करगुटा

This is a funny marathi story about a thing which have been wearing by every person when he has at childhood. The actual reason behind wearing it was not clear at that time but when everyone is growing up then they have got realized that why it is ne

करगुटा   ????????

            जवा म्या सा वर्षाचा झालो तवा मला शाळंत पहिलीला धाडायचं म्हणूनशान माझ्या आयनं माझ्या कमरंचा चांदीचा करगुटा काढला आन काळ्या गोपाचा करगुटा बांधला. एकदम फिट्ट. अगदी रगात आळून बसंल आसा. पण मला त्ये आवडायचं न्हाई. म्या आपला सारखं काय ना काय कारण सांगून त्यो सोडून निदान तोडून टाकायचो. पण मला आंघुळ घालताना नवरा नसलेल्या बाईचा गळा कसा डोरल्याइना सुना दिसतो तशी माझी सुनी कंबार दिसली की मग माझी आय दोन धपाट्या घालून पुन्हा करगुट्यानं माझी कंबार आवळायची.
             ही करगुट्याची काय भानगड हाय ती आम्हांला तवा कळायची न्हाई. कारण अगदी पिटुकल्यानं पास्नं ते दाढी मिश्यावाल्या धटुकल्यानं पर्यंत गावात समदी माणसं कमरंला करगुटा बांधायची. म्हंजी आम्ही काय परतेकांची कंबार चापसायला गेलो नव्हतो. पर नदीवं पवाय गेलं की काळा धागा हाण्डरपॅंटीच्या वर तरंगलेला दिसायचा. निदान मग कुणी आंगणात आंघुळ करत आसलं की कमरंला ह्यो करगुटा गुंडाळल्याला दिसायचा. आन म्हसणवाट्यात मैत झालेल्या माणसाच्या घरचा माणूस जवा आंगावं पाणी घ्यायला हिरीजवळ जायाचा तवा तर हमखास दिसायचा ह्यो लटकल्याला करगुटा.
              आम्हांला तवा कौतिक वाटायचं. पर ह्यो करगुटा कमरंला का म्हणून बांधत्यात त्ये कळायचं न्हाई. बर कुणाची आपल्याला नजर लागू न्ये म्हणून बांधत असतील तर एवढ्या आत बांधून त्यो काम कसं करणारं ? जर नजर लावणाऱ्याला त्यो दिसलाचं न्हाई तर त्याचा उपेग तरी काय ? कारण लहान पोरांस्नी कुणाची नजर लागू न्ये म्हणून त्याच्या हातात निदान पायात काळा गोप बांधतात ह्ये लॉजिक आम्हांस्नी माहीत होतं. पर नेमकं ह्या करगुट्याचंच काही कळायचं न्हाई. बर समदी दुनिया बांधती म्हणून आपण बी बांधायचा ह्याला काय अर्थ न्हाई ना. बर करगुटा बांधला की माणसाची कंबार डौलदार बनती, चांगली दिसती असं काय हाय बुवा. न्हाय...आसं आसलं बी...पर एवढ्या आतलं चांगलं दिसून तरी काय उपेग. शेवटी त्ये झाकूनचं.
            एकांद्या ताविजासारखं भुताखेता पासून ह्यो करगुटा वाचिवतो असं बी आसू शकतं. पण झेंडे गुरुजी तर म्हणायचे ह्या जगात भूतं बितं काय नसत्यात म्हणून. ह्या करगुट्याबद्दल एकदा म्या माझ्या आजीला इचारलं तर मला म्हणली, “ गप बस मुडद्या...आस इचरत न्हायती काय बाय. गुमान बांधून ठिवायचा कमरंला ” आन असं म्हणून एकदा तिनं माझी पैरण वर करून माझा करगुटा जाग्यावं हाये का न्हाई ते बी पाहिलं. तसं तिला बी ह्या करगुट्याचं रहस्य माहीत नव्हतं ह्ये मला नंतर कळलंच. मग एकदा असंच म्या माझ्या आज्याला इचारलं तर त्यो त्याचा चेहरा एकदम धीर गंभीर करून मला म्हणाला, “ तुझ्यावं येळ आल्यावं तुला कळलंच पर तवर करगुटा काय काढू नको.”
                म्या हो म्हणून मान डोलावली. झालं...माझं पहिलीत ऍडमिशन झालं. आम्ही सात आठ जणं पांढरा शर्ट आन खाकी चड्या घालून ढुंगणाला पाय लावून रोज शाळंला जाऊ लागलो. एकदा चारच्या सुट्टीत झेंडे गुरुजीं म्हणाले , “आता मी पुढचे तास घेणार न्हाई. तुमी  समदे पाच वाजे तोवर लंगडी खेळा.” आम्हांला काय तेवढंच पाहिजे. केला गोल राउंड आन पोरीविरुद्ध पोरं असा लंगडीचा खेळ सुरू केला. 
           मनीवर राज्य होतं. म्या, सुऱ्या, गण्या आन पम्या पळायला लागलो. पळता पळता अचानक माझ्या चड्डीचं बक्कल तुटलं आन माझी चड्डी आपसूक खाली घसराय लागली. मला जाणीव झाली. आता म्हणलं चार चौघात आपल्या इज्जतीवर घाला येणार. कारण तवा काय आम्ही चड्डीला पट्टे म्हणजे बेल्ट घालत नव्हतो. आता काय करायचं असा इचार करत असताना मला मग करगुट्याची आठवण झाली. म्या मग एका हाताने खाली सरकणारी चड्डी सावरत सावरत मुतारीकडे पळायला लागलो. 
           तेवढ्यात सुऱ्या म्हणला, “ अय कुठं ? ”
           
          मी आपलं एका हातानं करंगळीचं बोटं वर केलं. त्यो काय समजायचं त्ये समजून गेला अन पुन्हा खेळू लागला. म्या मुतारीत गेलो आन चड्डी करगुट्यांन पॅक आवळली. खाली वडून बघितली तर एकदम ओके. एकदा बाहीर यवून खाली बसून बघितलं. झकास फिटिंग झालं होतं. शर्ट खाली सोडला, छाती काढून ग्राउंडवर आलो अन भुंगाट पळायला लागलो. तवा मला करगुट्याचं पुरेपूर महत्त्व कळलं. मग तवापास्न त्ये आजपातूर म्या कमरंचा करगुटा काय सोडला न्हाई. काय माहीत पुना कवा चालता बोलता इज्जतीवर घाला घातला जाईल बाबा !

-------विशाल घाडगे ©™✍️