करावे तसे...

आपल्या कडून जशी वागणूक समोरच्या व्यक्तीला दिली जाते तशीच ती आपल्यालाही कधी तरी परत मिळतेच. कुठ


सरिता ने देसाईंच्या घरात सून म्हणून प्रवेश केला. सरिता सुंदर होतीच, शिवाय एक स्त्री म्हणून ज्या ज्या कला अवगत असाव्यात त्या सगळ्या तिच्या जवळ होत्या. सासरची मंडळी खुश होती आणि सरिता ही..
घरातील प्रत्येकाने सरिताशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला तसचं सरिताने ही सर्वांशी जुळवून घेतलं.
गीता म्हणजे घरातील शेंडेफळ असल्याने थोडी लाडावलेली आणि हट्टी असलेली सरिताची धाकटी नणंद.

ती मात्र सरितापासून पहिल्यापासूनच चार हात लांब राहिली. वहिनी म्हणून तिने कधी सरिता सोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न केला नाही.
नेहमी तिचा राग राग केला. प्रसंगी अपमान ही केला.
सरिता मात्र गीताशी जुळवून घेण्याचा मनापासून प्रयत्न करीत राहिली.
घरात नवीन असल्याने सरिता गीताच्या वागण्याकडे दुर्लक्ष करत असे. एकुलती एक नणंद म्हणून तिचे बोलणे ही फारसे मनावर घेत नसे.

पण दिवसेंदिवस जसे हे वाढू लागले तसे सरिताला सहन होईना. आपल्या नवऱ्याला, सासू- सासऱ्यांना तिने सांगून पाहिले. सगळ्यांनी उलट तिलाच समजावले...ती हट्टी आहेच. तू मनावर घेऊ नकोस..दुर्लक्ष करत जा...आता थोडयाच दिवसांत गीताचे लग्न होईल..मग होईल सगळे नीट. तसे गीताच्या वागण्यावर , चुकांवर पांघरूण घातले गेले .
आता मन घट्ट करून सरिता ने गीताच्या सर्वच बाबतीत पूर्ण दुर्लक्ष केले. मनाने आणि नात्याने ती गीता पासून दूर झाली.

गीता चे लग्न ठरले तेव्हा सरिता संपूर्ण कार्यात मनाने अलिप्तच राहिली. पण सून म्हणून सारी जबाबदारी व्यवस्थित पार पडली तिने.

इकडे पाटलांची थोरली सून म्हणून गीता ने वाड्यात प्रवेश केला. सासरची मंडळी तशी बरी होती. ती सहज वाड्यात रुळली..
श्रीमंती थाट-माट हवाहवासा वाटू लागला तिला.

नव्याचे नऊ दिवस संपले आणि संसाराला सुरुवात झाली. हळू- हळू गीताच्या लक्षात आले की दोन्ही नणंदा वाड्यात सारखी ये-जा करतात. सासरी त्यांना फारसा मान मिळत नव्हता. माहेरी मात्र सगळ्या निर्णयात यांची लुडबुड चालत होती... इथली श्रीमंती अंगवळणी पडली होती त्यांच्या..
थोरली सून म्हणून गीताच्या मताला फारशी किंमत नव्हतीच...
माहेरच सगळं वैभव गीताला आयत मिळालं म्हणून दोघी नणंदा तिचा राग -राग, अपमान करू लागल्या. काही-बाही कारणाने तिच्याशी भांडू लागल्या..
न राहवून गीताने नवऱ्याजवळ आपलं मन मोकळं केलं. त्यापुढे हात जोडले..
मात्र त्याने हात वर केले...माझ्या बहिणींना मी कधीही दुखावणार नाही..सहन होत नसेल तर तूच जा तुझ्या माहेरी निघून.. गीताला हे अपेक्षितच नव्हतं..

आपल्या जागी तिला सरिता वहिनी दिसू लागली.. ताई , ताई म्हणून मागे लागणारी...प्रेमाने आपल्या आवडीचे जेवण बनवणारी...तिच्या सौंदर्याचा, गुणांचा आपण किती दुस्वास केला...कितीदा अपमान केला.. तिने सगळ काही सहन केलं... नणंद -भावजयीच नातं फुलू दिलचं नाही आपण..

डोळे पुसून लगबगीने ती वाड्याच्या बाहेर पडली.. माहेरी जाऊन पाय धरुन वहिनीची माफी मागणार होती ..आणि माफ केल्यास तिच्या मिठीत शिरून आपल्या अश्रूंना मोकळी वाट करून देणारं होती...