि वृद्धाश्रमात तर कदापी नाही, तुम्ही तयार रहा मी तुम्हाला घ्यायला येत आहे, आपण आपल्या घरी जाऊ. "

दादा काही वेळात येत आहे हे समजल्यावर शिल्पा ला खूप आनंद झाला होता, तिने देवाचे खूप आभार मानले होते, ती आईसाठी खूप खूप खुश होती ,शेवटी आईचे नशीब चांगले होते म्हणून दादा तिला घ्यायला येणार होता.. तिला वृद्धाश्रमात जाण्याची दुःखद वेळ आली नव्हती.. तिला तिचे हक्काच्या घरी जायचे हेच मनात होते आणि अगदी तसेच झाले..शेवटी तिचे संस्कार चांगले होते म्हणून दादा त्यांना आपल्या सोबत ठेवणार हे माहीत होते...माझ्या आईचे संस्कार शेवटी ते...

ती नवऱ्याला म्हणत होती, "आईने आम्हाला खूप छान संस्कारात वाढवले आहे मग माझे भाऊ आई वडिलांना कसे वृद्धाश्रमात सोडून देतील "

नवरा तिच्या कडे बघतच राहिला होता,एक प्रश्नार्थक नजरेने तिला जाब विचारत होता / जर तुझ्या आईचे संस्कार इतकेच चांगले होते तर मग तुझ्यावर कोणाचे संस्कार होते ,की तू माझ्याशी वाद घालून शेवटी माझ्या आई वडिलांना वृद्धाश्रमाचा मार्ग दाखवला /

ती नवऱ्या कडे बघत होती ,हा अश्या नजरेने माझ्या कडे मी अपराधी असल्या सारखी का बघत आहे... तिला आंनद होता पण त्याच्या नजरेत अजून ही नाराजगी होती..कारण तिचे आई वडील तर आपल्या घरी जाणार होते..मग माझ्या आईवडिलांनी काय असे पाप केले की त्यांची ह्या पापातून सुटका होत नाही..ती आता मलाच करावी लागणार आहे..

दादा घरी आला तशी शिल्पा आनंदी झाली,आणि बाबा आईला ही खूप छान वाटले.. तरी नवरा खुश नव्हता..

ती, "तू खुश नाहीस का माझ्या आई वडिलांच्या आनंदात ? "

तो, "अग का नसणार मी खुश ,त्यांना त्यांचे घर आणि त्यांची प्रेमाची माणसे मिळणार आहे म्हंटल्यावर मला तर आंनद होईलच ना "

दादा उठला आणि त्याने आपल्या भाऊजी च्या मनातले भाव ओळखले, आणि आता त्याला ही राहवेना , तो म्हणाला " भाऊजी तुमच्या आई वडिलांना ही आंनद मिळणार हे नक्की ,नाहीतर तसा मी ह्या घरातून माझ्या ही आई वडिलांना घेऊन घरी जाणार नाही हे नक्की. "

दादा असे का बोलत होता हे शिल्पा ला कळत नव्हते ,नेमके काय चालू आहे इथे ते तिला जाणून घ्यायचे होते...

दादा तिच्या कडे बघत म्हणाला,"मला तुझे हे वागणे अजिबात पटलेले नाही, तू तुझ्या सासू सासऱ्यांना विनाकारण ह्या घरातून बाहेर काढून वृद्धाश्रमात त्यांची पाठवणी केली, त्यात तुझा जितका दोष आहे तितकाच आपल्या आईच्या संस्कारांचा ही आहे...तिने तुला असे घर फोडी चे सल्ले देणे चुकीचे होते..तेव्हा मलाच ह्यावर उपाय करावा असे वाटून मी हा वाटणीचा डाव मांडला होता..त्यात आई बाबाला वृद्धाश्रमात टाकण्यासाठी तुलाच वृद्धाश्रमाचा शोध घ्यायला लावला तो ही मुद्दाम."

(तिच्या आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठविण्याचा हा एक डाव होता आणि हा तर तिच्या दादा ने रचलेला डाव होता, ताईला फक्त एक धडा शिकवायचा होता.. जेव्हा इतरांचे दुःख समजत नाही तेव्हा असेच आपल्या बाबतीत घडले की अक्कल यायला वेळ लागत नाही हे दादाला दाखवून द्यायचे होते...)

तिला आता दादा खऱ्या अर्थाने समजला होता..


तिला कळले ,/तिच्या आईसाठी तिच्या जीवाचा तिळपापड होत असतांना तिच्या जीव थाऱ्यावर नव्हता ,तर तेच नवऱ्याच्या आई बद्दल हा विचार करणे किती सहज होते, त्यांची कशी सुटका करून घेतली हे ती हसून सांगत होती...नेमके हेच वागणे तिच्या दादाला पटले नव्हते...

मग दादाने विचार केला ,/ह्या वागण्या मुळे इकडे त्यांच्या ही घरातील वातावरण दुषित झाले असते.. आणि त्याचे परिणाम त्याच्या आई वडिलांना भोगावे लागणार होते.. म्हणून त्याने ही शक्कल लढवली होती...आणि ह्या बद्दल त्याने त्याच्या भाऊजींना ही संगीलतले होते../


दादाला वाटले आपल्या संस्कारावर पडलेला डाग पुसून काढायचा असेल तर आपणच वृद्धाश्रमात जाऊन ह्याच बहिणीच्या सासू सासऱ्यांना परत आणले पाहिजे..

दादा ," ताई मला माझी प्रॉपर्टी परत हवी आहे आणि म्हणून मी ती परत घेऊन जायला आलो आहे ,तसेच तू ज्यांना अडगळ म्हणत होती ते तुझी जबाबदारी आहेत ,तीच खरी प्रॉपर्टी आहेत, आणि म्हणूनच मी त्यांना सुखरूप परत घेऊन आलो आहे ,आणि हो उद्या तुला तिथे जर जायचे नसेल तर मुलांना ह्या प्रॉपर्टीत हिस्सेदार कर, त्यांच्यावर चुकीचे संस्कार होण्या आधी तू स्वतःवर काही नियम लागू कर.."

दादाच्या हे बोलणे तिला कळले होते... तिला खूप पश्चात्ताप होत होता..तिने सासू सासऱ्यांची माफी मागितली... तिचे आईवडील त्यांच्या घरी परतले..

वृद्धाश्रमातले दोन फॉर्म रद्द झाले होते..