कंगोरे भावनांचे - १२

Myriad shades of human emotions..

विषय - कौटुंबीक कथामालिका

शीर्षक - कंगोरे भावनांचे

भाग - 11.....त्याला सुंदर तरुण बायको सोबत असूनही वेगळे काही वाटत नव्हते. रात्री थकून रुमवर आल्यावर कपडे चेंज करुन अर्जुन बाबांच्या रुम मध्ये गेला. आणि आई प्रियुच्या रुम मध्ये झोपायला आली. आज प्रियुला काहीच वाटले नाही. किंबहूना तिने वाट बघायची भूमीका घेतली.

भाग - 12

चार दिवस छान गेलेत त्यांचे. प्रियु आयुष्यात पहिल्यांदा हिलस्टेशनला फिरायला आली होती. घरची परिस्थिती चांगली असूनही कधीच बाबा मुंबई बाहेर फिरायला नेत नसत. दोन चार वेळा आईच्या माहेरी गेली असेल तेवढेच ते फिरणे. म्हणून तिला हा बदलही आवडला.

पुन्हा सासरी नेहमीचे रुटीन सुरु झाले. परिक्षा दोन महिन्यांवर येऊन ठेपली. मोनाने प्रियुच्या घरी जाऊन सांगितले. तिला काॅलेजमध्ये पाठवा. परिक्षेचा फाॅर्म भरायचा आहे म्हणून सांगितले. आईला बर्‍याच दिवसांपासून प्रियुच्या शिक्षणा विषयी काळजी वाटतच होती. निदान हे वर्ष पुर्ण केले की तिच्या हातात डिग्री तरी असेल ना, वेळप्रसंगी शिक्षण कामी येईल तिच्याच, आणि एवढे एज्युकेटेड लोकं, प्रियुला काॅलेज मध्ये का पाठवत नाहीयेत? तिला कळेचना.

चांगले तर आहेत लोकं, पण आपण फोन केला की प्रियु पेक्षा जास्त तर तिची सासूच आपल्या सोबत बोलते. ही बाब आईला कुठे तरी खटकत होती. पण आपण खोलात जाऊन बोलणे बरोबर नाही. असा विचार करुन तिने प्रियुच्या सासरी फोन लावला. अपेक्षे प्रमाणे तिच्या सासूबाईंनी फोन उचलला.जुजबी बोलणे झाल्यावर शोभनाने प्रियुशी बोलायचे म्हंटले. पण ती आताच समुद्रावर जरा फिरायला गेली, म्हणून सासूबाईंनी सांगितले. मग काॅलेज मध्ये फाॅर्म भरायला तिला पाठवा म्हंटले. अर्जुनच्या बाबांशी बोलते आणि पाठवते तिला. त्यांनी हो म्हणून सांगितले. पण पुढच्या चारपाच दिवसात ना फोन ना प्रियु आली. मोना आणि चारु, प्रियुच्या घरी पुन्हा येऊन, बोलून गेल्या. इकडे संजु, नाना प्रश्न उपस्थित करुन आईचे डोके भंडावून सोडत होती. मग आईने मनाचा हिय्या करुन बाबांना प्रियुच्या फाॅर्म बद्दल सांगितले. फोन वरचे बोलणेही सांगितले. मग बाबांनी व्याह्यांना फोन लावला आॅफीसमध्ये. परिक्षे विषयी सांगितले तर ते म्हणाले, मला तर अर्जुनच्या आईने काहीच सांगितले नाही. बहुतेक अर्जुनला पण माहित नसावे. 

"बरं, मी आज बोलतो त्याच्याशी आणि कळवतो तुम्हाला." "अहो त्यात कळवायचं काय, तुम्हाला वेळ नसेल तर मी उद्या प्रियुला घ्यायला येतो आणि तुमच्याकडे आणूनही सोडतो." बाबा म्हणाले.

"बरं बरं काही प्राॅब्लेम नाही. या उद्या तुम्ही तिला घ्यायला."

अर्जुनच्या बाबांनी फोन ठेवला.

रात्री उशीरा अर्जुनचा प्रियुच्या घरी फोन आला. 

"उद्या तुम्ही येऊ नका प्रियुला घ्यायला. बाबांनी उद्या सुट्टी घेतली आहे. ते प्रियुला काॅलेज मध्ये घेऊन जातील. तिथून तुमच्या भेटीला येतील. मला सुट्टी मिळणार नाहीये."

आई बाबा जावयाच्या फोनने चमकलेच. हा येत नाहीये आणि ह्याचे वडील सुट्टी घेऊन येणार ?

मी तर जाणारच होतो ना स्वखुशीने मुलीला आणायला.

मी वडील असून मला का नाही म्हंटले यायला.

कधी नव्हे ते त्यांनी चर्चा केली.

बाबा म्हणाले मी आता शंभू सोबत बोलतो.

त्याच्या कानावर घालतो, तीन महिने होत आलेत, ते प्रियुला आपल्याकडे सोडत नाहीयेत. काॅलेमध्ये ती गेली नाही आणि आता सासरेबुवा तिला काॅलेजमध्ये नेणार? हे आॅड वाटतय!

सुरेशने शंभूला फोन लावला आणि सगळं बोलून घेतलं. शंभूने सुरेशला आश्वस्त केलं,"मी सांगतोय ना, फारच सद् गुणी मुलगा आहे. त्यांच पुर्ण कुटूंबच संस्कारी आहे. प्रियुवर कुठेही अन्याय करणार नाहीत ही लोकं. तरी सुद्धा मी बोलतो. आणी लगेच तुला फोन करतो."

शोभनाची तगमग वाढली होती. अनामिक भीतीने तिच्या मनात काहूर उठले होते. बाबा, शंभू सोबत बोलल्यावर एकदम निश्चिंत झाले आणि आईला म्हणाले,"काय गं काय बाई आहेस तू. विनाकारण शंकाकुशंका काढून माझे मनही कलूषित केलेस त्यांच्याविषयी. उगाचच शंभू सोबत बोललो. तो आता त्यांच्याशी बोलेल आणि मग माझ्या बद्दल तिच्या सासरच्यांना काय वाटेल? अरेरे..." त्यांना प्रश्चाताप होत होता.

आई हिरमुसून मुलींच्या रुम मध्ये आली.

संजुने सगळ ऐकल होतं. ती लगेच म्हणाली,

"अगं जा तू तिच्या घरी. प्रत्यक्ष बघ ना तिच्याकडे जाऊन, नक्की काय सुरु आहे ते. मला तर हे सारे लोकं भामटेच वाटत आहेत. उगाचच गोड बोलून, तिला घरात डांबून ठेवत असतील."

आईने जळजळीत नजरेने संजुकडे बघितले,"देवा किती वेळा म्हणू रे..काय मुलगी माझ्या वाटेला दिलीस. आशेने बघावे तिच्याकडे तर ती घणच घालते डोक्यात."

"हो जा मग बस तिकडे रडत. विचार करत. माझ्यासोबत बोलूच नकोस. मला अभ्यास करायचा आहे." आणि तिने पुस्तकात डोके खुपसले. 

रात्री उशीरा शंभूमामाचा फोन आला. तो म्हणाला अर्जुन तिला एकटीला इकडे पाठवायला तयार नाही. त्याच्या बाबाने तर त्याला म्हंटले होते. तू सोबत जा नाहीतर तिचे वडील येतच आहेत तर त्यांच्यासोबत जाईल ती. पण तो तसं करायला नाही म्हणतो. तुम्ही असे करा जरा शांत रहा. वेळ आहे ना अजून फाॅर्म भरायला. मग बघू, आजकालची मुलं आहेत ती. नवीनच लग्न झालं आहे, दूर पाठवायची इच्छा नसेल होत त्याची. आपल्या तरुणपणातले दिवस आठवा महाराजा..हा हा हा 

शंभू आणि सुरेश दोघेही हसलेत.

बाबांनी काय बोलणे झाले ते सांगितले आईला आणि आता चर्चा नको म्हणाले. पण आईच्या मनाने चिंतेला सुरुवात केली होती.

दोन तीन दिवसानंतर रिसीप्ट आणि काही नोट्स द्यायला मोना, चारु शोभना कडे आल्या. तेव्हा तिला कळले की प्रियु आणि तिचे सासरे काॅलेज मध्ये आले होते. फाॅर्म भरला आणि लगेच निघाले. आम्हाला तिच्याशी बोलायलाही भेटले नाही.

कसे बसे मुलींना चहा नाश्ता देऊन शोभनाने त्यांना रवाना केले.

संंजु लगेच म्हणाली,"काहीतरी गडबड आहे. मी म्हणतच होते ना आई, तुम्हाला माझं काही पटतच नाही. आपण बाबा त्या लग्नाच्या भानगडीत पडणारच नाही. असं असत का कुठे? बाबांवर भरोसा नाही आणि सासर्‍यांसोबत काॅलेजमध्ये...येडचापच हाय तो अर्जुन. आई चल आपण तिच्या घरी जाऊ. बघते बरं तो अर्जुन कसा वागतो तिच्याशी. चल जाऊ आपण, मला प्रियुची आठवण आली. आपलीही बाई येडीच आहे. बस म्हंटलं की बस...एवढच माहित तिला. चल चलते ना?" 

"हे बघ तू थांब जरा, असे तोंड उचलून उठून जाता येत नाही मुलीच्या सासरी. शिवाय बाबांचा प्रश्न आहेच..." आई.

"बाबा...बाबांचाच प्रश्न तू आयुष्यभर सोडवत रहा. अरे आता आमच्या प्रश्नांवर बोलणार की नाहीत ते आणि तू...?"

चिडून संजु म्हणाली. आईने डोळ्याला पदर लावला.

क्रमशः

संगीता अनंत थोरात

05/08/22

टीम - अमरावती

ईरा राज्यस्तरीय करंडक स्पर्धा

०००००

🎭 Series Post

View all