कन्यादान एक कर्तव्य...भाग 2

कन्यादान हे वडिलांनी मुलीसाठी पाहिलेले एक स्वप्न असते.



   "सिद्धर्थ फक्त तिला बघत होता. अजूनही सायली तशीच आहे. बिनधास्त,मोकळी, स्वच्छंदी आणि निरागस... याच निरागसपणा च्या तर मी प्रेमात पडलो होतो. सगळ्यात वेगळे समजून लीडर पणे वागणे, समाजकार्यासाठी स्वतःला झोकून देणे ह्यातच गुंतलो होतो मी.. पण मी हिच्या योग्य आहे का.? का आवडतो वेडीला, अजून वाट पाहत आहे माझी.....



आता पुढे....

     "प्राची, मी काय म्हणतोय आपण जरा बाहेर जाऊन यायचे का? माझी गाडी मी रोडवर पार्क केली आहे, उगीच ट्रॅफिक पोलिस उचलून नेतील." साहिलने प्राचीला खुणावले तसे तीही साहीलच्या मागे बाहेर गेली.


"सायली, कशी आहेस? तुझा जॉब काय म्हणतोय?" सिद्धार्थ.


"सिड, तू अजूनही तसाच आहे. एवढ्या दिवसांनी भेटलो आहोत आणि तू कशी आहे, जॉब कसा आहे, हे विचारतोय? इतके फॉर्मल वागण्याची गरज नाही. मी अजूनही तुझीच वाट पाहत आहे. कधीतरी मला भेटशील ही मला खात्री होती. त्यावेळी तुझ्या बहिणीने ते शकुन अपशकुन काहीकाही बोलून मला तुझ्यापासून लांब केले. मी रागात तुला सोडून गेले, पण मला वाटले तू येशील, मला समजावून, मला परत घेऊन जाशील.."सायली.


"सायली मी अब्रोडला होतो. मी तुला काँटॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, पण काही झालेच नाही. तू मास्क मीडियाचा कोर्स करायला दिल्लीला गेलीये,फक्त एवढेच कळले.. मला वाटले तू तुझ्या लाईफ मध्ये पुढे गेली असशील म्हणून तुला डिस्टर्ब नाही केले..."सिद्धार्थ.


"मग आता तुझ्या लाईफ मध्ये कोणी आले की नाही? की अजून वधूच्या शोधातच आहेस?"सायली आपल्या भुवया उंचावत त्याला थोडी चिडवत म्हणाली.


"हो तसेच म्हणावे लागेल, तुझ्यासारखी नंतर कोणी भेटलेच नाही.."सिद्धार्थ थोडासा हसला.


"बघ अजून लाईन मोकळी आहे. म्हणशील तर मी तुझ्या बरोबर आयुष्य घालवायला तयार आहे." सायली हसत म्हणाली.


सिद्धार्थ हसत सायलीकडे बघू लागला. "सायु, आजही तुच मला पहिले प्रपोज करणार आहेस का? माझ्या घरचे म्हणतील कुठून शोधून आणली ही फटाकडी.. त्यांना तर सुनबाई शांत संस्कारी सोज्वळ पाहिजे आहे."


"अरे संस्कार तर माझ्यात कुटून कुटून भरलेले आहेत, वेळोवेळी बाहेर येतात ते मझ्यातून. बाकी गुण तुला माहीतच आहे.. पुढची बोलणी करायची असेल तर उद्या परत याच ठिकाणी भेट, पण वेळेत बर का..? आज मातोश्रीचा प्रकटदीन आहे, मला जायला पाहिजे. तुझ्या उद्याच्या येण्याने मी समजून जाईल तुझा होकार आहे की नकार. चला बाय मी पळते आता, उशीर झालाय..." सायली बोलून उठून त्याला साईड ने मिठी मारत निघून गेली.


"बापरे ही मुलगी आहे की तुफान, तुझे काही ऐकून पण घेतले नाही, पळाली सुद्धा आणि जताजाता पब्लिक एरियात तुला मिठी मारून गेली. दम आहे बाबा हीच्यात..."साहिल पाठमोऱ्या सायलीकडे बघत म्हणाला. ती गेली तसा आत आला.

"साहिल, याच कारणाने मी तिच्या पासून लांब पळत होतो. मला हीचे हे स्वातंत्र्य, हीचं हे गोड हसू हिरावून घ्यायचे नाही. पहिले पासून अशीच आहे ही, अगदी बिनधास्त. माझ्या घरातील लोकं हिच्यासाठी कधी तयार होतील काय? " सिद्धार्थ.


"सिद्धया, तुझ्या घरी अशीच मुलगी पाहिजे, बरोबर सगळ्यांना सरळ करेल. आणि लग्न झाले की मुली होतात रे अडजेस्ट.. पण आता जर ती तुझ्याजवळ आली, तर तिला सोडू नकोस. तिने तुझी जेवढी वाट बघितली तेवढीच तू सुद्धा तिची वाट बघितली आहे. आणि आता नियती तुम्हाला परत एकत्र घेऊन येत आहे तर तिला नाकारू नकोस.. प्रेमावर विश्वास ठेव, तिने तुझ्यावर विश्वास ठेवून अजूनही स्वतःला जपून ठेवले आहे, मी तिच्या मैत्रिणीकडून सगळी खबर काढली आहे." साहिल.

साहिल बोलत होता तसे सिद्धार्थ विचारात पडला.


रात्री सायली घरी गेली तेव्हा आज ती खूप आनंदी होती. आईसाठी साडी आणि केक घेऊनच ती घरी गेली.

"आईssss लवकर ही साडी घालून येशील, मी केक कट करण्याची तयारी करते.. बाबा पण आले आहेत खाली, येतच असतील आता घरात. जरा छान तयार हो, तुला बघुन बाबांची व्हिकेट पडली पाहिजे बघ..."सायली आईला डोळा मारत म्हणाली.


"बंड्या, तू जो पर्यंत ह्या घरातून हात पिवळे करून जात नाही तोपर्यंत आम्हाला काही रोमान्स करायला मोकळा वेळ भेटणार नाही.. तर जरा बघा आता काहीतरी आपल्या लग्नाचे. म्हणजे आम्ही पण मोकळे होऊ.."बाबा घरात येत बोलले.


"ओ फादर, लागले का तुम्ही लगेच माझ्या मागे. पण यावेळी मी अजिबात रागवणार नाही, कारण जर देवाने तुमचे गाऱ्हाणे ऐकले तर या वर्षी नक्की हात पिवळे करून जाईल मी.."सायली.


"बंड्या, तुला काय तुझा राजकुमार भेटला का.? मी शेरावाणी आणि मुंडावळ्या तयार करू का..? भेटला की लगेच काढून तुझ्या हातात देतो, आणि तुझी पाठवणी करतो." बाबा.


"बाबा, तू आता असा बोलतोय, पण माझ्या लग्नात सगळ्यात जास्त तूच रडशील. तेव्हा बघते मग असा बोलतो का तू.."सायली खोटे खोटे गाल फुगवून म्हणाली.


"बंड्या..! हा तुझा बाबा तुझे लग्न झाले की वेडा होईल. त्याचा तुझ्यात किती जीव आहे माहित आहे ना तुला? उगीच तुला चिडवायला बोलतो तो असा.."आई सायलीला जवळ घेत डोक्यावर हात फिरवत म्हणाली.


"आई माहितये आहे ग! मी काय म्हणते आपण घर जावई करून घेतले तर कसे होईल? म्हणजे मी कायम तुमच्याबरोबर राहील.."सायली.


"नाही बाळा असे नाही होत, जगाची रीत आहे बाळा, मुलीलाच लग्न करून घर सोडून दुसऱ्या घरी जावे लागते.. "आई.


"आई ही रीत कोणी आणि का बनवली माहित नाही, पण मला जर तो व्यक्ती भेटला ना तर त्याला हे सगळे बदलून टाकायला सांगेल.
का नेहमी मुलीनेच आपल्या आई वडिलांना सोडून जायला पाहिजे? का तिनेच कायम मर्यादा, सगळ्यांच्या मर्जीने राहायला पाहिजे? मी बाहेर बघते ना आई, मुलींच्या जीवनाबद्दल ऐकून मला खूप वाईट वाटते. किती सहन करतात. नेहमी त्याच्यावर शारीरिक, मानसिक अत्याचार होतात पण आवाज उठवायला घाबरतात आणि त्याच वातावरणात घुसफटत जीवन जगत राहतात. मला कधी संधी मिळाली ना तर नक्की त्यांच्यासाठी काहीतरी करेल.. या दुबळ्या समाजायला बदलण्याचा प्रयत्न करेल.."सायली बोलता बोलता थोडी भाऊक झाली पण मुलींबद्दलची कळवळ तिच्या बोलण्यातून स्पष्ट जाणवत होती.


"हो ग माझा छोटा हत्ती, नक्कीच. हा बाबा कायम असेल तुझ्या बरोबर असेल.. पण आता केक कपुयात का नाहीतर मेल्ट होईल. मग खाण्यापेक्षा प्यावाच लागेल..."बाबा हसत म्हणाला. तसे सगळे हसायला लागले.


"प्राची, तू टेबल साफ कर मी केक काढून बाहेर आणते.." सायली काम सांगून किचनमध्ये गेली.


"प्राची, आज हिला कोणी खास भेटले काय? हिचा तो रांझना भेटला की काय.?आज ही भलतीच खुशीत दिसतेय!" बाबा म्हणाले.

"काकाssss अहो कसलं भारी गेस केलंय तुम्ही!".. प्राची आश्चर्यचकित होत म्हणाली.

"बाबा आहो तिचा, केसांची दिशा जरी बदलली ना, तरी सगळं कळते. फिर येह तो दिल का मामला हैं".. बाबा उगाच भाव खाऊन गेले.

"दॅट्स लाईक ए कूल बाबा!!".. प्राची.

"काय…काय बोलणं झालं मग?" बाबा.

"हो काका, आज तो…तोच भेटला होता, पण काय बोलणे झाले माहित नाही. ही पाचच मिनिटांत तिथून निघाली, काकूंचा बड्डे आहे म्हणून घाई घाईत भेटली." प्राची.


"किती वेडी आहे ही मुलगी! इतक्या वर्षांनी भेटला आणि आईसाठी निघून आली. थोडावेळ लेट झाले असते तर काय मी हिच्या आईला घेऊन पळून गेलो असतो का.?." बाबा.


"काका पळून जाणार तरी कुठे तुम्ही…?" प्राची हसत म्हणाली.

"तो दोन तास उशिरा आला होता, मग मॅडम राग तर काढणारच ना..? फक्त आज हिने थोडे शांततेत घेतले. मला तर भीती वाटत होती, ही कॅफेमध्ये काही राडा करते की काय?" प्राची.


"काय..? बंड्याने दोन तास वाट पाहिली? म्हणजे बंदे मे कूछ तो बात है. आता तर ह्या मुलाला भेटावेच लागणार. तू मला फक्त नाव आणि नंबर तेवढा मिळवून दे..."बाबा अती उत्साहात म्हणाला.


"हो काका, लवकरच मिळवून देते. आता शांत बसा नाहीतर तुम्हाला खबर दिली म्हणून, मला सायली मारेल."प्राची.


"बंड्या आज केक जरा जास्तच गोड वाटतोय.. आज काही खास आहे का..? तुझ्या वागण्यात आणि चेहऱ्यावर सुध्दा खूपच गोडवा पसरला आहे. आज आईसाठी काही मोठे सरप्राइज वगैरे प्लॅन केले आहे की काय?" बाबा.


"बाबा, माझी खबर काढून झाली असेलच तुझी? का उगीच फिरवून फिरवून बोलतोय..?
सरळ सरळ मला विचार मी आजपर्यंत तुझ्या पासून काही लपवले आहे का..?" सायली प्राचीकडे रागाने बघत म्हणाली.


"बंड्या सांग ना मग, आज तुमच्यात काय बोलणे झाले..?तो तुझ्यासाठीच परत आला ना?" बाबा.


"बाबा, आज काहीच नाही बोलले. उद्या तो मला जर भेटायला आला तर समजून घे तुझा जावई फिक्स.. नाहीतर तुझी लेक इथेच आहे तुला छळायला.."सायली.

सायलीचे बोलणे ऐकून बाबाने डोक्यावर हात मारून घेतला.


क्रमशः....

🎭 Series Post

View all