कंगोरे भावनांचे - १६

Myriad shades of human emotions..

विषय - कौटुंबीक कथामालिका

शीर्षक - कंगोरे भावनांचे

भाग - 15.....तरुण झाला तसा तो बाहेर जायला घाबरु लागला. कसा बसा काॅलेज करत होता. तसा तो अभ्यासात हुशार होता. पण एकही मित्र त्याने बनवला नाही.

एकदा तब्येत बिघडल्यावर बाबांनी त्याला डाॅक्टरकडे नेले.

आणि तिथून त्याची ट्रिटमेंट सुरु झाली. मध्ये तो नोकरीला पण लागला. पण त्याला घरी यायचीच घाई असायची. आणि कुणावरही तो विश्वास ठेवत नव्हता. ही त्याची मानसीक स्थिती होती. मी ह्याचे लग्न आताच नका करु, असे त्याच्या बाबांना बोललो होतो. पण तरीही त्यांनी केलेच लग्नं.

डाॅक्टरांनी इत्तमभूत माहिती दिली.

सोबत आश्वासन दिले,"वेळ पडल्यास मदत करतील."......

भाग - 16

प्रियुचे तर हसणेच बंद झाले. 

आई तिला बघून मनोमन स्वतःला दोष देत होती. 

आणि बाबा, आईला जबाबदार धरत होते.

पण शोभनाने सारासार विचार करुन ठरवले.

आता प्रियुला परत पाठवायचे नाही.

लवकरच वकीलांशी बोलून "डिवोर्स" फाईल करायचा.

मुलीच्या मायेने तिला कधी नव्हे ते एवढे बळ दिले. 

नवर्‍याला घाबरणारी बायको "आईपणाला" जागली.

माझ्या प्रियदर्शीनीला आनंदाने जगायचा हक्क आहे.

दुसर्‍या दिवशी सगळी परिस्थिती नवर्‍यासमोर ठेऊन तिने आपला मानस बोलून दाखवला.

सगळी परिस्थिती समजून घेऊन बाबा म्हणाले,"मला काही सांगायची गरज नाहीये. न विचारता तू डाॅक्टरांपर्यंत पोहोचलीस ना! मग तुम्हाला जसे वाटेल तसे करा."

आणि आॅफीसमध्ये गेले.

दुपारी त्यांनी घरी फोन करुन वकीलाचा नंबर संजुला दिला.

"अगं आई, बाबांनी वकीलाचा नंबर दिला. 

भारीच आहेत रे बाबाऽऽ"

शोभना समजून चुकली. बोलणार नाहीत पण हा संबंध चुकला हे त्यांना कळून चुकले. आता मी मागे सरणार नाही. चल, माझ्या मुलीसाठी हे आव्हान स्विकारते. 

ती प्रियुला घेऊन वकीलांना भेटली. आणि डिवोर्सची नोटीस अर्जुनला पाठवली. मध्यंतरी अर्जुनने फोन करुन धमकी द्यायचा प्रयत्न केला पण आई बाबांनी त्याला चांगलाच दम भरला. नंतर त्याच्या आईच्या विनंतीचा मान ठेऊन वर्षभराने म्युच्युअल डिवोर्स झाला.

त्यादरम्यान प्रियु पुन्हा काॅलेज मध्ये जायला लागली. ग्रॅज्यूएट झाली. पोस्ट ग्रॅज्यूएशनला तिने अॅडमिशन घेतली.

ह्या सगळ्या घडामोडीत ती "गॅलरीला" जवळपास विसरली होती. पण "तो" तिला न चुकता फाॅलो करत होता.

कालांतराने हे तिच्याही लक्षात आले. 'नाही आता पुन्हा मला ह्या फंदात पडायचेच नाही. जे झाले त्याने आयुष्यभराचा धडा मिळाला आहे. संजु म्हणाली तसे, वेळीच माझी भूमीका स्पष्ट केली असती, तर आज ही वेळ आली नसती.' पण आता परिस्थिती बदलली होती. प्रियु डिवोर्सी होती. आता ती "गॅलरीला" शक्यतोवर टाळू पहात होती. पण त्याचे तिला फाॅलो करणे थांबले नव्हते. आता तर बसमध्ये न चुकता, काॅलेज गेट पर्यंत, त्याच्या फेर्‍या वाढल्या. प्रियुला मनोमन आता चिड येऊ लागली. कळत नाही का ह्या मुलाला...मी अजिबात त्याची दखल घेत नाहीये आणि हा माझा पिच्छा पुरवतोय..! शेवटी एकदा न राहवून प्रियुने मागे मागे चालत असलेल्या "त्याला" रस्त्यात थांबून मागे वळून बघितले. तो सटपटलाच. त्याच्या कडे बघत. डोळ्याला डोळे भिडवत ती "त्याला" म्हणाली. काय चालवले आहेस हे? किती दिवसांपासून बघतेय तुला..हद असते एखाद्या गोष्टीची. का मला फाॅलो करतोस? काही कामबिम आहे की नाही तुला? माझे लग्नं झाले आहे. समजले का...? आणि आता माझ्या मागे येऊ नकोस. सांगून ठेवते...! ती रागाने त्याच्याकडे बघू लागली. तो जागीच उभा राहीला. जाणारे येणारे त्यांच्याकडे बघू लागले. भानावर येत प्रियु पुढे चालू लागली. मनातल्या मनात तिने स्वतःची पाठ थोपटून घेतली. आता हा माझ्या मागे येणार नाही. पण लगेच ती मनातून दुखी झाली. का मी त्याला रोखले...? मला पण तो हवाहवासा वाटतो. त्याच्या बद्दल मनात कुठे तरी काहीतरी आहे. जे माझ्या ओठांवर येत नाहीये. विचार करतच प्रियु घरी पोहोचली.

दुसर्‍या दिवशी नेहमी सारखी प्रियुने तयारी केली काॅलेजला जाण्यासाठी. मन आज उदास झाले होते. उगाच काल त्याला रागावलो. एकदा शांतपणे त्याच्याशी बोलायला हवे होते. समजावून सांगायला हवे होते. कसे आपण एकदम तोडून बोललोत. तिचे मन तिला कुरतडत होते. तो आजपासून दिसणार नाही मला...!

प्रियु रस्त्याने जाता जाता मनाला खुप समजावूनही मनाने ऐकले नाही आणि गॅलरी कडे तिने बघितलेच. धस्स झालं काळजात. काही तरी तुटल्याची भावना मनात जागृत झाली.

म्हणजे...अरेरे, हे मी काय केले...! गॅलरी रिकामी होती.

काॅलेजमध्ये प्रियुचे मन रमले नाही. नेहमीच्या वेळेवर ती काॅलेज बाहेर आली. यंत्रवत बस मध्ये चढली. मला तो जर आता एकदा जरी दिसला नां..तर त्याच्याशी बोलून, मला काय म्हणायचे ते सांगते त्याला. निश्चय करुन खिडकीतून तिने बसमध्ये नजर वळवली. अरे....हां तोच...अरे...मनात तिच्या उकळी फुटली. हा तर, बसमध्येच...म्हणजे म्हणजे...फाॅलो करणे नाही सोडले ह्यानेऽऽऽऽथँक गाॅड बस एकदा बोलायसाठीच पाठवलेस नां तू ह्याला...मनोमन हसली प्रियु. पण तिने त्याच्या कडे नंतर बघितले नाही. स्टाॅप वर उतरताच नेहमी सारखे तो मागे प्रियु पुढे. लटका राग दाखवत मग, एका वळणावर. प्रियु थबकली. वळली, त्याच्या कडे रोखून बघत म्हणाली."आज मला तुझ्याशी काही बोलायचे आहे.जरा बाजूला चल."

तो तिच्या सोबत चालत जवळ असलेल्या बागेत आला.

अचानक प्रियु त्याला म्हणाली.

"माझे लग्नं होऊन आता डिवोर्स झाला आहे. मी डिवोर्सी आहे. 

तुला माहित आहे आणि तरीही तू नेहमी सारखा माझ्या मागे मागे येतोस? सोडून दे हे सगळं. तुझा मार्ग वेगळा आणि माझा मार्ग वेगळा आहे. आपण एकत्र येऊ शकत नाही. समजले?"

"नाही, तुझा मार्ग आणि माझा मार्ग एकच आहे...." तो आत्मविश्वासाने तिच्या डोळ्यात बघत म्हणाला."मी तेव्हाही तुझ्यावर प्रेम करत होतो आणि आताही तुझ्यावर प्रेम करतो.

तुझे लग्न झाले, काही कारणाने डिवोर्स झाला म्हणून माझे प्रेम कमी झाले नाही. मी तुझीच वाट बघत होतो. मला विश्वास होता, एक दिवस तू स्वतःहून माझ्याशी बोलशील....

तुझ्याही मनाच्या कप्प्यात मी आधी पासून दडलेला होतो. मला माहित आहे." तो तिचा हात हातात घेत म्हणाला."आपण लग्न करु. मी घरच्यांना तुझ्या विषयी सगळं काही सांगितले आहे. त्यांचाही काही आक्षेप नाही. आज मी एवढ्या वर्षा पासून मनात साठवलेले बोलतोय. अगदी ह्रदया पासून...त्याच्या डोळ्यात पाणी तरळले होते आता. मग हळूच भावूक होत म्हणाला.......I Love You प्रियु !

Realy I Love You प्रियु...!

प्रियु कुठे तर त्याला नकार द्यायला बोलत होती. 

आणि हा तर मनकवडा निघाला....तो असं काही बोलेल, तिने कल्पना केली नव्हती. तरीही बळेबळेच प्रियु म्हणाली.

तिचा सगळा नकार गळून पडला होता...कुणी तरी आपल्यावर एवढं प्रेम करतय....ती हरखून गेली. जणू जन्माजन्मांतरीचे नाते होते....ती लगेच म्हणाली.

"हे बघ माझं शिक्षण पुर्ण झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही."

"प्रियु, अगं मी तुला आता लगेच लग्न करु असे थोडे ना म्हंटले. आधी तू पीजी कर. तुला नोकरी करायची असेल तर आधी नोकरी कर. मग आपण लग्नं करु. तोपर्यंत मी पण सेटल होतो. आपल्या साठी पुढची तरतूद करतो. खर सांगू प्रियु, तू माझ्यावर विश्वास टाकू शकतेस. मी तुला कधीही दुखावणार नाही की तुझ्या प्रगतीच्या आड येणार नाही. मी खुप खुप प्रेम करतो तुझ्यावर...I Love You प्रियु !

आता मात्र प्रियुने नांगी टाकली. धावतच ती त्याच्या मिठीत शिरली. ज्याचे तिने स्वप्नं बघितले होते. तो तिचा मनातला राजकुमार, तिच्यावर मनापासून प्रेम करणारा, आज प्रत्यक्ष ती त्याच्या मिठीत समाधानाने विसावली होती...I Love You Too !

०००००

अश्या घटना बघितल्या की, संजु सारख्या मुलींचे कौतुक वाटतं. निदान त्या आपल्यासाठी काय योग्य आहे हे जाणतात. आणि वेळीच प्रतिकार करतात. आपले मत ठामपणे मांडतात.

ह्यात अजून विशेष कौतुक आईचे, जिने आपल्या मुलीच्या भल्यासाठी शेवटी तिची साथ दिली. आणि तिला त्यातून बाहेर काढले.....कुणाचीही पर्वा न करता.

लग्नासारखा निर्णय घाईत न घेता विचारपुर्वक घ्यावा आई वडीलांनी. कुणावरही आंधळा विश्वास ठेवू नये. खरेतर पुर्ण शिक्षण झाल्या वर मुलींचे मन जाणूनच निर्णय घेतलेला योग्य ठरतो. सगळ्या मुलींना "तो" मिळेल ह्याची गॅरंटी नसते. आणि प्रत्येकीच्या नशीबी "अर्जुन" नसतो. पण जर "अर्जुन" सारखे पेशंट असतील तर आईवडीलांनी वेळीच ओळखून. योग्य ती ट्रिटमेंट द्यायला हवी. विशेष म्हणजे मानसीक रोगी पुर्णतया ठिक होऊ शकतात. आणि सामान्य जीवन जगतात. ह्या ठिकाणी पेशंट एखादी मुलगी पण असू शकते. 

....अश्या केसेस मध्ये कधी कधी लाजेपोटी कुणाला सांगू शकत नाही...मगं मनात किती दिवस ठेवणार...? जगण नकोस वाटतं....जीव गमावण्याचीही शक्यता असते....मग आपले लेकरु....धडधाकट जिवंत आपल्या समोर असलं...तर काय फरक पडतो...?शेवटी आपले जवळचे सोबती, काळजी घेणारे...हेच असतात....समाजातील लोकं नाही.

मुलगा असो वा मुलगी...जबरदस्तीने त्यांच्यावर हे जोखड लादू नका अशी नम्र विनंती...!

कथामालिका कशी वाटली...?

खरेच वाचली असेल तर रिप्लाय नक्की मला मिळेलच..!

धन्यवाद !

संगीता अनंत थोरात

07/08/22

टीम - अमरावती

ईरा राज्यस्तरीय करंडक स्पर्धा

०००००

🎭 Series Post

View all