कारण मला 'ती' आवडायची (भाग ०६)

An Untold Story of their Friendship ...


(मागील भागात आपण जय आणी अदितीच्या पहिल्या भेटीबद्दल वाचलं, आता पाहुयात पुढे) 

त्यादिवशी जय हॉलवर प्रॅक्टिससाठी पोहचला, आणी नेहमीप्रमाणे त्याची आल्या आल्या मस्ती सुरु झाली. याला टपली मार, त्याची खोडी काढ असं त्याचं सुरू झालं. थोड्या वेळाने ताईने जयला प्रॅक्टिससाठी आवाज दिला; जाता जाता जयने आपला गृहपाठ अदितीकडे सोपवला आणी तिला तो पुर्ण करायला सांगितला. अदितीनेपण काही न बोलता मानेनेच होकार कळवला आणी जय प्रॅक्टिसला निघुन गेला.

थोड्या वेळात प्रॅक्टिस संपवुन जय अदितीशेजारील खुर्चीवर जाऊन बसला, तो येईस्तोवर अदितीने सगळा गृहपाठ संपवल्याने काही गृहपाठ उरला नव्हता त्यामुळे दोघेजण छान गप्पा मारू लागले. जय ची एक सवय होती. त्याला नेहमी स्वतःला दुसऱ्यांच्या नजरेतून बघायची इच्छा असायची. म्हणजे दुसर्यांना मी कसा वाटतो, हे जाणून घ्यायला तो नेहमी उत्सुक असायचा. असाच त्या दिवशी गप्पा मारता मारता जय ने अदितीला प्रश्न केला.

"तुला मी कसा वाटतो गं अदिती?? " - जय
"म्हणजे??" - अदितीने थोडं दचकूनच प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिले.
"अरे, म्हणजे माझं वागणं-बोलणं कसं वाटतं तुला" - जय 

नेहमी इतरांना विचारले जाणारे प्रश्न तो आज अदितीला विचारात होता. अदितीनेही जास्त खोलात न जाता स्पष्टपणे सांगितलं ..

"बाकी सर्व ठिक आहे, पण तु जे येता जाता सगळयांना मारतो ना?? ते मला अजिबात आवडत नाही " या वाक्यात अदितीचा नाराजीचा सूर स्पष्टपणे जाणवत होता. 

जय काहीच बोलला नाही, परंतु त्याच्या मनाला काय वाटलं कुणास ठाऊक , इथुन पुढे कुणाचीही खोडी न काढण्याचं त्याने मनाशीच ठरवलं, आणी बघता बघता त्याची ती सवय मोडुन गेली ती कायमचीच. इतके दिवस ताईच्या ओरडण्याने जे झालं नव्हतं ते आज अदितीच्या एका वाक्याने झालं होतं. आणी जयने तेव्हापासुन उगाचंच कुणालाही मारणं सोडुन दिलं ते कायमचंच. म्हणजे एकवेळ बाकी मस्ती केली असेल जयने पण या प्रसंगानंतर तो जसा सर्वांना मजेत मारत असायचा, ते त्याने सोडून दिलं. ऐकायला थोडं विचित्र वाटतं असलं तरी हेच खरं होत, तिच्या एका वाक्याने जय पार बदलुन गेला होता.

दिवस सरत होते अन अदिती आणी जयच्या गप्पा वाढु लागल्या होत्या. आजकाल दिवसभरात जे काही घडेल ते एकमेकांना सांगितल्याशिवाय दोघांनाही चैन पडत नसे. त्यानिमित्ताने त्यांची ओळख वाढत गेली. एका निखळ मैत्रीचा पाया भक्कम होत होता. फक्त गृहपाठ झाल्यानंतर गप्पा मारणारे अदिती अन जय आता भेटतील तेव्हा एकमेकांची चौकशी करत होते. जराशी अबोल असणारी अदिती खुलत होती अन यांच्या न संपणाऱ्या गप्पा अश्याच रंगत चालल्या होत्या.

जय जितका अल्लड; तितकीच अदिती शांत, 
जय कुणासोबतही लवकर मिसळुन जायचा, याउलट अदिती प्रत्येक नवीन व्यक्तीसोबत मैत्री करताना फार वेळ घ्यायची. पण एकदा कि मैत्री झाली कि ती त्यात स्वतःला पुर्ण झोकुन देत असे. दोघांमध्ये बऱ्याच गोष्टी एकमेकांच्या विरुद्ध असुनही त्यांचा दोघांतील मैत्रीला अडसर ठरला नाही . काही गोष्टी तर त्यांच्या फारचं जुळुन यायच्या. बोलता बोलता अशा अनेक लहानसहान गोष्टींचा उलगडा होत असे . आवडती गाणी, फिल्म्स, रंग अशा अनेक गोष्टींची त्यांची आवड एकचं होती. 

दोघांचं निखळ मैत्रीचं नातं आता हळूहळू छान आकार घेऊ लागलं होतं. एखादं छोटं रोपटं हळूहळू डौलदार दिसु लागतं तसंच. कधी कधी तर दोघांना एकमेकांशी बोलायला शब्दांचीसुद्धा गरज पडत नसे, केवळ नजरेच्या इशाऱ्यानेच त्यांना एकमेकांचं बोलणं कळुन जायचं. म्हणजे सबंध ग्रुप जेव्हा जेव्हा एखाद्या वाढदिवस, पार्टी अथवा इतर काही कारणास्तव जेव्हा जेव्हा एकत्र यायचा तेव्हा तेव्हा अदिती जयसाठी जागा पकडुन ठेवायची आणी इशाऱ्यानेच त्याला खुणावून सांगायची. हे तीच नेहमीचं होत. जयला तिची हि सवय फार आवडायची.

फक्त एकचं न पटणारी गोष्ट होती तिच्या बाबतीत तिला उभे खेळ आवडत नसायचे म्हणजे उदाहरणं द्यायचं झालं तर पकडापकडी, खो-खो असे. ते खेळ चालु असताना ती थोडं लांबच उभी असायची. खुप वेळेस जयने आग्रह करूनसुद्धा अदिती त्या खेळांमध्ये भाग घेत नसे. त्या वयातील ते प्रेम तर नव्हतंच, पण आकर्षण देखील नव्हतं. या सगळ्यांच्या पलीकडे ते फक्त आमच्या दोघांच्या निखळ मैत्रीचं नात होतं. एक असं नातं ज्यात ना कोणत्या अपेक्षा होत्या ना कोणता हट्ट. जय आणी अदिती दोघे फक्त या नात्याला आनंदाने जगत होतो अन तेवढंच एकमेकांना जपत देखील होते.

सगळं खुप छान चालु होत; पण म्हणतात ना एखादया चांगल्या गोष्टीला लवकर नजर लागते, तसचं झालं. जय आणी अदितीला अश्या कारणास्तव लांब व्हावं लागलं ज्या समस्येचा कोणताच उपाय दोघांकडेही नव्हता. हो!! बहरू पाहणाऱ्या त्या रोपट्याला जणू खुडलं गेलं होतं. जय आणि अदितीला एकमेकांपासून वेगळं व्हावं लागलं..!!

(क्रमशः) 
==================================
काय कारण असेल बर त्यांच्या लांब जाण्याला?? जाणुन घेण्यासाठी वाचा कथेचा पुढचा भाग.

आपल्याला कथा कशी वाटतं आहे, कंमेंटद्वारे नक्की कळवा. आपले प्रेम पुढील लिखाणासाठी प्रेरणा देईल. 
लेखकाच्या नावाशिवाय साहित्य कोठेही पब्लिश करू नये.

© स्वप्नील घुगे

🎭 Series Post

View all