कंगोरे भावनांचे - 2

Myriad shades of human emotions..

विषय - कौटुंबीक कथामालिका

शीर्षक - कंगोरे भावनांचे

भाग - 2

कित्येकदा मुलांनी बघितले त्यांना, बस स्टाॅपवर उतरले की तरातरा चालायला लागायचे आणि काॅलेजमध्ये आल्यावरच ते थांबायचे. मध्ये कुणी बोलले तरीही ते न थांबता चालता चालताच बोलायचे. गोरेपान घार्‍या डोळ्यांचे बापट सर देखणे होते. त्यांना बघून वाटायचे ह्यांना कुठे तरी पोहोचायची घाई आहे. मग त्यांचे चालणे बघणार्‍याला अलगद हसवून जाई.

म्हणूनच मुलांनी त्यांना, "गीतांजली एक्सप्रेस" हे नाव ठेवले होते.

"यार तू नावा प्रमाणेच आहेस,"विनीत" सारे संस्कार ह्यातच भरलेत ह्याच्या आईने, कोणतेही सर मॅडम कुठून येतात...आलेत...ह्यालाच आधी दिसतात...आणि काय ते विनम्रपणाचे भाव चेहर्‍यावर....काय कुणी तुझा खबरी आहे का रे..कॅमेरा वगैरे लावला आहे की काय कुठे...?" त्याच्या शरीरावरुन हात फिरवत अभ्या म्हणाला.

"अरे कुठं रे बाबा, हे असे हात नको लावूस...गैरसमज व्हायचे सगळ्यांचे..." विनीत बाजूला पळत म्हणाला.

सगळे हसायला लागले. 

"चला क्लास मध्ये जाऊ.

बघू एखादे सर येतात का ते..नाहीतर आॅडीटोरीयम मध्ये जाऊ...!" चारु म्हणाली.

"नाही ना यार, आधी क्लास मध्ये चला, मग बघू...."

म्हणत प्रियु चालायला लागली. 

"ओहो बाईला आज खुप अभ्यास करायचा आहे वाटतं. 

जेव्हा की तब्येत बरी नाही तिची." मोना तिच्या मागे मागे चालत म्हणाली.

सगळे धावत पळत मागोमाग आलेत.

"खरेच का तुझी तब्येत बरी नाहीये? अगं मग घरीच आराम करायचा होता." चारु तिला म्हणाली.

"आता ठिक आहे. पण तरीही थोड्यावेळाने मी घरी जाते."

प्रियु तिचा हात पकडत म्हणाली.

चारु, मोना, प्रियु, विनीत, अभिनव, विराट, चिन्मय, नेहमीच सोबत असायचे. त्यांच्यात चांगली घट्ट मैत्री होती. सगळे बीएस्सी फायनल ईयरला होते.

सगळेच मानखुर्दच्या विविध भागातून चेंबूरच्या भारती काॅलेजला यायचे. ह्या दोन वर्षात त्यांच्यात छान बाँड तयार झाला होता. एकमेकांना काॅलेज वर्क मध्ये मदत करणे. 

काही अडचणी असल्यास, एकमेकांजवळ बोलून मनही हलके करायचे. खेळायचे, सिनेमा बघायचे, घरुन आणलेल्या एकमेकांच्या डब्यांवर ताव मारायचे. 

काॅलेज ट्रिपला लोणावळा-खंडाळा, 

महाबळेश्वर ह्या दोन वर्षात फिरुन आलेत.

गणपतीमध्ये तर मुलांनी धमालच केली होती. काॅलेजमध्ये पाच दिवसांचा गणपती बसवून, यथासांग सगळी पुजाअर्चा करुन, जेवणावळ करुन, शेवटच्या दिवशी जी धमाल केली...ती जीवनात कधीच ते विसरु शकणार नव्हते. सतत दोन दिवस मुले वेडे झाल्यागत ढोलताशे वाजवत नाचत विसर्जनात सहभागी झाले होते. आणि मग पुढचे पाच दिवस घरी आराम करत झोपून राहीले. 

सगळे क्लासमध्ये एंटर झालेच होते की तेव्हढ्यात चपराशी दिनकर धावत तेथे आला. "अभिनव तुझ्यासाठी फोन आहे, प्रिन्सीपल सरांच्या आॅफीसमध्ये चल पटकन."

अभिनव लगबगीने दिनकर सोबत गेला.

बराच वेळ झाला तो आला नाही म्हणून चिमण्या त्याला बघायला गेला, तर अभ्या त्याला काॅलेजगेट मधून बाहेर जाताना दिसला.

'अरे यार हा कुठे गेला न सांगता...'विचार करत चिमण्या क्लासमध्ये आला. "अरे माहित नाही काय झाले, अभ्या बाहेर जाताना दिसला."

"अरे त्याच काही खर आहे का. मनमौजी आहे तो. मात्र अभ्यासात हुशार आहे यार.." कौतुकाने चारु म्हणाली.

"ओ हो, इतनी तारीफ...क्या बात हैं बहना..."

तिला डोळा मारत मोना म्हणाली. 

"हे भलता सलता विचार करु नको गं. मी आणि अभ्या...? हॅट...पण आपल्या सर्वांचा जान आहे ना..चिवल्या बावल्या करणारा..सगळ्यांना हसवणारा...म्हणून..!"

थोड्या वेळाने प्रियु सगळ्यांचा निरोप घेऊन घरी जायला निघाली. बस स्टाॅप वर आली, बसमध्ये चढल्यावर एक रिकामी सीट बघून ती पटकन तिथे बसली. खिडकीतून बाहेर बघताना तिला आईचे बोल आठवले,"मुलाकडचे येणार आहेत तुला बघायला." 

'मी काय कचकडी बाहुली आहे. मला बघायला यायला. ह्या लोकांना काही कामं आहेत की नाही. का याव ह्यांनी मला बघायला? आज तर वर्कींग डे आहे. तरीसुद्धा कसा वेळ मिळाला ह्यांना. नाही मला नाही लग्न करायचे. मी सांगते आईला आणि वेळ पडल्यास बाबांशी पण बोलते.' मनोमन निर्धार करुन सुस्कारा सोडत तिने बसमध्ये नजर वळवली. आणि चमकून पुन्हा समोर उभ्या असलेल्या व्यक्तिकडे बघितले. 'अरे, हा तर तोच...गॅलरीतला. आज बस मध्ये...! गोरापान सुंदर आहे गं. कुणालाही आवडेल असा. गेले दोन वर्षे येता जाता गॅलरीतून बघतो. आज हसला, टाटा पण केला आणि चक्क गाडी मध्ये आता..! वा प्रगती आहे...!' म्हणत तिने त्याच्यावरुन नजर वळवली आणि कपडे सावरुन पुन्हा ती खिडकी बाहेर बघू लागली.

आता तिच्या पायांची हातांची चुळबुळ सुरु झाली होती. सारख तिच मन म्हणत होतं, बघ समोर, तुला आवडणारी व्यक्ती जवळच आहे. महत् प्रयासाने तिने पुन्हा समोर बघितले, दोन डोळे तिलाच निरखत होते. नजरानजर झाल्या बरोबर तो ओळखीचं गोड हसला...शहारुन प्रियु पण कसनुसं हसली. एवढ्या जवळून तो तिला निरखत होता. तिला कसेसेच होऊ लागले. चेहरा घामाने डबडबला. कुठे बघू आता...? काहीच न सुचून तिने पुढ्यात असलेल्या बॅगवर डोके टेकवून दिले. चेहरा लपवल्यावर आता कुठे तिला बरे वाटले. पण कुणीतरी बघतय ही भावनाही सुखावून गेली. ह्रदयाची धडधड वाढवून गेली. तिने कल्पना नव्हती केली की, गॅलरीतील व्यक्ती कधी अशी आपल्या समोर येईल.

क्रमशः

संगीता अनंत थोरात

29/07/22

टीम - अमरावती

ईरा राज्यस्तरीय करंडक स्पर्धा

०००००

🎭 Series Post

View all