कारण मला 'ती' आवडायची (भाग ०३)

An Untold Story of Their Friendship....

( मागील भागात आपण पाहिलं , जय इतक्या लांबुन कसाबसा अदितीच्या लग्नाला पोहचतो, लग्नाच्या आदल्या दिवशी रात्री सगळे मनोसोक्त गप्पा मारत होते, वाचा पुढील भाग ..)

सकाळी उठून सगळे आवरून जय खाली आला. थोड्या वेळात हॉलकडे निघायचे होते, म्हणून एकीकडे सगळ्यांची आवरा-आवर करायची गडबड चालू होती तर दुसरीकडे ब्रेकफास्ट चालु होता. जमेल तसं प्रत्येक जण कमी वेळेत आवरता येईल म्हणुन घाई करत होते, वेळ वाचविण्यासाठी फॅमिलीतील लहान मुलाला पुढे पाठवुन ब्रेकफास्टला रांगेत उभे करत होते. 

इतक्यात अदिती आली. रात्री उशिरा झोपुन देखील तिच्या चेहऱ्यावरचं तेज जरासुद्धा कमी झाले नव्हते. तिला भूक लागली आहे  असे तिने सांगताच जय ने तिला जे खायला हवे होते ते घेऊन तिच्याकडे पोहचला. तिचे काहीतरी काम चालुच होते. कोणी न कोणी येऊन हे कुठे आहे ते कुठे आहे? याची चावी पहिली का? त्याची चावी कुठे आहे? कपडे कोणत्या बॅग मध्ये ठेवायचे आहे? असे सारखे काही न काही विचारत होते. तिची उडालेली धांदल पाहून जयनेच तिला भरवायला सुरवात केली.

एखाद्या लहान मुलाला जसे विचारून विचारून काळजीपूर्वक एक एक भरवितात तसे जय तिला भरवत होता. मध्येच अदितीला कोणी काही विचारले तर जय ती बोलत असताना तसाच चमचा घेऊन अदितीकडे बघत रहायचा. नंतर मग दोघेच हसत बसायचे. तिचा ब्रेकफास्ट झाला अन तितक्यात काकु आल्या. "जयला सांग कॉफी आणायला, मला छान कॉफी बनवुन दिली त्याने" असे अदितीला त्या सांगत होत्या. मग अदिती मॅडम ने अगदी थाटात ब्रेकफास्ट अन कॉफी संपवुनच हॉल कडे मोर्चा वळविला. 

ती निघून गेल्यावर जय त्याच्या जुन्या मित्रांना भेटला. ऐन वेळी अचानक कामाहुन आल्यामुळे लग्नाला घालावे असे काही कपडे त्याने सोबत आणले नव्हते. तिथे भेटलेल्या मित्रांची पण अशीच काहीशी परिस्थिती असल्याने सगळे मिळून दुकानात गेले.  नेमके काय घ्यायचे काही ठरत नव्हते पण अदितीचं लग्न असल्याने काहीतरी छानच पाहिजे असे त्याला वाटत होते. बराच वेळ शोधल्यावर त्याला एक काळ्या रंगाचा वेस्ट कोट दिसला. काळा अदिती चा आवडता रंग असल्याने त्याने पटकन तो घालून पाहिला. सगळ्या मित्रांना सुद्धा तो आवडला म्हणून त्याने तो घेऊन टाकला.  खरेदी करून सगळे हॉल वर पोहचले.

इकडे हॉल वर बरीच ओळखीची मंडळी खूप दिवसांनीं भेटली होती. सगळ्यांकडे जाऊन जय त्यांची चौकशी करत होता, सगळ्यांचा लाडका असल्याने सर्व मंडळीपण भरभरून गप्पा मारत होते, सध्या कुठे असतो काय चाललंय अशी इत्यंभूत चौकशीला उत्तर देत जय सर्वांना उत्तर देत होता सगळ्यांना भेटून गप्पा मारण्यात पुढचा ०१-१.५ तास कसा गेला कळलेच नाही. काही वेळ मित्रांसोबत फोटो काढुन मग सगळेजण वरच्या मजल्यावर गेले. छान अशा फुलांनी स्टेज सजला होता, थोडीफार राहिलेली सजावट करण्यात करवल्या धावपळ करत होत्या. मुहुर्ताची वेळ जवळ येत होती, १२:१५ वाजता भटजीने आवाज दिला तसे जय चे लक्ष हॉल च्या मध्यभागी असलेल्या दाराकडे गेले. 

(क्रमश:) 

=================================

(पुढे काय होतं, जाणुन घेण्यासाठी नक्की वाचा कहाणीचा पुढील भाग)


कथा कशी वाटली कंमेंट मध्ये नक्की सांगा, लेखकाचं नाव असल्याशिवाय कथा कुठेही पब्लिश करू नये.

©स्वप्नील घुगे

🎭 Series Post

View all