कांदेपोहे

Gosht eka lagnachi

कांदे पोह्याला शेवटची वाफ देऊन स्मिताने त्यावर लिंबू पिळला आणि चहाचे आधण गॅसवर चढवून ती खिडकीतून बाहेर डोकावून पाहू लागली. इतक्यात बाबांचा आवाज ऐकू आला, "स्मिते आले गं पाहुणे!" तशी ती गडबडीने धावत आपल्या खोलीत गेली. चेहेऱ्यावर पावडरीचा हलकासा हात फिरवून, तिने आपल्या लांबसडक केसाची वेणी घातली आणि पुन्हा स्वयंपाक घरात येऊन उभी राहिली.
पुन्हा थोड्या वेळाने बाबांचा आवाज आला, "स्मिता ये गं बाहेर." तशी ती चहाचा ट्रे घेऊन बाहेर आली.

"हे अठरावं स्थळ..त्यातले चार नकार मीच दिले. बाकी.. मुलाकडच्या मंडळींनी. आता यांचा होकार आला तर ठीक, नाहीतर लग्नाचा विचार मनातून काढूनच टाकायचा. पुरे झाली शोभा आता." मनातल्या मनात बोलत तिने चहा टेबलावर ठेवला आणि समोर बसलेल्या मुलाकडे एक ओझरती नजर टाकली. तो ही तिच्याकडेच पाहत होता. तशी तिने लाजून नजर वळवली. मुलगा अगदी हँडसम होता. पाहतच क्षणी आवडला तिला तो.

नंतर मुलाच्या आईने विचारल्या जाणाऱ्या टिपिकल प्रश्नांची सरबत्ती केली आणि तिनेही सरावल्यासारखी त्यांची उत्तर दिली. पण त्या उत्तरांनी साऱ्यांचे समाधान झाले आणि बसल्या बैठकीत 'होकार' आला. तिला हे अपेक्षितच नव्हत. त्यामुळे बावरली ती.
स्मिताने आपल्या बाबांकडे पाहिले. त्यांच्या नजरेतही होकार होता. मुलात नावं ठेवण्यासारखं काहीच नव्हत. मग तिनेही होकार दिला.
त्या गडबडीत कांदे -पोहे आणायचे राहूनच गेले. ती लगबगीने आत आली.

लग्नाचं वय उलटून गेले, तरी स्मिताचं लग्न काही ठरत नव्हतं. तशा तिच्या काहीच अटी नव्हत्या, पण तो योग काही अजून आला नव्हता. एका सामान्य मुलीच्या ज्या अपेक्षा होत्या तशाच स्मिताच्याही होत्या.
पण काही ना काही कारणाने तिचं लग्न ठरत नव्हतं.

घरात स्मिता आणि तिचे बाबा असे दोघेच राहत असत. आई लवकर गेल्याने आईची माया तिला फारशी मिळालीच नाही. त्यामुळे राहून -राहून तिला आईची खूप आठवण येत राही.
बाबांनी योग्य वयात स्मितासाठी स्थळ पाहायला सुरुवात केली खरी, पण लग्न ठरत नव्हते आणि तिला समजून ,सवरुन सांगणारे जवळचे असे कोणीच नव्हते. मग मनातले सांगायचे तरी कुणाला?
योग्य वयात लग्न झाले नाहीतर किती दडपण येत, याचा अनुभव ती चांगलाच घेत होती. शिवाय 'बाहेरची बोलणारी मंडळीही' काही कमी नव्हती. "खरं ,आज आई असायला हवी होती. तिच्या कुशीत शिरून मन मोकळं केलं असतं. सासरी जाणाऱ्या मुलीच्या विरहाने आईचे डोळे कसे पाणावतात, हे ही अनुभवायला मिळालं असतं!"
या विचाराने तिचे डोळे भरून आले.

आपल्या विचारातून भानावर येत तिने पोह्यांच्या डिश भरल्या. इतक्यात तिच्या होणाऱ्या सासुबाई आत आल्या. त्यांना पाहताच तिला थोड अवघडल्यासारख झालं. पण त्या मायेने तिच्या पाठीवर हात फिरवत म्हणाल्या, "स्मिता अगं तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. मी आहे ना..तुझी आईच समज आजपासून हवं तर मला."

हे ऐकून तिला खूप बरं वाटलं. जणू त्यांनी तिच्या चेहेऱ्यावरचे भाव वाचले असावेत! ती छान हसली त्यांच्याकडे पाहून.

दोघी पोह्याच्या डिश घेऊन बाहेर आल्या. इतक्यात तिचे होणारे सासरे म्हणाले, "मुलांना काही बोलायचे असल्यास जाऊदे बाहेर. तेवढाच मोकळेपणा मिळेल." तशी दोघे उठून बाहेर गेली. काही मिनिट शांततेत गेली, पण अगदी काही वेळातच दोघांची छान मैत्री झाली. त्याचे बोलणे तिला खूपच भावले, तर तिच्या चेहऱ्यावरची प्रसन्न शांतता त्याला खूपच आवडली.

निरोपाच्या वेळी सासुबाईंनी केळीच्या घडाने तिची ओटी भरली. तिने त्यांना वाकून नमस्कार केला. तशा त्या म्हणाल्या, "लवकर ये आपल्या घरी. वाट पाहतोय आम्ही." पुढे स्मिताच्या बाबांकडे पाहून त्या म्हणाल्या, "पुढची बोलणी करण्यासाठी लवकरच येऊ बरं, काळजी नसावी."

जाताना स्मिताचा होणारा नवरा हलकेच तिच्या कानात पुटपुटला ,"मगाशी सांगायचे राहूनच गेले, गडबडीत पोह्यात मीठ घालायला विसरलीस..वाटतं? तरीही होकार दिला आहे हा!"त्याच्या या मिश्किल वाक्याने ती अजूनच गोरीमोरी झाली.
स्मिताने हळूच आपल्या बाबांकडे पाहिलं, त्यांच्या डोळ्यात समाधान दिसत होत.

आजपर्यंत मैत्रिणींकडून खूप ऐकल होत तिने..लग्न ठरल्यावर मन कसं वाऱ्यावर स्वार होतं ते! थोडं उशीरा का होईना, ते आता ती सारं अनुभवणार होती.
आज तिला खूप खूप छान वाटत होतं. आपल्या आईच्या फोटोकडे पाहत ती समाधानाने लाजली..अगदी थोडीशीच.