विषय - कौटुंबीक कथामालिका
शीर्षक - कंगोरे भावनांचे
भाग - 4.....'नाही मी आधी...आतापासूनच, मुलींच्या शिक्षणाची, लग्नाची तरतूद करायला सुरुवात करतो. म्हणजे पुढे गडबड होणार नाही. आणि आता जरा हात आखडूनच खर्च करावा लागेल. जेणे करुन घराची घडी नीट बसेल. तसे, शोभना तर जास्त खर्चीक नाहीये. ती करते व्यवस्थित. पण हातून निसटायला नको ती...आणि डोक्यावरही बसायला नको. जरा तिच्यावरही वचक हवाच...!
भाग - 5
त्याच बरोबर डोळ्यात तेल घालून, आपल्या बहिणी सारखे आपल्या मुली करणार नाहीत ह्यावर लक्ष ठेवावे लागेल. प्रसंगी कठोर वागावे लागले तरी चालेल. बाबांनी मनोमन ठरवले.
आणि त्यानुसार वागू लागले.
पण त्यांच्या अश्या वागण्याचा परिणाम असा झाला की, मुली, बायको त्यांना घाबरत असे, आणि मनाने त्यांच्यापासून दूर गेल्यात. नातेवाईकही दुरावत चालले होते. खर्च वाचवायच्या भानगडीत ते कुणाशीही मोकळेपणाने बोलत नसत. येणजाणं टाळत नातेवाईकांकडे. कमी बोलणारे तर होतेचं. त्यामुळे चांगले व्यक्ति असूनही त्यांची घरादारात प्रतिमा,
'एका भावनाशून्य व्यक्तिची' निर्माण झाली होती.
खरेतर त्यांनी त्यांच्या मनातील खळबळ आपल्या जीवनसंगिनीला सांगितली असती तर,
कदाचीत तिचे सहकार्य त्यांना मिळाले असते....!
ती स्वतः ग्रॅज्युएट होती. ती कुठे तरी जाॅब करु शकली असती. घर चालवायला तेवढाच हातभार लागला असता.
तिच्या माहेरशी चांगले संबंध ठेवले असते तर...
नाना नानींचीही मुलींना सांभाळायसाठी मदत झाली असती.
पण आपल्या एकट्यालाच हे आव्हान पेलायचे आहे.
ह्या भावनेने ते कर्तबगारी करायला निघाले होते.
घरातल्यांच्या भावनांचे "दमन" करुन.
अरे...आपण एकदम मुलींच्या बालपणात भरकटलो की,
चला परत येऊया....तारुण्यात...! एवढेच होते माझ्या मनात...बाबांचे पण काही विचार असतीलच की....म्हणून गेलोत तिकडे...!
तर, संजूला किचन आवरायला पाठवून,
ती सुलूमावशीला म्हणाली,"कसा वाटला गं मुलगा ?"
"अगं मुलाला काय बघावे, गोरा सुंदर आहे शिवाय अधिकारी आहे विद्युत खात्यात. वेल एज्युकेटेड फॅमीली आहे. विशेष म्हणजे आपल्या शंभूदादाच्या पाहणीतले लोकं ! मग काय बघायचं आता शोभनाताई...उडवा बार...!" मावशी मोठ्यांने हसत शोभनाला बिलगली.
" नाही हां मावशी आताच नाही..." प्रियु एवढं बोललीच होती की, तेव्हढ्यात आईने तिच्याकडे डोळे वटारुन बघितले. "कोणी दुसरा पसंत आहे का तुला ?"
"नाही नाही कोणी नाही..!"
धडकीच भरली प्रियुला आईच्या प्रश्नाने.
"मग, नाही म्हणायला काय कारण आहे. असे चांगले मुलं शोधूनही मिळत नाही. शंभूदादाने सोयरीक आणली म्हणजे आपल्याला नाव ठेवायला जागाच नाहीये. त्यांचही लक्ष राहील तुझ्यावर. एकदम अनोळखी सोयरीक केल्यास कसे मिळतील पाहुणे...माहीत नसणार आपल्याला. मग हातचं सोडून पळत्याच्या मागे जाणे बरे नाही."
आई उसंत न घेता बोलायला लागली.
"अगं पण माझं कालेज..." प्रियु
"ते होईलच गं, आजच थोडेना बोहल्यावर चढणार आहेस...."
आई प्रियुला मध्येच अडवून बोलतच होती, तेव्हढ्यात बाबा आत आले. त्यांनी बाहेरुन मायलेकींच बोलण ऐकलं होतं.
"काय चाललय...?" त्यांनी हाताने इशारा करुन गंभीर चेहर्याने शोभनाला विचारले. दोघीही चपापल्या. मग बाबा प्रियु कडे बघत म्हणाले,"तुला काय प्राॅब्लेम आहे?"
"नाही...काही नाही..." एवढेच निघाले तिच्या तोंडून.
खाली मान घालून ती बसली.
सुलूमावशी वेळ निभावून नेत म्हणाली, "भाऊजी खुप छान स्थळ आहे. आम्ही इकडे येतानाच बाबाआई पण म्हणत होते. हे लोकं चांगले आहेत म्हणून. शंभूदादा कडे ह्या पाहुण्यांना भेटले होते फार पुर्वी आईबाबा."
"मग कोणाला काही अडचण..." त्यांनी शोभना आणि प्रियु कडे बघत म्हंटले. प्रियु तर घाबरलीच होती.
शोभना कसनुसं हसत म्हणाली,
"नाही नाही तुम्ही म्हणाल तसे, काही अडचण नाही.!"
बाबा बाहेर गेलेत. शोभना सुलूचा हात पकडून त्यांच्याच मागोमाग हाॅल मध्ये आली आणि सगळ्यांच्या हास्य विनोदात, जुन्या आठवणीत, रमायचा प्रयत्न करु लागली.
प्रियुच्या मनातली खळबळ थांबत नव्हती. आता कसे...?
कुणाजवळ बोलू मी ! ग्रॅज्युएशन तरी कंम्प्लीट करु द्यायचं असतं ना...कसं थांबवू हे सगळं? तिच्या ह्रदयासकट डोळ्यात पाणी दाटले. तेव्हढ्यात मावशीने तिला आवाज दिला.
कसेबसे डोळ्यांबाहेर पडू बघणार्या अश्रुंना तिने तिथेच थोपवून, बाहेर आली.
ये बैस इथे आज्जीने तिला आपल्या जवळ बसवले.
"बरे मला सांग, तुला...मुला सोबत काही बोलायचे आहे का?
नाहीतर उद्या उठून म्हणायचीस,'मला बोलू दिले नाही म्हणून..' बोल, विचार काही विचारायचे असल्यास.." आजी तिच्या पाठीवरुन हात फिरवत म्हणाली.
"अगं आई अशी काय करतेस...माझी मुलगी आहे ती. बाबा जे करतील त्यात तिची सहमती आहेच...तिचे बाबा म्हणतील तसेच...ते बोलतील मुलाशी...म्हणजे पाहुण्यांशी..!"
आई ह्या सगळ्यांमध्ये बाबांचा गंभीर चेहराच निहारत होती. आज्जीने प्रियुला बोलायला म्हंटले आणि बाबांच्या कपाळावरच्या आठ्या आईच्या नजरेतून सुटल्या नव्हत्या. म्हणून ती मध्येच बोलली होती.
"बरं बाबा, होणारे नातजावई, तुम्हाला काही बोलायचे का मुली सोबत? एकांतात बोलायचे असेल तर तसे सांगा...आम्ही बापडे सगळे आत जाऊन बसतो..."
आजोबा मोठ्यांने हसतच बोलले.
'अरे हो म्हण..म्हण ना हो...मला बोलायचे आहे तुझ्याशी. तुच आता ह्यातून मार्ग काढू शकतोस. प्लीज देवा सांग ना ह्याला बोलायला...!' मनातल्या मनात प्रियु बोलत होती.
मुलगा लाजून त्याच्या आईबाबांनकडे बघून मंदसा हसला.
"बाबांनी सगळच विचारले आहे. बाबा म्हणतील तसे. मी बाबांच्या शब्दा बाहेर नाही."
'झालं कल्याण...! हाही शामळूच भारी..! देवा सांभाळ मला...!'
डोळे मिटत प्रियु मनात म्हणाली.
मुलाच्या भावाने रवीने बाहेरुन पेढे आणले. सगळ्यांचे तोंड गोड करण्यात आले. सगळे आनंदात होते. आईबाबांचा उत्साह तर पाहण्यालायक होता. एवढ्या झटपट लग्नं जुळल्याचा आनंद त्यांच्या चेहर्यावरुन ओसंडून वाहत होता.
मग ठरले, दोन दिवसानंतर येत्या रविवारी टिका लावू. साखरपुड्याची खरेदी करु आणि मग त्यापुढल्या रविवारी साखरपुडा...! सगळ्यांचे एकमत झाले. आनंदाने गळाभेट झाली. जेवणाचा फार आग्रह बाबांनी पाहुण्यांना केला. पण रविवारी जेवण करु तुमच्याकडे, असे ठरवून पाहूण्यांनी निरोप घेतला.
क्रमशः
संगीता अनंत थोरात
31/07/22
टीम - अमरावती
ईरा राज्यस्तरीय करंडक स्पर्धा
०००००
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा