कन्यादान एक कर्तव्य...भाग 8

कन्यादान


पूर्वार्ध:

सायली तिच्या आई बाबांबरोबर सिद्धच्या घरी लग्नाची बोलणी करायला गेले होते. लग्नाची तारीख अगदी जवळची काढल्याने सगळेच गडबडीत होते. सायलीच्या बाबांना मात्र टेन्शन आले होते. बघुया आता लग्नाची तयारी आणि त्यातील गोंधळ या भागात....


आता पुढे...


"सायली, आठ दिवसांत तुझे लग्न आले आहे आणि तू अजून झोपली आहेस? आता तुला लवकर उठण्याची सवय करायला पाहिजे, सासरी असे झोपून चालणार नाही." आर्यन सकाळी सकाळी फोनवर सायलीला चिडवत होता.


"आर्यन, तुझ्यात काय आई अवतरली का? हे वाक्य तिचे आहे, ते तू का वापरतोय? आता फोनवर बोलणे सोड आणि बाबाला मदत करायला लवकर इथे ये." सायली.


"मला येण्याची तर खूप इच्छा आहे, पण सुट्टी मिळणे अवघड आहे. पण तुझ्या लग्नात पक्का येणार, प्रॉमिस!" आर्यन.


"तेव्हा तर यावेच लागणार आहे, नाहीतर तुझ्या तिथे येऊन तिला तुझाच त्या मोठ्यावाल्या AK 47 ने तुला ठोकून काढेल." सायली.


"म्हणजे लग्नाच्या आधीच जेलमध्ये जाण्याची तयारी करते आहेस? पण एक सांगू AK 47 मोठी वाली नसते, पॉकेटमध्ये बसेल एवढीच असते. आधी नीट माहिती करून घे, मग मला मारायचा विचार कर. आणि मी एक मेजर आहे मी माझा शब्द दिला तर दिला, तो काहीही झाले तरी मोडणार नाही." आर्यन.

"बरं बरं, बस झाले आता! आई माझ्या नावाने आता खरंच ओरडत येईल, मी बाहेर मदत करायला जाते." सायली.


सायली आपल्या रूममधून बाहेर आले, तर आई बाबा दोघेही काहीतरी बोलत होते आणि हातात वही घेऊन त्यावर मांडत होते.


"बाबा, पाहुण्यांची लिस्ट काढतोय का? आधीच सांगते फार ताम झाम नको करुस, मला अगदी साधे लग्न करायचे आहे. उगीच लोकांना अन्नदान करून स्वतः बँकेचे लोन घ्यायचे, मला असल्या गोष्टी आवडत नाही. तर तुम्ही दोघेही आटोपते घ्या." सायली.


"सायली, बाळा सगळे तुझ्या मनाप्रमाणे नाही होणार. लग्नकार्य म्हटले तर चार लोकं लागतातच. आणि सिद्धच्या घरच्यांना लग्न साधे नको आहे. आपल्याला त्यांच्या प्रतिष्ठेचा विचार करायला पाहिजे ना? ते लोकं आपल्यापेक्षा फार मोठे आहेत." बाबा.


"बाबा, अरे काहीपण असते तुझे! चार लोकं गोळा झाले म्हणून फार मोठेपणा मिळवला, असे होत नाही रे!" सायली.


"सायली, आम्हा मोठ्या लोकांच्या काही गोष्टी असतात, यात तुम्ही मुलांनी न पडलेले चांगले.
जा जाऊन तयारी कर, सिद्ध आणि तुझा बस्ता बांधायला जायचे आहे. ते लोकं दुकानात भेटणार आहेत.." बाबा.


"बरं बाबा, तू म्हणतोस म्हणून, पण तू जास्त त्रास नको करून घेऊस. तुझ्याने होईल तेवढे कर, अती जास्त करण्याची गरज नाही." सायली आपलं मत मांडून तयार व्हायला गेली.

दुपारी सगळे लोकं मॉलमध्ये जमले, सिद्ध आणि सायलीच्या लग्नाच्या बस्त्याला सुरवात करण्यात आली. सायलीसाठी सिल्कच्या साड्या, शालू घेतल्यावर मेन्स डिपार्टमेंटकडे सिद्धसाठी सायलीच्या साडीवर मॅचींग ड्रेस घेण्यासाठी दुसऱ्या शोरुम मध्ये गेले.
तिथे एक शर्ट कमीत कमी 10 हजारच्या वरच होता, त्यात सिद्धच्या लग्नाचे कपडे म्हटले म्हणून चार ड्रेस लाखाच्या पुढे गेले.

"बाबा अरे इथे कोणी कपडे घ्यायला येते का? इथली किंमत बघूनच माझं डोकं गरगरयला लागले आहे. माझ्या साड्यांसाठी खाली साधारण शॉप आणि याच्या साठी ब्रँडेड असे का? आणि तू का म्हणून याचे पैसे भरायचे? बाबा त्याचे कपडे, त्याची पसंती आणि पैसे आपण भरणार? हे चुकीचे आहे ना?" सायली.


"सायली, तशीच रीतभात असते, मुलीचा बस्ता मुलाकडून असतो, मुलाचा मुलीकडून.
तू शांत रहा मी करतो आहे ना, माझ्या मुलीचे लग्न आहे, सगळे कसे पध्दतशीर आणि रीतीरिवाजाणे झाले पाहिजे. बाळा, जे माझे कर्तव्य आहे ते मला पार पाडू देत. उद्या माझ्या लेकीला कोणी बोलायला नको की बाबाकडून काही कमतरता राहिली." बाबा बोलल्यावर सायली शांत झाली, पण आता तिची पुढे काही घेण्याची इच्छाच राहिली नव्हती.

एक सर्वसामान्य कुटुंबाला इतका मोठेपणा, त्याचा थाटमाट शक्य होत नाही. बाप त्याचे कर्तव्य म्हणून सगळे करतो, त्यासाठी तो त्याच्या आयुष्याची सगळी जमापुंजी त्यात घलातो. त्याच्या म्हातारपणासाठी सुद्धा काही ठेवत नाही, वाईट वेळ आली तर… पण या कशाचाच तो विचार करत नाही, त्याच्या डोळ्यांपुढे फक्त त्याला त्याचा लेकीचे सुख दिसत असते.

सायलीला हे असे कधीच पटत नव्हते, पण बाबा आणि सिध्दकडे बघून ती शांत होती.


"सायली, तुझ्यासाठी दागिने बघायचे आहेत, तुला आवडेल ते मंगळसुत्र तू निवड. शेवटी तुला ते आयूष्यभर जपायचे आहे." सिद्धच्या आईने सांगितले म्हणून, सायलीने पण आपला राग काढत चांगले जड वाले मंगळसुत्र निवडले, सोबत मिनी मंगळसुत्र. आणि राणी हार चंद्र हात बांगड्या बरेच दागिने निवडले.


"तुमच्या मुलीची आवड भारीच आहे बरं! तिने अगदी आमच्या घरातील सूनेला शोभेल असलेच दागिणे काढले आहेत." सिद्धची आई हसत म्हणाली.


सायलीचे बाबा मंगळसुत्र सोडून बाकी दागिन्यांचे बिल भरायला पुढे आले.

"बाबा, अरे हे दागिने सासर कडून असतात ना? मग तूच का हे करतो आहेस?" सायली रागात बाबाला म्हणाली.


"सायली, मुलीला सौभाग्य आभूषण सोडून बाकी बापाने द्यायचे असेच ठरले होते. तुझ्या बाबाने तुझ्यासाठीच तर हे सगळं केले आहेत, हे सगळे आम्ही थोडी घेऊन जाणार आहोत." सिद्धची आई.


सायलीने रागात सिद्धार्थकडे पाहिले, त्या दिवशी आम्ही याच्या रूममध्ये असताना, \"यांची देण्याघेण्याबद्दल बोलणी उरकून घेण्याचा याचा पण हाच डाव होता का? आणि मला यातले काही माहीतच पडू द्यायचे नाही?\" सायली सिद्धकडे बघत विचार करत होती.

"बाबा, मला अर्जंट काम आले आहे, मी जाते. मला वाटते तुझी इथली खरेदी संपली असेल तू ही घरी गेला तरी चालेल." सायली थोडी रागातच म्हणाली.


"सायली आज पण काम आहेत का? देण्याघेण्याच्या वस्तू खरेदी करणे बाकी आहेत, तू एकदा बघून घेतले तर बरे होईल." आई.


"आई, त्या इथून नको घ्यायला, मी बाहेरून घेऊन येईल. फक्त मला सांग किती आणि कशा पाहिजेत? आता तुम्ही पण दमलात तर घरी जाऊन आराम करा.." सायली बाहेर जाऊ लागली तसा सिध्द ही तिच्या मागे पळत गेला.

"सायली काय झाले? तुला आजची खरेदी आवडली नाही काय? तुझा चेहरा बघून वाटते आहे की तू खुश नाहीस."सिद्ध.


"सिद्धार्थ, माझा बाबा तुझ्या फॅमिली इतका श्रीमंत नाही. आजचा खरेदीचा जो बजेट तुम्ही दाखवला ना, यात माझ्या बाबाने माझे संपूर्ण लग्न करावे अशी माझी इच्छा होती. आताच असे आहे, तर लग्नात तुमच्या अजून काय काय मागण्या असतील? त्याने स्वतःला विकून तुमच्या मागण्या पूर्ण ना केल्या म्हणजे मिळवले...."सायली रागात त्याला बोलत होती.


"सायली, हे आधीच ठरले होते, तेव्हा तुझें बाबा हो बोलले. तुला जर एवढेच वाटत असेल ना तर मी त्यांना पैसे देईन. पण मला तू नाराज झालेली नको आहेस, आपले लग्न आहे, सायली इतक्या वर्षाचे प्रेम आज पूर्ण होणार आहे...."सिद्ध.

"सिद्ध, माझा बाबा खूप स्वाभिमानी आहे रे, मला त्याला असा झुकलेला नाही बघवत, आणि बघायचे सुद्धा नाही. तू पैसे दिले तर तो घेईल असे वाटले का तुला? त्यापेक्षा तुझ्या घरच्यांना समजव, उगीच वाढीव मागण्या करू नका म्हणावं. पैसे एवढे वर आलेत तर ते एखाद्या अनाथ मुलाच्या संगोपनात आणि शिक्षणात मदत करण्यासाठी घालावा." सायली.


"सायली मी प्रयत्न करतो, पण तू नाराज नको होऊ. रात्री बाहेर जेवणाला जाऊयात. मी तुला घ्यायला येतो, तू तयार रहा..." सिद्ध.

सिद्धच्या बोलण्याने सायलीला बरे वाटले. ती त्याला हसून हो म्हणाली.

संध्याकाळ झाली, सायली तयार होऊन बसली होती, सिद्धचा काहीच पत्ता नव्हता. रात्र होण्याची वेळ झाली तरी ना त्याचा फोन आला आणि नाही तो. त्याला फोन करावा तर तोही बंद होता, काहीच कळत नव्हते काय झाले. ती हॉलमध्ये बसून त्याची वाट पाहत होती, बाबा पत्रिका टाकायला गेले होते, आई काही खरेदी करायला. तेवढयात दारावरची बेल वाजली, सिद्ध आला असेल म्हणून सायलीने दार उघडले तर समोर एक मुलगा हातात एन्वलोप घेऊन उभा होता. सायली ते घेऊन घरात आली आणि उघडुन त्यावर वाचू लागली. त्यात लग्नाचा हॉल आणि केटरिंगचा बजेट होता.
१५०० लोक लग्नाला आणि AC हॉल, बस आता तर सायलीच्या डोळेच फिरले, \"बापरे ही लोक आहेत की गाव जेवण? पुढारी लोक पण एव्हढे करत नसतील, एवढे मोठेपणा हे लोक करताय आणि भरतो कोण माझा बाबा. आता मला यात बघावेच लागेल, अती जास्त होते आहे हे, मला असले लग्नच नको आहे.\" ती स्वतःशीच विचार करत होती.

रात्री बाबा घरी आला तेव्हा सायली हातात तेच बिल घेऊन बसली होती. बाबा आल्यावर तिच्याजवळ जात तिला पत्रिकेचे डिझाईन दाखवू लागला पण सायलीने त्याच्याकडे दुर्लक्ष करत समोर बिल केले, "बाबा हे काय आहे? हे सगळे तू करतो आहेस? तुला माहित आहे आपल्याकडे इतका पैसा नाही की आपण हा सगळा खर्च करणार. बाबा, आता तरी बस कर. अरे, असे लग्न करून मला आयुष्यभरासाठी तुला त्या कर्जाच्या ओझ्याखाली नाही टाकायचे. बाबा, मला असे लग्न मान्य नाही, ज्याने बापाला आपल्या आयुष्याची जमापुंजी त्यासाठी खर्च करावी.
बाबा मला नाही वाटत मी आता या लग्नाने सुखी राहू शकेल. कारण दोन दिवसांत तुझी अवस्था किती वाईट झाली आहे, मला कळते आहे. तुला अशा स्थितीत पाहून मी कशी सुखाने लग्न करून नांदू शकते? बाबा, तू आताच हे सगळे कॅन्सल कर, आपण इथेच थांबूया. आता जर असे हाल आहेत, तर पुढे जाऊन माहित नाही अजून काय काय बघायला मिळेल..." सायली अगदी तळमळीनं तिच्या बाबाला सांगत होती.

"सायली बाळा, तू माझा एवढा विचार केलास हेच खूप आहे, पण मला माझ्या मुलीसाठी हे सगळे करण्यात किती आनंद होत आहे याची तुला कल्पना पण नाही. आणि लग्न कॅन्सल करू, वगैरे हे काय आहे? नाती अशी लगेच तोडता येत नाही. जमलेले लग्न मोडले तर, मुलीला लोकं नाव ठेवतात, परत त्या मुलीला समजात समजून घेतले जात नाही. आता परवा साखरपुडा आहे, तू त्याची तयारी कर, त्यानंतर लग्नाचे कार्यक्रम सुरू होतील. बाकी कळाजी करु नकोस, अजून तुझा बाबा आहे..." बाबा.

सायलीला बाबाचे बोलणे बिलकूल पटले नाही म्हणून ती रागात उठून निघून गेली.
त्यात तिचा मोबाईल वाजला सिध्दचा मॅसेज होता, तिला आता तो वाचण्याचा बिलकूल मुड नव्हता पण काही महत्त्वाच असेल तिने उघडुन पाहिला.
"आज पत्रिकासाठी अचानक आई आणि बाबांबरोबर जावे लागले, त्यामुळे तुला भेटायला येता आले नाही, पण उद्या नक्की भेटू. आता आई समोर आहे, तुझ्याशी जास्त बोलू शकत नाही, बाय बाय! तुझाच सिद्ध."

"सिद्ध, उद्या मला कामं आहेत, भेटायला जमणार नाही, तुझा वेळ वाया घालवू नकोस. साखरपुडा आहे तेव्हा परवा आपण कर्यालायात भेटूया..."सायलीने एवढंच लिहून मोबाईल बंद करून ठेवला.


क्रमशः.....

🎭 Series Post

View all