काका गेल्यावर साधनाला काही वेळ असाच घालवावा लागला. आतून सोना येऊन म्हणाली, "झालं तुझं समाधान? गेले ना काका शेवटी? चांगले बाहेर गेलो असतो. किती दिवसांनी ते आले होते. काय हे मम्मी, शी". मग तिला जवळ घेऊन साधना म्हणाली, " बाळ तुला अजून फारसं कळत नाही. बाहेरच जायचंय ना? आपण जाऊ की. " तिच्यापासून बाजूला होत सोना म्हणाली, " छट, सगळी मजा गेली. बाकीच्या मैत्रिणींचे बाबा कसे , कुठे ना कुठे तरी त्यांना घेऊन जातात .आपण फक्त घरीच बसतो. " ......... थोडा वेळ जाऊन देऊन साधना म्हणाली, " काय गं इतके दिवस कधी तुला बाबांची आठवण झाली नाही, काका गेल्यापासूनच व्हायला लागली का ? " त्यावर सोनाने तोंड वाकडं केलं आणि ती आत निघून गेली. शेवटी ते काका आहेत, साधनाच्या मनात आलं. तरीही तिला कल्पना होतीच की ही जसजशी मोठी होईल तसं तसं आपल्याला तिला समजावणं सोपं जाणार नाही. म्हणून तर काकांच्या आगमनाला तिने कधी हरकत घेतली नाही. पण मन स्वस्थ बसलं. तर , ते मन कसलं. उगाच खोटी कारणं त्या पोरीला कशाला देतेस ? तुला काकांमध्ये रस होता म्हणून तर तू एवढी जवळीक होऊ दिलीस. मग आवडत नसलं तरी मन वेगवेगळे पुरावे पुढे करू लागलं. शेवटी सहन न होऊन ती उठली. चांगला कडक चहा घ्यावा म्हणून ती किचनमध्ये गेली. काहीही असलं तरी आपणही त्यांच्यामध्ये अडकत गेलो. पण वास्तवाचं भान आता ठेवावंच लागेल. खरंच उद्या सगळे पैसे बँकेतून काढून घ्यायचे का ? आणि बँक उद्याच्या उद्या सगळे पैसे देईल ? एफ् डी चे पैसे वगैरे सगळे मिळून तिचे नाही म्हंटलं तरी पाच सहा लाख होत होते. ते घरात ठेवून परत नवीन बँक शोधत बसा. नवरा गेला तेव्हा कधी न पाहिलेले नातेवाईक कुठून उपटले कुणास ठाऊक? का ते फक्त पैसे घ्यायला आले होते, काय माहीत? दूर दूरचे भाऊ, बहिणी, मामा, मावश्या, ज्या नवरा जिवंत असताना कुठे दडले होते काय माहीत? तिच्या मनात आलं. धंद्यातल्या मिळकती विकून भागीदारांच्या लबाडीमुळे काहीच हाती लागलं नाही. धंद्याचे हिशेब तिला काय नवऱ्याने कधी सांगितलंच नाही. कसातरी पण फ्लॅट तिला मिळाला होता आणि तीन साडेतीन लाखाची रोकड. तिला एकदम मागचं सगळं आठवलं............. मग तिला वाटलं,काय ह्या काकांना अवदसा आठवली कोण जाणे. ते होते तरीही आत्तापर्यंत कसं सगळं सरळ होतं. पुढेही सगळं सरळ होण्याची अपेक्षा होती. तिला काकांच्या या नव्या पेचामुळे धक्काच बसला होता. आता त्यांना हो म्हणावं तरी पंचाईत आणि नाही म्हणावं तरी पंचाईत. खरंतर त्यांनी आपल्याला किशाशी संबंध आलेला सांगितल्यावरच आपण त्यांना निर्वाणीचा निर्णय द्यायला हवा होता. पण तिला हे माहीत नव्हतं की ते त्याच्याही आधीपासून दरोड्याच्या प्रकरणाशी संबंधित होते. सोनाला त्यांची चांगलीच सवय झाली होती आणि ती त्यांच्यात रुळलीही होती. तिला समजावून सांगणं कठीण होतं. मन परत परत तिथेच येऊन थबकत होतं. चहाला उकळी येईपर्यंत तिने बाथरूममध्ये जाऊन तोंडावर गार पाण्याचे हबके मारले. जरा बरं वाटलं. मग ती चहा घेऊन पुन्हा हॉलमध्ये येऊन बसली. न आवडणारा पेपरही मुलं कशी जबरदस्तीने सोडवायला बसतात तशी ती बसली. उपाय सुचला नाही तर शरीरालाही वजन असल्याची जाणीव होते आणि ते जास्तीत जास्त बर्फासारखं घट्ट बसून राहू लागतं. ती विचार झटकून बाहेर जाण्याचं ठरवीत होती.
तेवढ्यात तिचा फोन वाजला. तिने तो तत्परतेने घेतला. काहीतरी नवीन विचार मिळेल अशी तिला आशा वाटली. तिने चुकून ती कोण बोलत्ये हे सांगितले. पण फोन करणारी व्यक्ती बोलायलाच तयार नव्हती. ती हॅलो, हॅलो करून कंटाळली. बोलायचं नव्हतं तर फोन का केलाय तिला कळेना तिने तो ठेवून दिला. काका तर नसतील? पण तो होता किशा दादा........ तेवढयात सोनाने बाहेर येऊन आशेने विचारले, " काकांचा फोन असणार. तू जरा वेळ थांबायचंस ना. लगेच बंद काय केलास. " सोनाला अजूनही आशा होती की काका येतील. साधनाने काहीच उत्तर दिलं नाही. उलट ती उठून म्हणाली, " चल आपण बाहेर जाऊन येऊ या. " त्यावर सोनाची प्रतिक्रिया एवढीच, " काय करणार आहोत आपण बाहेर जाऊन? तूच जा". मग तिने तिला समजावलं, की बाहेर जाऊन जेवू आणि पिक्चरही पाहू. तुझ्यासाठी खरेदी करू. " ...... हे सगळं तिला करणं भाग होतं. साधनाच्या डोक्यातून जाईचना, की काका या दरोड्याच्या प्रकरणात अडकले आहेत. वेगवेगळे विचार करून झाले तरीही नवीन उत्तर सापडत नव्हतं. परिस्थिती अगदी टोकाशी आल्यावर निर्णय घेणं कठीण होतं..... ती बाहेर जाण्यासाठी तयार झाली. सोनालाही तिने जबरदस्तीने तयार केलं.
**** ***** **** ***** ****** ******** *******
अकड्याने त्याला हाताने इशारा केल्यावर त्याने डिकीचा दरवाजा उघडा ठेवला. मग अकडा ते पोतं खांद्यावर घेऊन पुढे झाला आणि त्याने ते उघड्या डिकीत ठेवले. डिकी बंद करून तो आणि सूर्या मागच्या सीटवर बसले. ठरल्याप्रमाणे अकडा ते पोते स्वत: उचलूनच आजीच्या फ्लॅटमध्ये जाणार होता. सूर्या फक्त बरोबर राहणार होता, घोडा हातात धरून. काही झालंच तर घोड्याचा वापर तो करणार होता. दादाने ते करायला मनाई केली होती. पण सूर्याला घोड्यावर जास्त भरंवसा असल्याने त्याने ऐकले नव्हते. गाडी निघाली, शक्यतोवर हेडलाईटस न वापरता हिरा ती चालवीत होता. ड्रायव्हिंगच्या सगळ्या वाईट पद्धतीत त्याचा हातखंडा होता. अर्ध्या पाऊण तासातच ते श्रीकांत सहकारी बँकेच्या जवळ पोहोचू लागले. एका मोठ्या वडाच्या झाडाखाली पांढरी स्कॉर्पियो उभी राहिली. तिथून बँक एखाद शंभर मिटर दूर होती. त्यांचा प्लान आता ठरलेला होता. हिरा खाली उतरला. त्याने डिकी अर्धवट उघडली. मग त्याने आपली सराईत नजर पूर्ण बिल्डिंगवरून फिरवली. कोणीही गॅलरीत उभं नाही ना, किंवा कोणाची खिडकी उघडी नाही ना हे पाहून घेतले. आणि ऑल क्लिअरचा सिग्नल आत बसलेल्या दोघांना दिला. दोन वॉचमन आळीपाळीने बँकेभोवती फिरत होते. बँकेच्या पुढच्या दरवाज्या समोर आलेल्या वॉचमनला मागे जाताना पाहून अकड्याने आळीपाळीने फिरणारा दुसरा वॉचमन तिथे यायच्या आत पोतं लिफ्ट जवळ नेऊन ठेवलं. कोणी बघितलं असेल तर बघो, असं त्याच्या मनात आलं. कोणत्याही धोक्याला नष्ट करण्याची त्याची क्षमता होती. मग तो चांगली कामं का करीत नव्हता, असला पुचकट विचार काकांसारख्या माणसाच्या मनात नक्की आला असता. सूर्या त्याच्यामागोमाग खिशातल्या पिस्तुलावर हात ठेवून होता. लिफ्टने जाऊन आवाज होईल म्हणून, आता मात्र त्या दोघांनी पोतं उचलून जिन्याचा रस्ता धरला. ते दोन जिन्यांमधल्या सपाट भागात दम खाण्यासाठी उभे राहिले. आत्ता मात्र त्या दोघांना चांगलाच घाम फुटला होता.
ऑफिसमधून प्रेत असलेलं पोतं बाहेर काढणं आणि प्रत्यक्ष बिल्डिंगमध्ये पोतं उचलून नेणं. यात फरक होता. घाम पुसून ते पोतं उचलणार तेवढ्यात त्यांना पहिल्या मजल्यावर नेणाऱ्या जिन्याच्या वरच्या टोकाला दोन चमकणारे डोळे दिसले. अकड्याचा हात सुटला आणि पोतं खाली पडलं. सूर्याने खिशातलं पिस्तूल हातात घेतलं. जिन्यात मिट्ट काळोख होता. जो काही रस्यावरच्या दिव्यांचा चोरटा पिवळा अंधुक प्रकाश पडला होता, त्यात त्यांना जिन्याच्या वरच्या भागात कोण आहे, याचा अंदाज येत नव्हता. पण लगेचच आलेल्या गुरगुरीमुळे अकड्याला समोर कुत्रा असल्याचे जाणवले. त्याचा जीव भांड्यात पडला. त्याने हळूच सूर्याला " कुत्ता है " असा आवाज दिला. पण सूर्याला कोणताही धोका पत्करायचा नव्हता. तो म्हणाला, " उडा देता हूं. " ..... अकड्याने त्याला हळूच त्याच्या हाताला चिमटा काढून तसे न करण्याविषयी सांगितले. आता गुरगुरणं वाढलं. आणि हलक्या आवाजात तो भुंकू लागला. त्याचा थोबडा बंद कसा करावा याच त्यांना विचार पडला. त्यांनी या अडचणीची कल्पना केली नव्हती. अकड्याने पोत्याची घट्ट बांधलेली दोरी सोडली, त्याचे हात थरथरतच होते. कुत्र्याला काही कळायच्या आत त्याच्यावर झेप घेऊन त्याची मान दोरीने आवळण्यास सुरुवात केली. आपल्या डाव्या पायाच्या गुडघ्याखाली कुत्र्याचे दोन पाय आणि पोट त्याने आवळून धरले होते. त्याने मारलेल्या नखांनी अकड्याला हातावर बऱ्याच जखमा झाल्या पण त्याने त्या सहन केल्या. कुत्र्याला अचानक होणाऱ्या हल्ल्याची कल्पना नव्हती. पंधरा वीस मिनिटं त्याने चांगलीच धडपड केली. शेवटी अकडा जास्त पाशवी ठरला. कुत्र्याचे पाय लवकरच ढिले पडले. कुत्रा बेशुद्ध पडला होता की मेला होता याची परीक्षा करायला त्यांना वेळ नव्हता. त्याच्याभोवती गुंडाळलेला दोरी खिशात कोंबीत त्याला तसाच सोडून, घामेजलेल्या अकड्याने सूर्याने धरून ठेवलेले पोते उचलले. मग दोघेही आजूबाजूचा अंदाज घेत मांजराच्या पावलाने आजींच्या फ्लॅटजवळ पोहोचले. मग सूर्या हलक्या पायांनी जिन्याच्या वरच्या भागाकडे पिस्तूल रोखून फायर कव्हर देत उभा राहिला. पुन्हा एकदा त्यांनी मागे वळून कानोसा घेतला पण शेजारपाजारचा काहीच आवाज आला नाही. पोतं खाली ठेवून त्याने सावकाश आवाज न करता कुलूप उघडले. कडी सरकवली. दरवाजा उघडून प्रथम त्याने पोते आत टाकले आणि ते दोरीने पुन्हा घट्ट बांधले. मग स्वत: आत शिरला. आत असलेल्या झमझमला त्याने किल्ली सुपूर्त केली. त्याने बाहेर येऊन सफाईने कुलूप लावले. हालणारे कुलूप स्थिर करून, पाय न वाजवता तो जिन्यावरून खाली उतरला. रस्त्यावरच्या दिव्यांचा प्रकाश टाळीत जिन्याच्या खालच्या भागात ते दोघे तिथेच उभे राहिले. मग वाकून त्या दोघांनी वॉचमन जाण्याची वाट पाहिली. त्याची पाठ वळल्याबरोबर ते तसेच पावसात भिजत झाडाखाली उभ्या असलेल्या स्कॉर्पियोकडे घावले. मागचा दरवाजा उघडा ठेवल्याने ते पटकन आत बसले. पुन्हा एकदा वॉचमनची पाठ वळण्याची वाट पाहत हिरा थांबला. आणि योग्य वेळ येताच त्याने गाडी स्टार्ट केली. मागे जराही वळून न बघता ते सुसाट त्यांच्या ऑफिसकडे निघाले.
अकड्याने दादाच्या सांगण्याप्रमाणे पोत्यातून आजींना बाहेर काढले. जरी बरेच दिवस बर्फात ठेवल्या होत्या तरी श्रीपतला आत ठेवण्याच्या आदल्या दिवसापर्यंत बर्फाचा उपयोग अधून मधून आणि आठवेल तेव्हाच केल्यामुळे आता मात्र चांगलाच कुजट वास मारू लागला. दोघांनी मग एकमेकांच्या साहाय्याने आजींना एका चादरीत गुंडाळून कपाटाजवळ नेले. कपाट उघडले पण असा एकही मोठा खण त्यांना सापडला नाही की ज्यात आजी मावतील. त्यांनी एकमेकांकडे पाहिले. आता काय करायचं? तसे आत बरेच कपडे होते. एका म्हातारीचे एवढे कपडे कसे असतील. असे वाटून त्यांनी ते सगळे बाहेर फेकले. त्यात काही पुरुषी कपडेही सापडले. म्हणजे कोणी ना कोणीतरी पुरूष माणूस तिथे राहत असावा. पण कपडे जुने व जुन्या पद्धतीचे होते. नक्कीच आजींच्या नवऱ्याचे असावेत. अकड्याच्या लक्षात आलं, इथे उगाचंच डोकं चालवून काय करायचं. एकूण पाच खण होते. कपाट लाकडी होतं आणि जुनं व मोठंही. त्याने जवळच पडलेला हातोडा हातात घेतला आणि तो एका खणावर मारणार एवढ्यात त्याच्या लक्षात आलं आत्ता या वेळेला आवाज आला तर बाहेर नक्कीच ऐकू जाईल. म्हणून त्याने त्याच्या सहकाऱ्याला एका खणावर जोर लावायला सांगितलं. दोघांनी जोर लावल्यामुळे जुना पुराणा खण मोडला, पण अर्धवट आणि वेडावाकडा. तशी कपाटाची बांधणी भक्कम असावी. त्यांनी परत जोर लावून पाहिला. मग तिथे पडलेल्या पहारीने त्याने जोर लावला. आता मात्र मधले दोन तीन खण लवकरच खाली आले. एक प्रकारची उभी आयताकृती पोकळी निर्माण झाली. आतात घुसलेल्या लाकडांच्या कुसांमुळे येणारी कळ दाबीत त्या दोघांनी आजींना उचलले आणि प्रथम आत बसलेल्या अवस्थेत ठेवले. पण त्याने ती सर्व जागा व्यापली गेली. आता कपडे कुठे ठेवणार? अस विचार करीत ते कपाटाचे आणखी खण मोडता येतात का बघू लागले.दहा पंधरा मिनिटे निरीक्षण केल्यावर पहार उचलायला ते खाली वाकले तशी आजीचा मृतदेहा हळू हळू जागा सोडून त्यांच्या पायावर पडला. त्यांना दोघांनाही घाम फुटला. नाही म्हंटलं तरी गेला जवळ जवळ तासभर ते प्रयत्न करीत होते. आता त्यांनी परत आजींना उचलून त्याच ठिकाणी
मागच्याच अवस्थेत ठेवले आणि एकाने त्यांना धरून ठेवले. दुसऱ्याने काही कपडे आजींवर कोंबले आणि उरलेले बाजूच्या कपड्यांमध्ये कोंबले.
म्हातारी कशाला असली तसदी घेईल, त्याच्या मनात आलं. मग त्याने दाराला कान लावला. बाहेर त्याने मारलेलं कुत्रं अर्धवट मारले गेल्याने बेशुद्धीतून उठले. त्याच्या अंगात चालण्याचे काय उठण्याचे त्राण नव्हते. पण पशूंना बहुतेक नैसर्गिक देणगी असावी. ते त्याही अवस्थेत एखादा बेवडा असंबद्ध चालतो तसं चालत वास घेत घेत आजींच्या फ्लॅटजवळ पोहोचले. तिथे ते आवाज करीत पडून राहिले. कदाचित त्याला मृतदेहाचा वास आला असावा. किंवा त्याला मारणाऱ्यांचा माग लागला असावा. असली क्षमता माणसाला नसते. तरीही जास्त काही करण्याची त्याच्यात ताकद नव्हती. त्याच्या तोंडातून रक्तस्त्राव झाला. मग तो पाय आखडून पडला. किती वेळ धुगधुगी होती, कुणास ठाऊक. अकड्याला तिथे कुत्रं असल्याचा अंदाज आला. सूर्याने त्याला मारलं असतं तर बरं झालं असतं. आपण उगाच त्याला अडवलं. त्याला परत सकाळी चार वाजेपर्यंत बाहेर पडायचं होतं. मीटिंग महत्त्वाची होती..............
(क्रमशः)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा