कारण, मला 'ती' आवडायची!! (भाग ०१)

An Untold Story of Their Friendship ...

संध्याकाळची वेळ होती. शनिवार असल्याने आपली कामे आवरून सर्वजण रविवारचा काय प्लॅन करावा याचा विचार करत होते. कुणी बोलत होते रायगड ला जाऊ तर कोणी किनारपट्टीवर वर जाऊ तर कोणी जयगडला जाऊ असे चालले होते. या सगळ्यामध्ये जयचे मात्र कुठेच लक्ष लागत नव्हते. त्याच्या मनात वेगळेच विचार चालू होते. नवीन जॉब सुरू होऊन जयला फक्त २० दिवस झाले होते. त्यात नवीन साईट वर तर तो फक्त ५ दिवसापूर्वीच आला होता. अजुन तर बरीच कामे बाकी होती. 

जय स्वभावाने तसा बोलका असल्याने त्याची इतरांशी ओळख व्हायला फार वेळ लागत नसे. अगदी थोड्याच कालावधी मध्ये जयने मेस मधील आचाऱ्यापासून ते ऑफिस मधील स्टोअर सांभाळणारे काका, गाडीचा ड्रायव्हर असो की सगळ्यांना चहा आणून देणारा छोटु या सगळ्याच स्टाफ बरोबर ओळख करून घेतली होती.

जय दिसायला सुंदर , उंच, गोरा वर्ण, सरळ आणी लांब सिल्की केस सडपातळ शरीरयष्टी (म्हणतात ना काही माणसं पहिल्या भेटीत सुद्धा कायम लक्षात राहतात अशा लोकांपैकी एक)  पार्टी-पर्सन. एखादी गोष्ट मनावर घेतली की ती पूर्ण झाल्याशिवाय त्याला चैनच पडत नसे. सतत काहीतरी आव्हानात्मक करण्याची जयची तयारी असायची. शांत स्वभाव असल्याने खूपदा लोकांचे म्हणणे ऐकून घेऊन मग कृती करण्यावर विश्वास असल्याने बऱ्याचदा तो लोकांना जवळचा वाटायचा. सध्याचा जॉब सुद्धा त्याला त्याच्या अशा स्वभावामुळेच मिळाला होता. आणी थोडं चॅलेंजिंग कामाची जबाबदारी घेऊनच तो इकडे आला होता.

या सर्व परिस्थिती मध्ये येत्या २ दिवसांत अदिती च लग्न होतं.  ०८ एप्रिल (सोमवार) त्याला या लग्नाला काहीही करून जायचेच होते. परंतु कुणाकडे आणी कसे विचारावे या गोष्टीमुळे त्याचा गोंधळ उडाला होता. तसे जाण्याचा विचारही सोडून देता येण्यासारखा नव्हता. इतर वेळी सहज कारण सांगून नाकारता आलं असतं पण ही वेळ वेगळीच होती. सूर्य मावळत चालला तशा जय च्या आशा पण हळू हळू मावळू लागल्या होत्या. नाईलाजाने तो सगळ्यांपासून आपल्या भावना लपवत उसने हसू आणण्याचा प्रयन्त करत होता.

काय करावे?? , कुणाला सांगावं?? , कोण आपल्याला मदत करू शकेल अशा वेळेला? असा विचार करत असताना अचानक त्याला मोहितची आठवण झाली. मोहित आणि जय नवीन कंपनी मध्ये सोबत कामाला होते. एकच प्रोजेक्ट असल्याने बऱ्याच वेळेस त्या दोघांना एकत्र काम करावे लागत असे. मोहित जयच्या ०५ वर्ष आधीपासून कंपनीत असल्याने कंपनीची कामाची पद्धत , आपला प्रोजेक्ट पाहणारे सगळे वरिष्ठ मंडळी त्यांचे स्वभाव आणी कामाबद्दलचे बारकावे त्याच्याकडूनच जयला कळत असे. मोहितचा स्वभाव बऱ्याच वेळा गोंधळून टाकत असे. त्याच्या मनात काय चाललंय हे कुणाला कळू न देता इतरांचे मन वाचण्यात तो फार तरबेज होता. तसेच कोणत्याही प्रश्नाचे अचूक उत्तर त्याच्याकडे असायचे. मग तो तुमचा पर्सनल प्रॉब्लेम असो की कामाच्या बाबतीत असो. म्हणूनच की काय, त्या वेळी तोच काहीतरी करू शकेल अस जयला वाटले आणि त्याने मोहित ला फोन केला. 

कामाबद्दल चर्चा झाल्यानंतर मोहित ने जयचा नाराजीचा सूर ओळखून घेतला. "काही झालंय का तुला? साईट वर कुणी काही बोलले का?" मोहित ने विचारले. "नाही रे तसे काही नाही. मी आजचं साईटला जाऊन कामाची पाहणी करून आलो आहे सगळं व्यवस्थित आहे " जय ने सांगितले. पण मोहित माणसांच्या आवाजावरून त्याच्या मनात काय चाललेय हे ओळखण्यात पटाईत होता. त्यामुळे मोहित पुन्हां पुन्हां खोदून विचारू लागल्यावर जय जय ने धीर करून ०८ एप्रिल आणि अदितीच्या लग्नाबद्दल मोहितला सांगितलं. यावर "अरे एवढंच ना? तु डायरेक्ट सरांना फोन कर आणी सांग तुला जायचय. सर देतील परवानगी. मी ओळखतो त्यांना. ते नाहीं म्हणणार नाही. तू फक्त सोमवारी रात्री वेळेत परत येशील असं सांग." एवढे बोलून मोहितने फोन ठेवला

(क्रमशः)
==================================
(कोण बरे ही अदिती?, जयला तिच्या लग्नाला का बरं जायचं आहे?, त्याला परवानगी मिळेल का? जाणुन घेण्यासाठी वाचा कथेचा पुढील भाग )

कथा कशी वाटली कंमेंट मध्ये नक्की सांगा, लेखकाचं नाव असल्याशिवाय कथा कुठेही पब्लिश करू नये

© स्वप्नील घुगे

🎭 Series Post

View all