कारण मला 'ती' आवडायची (भाग ०४)

An Untold Story of their Friendship...

(मागील भागात आपण पाहिलं,  जय आणी बाकी मंडळी हॉलवर पोहचली होती आता वाचा पुढे... ) 

एक क्षण डोळ्यावर विश्वास न बसल्यासारखं वाटतं होते. नारंगी रंगाच्या नव्वारी साडीमध्ये अदितीचं रूप अतिशय सुंदर आणी अनोखं दिसत होतं. नेहमी जयच्या मनाचा ठाव घेणारे तिचे कमळाच्या पाकळीसमान रेखीव डोळे आज मात्र क्षणभरासाठी त्याच्या हृदयाचा ठोका चुकवुन गेले. तिच्या त्या काजळ भरलेल्या खोल डोळ्यांत डुंबण्यापासून तो स्वतःला रोखण्याचा प्रयत्न करत होता पण आज मात्र शुद्ध हरपल्यासारखं तिच्या त्या नयनसागरात वाहून गेला होता. अदिती पुढे हळू हळू पुढे येत होती हळूच होणाऱ्या वक्राकार पापण्यांची उघडझाप जसा एक एक तिर मारल्यासारखा भासत होता. 

तिचा होणारा जीवनसाथी सुद्धा तिच्याकडे भान हरवल्यासारखं मधुन मधुन एकटक तिच्याकडे पाहायचा अन पुन्हा डोळे फिरवुन घ्यायच्या. ते बघून तिच्या मागे चालत येणाऱ्या मैत्रिणींनी तिची खेचायला सुरुवात केली. सगळ्यांसमोर हसताही येईना अन आपले हसू तिला सावरताही येईना म्हणून हसताना हलकेच तिने आपल्या ओठांवर हात ठेवला अन काही क्षणांत बाजूला केला. छोट्या बाळासारखे नाजूक असणारे तिचे ओठ आज मात्र गर्द लाल रंगाच्या उमललेल्या फुलासारखे भासत होते. मधूनच हसताना डाळिंबाच्या दाण्यांप्रमाणे एका ओळीत दिसणारे नाजूक दात तिच्या सौंदर्यात अजूनच भर घालत होते. झेंडू, शेवंती अन मध्ये मध्ये गुलाबपाकळ्यांच्या हृदयाच्या आकाराच्या बनविलेल्या फुलांच्या गळीच्यावरून पेशवाई पद्धतीचे मोठे मोठे मोत्यांचे चाळ पायात घालून हळूच एक एक पाऊल टाकत ती पुढे येत होती. मुक्या घुंगरांचा सुद्धा नाद तिच्या प्रत्येक पावलासोबत जयच्या कानात निनादत होता. 

तिच्या गोर्यापान नितळ पायांवर लालसर रंगलेली मेहंदी अन पायात घातलेली कोल्हापुरी चप्पल तिच्या पायांवर उठून दिसत होती. एवढ्या दिवसानंतर तो सर्व भान हरपून तिच्याकडेच बघत होता  तितक्यात मित्रांचा धक्का लागल्याने जय भानावर आला. बघितले तर सर्वजण मिळून नवरोबाची खेचण्यात अजिबात कसर सोडत नव्हते परंतु जयची नजर मात्र आज अदितीवरून हटण्यास तयारच नव्हती ।

गर्द नारंगी रंग तिच्या गव्हाळ कांतीवर तिला अजूनच उठून दिसत होता. गळ्याला खेटून असलेली सोन्याच्या टपोऱ्या मण्यांची ठुशी, त्याखालोखाल नाजूकश्या कलाकुसरीचा कोल्हापुरी साज अन त्याखालोखाल लटकलेली ३ पदरी टपोऱ्या मण्यांची मोहनमाळ जणू सर्वांचेच लक्ष्य वेधून घेण्याची चढाओढ करत होती. कमरेवर घट्ट बांधलेला मोत्यांचा कंबरपट्टा तर डाव्या बाजूने लटकलेला चांदीच्या नक्षीदार जाळीचा मेखला तिच्या पडणाऱ्या प्रत्येक पाऊला सोबत दिमाखात झुलत होता. गोऱ्या मुलायम हातांवर रंगलेल्या लालसर मेहंदीवर हौसेने हात भरून घातलेला गर्द हिरव्या रंगाचा चुडा,मध्ये मध्ये घातलेल्या पाटल्या हाताची शोभा वाढवत होत्या. 

दंडावरील सुरेख नक्षीचा दंडवत, कपाळावर नाजूकशी चंद्रकोर, त्याच्या थोडासा वर सरळ मध्यभागी पडलेल्या भांगामधुनी पुढे येऊन लटकणारा भांगेरा, त्याच्यामागोमाग आंबड्याच्या पुढे खोचलेली वेणी, कानात पिवळसर टपोऱ्या मोत्यांचे कुडके, त्यासोबत सुंदर सुवरनाक्षीकाम केलेले तिच्या संपूर्ण कानांना झाकून टाकणारे कर्णे, अन कानाच्या मागून लोंबकळत ठेवलेले डुलणारे वेल मागे सुवासिक मोगर्याच्या फुलांनी मढविलेला आंबड्या मध्ये खोचलेले होते. 

जरीचा गर्द लाल रंगाचा शेला उजव्या बाजूने खांद्यावर घेऊन तर डाव्या बाजूने हाताला गुंडाळून सावरलेला होता. मागून चालणाऱ्या मैत्रिणी अन पुढे चालणारी सर्वसुंदर अदिती आज एखाद्या अप्सरेला सुद्धा लाजवेल अशी नाजूकता घेऊन एखाद्या राणीचा थाट देखील कमी पडावा अशी दिसतं होती.

थोड्या वेळात भटजीने मंगलाष्टकांना सुरवात केली, आणी आदीतीचा विवाहसोहळा संपन्न झाला. प्रत्येक मुलीचं स्वप्नं असतं आपलं लग्नात हे असावं - ते असावं , थोडक्यात सारी हौस मौज करावी. अदितीने अगदी मनापासून तयारी केली होती साऱ्यांची आणी तिच्या बाबांनी सुद्धा मुलीच्या लग्नात काहीच कमी पडणार नाही याची पुरेपुर काळजी घेतली होती. जेवणासाठी तर पाणी-पुरी, पिझ्झा, चायनीज, पासुन वेगवेगळ्या प्रकारचे Desert पर्यंत सगळे पदार्थ होते.

सगळ्यांनी मनोसोक्त जेवण झाल्यावर वर-वधु आणी त्यांच्या माता-पित्याचे आभार मानत निरोप घेतला. जयसुद्धा लांब जायचे असल्याने लवकरचं निघाला, निघताना अदितीच्या आई बाबांना भेटला, "खुप छान झालं सगळं, आता जास्त दगदग न करता तुमची पण काळजी घ्या" हे सांगायला तो विसरला नाही. आज सोमवार असल्याने स्टेशनवर जास्त गर्दीपण नव्हती, गाडी आली जय गाडीत बसला, गाडी परतीच्या दिशेने धाऊ लागली, जयने डोळे बंद केले आणी गाडी सोबत त्याचा आठवणींचा प्रवास सुरु झाला.

क्रमशः 

=================================

( जयला नेमकं काय बरे दिसत असेल आठवणीत ?? , जाणुन घेण्यासाठी वाचा कहाणीचा पुढील भाग )

कशी वाटते कहाणी, कंमेंटद्वारे नक्की कळवा, तुमच्या कमेंट्स पुढील लेखनास प्रेरणा देतील. लेखकाच्या नावाशिवाय साहित्य कोठेही पब्लिश करू नये..

© स्वप्नील घुगे

🎭 Series Post

View all