विषय - कौटुंबीक कथामालिका
शीर्षक - कंगोरे भावनांचे
भाग-2 मधून...आता तिच्या पायांची हातांची चुळबुळ सुरु झाली होती. सारख तिच मन म्हणत होतं, बघ समोर, तुला आवडणारी व्यक्ती जवळच आहे. महत् प्रयासाने तिने पुन्हा समोर बघितले, दोन डोळे तिलाच निरखत होते. नजरानजर झाल्या बरोबर तो ओळखीचं गोड हसला...शहारुन प्रियु पण कसनुसं हसली. एवढ्या जवळून तो तिला निरखत होता. तिला कसेसेच होऊ लागले. चेहरा घामाने डबडबला. कुठे बघू आता...? काहीच न सुचून तिने पुढ्यात असलेल्या बॅगवर डोके टेकवून दिले. चेहरा लपवल्यावर आता कुठे तिला बरे वाटले. पण कुणीतरी बघतय ही भावनाही सुखावून गेली. ह्रदयाची धडधड वाढवून गेली. तिने कल्पना नव्हती केली की, गॅलरीतील व्यक्ती कधी अशी आपल्या समोर येईल.....
भाग - 3
आता तिला पटकन बसमधून उतरायचे होते. हा माझ्याशी बोलला तर ? मी काय बोलणार. कुणी बघितले तर.? बापरे बाबांना दिसली तर..माझं काही खरं नाही. नाही नाही कसही करुन मला ह्याला टाळावे लागेल.
थोडा मनाचा निर्धार करुनच प्रियुने उतरायची तयारी केली. आता तिला अजीबात त्याच्याकडे बघायचे नव्हते. कारण ती घराजवळच उतरणार होती. शक्य तेवढा गंभीर चेहरा करुन ती तग धरुन बसली. टींग...घंटी वाजताच ती दाराकडे झेपावली.
चालत्या बसमधुन उतरत तिने घराकडे अक्षरशहा धाव घेतली. मनातून खुप वाटलं तिला, बघावे त्याच्याकडे, बोलावं त्याच्याशी. हसावं खुप खुप...पण, हा "पण" आडवा आला आणि ती धापा टाकतच घरी पोहोचली.
काय वाटलं असेल आपल्या बद्दल त्याला ?
हा एकच विचार घोळत होता तिच्या मनात.
घराबाहेर तिला भरपूर चपला दिसल्या. अरे बापरे मला उशीर झाला वाटतं. माझी काही खैर नाही आता. पाहुणे आलेत बहुधा. घाबरतच ती घरात दाखल झाली.
"ही बघा आली प्रियदर्शिनी." आईने हसतच म्हंटले.
मामा, मावशी मावसा आणि नाना नानी आले होते.
त्यांना बघून प्रियुच्या आनंदाला पारावार राहिला नाही.
"अरे तुम्ही सगळे कसे काय आलात. कधी आलात? मला तर माहीतच नव्हते तुम्ही येणार म्हणून." अत्यानंदाने सुलूमावशीच्या गळ्यात पडत प्रियु म्हणाली.
"अगं कालच ताईने फोन केला होता. मग काय लगेच आलोत कारने इकडे."
"अग पण कशासाठी...म्हणजे मला आवडले तुम्ही आलात ते. पण एवढ्या तडकाफडकी...?" प्रियु काही न समजून म्हणाली.
"बस जास्त अज्ञानी बनू नकोस बाळा. जा कपडे बदल. साडी नेस, पाहुणे येतीलच एवढ्यात. आणि हो, पाहुणे येणार आहेत म्हणूनच ह्यांना बोलावले. समजले आता ?" तिच्याकडे डोळे मोठे करुन बघत आई म्हणाली.
प्रियदर्शिनीने आई कडे बघितले मग आत गेली कपडे बदलायला. 'बापरे आईचा विचार तरी काय आहे. माझं लगेच लग्नं लावते की काय ? मुलगा तर अजुन बघितला नाही मी. कसे करतात हे लोकं काय माहित. वाचवा रे मला कुणीतरी...' मनोमन धावा करत तिने तयारी केली. 'नाही मला आताच लग्न करायचे नाही. मी ना आता बाबांशीच बोलेन, ते समजतील मला...' तिने ठरवूनच टाकले मनोमन.
थोड्या वेळातच पाहुणे आलेत. सगळ्यांच्या ओळखी पाळखी झाल्यावर मग पोह्यांचा ट्रे घेऊन प्रियुला पाठवले आईने. साडी कशीबशी सावरत ती हाॅल मध्ये आली. सगळ्यांना प्लेट दिली हातात. तेव्हढ्यात मुलाचे आजोबा म्हणाले,
"बाळा एक रिकामी प्लेट आण पाहू आतून."
प्रियु किचन मधून रिकामी प्लेट घेऊन आली.
"ठेव तिथे टिपाॅय वर," आजोबांनी म्हंटले.
तिने प्लेट तिथे ठेवली.
"तू पण घे ना पोहे !"आजोबा म्हणाले.
"नाही, नको...मी आताच जेवले, काॅलेजमधुन आल्यावर."
प्रियु हळुच म्हणाली.
पोहे खाता खाता सगळे पाहुणे तिलाच निरखत होते.
मुलाचे आजोबा, आजी, आई, वडील, बहीण, दोन भाऊ आणि दस्तुरखुद्द मुलगाही....आता प्रियुला पिंजर्यातल्या प्राण्यासारखे वाटायला लागले होते. पण सांगणार कुणाला.
तिला तिथेच बसवून मावशीने प्लेट आत नेल्या. "तुम्ही बोला मी चहा ठेवते. आणि हो पोहे प्रियदर्शिनीनेच बनवले होते...बरं का !" हसतच मावशी म्हणाली.
प्रियुने चमकून मावशीकडे बघितले आणि मावशीने एक डोळा बंद करुन,"गप गुमान बस..."चा इशारा केला तिला.
तुझं नाव काय? शिक्षण काय सुरु आहे? काॅलेजचे नाव? मामेकुळ? पुढे काय करायचा विचार आहे?भावंड किती?
एक ना अनेक...त्यांना सगळे उत्तर माहित असलेले...प्रश्नं...हे लोकं मला का विचारत आहेत...? प्रियुचे मन म्हणत होते.
मात्र ह्यातील एकही प्रश्न मुलाने विचारला नाही. त्याच्या चेहर्यावर अगाध शांतता होती. मधे मधे तो आजोबांच्या किंवा त्याच्या वडीलांच्या बोलण्यावर किंवा प्रश्नांवर मंद हसत होता.
दिसायला छान होता मुलगा. आणि mseb मध्ये आॅफीसर होता. त्याचे वडील गुरांचे डाॅक्टर होते. आई गृहीणी, बहीण काॅलेजमध्ये विशेष म्हणजे ती पण बीएस्सी फायनल ईयरला होती. एक भाऊ इंजीनीयर तर दुसरा आर्कीटेक्ट, फायनल ईयरला. आजोबा रिटायर्ड शिक्षक होते. अश्या ह्या एज्युकेटेड घरातील विकास हा मोठा मुलगा होता. आणि म्हणून सगळ्यांना त्याच्या लग्नाची घाई होती.
मध्यस्ताने म्हणजे आईच्या चुलत भावाने,
जो बाबांचा बालमित्र होता. त्याने त्याच्या बायकोच्या नात्यातील ही सोयरीक प्रियु साठी सुचवली होती. आज तो शंभुमामा {की काका...} ही मुला सोबत आला होता. म्हणून ह्या सोयरीकीला वजन प्राप्त झाले होते. काहीही करुन हे जमवायचेच...प्रियुच्या आईबाबांनी चंगच बांधला होता. वेळ न दवडता तिने माहेरच्यांनाही बोलावून घेतले होते.
यथासांग प्रियुची तपासणी उलटतपासणी झाली. आता चहा पिऊन झाला. जेष्ठांना नमस्कार करायला प्रियुला सांगण्यात आले होते. नमस्कार केल्यावर आजोबांनी त्यांच्या बटव्यातून शंभर रुपयांची नोट काढून प्रियुला दिली. आधी तिने नाहीच म्हंटले..."पण हा शगुन आहे, घ्यावाच लागतो." असे म्हणत तिच्या हातावर आजोबांनी नोट ठेवली. नाईलाजाने तिने पैसे घेतले आणि बेडरुम मध्ये आली.
"हे प्रियु कसा वाटला मुलगा?"
मावशीने तिला गाठत लगेच हळू आवाजात विचारले.
"अगं कुठे काय, मी त्याला तर चांगले बघितलेही नाही अजुन.."
"झालं तर मग. ही कशी सांगणार काही. त्यापेक्षा आईला विचार तू मावशी...कसा वाटला मुलगा म्हणून. आणि हो, तू तर डोळे मोठ्ठे करुन मुलाला निरखत होतीस. तुला नाही कळले का ?" खोचकपणे प्रियुची लहान बहीण संजीवनी म्हणाली.
"अरे...ही काय पद्धत आहे मावशी सोबत बोलायची ? तू जरा तुझं तोंड बंद कर. बाहेर पाहूणे आहेत. ऐकू जाईल त्यांना. जा, जरा किचन आवर. इथे गप्पा हाकू नकोस. जरा कामात हातभार लाव." आईने संजीवनीचे खडे बोलणे ऐकले होते.
संजीवनी म्हणजे तापलेला तवा, सदानकदा गॅसवर असल्या सारखी ! तिला आईवडीलांचे विचार पटायचेच नाहीत. ती बाबांना वचकून असायची पण आईशी, नातेवाईकांशी सतत हुज्जत घालायची न पटणार्या गोष्टींसाठी.
क्रमशः
संगीता अनंत थोरात
30/07/22
टीम - अमरावती
ईरा राज्यस्तरीय करंडक स्पर्धा
०००००
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा