कन्यादान

कन्यादानाचे महत्व
कन्यादान
मायेचा उंबरा कायमस्वरूपी ओलांडून अनोळखी अशा दारी प्रवेश करणे वाटते तेवढे सोपे नसते. तरीही लाडाकोडात वाढलेली एक बाहुली कोणा राजकुमाराचा हात हातात घेऊन दूरवर निघून जाते. तळफोडाप्रमाणे जपलेल्या ह्या लेकीला असंख्य गोष्टींना सामोरे जावे लागणार हे माहीत असूनही,कन्यादाना सारख्या पवित्र दानात स्वतःची लेक समर्पित करतात. स्वतः कडील एखादी अनमोलच काय तर साधी वस्तू ही दान करण्यात मनुष्य विचलित होतो. इथे तर स्वतःच्या काळजाचा तुकडा च आईवडील परक्याला देतात.
अशा च अनोळखी बंधात स्वतःला हसतच ती सामावून घेते, ज्याच्या नावाचा शृंगार करून त्या घरात ती प्रवेशते,तोच तर त्या क्षणी तिचा सर्वस्व असतो. माता, पिता, भाऊ-बहीण ही सर्वच नाती तो तिच्या साठी निभावत असतो. नव्या नात्याची दोर त्या दोघांनाही सावरायची असते. संसाराची ती वेल त्या दोघांच्या साथीने च तर बहरणार. ही वेल इतकी नाजूक असते की समजुदार पणाचा शिडकावा त्यावर सदैव करताना, प्रेमरूपी खतही सतत घालणे जरुरीचे असते. कधी कधी बाहेरील वादळे घोंगावत त्या वेलीपर्यंत येत असतात,अशातच संशयाची कीड ह्या वेलीला लागणार नाही ह्याची काळजी नक्कीच घ्यावी लागते. विश्वासाचं सिंचन नेहमीच उपयोगी पडत. सतत ही वेल हिरवीगार च राहील असे नाही तर कधी कधी कडक असा वैशाखाचा दाह ही तिला सोसावा लागणार. परंतु श्रावणातल्या सरींची मजा जर का अनुभवायची असेल तर समजुदार पणा चा ओलावा ठेवावाच लागेल.
अशाप्रकारे ह्या वेलीची काळजी जर का दोघांनीही घेतली तर ही वेल सदैव भरभरून बहरत राहील. माहेर आणि सासर ह्यातील अंतर दूर सारून एक मायेचा साकव तिथे अस्तित्वात येईल. जेणेकरून कन्यादाना सारख्या पवित्र अशा दानाचे पावित्र्य सर्वांकडूनच जपले जाईल.
@प्राजक्ता हेदे (बोवलेकर)
कृष्णवेडी