कंगोरे भावनांचे - ११

Myriad shades of human emotions..

विषय - कौटुंबीक कथामालिका

शीर्षक - कंगोरे भावनांचे

भाग - 10......त्यानुसार दोन बसेस बदलून ते हिंदमाताला आले.

मग पुढे मार्केट थोडे पायी फिरायचे असे ठरवून निघाले.

पण बस मधून उतरल्या बरोबर, गर्दीत अर्जुन दिसेनासा झाला.

प्रिया भांबावून इकडे तिकडे बघू लागली......

भाग - 11

बर्‍याच पुढे एका ठिकाणी तिला अर्जुन उभा दिसला. ती त्याच्या जवळ गेली. काही बोलणार तेव्हढ्यात पुन्हा घाईघाईने तो पुढे चालू लागला.

आधी तिने त्याला आवाज द्यायचा प्रयत्न केला. पण तो थोडा थांबून तिला बघायचा. ती जवळ आली की पुन्हा पुढे निघून जायचा. तीनचार वेळा असे झाल्यावर मग प्रियु संतापली. समोरच तिला बसस्टाॅप दिसला. प्रियु उभ्या असलेल्या बसमध्ये चढली. बस जवळच्या डेपोत जाणारी होती. तिथे पोहोचल्यावर पालघरची बस शोधून ती सरळ घरी परतली.

घरी येऊन तिने सासूला सगळे सांगितले.

सासूने अर्जुन वर चांगलच तोंडसुख घेतले.

थांब त्याला येऊ दे, चांगली रागावतेच आता.

आणि प्रियुची आस्थेने विचारपूस करुन तिला जेऊ खाऊ घातले. 

सासू चांगली आहे माझी, पण अर्जुन का असा...?

काय झाले त्याला...? तिला थांगच लागत नव्हता त्याचा.

महिना उलटून गेला. कधी मुहूर्त निघणार...कधी सगळं ठिक होणार...ह्याला मी आवडते की नाही? एक ना अनेक विचार प्रियुच्या मनात पिंगा घालत होते. शेवटी तिने हे सासू जवळ बोलून दाखवले. सासूनेही थातूर मातूर बोलून तिची समजूत काढली. काही दिवसाने लॅन्डलाईन सुरु झाली.

आई सोबत प्रियुचं बोलण व्हायचं पण जवळपास घरातले कुणी ना कुणी असायचे म्हणून मोकळेपणाने तिला माहेरच्यांशी बोलता येईना. शेवटी तिची तगमग बघून बाबांशी बोलून सासूबाईने मुलांना हिलस्टेशनला पाठवायचे ठरवले. अर्जुनला सांगितल्यावर तो ऐकायलाच तयार नव्हता. 

तुम्ही सगळे येत असाल तरच मी हिलस्टेशनला येतो. ही अटच घातली त्याने. मग काय प्रियुला चेंज मिळेल म्हणून सासूबाई, सासरे उटीला त्यांच्या सोबत फिरायला आले.

फार रोमँटिक वातावरण होते उटीचे. फाईव्ह स्टार हाॅटेल मध्ये उतरले होते ते. मोठ्या आलीशान दोन रुम बुक केलेल्या होत्या.

प्रियुच्या मनात फुलझड्या पेटत होत्या. तिने सिनेमात उटीचे बघितलेले सगळे सीन, तिला आठवत होते. तिची उत्कंठा वाढवत होते. फायनली आम्ही आता एकत्र येणार. ह्याच आनंदात तिने छान आंघोळ केली. सॅटीनचा लाल नाईट गाऊन अंगावर चढवला. मंद धुंद करणारा परफ्यूम स्प्रे केला अंगावर. ओलेत्या केसांना पुसतच ती बाथरुम बाहेर आली. 

अर्जुन खिडकी जवळ उभा राहून बाहेर बघत होता.

तिची चाहूल लागताच वळून त्याने तिच्याकडे बघितले.

"अरे आंघोळ केलीस. आणि हे काय घातलस, लालभडक?"

'अरे मुर्खा गाऊन आहे तो. झोपताना घालायचा. बावळट कुठला...' मनोमन प्रियु बोलली.

तिला वाटत होते ह्याने तिला ओढून जवळ घ्यावे नाहीतर तिने त्याला मिठीत घ्यावे. पण दोन्ही गोष्टींसाठी तो चांन्सच देत नव्हता. "ते केसं आधी सुकवं मगच बेडवर झोप. उशी ओली होईल." इति अर्जुन.

"हात्त लेका, म्हणे केसं सुकवं..." चरफडत प्रियु बाहेर गॅलरीत गेली. टाॅवेलने केस पुसायला लागली. पंधरा वीस मिनीटाने बेडरुम मध्ये आली आणि थबकून बेडकडे बघू लागली.

अर्जुन अंगावर ब्लँकेट घेऊन ढाराढुर झोपला होता. 

त्याच्या घोरण्याचा आवाज तिच्या कानी पडला.

आता मात्र तिला कसेसेच होऊ लागले.

असं कसं होऊ शकतं. मी सोबत असताना हा असा कसा झोपू शकतो? काय करु? उठवू का हलवून ह्याला? की देऊ लगावून दोन...हा माझी परिक्षा तर बघत नाहीये ना! हो नक्कीच मी काय करु शकते हेच बघायचे असेल ह्याला!

मग तिने मागचा पुढचा काहीच विचार न करता सरळ ती बेडवर गेली. आणि त्याच्या ब्लँकेट मध्ये शिरली. आणि त्याच्या पाठीमागून त्याच्या अंगावर हात टाकला....तत्क्षणी जोरात ओरडून घाबरुन तिचा हात झटकून तो उठला.

एक नजर तिच्या कडे बघितले आणि तरातरा दार उघडून बाहेर गेला. प्रियु त्याच्या अश्या वागण्याने आधी घाबरली पण लगेच ती त्याच्यामागे बाहेर आली. तो लगतच असलेल्या सासूबाईंच्या रुमचे दार वाजवत होता. 

"अहो हे काय करताय तुम्ही? त्यांना कशाला उठवता?"

म्हणे पर्यंत सासरे बुवांनी दार उघडले.

झटक्यात आत येत अर्जुन म्हणाला,"बाबा ही प्रियु मला बिलगून झोपली आणि माझ्या अंगावर तिने हात टाकला."

धरणी दुभंगून त्यात गडप व्हावेसे प्रियुला वाटले.

ती धावतच आपल्या रुम मध्ये आली आणि चेहरा ब्लँकेट मध्ये लपवून रडू लागली.

हे काय झालं? हा काय लहान बाळ आहे का?असा कसा तो माझ्याबद्दल बाबांसोबत बोलू शकतो? काय विचार करत असतील ते माझ्याबद्दल आता...!

झालेल्या प्रसंगाने तिला सासू सासर्‍यांसमोर खजील केले होते.

प्रचंड लाज वाटत होती तिला. मी आता कुठल्या तोंडाने त्यांच्या समोर जावू? डोकं भनभनले प्रियुचे.

विशेष म्हणजे, रात्री तिच्या मागोमाग, परत रुम मध्ये, ना आईबाबा आले आणि नाही अर्जुन आला.

आईबाबांचे ठीक होते. पण,

प्रियुला अर्जुनच्या वागण्यात काहीतरी गडबड वाटली.

तिने उठून सहजच अर्जुनचे सामान चेक केले. एक मोठ्ठी फाईल त्यात तिला दिसली. फिरायला आला आणि ही फाईल का बरं सोबत? काही आॅफीशीयल कागदांबरोबरच एक औषधांचे प्रिस्क्रिप्शन पण त्यात होते. का कोण जाणे, वर अर्जुनचे नाव बघून तिने पर्समधून पेन काढून औषधांची नावे जवळच्या कागदावर लिहून घेतली. डाॅक्टरांचे नाव आणि फोन नंबरही लिहून ठेवला.

नक्की होत काय आहे माझ्या बरोबर? विचार करत तिचा कधीतरी डोळा लागला. 

दुसर्‍या दिवशी जणू काही, काल रात्री "काहीच" झाले नाही, अश्या अर्विभावात अर्जुन वावरत होता. आई पण तिच्याशी खेळी मेळीने बोलली. आणि हळूच तिच्या कानात म्हणाली,

"तुला, गुरुजींनी काय म्हंटले ते सांगितले ना मी? म्हणून हा गमतीने तसा वागला रात्री. अगं तो आणि बाबा म्हणजे बेस्ट फ्रेंड आहेत. दोघेही एकमेकांना सगळ्या गोष्टी शेयर करतात...आम्हाला, काही नाही वाटले. तू लाजू नकोस. लवकरच हे 'भारी दिवस पण निघून जातील.' चल तयारी कर आपण फिरायला जाऊ आता." आणि मग सगळे उटीतील प्रेक्षणीय स्थळं बघायला बाहेर पडले. आई शक्यतोवर आठवणीने त्यांचे फोटो काढत होती. गाडीत ती प्रियुला अर्जुनसोबतच बसायला सांगायची. मात्र अर्जुन संयमीत भासत होता. त्याला सुंदर तरुण बायको सोबत असूनही वेगळे काही वाटत नव्हते. रात्री थकून रुमवर आल्यावर कपडे चेंज करुन अर्जुन बाबांच्या रुम मध्ये गेला. आणि आई प्रियुच्या रुम मध्ये झोपायला आली. आज प्रियुला काहीच वाटले नाही. किंबहूना तिने वाट बघायची भूमीका घेतली.

क्रमशः

संगीता अनंत थोरात

05/08/22

टीम - अमरावती

ईरा राज्यस्तरीय करंडक स्पर्धा

०००००

🎭 Series Post

View all